हुसेनभाई एकदा मुंबईला जाऊन आला. त्याची गोष्ट आता मुलं त्याच्या तोंडून ऐकतीलच पण हुसेन खरंच मुंबईला गेला होता का ? असा कुणाला तरी प्रश्न पडला. तो गेला होता ही गोष्ट खरी आहे. तो कसा गेला , याची पण गंमतच आहे. हुसेनभाईला मुंबईला जावं वाटल्याबरोबर त्यानं आबड्याला गाठलं. आबड्यानी त्याचा उत्साह वाढवला , अन् हुसेनच्या घरच्यांनीही परवानगी दिली. अन् हळूहळू ही बातमी गावभर पसरत गेली. गावभर दवंडी पिटवल्यासारखा बोभाटा झाला. हुसेनभाई मुंबईला चालला. कुणाला आश्चर्य , कुणाला गंमत , कुणाला भीती वाटत होती. कोणी म्हणालं , आरं , ह्यानं कवा गावाची शीव वलांडली नसन तो पार मुंबईला धडकायला निघालाय. कुणाला भीती वाटली , एवढ्या अफाट शहरात हुसन्या चुकला , त्याला वाहनं चुकवता आली नाही , रस्ता वलांडताना गडबडला , वाट चुकला , चकव्यात घावला , तर ह्याची ह्यालाच काय सुधरायचं नाय. त्यात कोणी म्हणलं , मुंबईला लई बनेल अन् गुंड माणसं आसत्येत. ह्याल...