Skip to main content

हुसेनभाईचा पतंग

        नाटकाचा खेळ सुरू झाला. मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता. मधून-मधून ‘शाबास रे गब्रु, शाबास रे बब्रु’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता.
              गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार अतुट होतं. प्रत्येक मुलाशी बोलणार, चेष्टा मस्करी करणार, ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची.
        परवाचीच गोष्ट. अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता, तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं, ‘‘काय बे, तुझा बा, दिसत नाही रे आजकाल?’’  
              ‘‘गावाला गेलेत,’’ अनिलनं सांगितलं. ‘‘अरे, गावाला कुठलं, गेला तो तुला दुसरी आई आणायला’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला. अनिलही लाजून हसला, तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना.
कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला, तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये, नक्कल करून खिजवत असे.
         नागपंचमीच्या काळात पतंग, वावड्या उडविणार्‍या पोरांत हुसेनभाईइतका कोणी रमत नसे. मुलांच्या आयासुद्धा हुसेनभाईला मुलांवर लक्ष ठेवा, पतंगाच्या नादात धडपडायचं कुठंतरी, असं सांगून निर्धास्त राहायच्या. सगळ्याच मुलांना पतंगाचा खाकी कागद आणणं जमायचं नाही, हुसेनभाई त्यांना पोस्टकार्डचा पतंग करायची शक्कल शिकवायचा तर कुणाला घरातल्या जुन्या पतंगावरच. एखाद्याचा पतंग उडत नसेल तर त्याचा पतंग पुन्हा नीट करून देणे, पतंगाचं मोजमाप, मंगळसूत्र, दोरा वगैरे गोष्टीत तो मुलांना मदतच करायचा. याचवेळी मोठ्या मुलांच्या वा माणसांच्या आकाशात उंच जाणार्‍या वावड्या पाहून खूश होणारा, ओरडणारा, दोरा मागं-पुढं ओढण्याच्या सूचना देणारा, हुसेनभाई लहानात लहान आणि मोठ्यात मोठा होऊन जायचा.
           मुलं थकली की, त्यांना गोळा करून तो पतंगाच्या गोष्टी सांगायचा -
              ‘‘पोरांनो, तो दौलतराव - ह्या प्रकाशचा आजा तुम्हाला आठवत नसंल, पण त्याला असा पतंग खेळायचा लई नाद. पुरुषभर उंचीच्या वावड्या तो बनवायचा अन् आभाळात सोडायचा. मांज्या लावून दोर पक्का बनवायचा. वावडी वर गेली की नुसता बुंग, बुंग आवाज यायचा, कसा यायचा?’’
                   ‘‘बुंग, बुंग’’ पोर ओरडायची.
                  ‘‘तर नुसता बुंग, बुंग आवाज नाही, वावडीभी लई वडायची, माणूस पुढं पुढं वडायची. असंच झालं, एक वावडी आपल्या गावातल्या सोमा धनगराच्या पोरानं हातात मागितली. दौलतनी दिली अन् त्या पोराला काय ते झेपलं नाही. वावडी त्याला वडायला लागली, वडता, वडता ते पुढं जायला लागलं, वरडायला लागलं, कुणाचं लक्ष नव्हतं, अन् त्याच्या वरडण्यानं कुणीतरी पाहिलं, वावडी पोर्‍याला पुढं वडत नेती. तर त्यानी माणसांना सावध केलं. 
                ‘‘माणसं वरडायला लागली. ‘आरं सोड, आरं सोड, जाऊंदे वावडी, वावडीचा दोर सोड,’ पण त्या पोराला काय समजंना म्हणा की सुधरंना. ती वावडी वढत होती, आता पोरगं खाली पडलं, अन् वावडीनं वढलं तर छाती-पोट पार सोलून काढलं जाईल, वावडीच्या दोरानं त्याच्या हातात विळखाच घातला होता. 
                ‘‘शेवटी पोर अडकलं काटीच्या झुडपावर आदळून. माणसं पळत गेली. दोरा तोडला, अन् वावडी मोकार सोडून दिली. त्या काटीच्या झुडपावर सोम्याचं पोरगं अडकलं, म्हणून वाचलं, पण पोरांनो, त्या झुडुपात होतं मोहोळ. आगीमोहोळ. आगी माशा सोम्याच्या पोरावर तर तुटून पडल्याच; पण त्याला सोडवायला गेलेल्या पोरावर, माणसांवर भी. आता काय सांगायचा हा हाहाकार...’’ हुसेनभाई थोडं थांबला.
                  ‘‘बापरे,’’ पोरांच्या चेहर्‍यावर भीतीचे भाव उमटले, ‘‘पुढं काय?’’ पोरांनी विचारलं.
           ‘‘पुढं... समद्यांची आंगं फोडून काढली, त्या आगीमोहळाच्या माशांनी. बोंबलत सुटली रानभर येड्यावानी, मरण आल्यावनी. त्यांना वाटायला लागलं, त्यांच्या समद्या अंगात आग-आग व्हायला लागली. बोंबलून-बोंबलून वाट मिळल तिकडं पळत सुटली, अन् माशा त्यांच्या डोक्याभोवती खवळल्यावनी फिरतच होत्या. त्या काय पिच्चा सोडंना. 
              ‘‘शेवटाला का व्हायचं, बैलगाडी करून नेलं दवाखान्यात. त्या वर्साला पतंगाचा खेळ काय गावात रमला नाही. ही आगीमोहळाचं लई आवघड. मरता मरता वाचली. अन् गावातल्या बाई माणसांनी मलाच झ्यापलं, हुसेन तुझ्या भरोस्यावर पोरांना पतंग खेळायला पाठवितो.
            ‘‘त्यात माझा काय संबंध नव्हता. मी असल्या मोठमोठ्या वावड्यात पडत नसतो. ह्या छोट्या पतंगातच मला मजा वाटायची, पोरांना खेळवायला.
              ‘‘आता नागपंचमी आली अन् पतंगाचा खेळ पोरं खेळायला लागली तर मी आपला लई सावध असतो. बारीक ध्यान देतो. काही पोरं लई आतराब असत्यात, खोडकर, उनाड अन् ती माझं नाही ऐकत. असल्या पोरांना मी मग लई खवळतो. पण काही नाही ऐकत. जाऊ द्या.’’
           पण काही म्हणा, पतंग उडवायचा तो आपल्याच पोरांनी, ‘‘आपुणके गावके लडके सबसे भारी.’’
पतंगापेक्षा हुसेनभाईच्या गप्पांचा पतंग वर्षभर उडत असतो अन् त्याची मजा खर्‍या पतंगापेक्षा जरा जास्तीच.
                                                                                                                            - अरुण  जाखडे 

Comments

  1. Karjatchyaa naagpanchamichi aathavan zaali.Thanks._ Shrinivas Bhanage

    ReplyDelete
  2. Karjatchyaa naagpanchamichi aathavan zaali.Thanks._ Shrinivas Bhanage

    ReplyDelete
  3. Sundar, ajun goshtinchi pratiksha aahe

    ReplyDelete
  4. Sundar, ajun goshtinchi pratiksha aahe

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...