मुमू लग्न होऊन तिच्या सासरी गेली.
नाठाळ भाऊ ताजूला घरातून हाकलून दिलं, मुमूच्या लग्नात
शेरडं, करडं, बोकडं विकल्यामुळे
गुरांचं वाडगं सगळं मोकळं झालं होतं, या सगळ्यांमुळे आलेल्या
रितेपणाची उदासी हुसेनच्या मनावर, चेहर्यावर स्पष्ट दिसत
होती. त्यातच त्यालाच नव्हे तर घरातल्या सगळ्यांनाच हे जाणवलं होतं की, मृत्यूची सावली आपल्या घरापासून आता दूर नाही. बुढ्ढी आता खचली होती आणि
तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं. तिच्या चेहर्यावरच्या सुरकुत्यासुद्धा चेहर्यावरची
ओल शोषल्यामुळं एखाद्या वाळलेल्या दोडक्याच्या शिरांसारख्या दिसू लागल्या. अल्लाचा
हुकूम येईपर्यंत दिवस काढायचे, एवढंच तिला वाटत होतं.
या सगळ्यांचा परिणाम
प्रत्येकाच्याच वागण्या-बोलण्यावर झाला होता. हुसेन केवळ अबोलच नाही, तर दिवसभर तो रानातच काहीतरी काम करत बसे. झाडाच्या गार-गर्द सावलीत तो
स्वत:चे अंग आकसून पडलेला असे किंवा उगाच आभाळाकडं नजर लावून तासन् तास बसलेला
असे. त्याला आता रानातच बरं वाटे. त्यानं स्वत:ला गावापासून अलिप्त करून घेतलं
होतं. त्याला आता माणसांचा, त्यांच्या गप्पांचा भलताच कंटाळा
आला होता. त्याला आपण फक्त एकटे आणि फक्त एकटेच असावे असे वाटू लागले. घरातल्यांपासूनही
तो थोडा फटकूनच वागू लागला.
बोलणारा माणूस एकदम मुका व्हावा, राघूचा कंठ कोणीतरी आवळून धरावा, त्यामुळे येणारी
अस्वस्थता गावातल्या मंडळींना अस्वस्थ करत होती. बिचारी भली माणसं, त्यांना काही कळेना, हुसेनला असं काय झालं? उन्हाळ्यात नदी, आड आटले तर एवढं तरी लक्षात यायचं
की दोन पाऊस झाले की, वाहू लागतील पुन्हा खळाखळा. पण हुसेन?
तो कोणत्या ग्रीष्मलाहीत अडकला आहे आणि त्यामुळे पेटलेला हा वणवा
कधी विझणार आहे, हे काही कोणाला सांगता येईना. माणसं बोलत
होती, चालत होती, पण बोलताना अन्
गावातल्या रस्त्यावर चालताना त्यांची नजर हुसेनला शोधत होती. तो आज ना उद्या असा
मोकळा-मोकळा भेटेल, पुन्हा तशाच बाता मारेल अन् हुसेन
पूर्वीच्याच रूपात हजर होईल, असं सगळ्यांना वाटे.
पारावर माणसं जमली, देवळापुढं विसावा घ्यायला थांबली, एस.टी.च्या
स्टॉपवर रेंगाळली, तरी प्रत्येक ठिकाणी हुसेनला काय झालंय,
हुसेन भेटला का, याचीच चर्चा होई. कोणी सांगे
भेटला. भेटला पण फार काही न बोलताच पुढं निघून गेला. ‘सलाम
आलेखुम’च्या पुढे त्याची जीभ एकही शब्द उच्चारायला तयार
नव्हती. आता माणसांना त्याची अनुपस्थिती एवढी जाणवू लागली की, त्यांनाच वाटू लागले की, आपणच आजारी पडलो की काय?
शेवटी पारावर माणक्याला लोकांनी विचारलं, ‘‘माणकेश,
अरं हुस्न्या काय मुका झालाय का त्याला कुणी मुस्क्या बांधल्यात?
सांग की जरा, अन् हे बघ, ते समजा मेलं असतं, तर आमी मनाची समजूत घातली आसती,
आता त्ये गेलं देवाघरी, दोन-चार आठवडं वंगाळबी
वाटलं आस्तं, पण कुणीतरी म्हणत व्हतं, तुरुतुरु
चालत रानात जातंय दिवस उगवायच्या आतच. तर मनाची कोणती समजूत घालायची आमी? एवढा चतुर माणूस, लांबवरच्या गप्पा मारणारा, आरं राघूंचा थवा आला तरी, आमचा हुसेनच भारी पडणार.
मोठ-मोठी बॅलिस्टर मंडळी आणली, तरी हुसेनच भारी पडणार,
आपल्या गावचा तो चतुर बिरबलच की राव. अन् ती असं पुतळ्यावनी झालंय.
काय बी बोलंना, चालंना. आता सांगा, आपल्या
मनाची समजूत कशी घालून घ्यायची? त्याला काय झालंय ते तरी
सांग म्हणावं. माणसानी मन मोकळं करावं. पण हे काय पटत नाय.’’
आता माणिक तरी काय उत्तर देणार? म्हणाला, ‘‘उद्या त्याच्या घरी जातो. काय झालंय ते
पाहून येतो अन् सांगतो.’’
दुसर्या दिवशी माणिक हुसेनच्या
घरी गेला. त्यानं दरवाजा ढकलला पण काहीच प्रतिसाद आला नाही. मग तो थोडं खाकरला, खोकला. आतून क्षीण आवाज आला, ‘‘कौन आया?’’
बुढ्ढीचाच आवाज. माणिक घरात जात म्हणाला, ‘‘एवढं बोलणं खोल गेलंय, आजारी दिसते तू, आमाला तर काय समजलं नाय.’’
‘‘हूं’’ बुढ्ढी
एवढंच म्हणाली.
‘‘कुठं गेली सगळी? घरात
तू एकटीच बैठी क्या?’’
‘‘सब गये अपने-अपने कामपें.’’
‘‘कोणतं काम?’’
‘‘मुझे कुछ मालूम नहीं, मेरा ध्यान अब बस अल्ला की तरफ है.’’
‘‘काय?’’
‘‘माबूद इल्लाह.’’
माणिकला हे काही समजले नाही.
बुढ्ढी म्हणाली, ‘‘ला मकसूद इल्लल्लाह. मुझे अब अल्लाके सिवा कुछ पानेका नहीं, कोई आशा नहीं रह गयी. हे अल्लाह!’’
बुढ्ढी फार थकली आहे. माणिकला ती
काय बोलली हे समजलं नाही. पण त्याच्या लक्षात आलं, तिला आता जगायचं
दिसत नाही. बुढ्ढीचा बोलण्याचा मूड नाही हे पाहून तो आल्या पावली परतला.
त्यानं हुसेनच्या रानात जाऊन
हुसेनलाच भेटायचं ठरवलं. तो भर उन्हात त्याच्या शेतात गेला. हुसेन लिंबाच्या
झाडाखाली सावलीत पोतं पसरून त्यावर बसला होता.
माणिकला पाहून तो हसला. बराच वेळ
कोणीच कोणाशी काही बोललं नाही. शेवटी माणिकच बोलला, ‘‘मी घरी गेलो
होतो. बुढ्ढी बिमार है क्या?’’
हुसेननं मानेनं ‘नाही’ म्हणून सांगितलं.
माणिक म्हणाला, ‘‘ती लईच बारीक आवाजात बोलत होती. ‘अल्ला, अल्ला’ करत होती. घरातली माणसं कुठं पांगली म्हणून
विचारलं तर म्हणाली, ‘ज्याच्या त्याच्या कामाला’ हुसेन, बुढ्ढी मला असं कधीच तोडून बोलली नाही. मी
आलो की, तिला आनंद वाटायचा, उत्साहानं
ती बोलवायची, बोलायची. मला आज म्हातारी लई थकल्यावनी दिसली.
‘‘म्हातारीचं जाऊंदे, तुमचं समदं घरंच असं काय वागतंय तेबी समजंना. गावातला जो तो म्हणतोय,
हुसेन कुठंय, काय करतोय, पयल्यावनी बोलत नाही. तूच सांग आता त्यांना काय सांगायचं?’’
हुसेननं मातीचा एक ढेकूळ हातात
घेतला अन् लांबवर फेकला. ढेकूळ फुटला. बाजूच्या मातीत त्याचे तुकडे पडले. ढेकूळ
संपला.
‘‘ढेकूळ फुटला.’’ हुसेन
एवढंच म्हणाला.
‘‘लई कोड्यात बोलू नकू. मी तुझा जानी
दोस्त, समद्या गावाला माहिती. मला सांग, तुला काय झालं? घरात काय बिघडलंय? कुणी तुला वाईट-वंगाळ बोललंय, तर सांग मला.’’
हुसेननं हसण्याचा केविलवाणा
प्रयत्न केला. म्हणाला, ‘‘कुणाबद्दल माझी तक्रार नाही. मला आता
वाटतं, एकटा थोरला गडी कुठवर लढणार. एकात व्हतं तवर मला
मोकळीक व्हती. आता मीच म्हणलं, आपल्याला काय कामाची सवय नाय,
पण रानात बसलो तर निदान राखण तरी व्हती. आता मी दिवसभर इथंच असतो.
टाइम घावला तर यीन पारावर.’’
‘‘ये ये, तुझी वाटच
बघतेत. आरं तुमच्या समद्या घराला काय झालंय, मला समजंना.
बुढ्ढीबी काय बोलत नाय, तुबी काय बोलत नाय, आरं बोललं म्हंजी मन निर्मळ व्हतं. देवानी जलम दिलाय तर आपण आनंदानं
वागायला पायजे, असं रुसल्यावणी वागू नकू.’’
‘‘खरंय,’’ हुसेन
म्हणाला. त्यांच्या थोड्या गप्पा झाल्या पण हुसेन काही खुलला नाही. माणिकची पायपीट
वाया गेली.
हुसेन गावात दिसला नाही, म्हणून काय झालं? सगळीकडं त्याचं अस्तित्व जाणवत
होतं. शाळेतली मुलं एकमेकांशी गप्पा मारताना हुसेनची आठवण काढत होते. एखादा मुलगा
फार अशक्य गोष्टी बोलू लागला तर त्याला दुसरी मुलं ‘हुसेनभाई
बाताड्या दिसतोस’ म्हणायचे.
मोठी माणसंसुद्धा असंच बोलत. परवा
कुठलीतरी सभा झाली. पुढारी माणूस बोलत होता. ‘गावात रस्ते आणायचे,
पोस्ट आणायचे, शाळा वाढवायची, दवाखाना खोलायचा, ही कामं कोण करणार? मीच करणार, मी ह्या गावासाठी जीव टाकणार.’
पुढारी बोलून गेला. तो गेल्यावर
माणसं एकमेकांत बोलायला लागली, ‘आवं त्यो पक्का
हुसेनभाई बाताड्या दिसतोय. काय करणार नाय. इतकी दिवस कुठं तरफडला व्हता.’ एका मिनिटात त्याला हुसेनभाई बाताड्या करून टाकला.
एखादा माणूस एखादी गोष्ट जास्त
फुगून सांगू लागला, न पटण्यासारखं आख्यान लावत बसला,
तर त्याचा उल्लेख ‘हुसेनभाई बाताड्या’ असाच करू लागले.
शेवटी काही माणसांना वाटू लागलं, ‘आयला, ती हुस्न्या काय आता भेटत नाय तर नवा हुसेनभाई
बाताड्या गावाला पायजे.’ हुसेनभाईची इतकी सवय आणि त्यातून
गरज गावाला निर्माण झाली.
माणसं नवा हुसेनभाई भेटंल या आशेवर
आहेत. पण ‘हुसेनभाई बाताड्या’ म्हणजे काय बाजारात मिळणारी वस्तूय का? का डॉक्टर,
वकीलय? पहिला नाय मिळाला तर दुसरा पकडला?
मग फक्कड पाटील एक दिवस म्हणाले, ‘‘आवं दुसरीकडं कुठं बघता, आपला हुसेन पंक्चर झालाय.
तर पंक्चर काढा. त्याच्यातच हवा मारा अन् गाडी पुढं चालवा.’’
पण हुसेन आता कोणत्याही पंपाने
फुगणार नव्हता.
हुसेन गावाला हवा होता. माणसातला
माणूस एकटा राहणं इतकं शक्य आहे का? त्यानं असं
गावापासून अलिप्त होणं अवघड होतं. पण एखाद्या साधू-संन्यास्यानं कडक निर्णय घ्यावा
अन् तसंच वागावं, तशा पद्धतीनं हुसेन वागत होता.
एक-दोनदा हुसेन गावात दिसला.
माणसांना ‘राम राम’, ‘सलाम
आलेकुम’ करत हसत-हसत पुढं निघून गेला. अलीकडं तो पायाच्या
बोटावर भार देऊन टाचा वर करत चालू लागला. कोणीतरी म्हणालं, ‘‘त्याच्या पायाला कुरुपं झालीत.’’ तो चालू लागला
म्हणजे एखाद्या बदकासारखा चाले. मधूनच दोन्ही हातांनी दोन्ही पायावरचा पायजमा
झटकून पुढे चाले. पुन्हा हात, पुन्हा पायजमा झटकणं, तुरुतुरु चालणं.
हुसेनचं सगळंच बदललं होतं. तो
दिसला की माणसं, पोरं टाळ्या पिटत म्हणत, ‘‘आरं बघा, त्यो हुशेन कसा तुरुतुरु पळत चालला,
ये हुशेन थांब लका, थांब लका, जरा आवर स्वत:ला. थांब हुशेन! हुशेन जरा रूको.’’
- अरुण जाखडे

Comments
Post a Comment