Skip to main content

हुसेनचाचा - एक दंतकथा

     

    काही माणसं अशी असतात की जिवंतपणीच दंतकथा बनण्याचे भाग्य त्यांना लाभते. हुसेन अशा थोड्या नशीबवान लोकांपैकी एक आहे. एखाद्या नावापुढे ‘पाटील’, ‘सर’, ‘राजे’ असे बिरुद लागावे तसे हुसेनभाईच्या नावापुढे ‘बाताड्या’ हे बिरुद लागले. त्याचा त्याला अभिमान वाटत नसला तरी रागही नव्हता किंवा कमीपणाही वाटत नव्हता. लोक प्रेमाने बोलतात असेच त्याला वाटे. त्यामुळे विनातक्रार हे बिरुद अधिक पक्कं होत गेलं.
   गावातली प्राथमिक शाळेतली मुलं शिकायला तालुक्याच्या ठिकाणी गेली. बहुतेक मुलं तिथं बोर्डिंगमध्येच राहत होती. रयत शिक्षण संस्थेमुळे खेड्यातल्या मुलांची शिक्षणाची आणि राहण्याची सोय अल्प दरात होत असे. पैसे नसले तर शेतात पिकलेले धान्य नेऊन दिले तरी वसतिगृहात राहता येत असे.
   ही सगळी मुलं संध्याकाळी मैदानावर खेळायला, जेवणाला किंवा रात्री झोपताना एकत्रच असत. एका-एका हॉलमध्ये किंवा वर्गामध्ये तीस-तीस मुलं तर कधी पंधरा-वीस असत. झोपताना मुलांमध्ये चेष्टा-मस्करी, गप्पा-गोष्टी होत. दीपक नावाचा एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, ‘‘थांबा, तुम्हाला सांगतो हुसेनभाईची गोष्ट.’’ मुलांना काहीतरी नवीन हवंच असतं. दहा गावची मुलं तिथं जमलेली. काहीतरी गावाकडच्या गोष्टी सांगत. दीपकलाही त्या दिवशी  हुसेनचाचाची आठवण आली होती. हेही एक हुसेनभाईची गोष्ट सांगायला कारण घडलं होतं. दीपक उठला, आणि डोक्याशी असलेल्या काळपट झालेल्या त्याच्या जुन्या ट्रंकवर बसला. ढोलकं वाजवावं तशी त्यानं दोन्ही हातांनी ती ट्रंक (पेटी) वाजवली. धबधब आवाज झाला. आवाज थांबवून तो म्हणाला, ‘‘ऐका, लई भारी, आमच्या गावच्या हुसेनचाचाची स्टोरी. हुसेनचाचाची म्हंजे त्यांनी आम्हाला सांगितलेली. आता इथं माझ्या गावातली तिघंजण हायेत. पलिकडं नववीच्या वर्गातली दोघं-तिघं हायेतच. तर मी काय सांगतो, ते खरंय का खोटंय याची रुजवात तुम्ही माझ्या गाववाल्यांना विचारून ठरवा. तर ऐका–’’ दीपकनं हुसेनचाचाची गोष्ट सांगितली. सगळी मुलं रमली. म्हणू लागली, ‘‘पण हे खरंचय का?’’ तर दीपकच्या गावातल्या दिलीप आणि अनिलनं सांगितलं, ‘‘शंभर टक्के खरी. हुसेनचाचा आम्हा शाळेतल्या पोरांना गोष्टी सांगायचा. आमच्याशी गप्पा मारायचा. आमचे मुके घ्यायचा. आता आठवण आली तर मन कसं भरून आलंय.’’
    सगळ्याच मुलांना ही गोष्ट आवडली. दुसर्‍या दिवशी झोपताना पोरं पुन्हा हट्ट करू लागले. ‘‘ए, दीप्या सांग की, हुसेनभाईची एखांदी गोष्ट.’’ दीपक म्हणाला, ‘‘आज मी नाही, दिलप्याला सांग म्हणावं. ए, दिलप्या सांग तू आज गोष्ट.’’ दिलप्या काही सांगंना. पोरं ओरडली. ‘‘दिलप्या... भाव खाऊ नकोस. सांग तू गोष्ट.’’
    ‘‘मला मधनंच आठवली नाही तर?’’ म्हणून दिलीप गप्प बसला. शेवटी दीपक म्हणाला, ‘‘मी सांगन मधनंच तुला नाही आठवलं तर.’’ पोरांनी दिलीपला घोड्यावर बसवला. दिलीप म्हणाला,       ‘‘दिप्या, कोणाची सांगू रं?’’
      ‘‘कोणचीऽऽ हं, सांग नेहरू चाचाची.’’
      दिलीपनं गोष्ट पूर्ण केली. पोरं खुश होऊन आनंदानं झोपी गेली. हुसेनभाईच्या गोष्टी पोरांना आवडू लागल्या. पोरं दुसर्‍या दिवशी वेळ मिळाला तर वर्गातल्या किंवा बोर्डिंगमधल्या दुसर्‍या खोलीतल्या मुलांना सांगू लागले. नववीच्या, दहावीच्या वर्गातसुद्धा जी मुलं हुसेनभाईच्या गावची होती, तेही सांगत, ‘खरंच गोष्ट सांगावी तर हुसेनचाचाचीच.’
       अख्ख्या बोर्डिंगमध्ये हुसेन माहीत झाला. त्याच्याबद्दलचं कुतूहल वाढलं, खरंच असा माणूस आजही जिवंत आहे? तर तो दिसतो कसा? पोरांशी बोलतो कसा? नाना प्रश्‍न मुलं विचारू लागली. हुसेनला पाहण्याची त्यांची उत्सुकता शिगेला पोचली.
      ‘बोर्डिंगमध्ये रोज रात्री आठवीच्या, कधी नववीच्या वर्गात काहीतरी रामायण चालतं’, अशी कुणकुण बोर्डिंगच्या रेक्टर सरांच्या कानावर गेली. 
      आज संध्याकाळी मुलं प्रार्थनेला उभी राहिली. प्रार्थना झाल्यावर रेक्टर सरांनी ‘दीपक’ अशी मोठ्यानं हाक मारली. दीपक दचकला. ‘‘चल इकडं ये. समोर उभा राहा.’’ नंतर दिलीप आणि अनिललाही त्यांनी बोलावून घेतलं.
     सरांनी प्रत्येकाचे कान पिरगळत एकमेकांची डोकी एकमेकांवर आदळली. काय झालंय, हे तिघांनाही समजत नव्हतं. ती रडू लागली.
     ‘‘का रे पोरट्यांनो, बापानं तुम्हाला इथं कशाला पाठवलंय?’’
तिघंही गप्प. सरांनी ओरडून तिघांचे केस ओढत विचारलं, ‘‘सांगा, हरामखोरांनो, बापानं तुम्हाला इथं कशाला पाठवलंय?’’
    ‘‘शिकायला’’, दिलीप रडत-रडत म्हणाला.
     ‘‘अरं, तुम्ही इथं असले नाटकं करता व्हय रे? दुसर्‍या पोरांना नादी लावता. खिक् खिक् हसायला लावता. त्यांच्या झोपा मोडता. काढू का बडवून तुम्हाला आता. उद्या सकाळी पेटी डोक्यावर घ्यायची अन् गावचा रस्ता धरायचा.’’
     तिघंही रडू लागले. ‘‘सर, नाही आता असं करणार. पोरंच आमच्या मागं लागतात गोष्ट सांग म्हणून.’’
    ‘‘कोण मागं लागतं, सांगा त्यांची नावं?’’
    आता हे तिघेही अडचणीत आले. ते गप्प बसले. तोंडातून शब्द निघेना. अन् बाकीच्या मुलांना वाटलं, आता आपली नावं हे सांगणार. आता आपली पण काही खैर नाही.
    ‘‘कोणत्या गोष्टी सांगता?’’
    ‘‘सर, वाईट वंगाळ नाही. आमच्या गावात हुसेनचाचा आहे. त्याला लहान मुलं आवडतात. आम्हाला लहानपणापासून तो काहीतरी गोष्टी सांगत आला. आमच्या आई-वडिलांना, गुरुजींना पण हे माहितंय, चांगला माणूस आहे. हुसेनचाचा भेटला नाही, तर पोरांना करमत नाही.’’
सरांच्या लक्षात आलं, हे काही फार वाईट प्रकरण दिसत नाही.
    कोणीतरी ह्या तिघांची अन् बाकी मुलांची चहाडी सरांना सांगितली होती. त्यातला फोलपणा सरांच्या लक्षात आला. सगळ्यांना सांगितलं, ‘‘जा आपापल्या जागेवर.’’
    सगळी मुलं शिस्तीत रांगेत आपआपल्या ठरलेल्या खोलीत व जागेवर जाऊ लागली. सगळी गेल्यावर ह्या तिघांना – दिलीप, अनिल आणि दीपकला सरांनी रागानेच मान हलवून डोळ्यानं सांगितलं, ‘‘तुम्ही पण चला आता.’’
    हुश्श! सगळ्यांना सुटल्यासारखं झालं. मनं हलकी झाली. त्या दिवशी कोणीच कोणाशी न बोलता, गप्पागोष्टी न करता सगळे शांतपणे झोपली.
    पण ह्या प्रकरणाने मुलांच्या मनात हुसेनचाचाला पाहायची, त्याच्याशी बोलायची फारच इच्छा निर्माण झाली. दिलीप एक दिवस म्हणाला, ‘‘चला एखाद्या रविवारी येता का आमच्या गावाला? हुसेनचाचाला भेटवतो. त्याचं घर दाखवतो. चला आमच्या घरी.’’
    एका रविवारी आठ-दहा मुलांचा गट दिलीप, दीपक, अनिलबरोबर त्यांच्या गावाकडं निघाला. आठ किलोमीटरचे अंतर होते. पाच-सहा सायकली भाड्यानं घेतल्या. सरांची परवानगी घेतली. संध्याकाळी परत येतो म्हणाले आणि निघाले, ‘हुसेनचं दर्शन घ्यायला.’
    आदल्या दिवशी अर्धी सुट्टी होती. दिलीप दुपारीच पायी निघाला. दीपक आणि अनिलला म्हणाला, ‘‘पुढं जाऊन घरी सांगतो, ‘पोरं येत्यात.’ हुसेनचाचाला सांगतो, ‘बाहेर कुठं जाऊ नको.’ पुढं जाऊन सगळी व्यवस्था करतो.’’
    हुसेनचाचाला हे सगळं रामायण दिलीपनं सांगितलं, तर तो नुसतंच हसतच राहिला. सारखा म्हणू लागला, ‘‘ए अल्ला, ये क्या मुसिबतमें डाला? मैं क्या इतना बडा आदमी हूँ? मैं कोई देखनेलायक आदमी हूँ? ये कौनसी मुसिबत सामने लेके आया रे तू दिलीप?’’
    आता ह्या बातमीनं गावात मोठी हलचल सुरू झाली. हुसेनच्या बुढ्ढीनं पोत्यातून घमेलंभर शेंगा काढून सुनांना सांगितलं, ‘‘उद्या सकाळी भाजून ठेवा. पोरांना बरा असतो हा माकडखाऊ. त्याच्याबरोबर थोडा गूळ द्या. पुढल्या पडवीत दोन लांब-रुंद घोंगड्या पसरून टाका.’’ बुढ्ढीला अन् हुसेनच्या घरातल्या सगळ्यांनाच नवल वाटत होतं. आपला हुसेन एवढा मोठा कधी झाला, कळलंच नाही.
     तिघांच्या घरी जेव्हा हे समजलं, तेव्हा त्या प्रत्येकाच्या आईनं त्यांना आपल्याच घरी जेवायला आण, असं सांगितलं. पोरं कायबाय घाईत आल्यात. येणार येणार अन् लगीच जाणार म्हणत्यात. पोरांच्या आयांना काय करावं काय करू नये, समजंच ना. 
सकाळी बरोबर नऊ वाजता पोरं पोचली. अनिलचं घर शेतात अन् दीपकचं घर लहान असल्यामुळे दिलीप सगळ्यांना आपल्याच घरी घेऊन गेला.
    थोड्याफार शिळोप्याच्या गप्पा झाल्या. ‘एका सायकलची चेन सारखी पडत असल्यामुळे कसा उशीर झाला’, मुलं उत्साहानं बोलत होती. गटागटा पाणी पित होती. चेहर्‍यावरचा घाम पुसत होती.      
    दिलीपच्या आईनं सगळ्यांना खायचा आग्रह केला, पण पोरांना हुसेनकडं जायची घाई होती. दिलीपच्या आईनं दिलेलं गरम-गरम दूध पिऊन पोरं बाहेर पडली.
     मुलं हुसेनच्या घराबाहेर उभी राहिली. हुसेनला आत चाहूल लागली. तो वाटच पाहत होता. ‘‘आवो, आवो, अंदर आवो’’, करत तो बाहेर आला. आज त्यानं स्वच्छ कपडे घातले होते. लुंगी तर नवीनच असावी असे वाटत होतं. हुसेननं आज साबण लावून आंघोळ केली असावी. त्यानं मुलांना जवळ घेतलं. त्यांच्या पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवत तो प्रेमानं पाहत होता. सारखं म्हणत होता, ‘‘कितने अच्छे लडके; कितने मासूम, कितने प्यारे, आवो, बैठो.’’
     पोरं हुसेनच्या समोर घोंगडीवर बसली. जरा वेळ कोणीच काही बोललं नाही, मग हुसेनभाई म्हणाला, ‘‘बोलो बच्चों, क्या बात है?’’
     दिलीप म्हणाला, ‘‘चाचा, बात कुछ नहीं. तुम्ही आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या, त्या लक्षात ठेवल्या आहेत. त्याच गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या. मुलांना आवडल्या. म्हणाली, ‘हुसेनचाचाला पाहायचंय’, तर आम्ही म्हणालो, ‘चला, भेटवतो तुम्हाला. आज तुम्हाला पहायला, भेटायला ही मुलं आली. त्यांना वाटत होतं असा माणूस असतो का? आहे का? आता तुम्हीच सांगा ह्यांना. बोला ह्यांच्यासंग.’’
     हुसेन खळखळून हसू लागला. त्याला हसू आवरेना. मध्येच तो डोकं खाली घ्यायचा. लुंगीनं डोळे पुसायचा. पुन्हा हसायचा. त्याचं हसूच थांबेना. त्याला खोकला लागला. नाकात पोहताना पाणी जावं तसं झालं. पोरांना काय करावं समजेना. पण तीही हसू लागली. हसण्याच्या आवाजानं घर गजबजून गेलं. हुसेन म्हणाला, ‘‘हसो बच्चो, हसो.
     हसहासाट, हसहासाट, हसहासाट!
    ‘‘तुम्ही खुश, समदं फुकाट, समदं फुकाट!’’ डोळे मिचकावत म्हणाला, ‘‘कसं?’’
त्याचं हे हसणं घरातल्या लोकांना हास्यास्पद वाटू लागलं. पण हुसेन कोणीतरी अजब माणूस आहे, त्याच्यासाठी तर पोरं लांबून आलीत.
     हसण्याचा आवाज ओसरला. मग प्रत्येक मुलाकडं पाहून प्रत्येकाला हुसेन विचारू लागला, ‘‘सांग तुझं नाव काय, गाव कोणतं, आई-वडील काय करतात?’’ प्रत्येकाची विचारपूस केली. प्रत्येकाच्या गावातलं कोणीतरी हुसेनच्या ओळखीचं होतं. मध्येच सांगायचा, ‘आमच्या गावातल्या अमक्या-अमक्याची लेक, तुझ्या गावात दिली, माहिती का तुला? आता मुलांना इतकं कसं माहीत असणार?’ सगळी विचारपूस झाली.
     बुढ्ढी खमंग भाजलेल्या शेंगांचं घमेलं अन् एका परातीत फोडलेला गूळ घेऊन आली. पोरांच्या मधी ठेवून ती म्हणाली, ‘‘खावा, आमच्या गावात काय हाट्टेल नाय, हीच आणलं मूठ-मूठ खावा.’’
     हुसेन बुढ्ढीला म्हणाला, ‘‘ये सब छोकरे अपने पहेचानके निकले. ये जो छोकरा है ना इसके गावमें ओ एक आसामी उसकी लडकी अपने गांवमें इसके लडकेको दी. ये जो दुसरा है, उसके गांवमें अपनी गांवकी लडकी को दी है. और ये जो है ना, उसके गावका फकीर आता है ना हमेशा अपने घर.’’ सगळ्या मुलांची तो अशी ओळख सांगत होता की जणू ह्यांना बरेच वर्षांपासून ओळखतोय.
     दिलीप मुलांना म्हणाला, ‘‘अरे, तुम्ही गप्प का बसला. तुम्ही विचाराना, काहीतरी बोलाना हुसेनचाचाशी.’’
    पोरं त्याच्या एकेक गोष्टी सांगू लागले. प्रत्येक वेळी हुसेन एवढंच म्हणायचा. ‘‘खरंय, ही गोष्ट मात्र खरीचंय. खरंय.’’
    मग हुसेन म्हणाला, ‘‘मुलांनो, ह्या सगळ्या गोष्टी खर्‍या आहेत. हं हं, ये बात सही. दिखाता हूँ.’’ हुसेन आत गेला. जपून ठेवलेली, प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवलेली टोपी आणि जोकर त्यानं मुलांना दाखवला. त्यांच्या हातात दिला.
   कोणी टोपी डोक्यावर घालून पाहिली, जोकरला जवळ घेऊन त्याच्या अंगावरून हात फिरवून परत चाचाकडं दिला.
    एका मुलानं विचारलं, ‘‘चाचाजी, ओ राज कपूर नट आपको कैसे पहेचनता? आम्हाला तर लईच भारी वाटलं. तो तुम्हाला आवडतो का?’’
    ‘‘आवडतो का म्हंजे? आमच्या हृदयात तो जाऊन बसलाय.’’ हनुमानानं छाती फाडून राम दाखवावा, तशी ऍक्शन करत हुसेनचाचा म्हणाला, ‘‘देखो, वो इदर बैठा है. कारण क्यूँ मालूम है तुमको?’’
    मुलं मानेनंच ‘नाही’ म्हणाली. 
    ‘‘भूख और गरिबी. ओ बस इस बातपर फिल्म बनाता है. बस इतना कारण है. अरे, ये क्या आदमी, मैंने उसकी बहोत फिल्मे देखी. ‘फटेला आदमी’. त्याच्या पायातल्या तुटक्या बुटातून पायाची बोटं बाहेर येतात. उसके पास अच्छे कपडे नहीं. ओ बडा हाफिसर या धनिक कभी नहीं रहता. ओ बोलता है, ‘बहती है गंगा वहॉं मेरा गाव’, अहाहा, अरे क्या बात, ‘मेरा बुटा है जपानी, फिरबी दिल है हिंदुस्थानी’, अरे हा शंभर टक्के हिंदुस्थानी. बोलता है, तो ऐसा लगता है, एक गरीबकी आवाज बोल रहीं है. ओ गाता है तो लगता है, अरे, कोई दुखी आत्माकी आवाज गा रहीं है, ओ धनवाला नहीं, कोई बडा कारखानदार नहीं, वतनदार नहीं, बस वो कहता है, ‘मैं एक इन्सान हूँ.’’
     ‘‘बच्चो, ध्यान में रखो, ये इन्सानियत बहुत बडी बात है, तुम कुछबी बनो लेकिन इन्सान और इन्सानियतको मत भूलो.’’
     त्याने मुलांना जोकर दाखवला. ‘‘बच्चे लोक, इसे देखो, ये क्या करता है? इसके पास कोई बडी शक्ती नहीं. लेकिन शक्ती है, लोगोंको खुश करने की, हसाने की. बस बच्चो, तुम जिंदगीभर खुश रहो. समजो, ये जोकर बोल रहा है. मैं भी ऐसी बाते करता हूँ, बच्चे प्यारसे मेरे पास आते है.’’
आत हे सगळं चाललं असताना गावातले लोक मुद्दाम हुसेनचाचाच्या दारावरून जा-ये करत होते. पुन्हा पुन्हा जा-ये करत होते. ते दरवाजापुढं रेंगाळत, थांबून, डोकावून पाहत होते, ‘बाहेरगावची मुलं हुसेनला भेटायला आलीत.’
     मुलं गेली. पण गावात ही चर्चा बरेच दिवस राहिली. हुसेनभाईच्या बाता लांबवर गेल्यात. शिकणारी मुलं त्याला भेटायला आली. गावात कोणाला तरी भेटायला कोण येतंय का? खरंच, हुसेननं नाव काढलं. आपल्या गावाचं नाव काढलं.
    हुसेनबद्दल आता आणखी कथा-दंतकथा तयार होऊ लागल्या.
    ‘हुसेनचाचा जिंदाबाद!’
- अरुण जाखडे

Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...