आमनू
कासारची गोष्ट ऐकून सगळेजण थक्क झाले. हुसेन इतका चतुर माणूस आहे, याचं
आश्चर्य आणि कौतुक सगळ्यांनाच वाटत होतं. ते आता जास्ती वाटावं असं वाटू
लागलं. आमनू कासारची गोष्ट प्रत्येकजण आपल्या घरी, दुसर्याला सांगू
लागला.
आज पारावर निर्णय झाला की, आमनूची गोष्ट हुसेननं
शाळेतल्या पोरांना सांगावी. तेवढ्यात शाळेचे एक शिक्षक समोरून चालले होते.
त्यांना ‘‘गुर्जी इकडं या’’, म्हणत हाक मारली. गुरुजी आले. पारावरच्या
माणसांनी त्यांना सांगितलं, ‘‘गुर्जी, आपल्या गावचा हुसेन लई भारी.
त्याच्याकडं बातांचा खजिनाच हाय. त्यातला थोडाफार खजिना आपल्या पोरांना
उलगडून दावलाच पायजे. आवं लई भारी.’’
गुरुजी एकदम तिरस्काराने
म्हणाले, ‘‘कोण तो हुसेन बाताड्या? अहो, सगळे त्याला ‘बाताड्या’ म्हणतात.
पारावरच्या असल्या गप्पागोष्टींना शाळेत असं मुलांसमोर नाही सांगता येणार.
नाहीतरी बर्याच वेळा शाळा सुटल्यावर शाळेसमोर मुलं जमा करून तो गप्पा मारत
असतो. तिथंच सांग म्हणावं त्याला.’’
‘‘आवो गुरुजी, समजून घ्या,
त्यात वाईट-वंगाळ असं काय नाय वो. सालं आमचं हुस्न्या शाळा शिकला नाय
म्हणून मागं पडला, नायतर त्यानीच तुमची तपासणी केली असती.’’
‘‘माझी काय तपासणी केली असती? तुम्ही मला शिकवू नका.’’
‘‘आवो,
गुरुजी इतकं भडकू नका. शिकलं म्हंजी लई हुशार व्हतं म्हणून शान तर आमची
पोरं शाळंत पाठवतो. त्यातनंबी आमी कवा तुमाला काय सांगत आलो नाय,
पयल्यांदाच आपलं सांगितलं. आता तुमी नाय म्हणत असाल तर इषय सुटला. पण
कवा-कवा गावकर्यांचंबी ऐकत जावा की.’’
‘‘नाही ऐकणार. तुम्ही कोण
सांगणार? पारावरच्या गावगुंडीत मला ओढू नका. मी शासकीय माणूस आहे. शाळेत
काय सांगायचं, काय शिकवायचं, ते मी ठरवणार. आलं लक्षात?’’ आणि गुरुजी
तडातडा पुढं निघून गेले.
‘‘आयला, लई फुगराट दिसतंय राव. आपण पोरं
शाळेत धाडतो म्हणून याला पगार मिळतो. अन् आमीबी पोरांसाठीच सांगितलं
व्हतं. नायकावो?’’ नामदेव म्हणाला.
‘‘जाऊदे, त्याचंबी काय चुकलं म्हणा, त्यो त्याच्या कायद्यानं चालणार. आपण असली माणसं. आपल्याला काय धोराण नाय.’’
‘‘धोराण नाय म्हंजी?’’
‘‘आरं,
धोराण म्हंजी, त्याला आदी पाकात जिलबी टाकावी तसा टाकायला पायजे व्हता.
गोड बोलून घोळात घ्यायला पायजेन व्हता. ‘एकदा हुर्डा खायला चला की आमच्या
वावरात’, असं म्हणायला पायजे व्हतं आन् ‘गुरुजी तुमी आमच्या शाळेत
आल्यापासनं आमची पोरं लई हुशार झाली’ म्हणायला पायजे व्हतं. मग खुलला असता
अन् म्हणला असता, ‘पाठवा हुसेनभाईला शाळंत.’ ’’
‘‘अय, कायबी बोलू
नका गड्या. उद्या तुमी म्हणताल, काल किर्तान आवडलं, त्याला शाळंत बोलवा,
उद्या हरदासाची कथा आवडली, बोलवा त्याला म्हणताल. उगं पारावर बसल्या बसल्या
कायतरी बोलू नका. पटंल असं बोला की.’’ नामदेव.
अशा गप्पा चालल्या असतानाच हुसेन आणि माणिक तिथं टपकला.
‘‘अय
हुस्न्या, आता तुझाच इषय चालला व्हता. त्या गुर्जीला म्हणलं, हुस्न्याला
बोलवा की तुमच्या साळंत नायतर आमी घेऊन येतो त्याला. पोराला चार गोष्टी
सांगन तर नाय म्हणतंय ते.’’
हुसेन म्हणाला, ‘‘कशाला माझी मस्करी
करता राव, पोरांना सांगायला मला काय शाळंत जायला पायजे असं नाय. शाळा
सुटायच्या टायमाला मी शाळंम्होरं उभा राहिलो तर पोरंच गोळा व्हत्यात
माझ्याभवती. हुसेनचाचा गोष्ट सांगा म्हणतेत. मला काय गुर्जीची परवानगी लागत
नाय.’’
‘‘सांग राव, जरा खुलून खुलून सांग. आमनू कासारची गोष्ट.’’
‘‘सांगतो, सांगतो. लई दिवस झालं, पोरांना भेटलोच नाय अन् गोष्टबी सांगितली नाय.’’
‘‘हुसेन,
त्यो आमनू कासार मरायला नाय पायजे व्हता गड्या. त्याला उठीव अन् चालू कर
पुढचं. लई भारी गोष्टय राव. ती आसं मेलं कसं कायनू?’’
‘‘जी घडलं
ते मी सांगितलं. असं कुणाला बी मला जीता करता आलं आसतं, तर इथं रांग लागली
आसती आपल्या पारावर. दिवसात एकदाच एस.टी. येती, तिची दहा चकरा झाल्या
असत्या.’’ हुसेन.
‘‘हां, ते खरंय म्हणा.’’
‘‘आता तू एक
काम कर हुशान्या. उद्यापासनं तू देवळात नायतर मसुदीत तू एखांदी गोष्ट सांगत
जा. माणसं तुझ्या पाया पडतीन. अन् टायमाला थोडी चिल्लरपण टाकतीन.’’
हुसेनला
हे सगळं कंटाळवाणं वाटायला लागलं. तो उठला अन् म्हणाला, ‘‘आयला, इसरलोच
की, म्हातारीनं बुकनी, गूळ घिऊन यायला सांगितलं व्हतं.’’ अन् तडातड चालीत
तो घराकडं निघून गेला.
हुसेन गेल्यावर माणसं त्याचं, त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या बापाचं कौतुक करत होते.
हुसेन
दुकानात गेला. दुकानदार त्याच्याकडं बघत सारखा हसत होता. हुसेनला काही
कळंना, तो असं का करतो. हुसेननं पुन्हा सांगितलं, ‘‘अतपाव बुकनी अन्
अर्धाशेर गुळ द्या.’’
शेटजीनं कागदात बुकनी बांधून दोरा गुंडाळून
ती पुडी हुसेनच्या अंगावर फेकली. मग गूळ कागदात बांधला. हुसेनच्या हातात
दिला. गुळाच्या ढेपीवरची गांधील माशी हाकलत त्यानं लोखंडाच्या सळईनं
ढेपीतून गुळाचा टुकडा काढला अन् हुसेनच्या हातात देत म्हणाला, ‘‘खावा
जमादार.’’
हुसेननं नको म्हणून मान हलवली. गांधील माशाकडं बघत तो म्हणाला, ‘‘चावनं बरं का शेटजी.’’
‘‘एखांद्या टायमाला चावनबी नायतर नाय चावणार, आता तिच्या भीतीनं गूळ विकायचा नाय का?’’
‘‘हां ते खरंय, पण तुमी मला बघून हसत का होता?’’
‘‘हसायला म्हंजी काय, समदा गाव येडा केलाय तुमी जमादार तवा मलाबी नवल वाटलं. तुमाला पायल्यावर जरा हसलो.’’
‘‘आसं
वय, ते जाऊ द्या, पण ह्या गांधील माशीची काळजी घ्या बघा. नायतर काय व्हतं,
चावली तर जिथं चावन् तिथं फुग्यावनी आंग फुकतं. आन् लोक त्याला म्हणत्यात
सुजलं. अन् मग त्याच्यावर चिकनमाती काय लावत्यात, तुळशीतली माती काय
लावत्यात. लई तकलीफ व्हती वो. शेटजी, आता तुमी लई चांगली माणसं, आमच्यावणी
वशाट वंगाळ खात नाय. दुसरा कसला वाईट नाद नाय. पण ह्या माशीचा काय भरोसा
नाय. ती काय चांगला वाईट माणूस बघत नाय.’’
हुसेन काही गांधील
माशीला सोडेना, अन् दुसरा विषय काढेना, म्हणल्यावर शेटजी वैतागला.
पुठ्ठ्यानं माशा हाकलत म्हणला, ‘‘हुसेनभाई, यंदा रानात काय पीकय?’’
पण
त्याच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करत हुसेन म्हणाला, ‘‘हां, तर ती मागनं
सांगतो. आधी ऐका. गांधील माशीची भी बघा ना काय तर्हा. शापात आडकली अन्
बसली इकडं तिकडं फिरत. तुमच्या दुकानातच नायवो कुठंबी आढळलं.’’
‘‘शापात?’’ शेटजीनं उत्सुकतेनं विचारलं.
‘‘हां, हां, शापात, पण तुमी ऐकणार असान तर सांगतो. कसंय तुमी कामाची माणसं, आमी काय अशीच रिकामी माणसं.’’
‘‘हां, हां, सांगा ना. आता काय दुकानात गिर्हाईक नाय, सांगा हुसेनभाई.’’
‘‘त्याचं
काय शेटजी, ही आपली पाच-पन्नास गावं हायतं ना ह्याला परगाना का काय
म्हणत्यात तसं होतं. तर ह्या परगान्याची सरदारकी व्हती एका तालेदार
माणसाकडं. त्याचं नाव राजेंद्र महाराज. राजेंद्र महाराज लई शौकीन. कवा
मुलुखगिरीला जायचा, कवा शिकारीला जायचा. तर शिकारीच्या नादात जंगलात वाट
चुकला. चकवा झाल्यावणी ती फिरतच राहिलं. अंधार झाला. त्येवढ्यात त्याला
कुठंतरी चूल पेटवल्यावर होतो तसा जाळ दिसला. जाळाच्या उजेडात झोपडी चमकली.
म्हंजी इथं कुणीतरी राहतंय. जाळाचा माग घेत महाराज तिथं पोचले.
‘‘तिथं
एक ऋषीवनी म्हणजी ऋषीच म्हणाना, दाढी असलेला, मानेवर केस सोडलेला, अंगावर
भस्म लावलेला एक तपस्वी बसलेला दिसला. त्यानं राजेंद्र महाराजाला पाहून
विचारलं, ‘कोणय?’
‘‘मी राजेंद्र महाराज, अमुक अमुक परगान्याचा वतनदार.’
‘‘ठिकय, मला माहीत व्हतं तू इथं येणारयस.’
‘‘माहीत होतं कसं काय?’
‘‘जास्ती
प्रश्न विचारायचे नाय. कुणाची तरी सुटका होती अन् कुणीतरी अडकतो. आता
इथंच मुक्काम कर. तुला रस्ता सापडणार नाही अन् प्रयत्न केला तर वाघांचा बळी
ठरशील.’
‘‘जशी आज्ञा महाराज.’
‘‘राजेंद्र महाराजांनी
तिथं मुक्काम केला. ऋषींना एक सुंदर मुलगी होती. तिला बघून राजेंद्र महाराज
बेचैन झाला. एवढी सुंदर मुलगी त्यानं पूर्वी पाहिली नव्हती.
‘‘ऋषीमहाराजांनी त्याला बाहेर झोपण्याची आज्ञा केली. आत ऋषी आणि त्याची मुलगी. ऋषीनं दार बंद केलं.
राजेंद्र महाराजांना झोप येईना. रात्रभर तळमळत पडला. त्याच्या डोळ्याम्होरनं ती पोरगी काय जाईना.
सकाळ झाली. ऋषीनं झोपडीचं दार उघडलं.
‘‘राजाला विचारलं, ‘अतिथी झोप आली का?’
‘‘राजा म्हणाला, ‘हो, हो, खूप शांत आहे ही जागा. दिवसभर दमलो होतो, खूप छान झोपलो.’
‘‘खोटं बोलू नकोस. रात्रभर तू तळमळत होता.’
‘‘बापरे, ह्या ऋषीची लईच ताकत दिसती.’ राजा लाजला. हळूच म्हणाला, ‘नाय आली, बरोबरंय.’
‘‘का
आली नाही ते मला माहितीय. ही ऋषीकन्या पाहून तू बावचळला. तुझं सगळं मन
तिथंच अडकलं. आता ऐक. हे सगळं विधिलिखित मला माहीत होतं. तू शिकारीला
निघालास. वाट चुकला, इथं पोचला, हे सगळं ठरलेलं होतं. आता पुढचं ऐक, ही
कन्या तुला दिली. तिला तू प्रेमानं सांभाळ. तिनं किती तकलीप दिली तरी तिला
अंतर देऊ नको.’
‘‘नाही महाराज.’
‘‘दोन दिवस राजा तिथं राहिला. ऋषींनी काही विधी केले. मंत्र म्हटले अन् राजाला सांगितलं, ‘जा आता तिला घेऊन, सांभाळ.’
‘‘राजा
नव्या राणीला घेऊन आला. घरात पहिली राणी एकदम भडकली. ती ह्या नव्या राणीचे
केस धरून हाकलून द्यायला लागली. तशी ही चवताळली. अन् पहिल्या राणीच्या
हाताला चावली. चावली तर राणी मोठ्यानं ओरडली. अन् बघती काय तर हात फुगला.
फुगतच चालला. तो काय थांबना. तवा राजानं वैद्याला बोलावलं, म्हणला,
‘‘गांधील माशी चावली.’
‘‘राजा भडकला, म्हणाला, ‘माशी नाय वो, ही ही नवी राणी चावली.’
‘‘आवं मला दिसतंय महाराज, गांधील माशी चावली. हा बघा काटा बाहेर काढला. हातावर चिकणमाती लावा. तुळशीतली माती लावा.’
‘‘राजानं तसं केलं. फुगलेला हात पहिल्यावणी झाला.
‘‘पण राजा हबकून गेला. ‘हे काय, ही बाय माणूसय का माशी? तवा त्यानं तपास करायचं ठरवलं.’
‘‘बरं
ही राणी म्हंजी लईच तापसी, रोज कुणाला तरी झापायची. इंचू चावल्यावणी
चावायची. इंगळीवनीच वागू लागली. तिच्या बोलण्याच्या फटकार्यानं ती
समोरच्याला तोडून टाकायची.
‘‘राजानं विचार केला. परत जंगलात
गेला. महाराजाचं दर्शान घेतलं, अन् सगळी हकिकत बैजवार सांगितली. म्हणला,
‘आवं, ती रूपवान हाय पण माणसं म्हणायला लागली, आवं ती बाय नायी ती गांधील
माशीवनी वागतीया.’
‘‘तवा महाराजानी सविस्तर सांगितलं. म्हणला,
‘मी म्हणलो होतो ना, कुणाची तरी सुटका व्हती अन् कुणीतरी अडकतो. आता त्या
दिवशी तू अडकणार व्हतास, तू अडकलास. चल मी येतो तुझ्याबरोबर तिचा बंदोबस्त
करायला. अरे, ही शापित कन्या विष्णूनं मुद्दाम माझ्याकडं पाठवली व्हती.’
‘‘ऋषी महाराज ‘आलो’ म्हणाले, ‘दरबार भरव.’
‘‘दरबार भरवला, ऋषी महाराज म्हणले, ‘दरबारात माझ्या मानसकन्येला बोलाव.’
‘‘तिला दरबारात बोलावलं.
‘‘ऋषीमहाराजांनी गोमूत्र त्या नव्या राणीच्या अंगावर शिंपडलं. भस्म फेकलं. अन् शाप दिला. ‘तू गांधील माशी व्हशील, पहिल्यावणी.’
‘‘तर ती गांधील माशी झाली. रडायला लागली. महाराजाच्या पाया पडली. म्हणली, ‘तुमी माझे वडील, आपल्या मुलीला अशी माशी बनवतेत का?’
‘‘पण
ऋषी महाराज लई कडक. इरघळला न्हाई. म्हणला, ‘ठीकय, तुला गोड गोष्टी आवडत
नव्हत्या. कडूबेण्यावनी तू वागायची. आता गोडाच्या शोधात तू फिरत राहशील.
जिथं गोड गूळ दिसेल तिथं तू घुटमळत राहशील. माणसानी गोड बोलावं, गोड
वागावं, गोडाच्या शोधात राहावा, म्हणून तुला ही शिकवन देण्यासाठी गांधील
माशी केली. हा शाप सगळ्या गांधील माशांना दिला.’’
‘‘तवापासनं गूळ
दिसला की माशी चिकटलीच समजायचं. आपणबी गोडाच्या म्हंजी चांगल्या
गोष्टीच्या भवती राहावं. एवढंच शिकावं.’’ तेवढ्याच तीन-चार गिर्हाइकं आली.
त्यांच्याकडं बघत हुसेन म्हणाला, ‘‘शेटजी, चालू द्या तुमचं काम. मी
जातो.’’
‘‘आवा जाता कुठं जमादार? थांबा च्या करायला सांगितलाय. दोन मिनिटात गिर्हाइकं मोकळी करतो.’’
गिर्हाइकं गेली. च्या आला. शेटजी म्हणाला, ‘‘जमादार तुमाला लईच माहिती राव.’’
‘‘शेटजी,
तुमीबी गोडाच्या गोळ्यावणीच हायेत. गुळाहून गोड. आवं सगळा गाव मला
‘हुसेनभाई बाताड्या’ म्हणतो पण तुमी मला ‘जमादार’ म्हणता. आता ही लई गोडी
झाली. ऋषीला काय म्हणायचं ते तुमाला आधीच समजलं.’’
हुसेन दुकानाच्या पायर्या उतरत रस्त्याला लागला. शेटजी जाणार्या हुसेनला अन् येणार्या गिर्हाइकाला पाहत उंबर्यात उभा राहिला.
- अरुण जाखडे

Comments
Post a Comment