सकाळी हुसेन उठला, तेव्हा त्याला कालची संध्याकाळ आठवली. ते भास होते का स्वप्न? आपल्या पाठीमागे भीतीचे भूत लागले आहे, याची त्याला कल्पना आली. आपण ज्या भीतीने झपाटलो आहोत, ती भीती इथे या गावात वाटण्याचं कारणच नाही. काल मला घरी सोडायला निम्मा गाव आला होता. माणक्या आपली वाट पाहत होता. इथे ना धर्म, ना जात, इथे तर आहे फक्त माणुसकीचा झरा. न आटणारा, गटागटा प्या, नाराळाच्या पाण्यावाणी गोड. तो स्वत:शीच हसला. मुंबईचं आता विसरून जाऊ. दोनशे कोसावर भूकंप झाला म्हणजे आपल्या गावात थोडाच होतो. तरीही त्याच्या पोटात शंकेचा गोळा फिरला. आज नाही उद्या, इथपर्यंत पोचलंच ना. आता नवी फॅशन मुंबईत आली की गावातल्या पोरीबाळी नाही का तसली कापडं घालत. हा फिरता गोळा त्याने हातानं एका कोपर्यात बसवावा तसा बसवला. उद्याचं कोण पाहतंय, आज तरी आबादी आबाद हाये ना. तेवढं बास. आता उद्या आपण जगतोय का मरतोय, हे कुठं सांगता येतंय? गोळा जागेवर बसला, हुसेनभाई ताजातवाना झाला. त्यानं पोरांंना हाका मार...