दिवस बरगडीचे होते. पाऊस चांगला झाला, पिके चांगली होती. हिरवेगार शेतं पाहून माणसं समाधानी होती. ज्वारीची कणसं निसवायला आली. हरभर्यात आता दाणे भरू लागले होते.
ऐनवेळी आभाळ फिरू लागलं. आकाश गच्च भरून येत होतं, वाटायचं आता पाऊस
येणारच. शेतकर्यांच्या पोटात धस्स झालं. कुठं कुठं थोडी झिमझिम पण
झाली. पंधरा दिवस आभाळात ह्या काळ्या ढगांचा खेळ चालला होता. ह्या
आभाळानं घाट्यांना लागलेला हरभरा दाणे आखडून घेऊ लागला. ज्याची भीती वाटत होती
तेच एका रात्री झालं. तासभर वाव्हणी पाऊस झाला, रप, रप, रप.
पिकाप्रमाणेच शेतकर्यांनी माना खाली टाकल्या.
आता ज्वारीला टिक्का पडणार, म्हणजे दाण्यांना काळा डाग, दाणे रसरशीत होणार नाहीत. पावसानं पिकं पुन्हा उफाळून आली. उगीच हिरवेपणा घेऊन थोडी वाढली. हरभरा हिरवागार झाला पण सगळी आंब धुवून गेली. नुसतेच डहाळे वाढले. घाट्यात दाणा मात्र फुलेना.
हुसेन आणखीनच गंभीर झाला. चेहर्यावरचा ताण तो लपवू शकत
नव्हता. एकेदिवशी संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे भाऊ गप्पा मारत बसले.
बुढ्ढीही होतीच. पिकाचा अंदाज चुकला याची हळहळ करत होते. ह्यावर्षी
हुसेनच्या मुलीचं लग्न करायचं होतं. एकत्रातली ती जबाबदारी सगळ्यांनी
पेलवायचं ठरवलं होतं. आभाळ आणि पावसानं सगळा हिरमोड केला. शेवटी थोरला कारभारी फकीर महंमद म्हणाला, ‘‘जाऊ द्या, वेळ आली तर कर्ज काढू.’’ हुसेनला तर काहीच सुचत नव्हतं. तो बारीक
आवाजात म्हणाला, ‘‘लगीन पुढं ढकललं तर नाय चालायचं का?’’ हुसेनला वाटत होतं, त्यामुळं कर्जाचा
ताण येणार नाही. वेगळ्या वाटण्या पुढं ढकलल्या जातील, अन् त्याची प्रिय
मुमु आणखी काही दिवस तरी घरी राहील. मुलगी कोणाला द्यायची, त्याच्या फार
जिवावर आलं होतं.
बुढ्ढी म्हणाली, ‘‘ओ होता है जो अल्ला को मंजूर है. अच्छा लडका देखनेमें आया तो
शादी बनाने की. दिन आते है, जाते है.’’
कुणीच कोणाशी काही बोललं नाही. सुस्कारे टाकत सगळे झोपायला निघून
गेले. हुसेननं पाहिलं, मुमु झोपलेली. तिचा गोरापान नाकेला चेहरा. नाजूक मुमु जणू
चौदहवी का चॉंद. हुसेननं मुमुच्या गालावरून हात फिरवला. मुमु गार
झोपेत होती. हुसेनच्या पोटात कालवाकालव झाली. डोळे भरून बुढ्ढी लांबून
पाहत होती. म्हणाली, ‘‘हुसेन, मुमु ससुराल जानेके बाद तू बीमार पडेगा. मुझे तो कुछ समझता नहीं, सबके घर लडकियां होती है और सबको घर छोडके ससुराल जाना पडता है. आता माझं काय, सगळ्या सुनांचं काय, हेच होतं. तिला चांगलं घर बनून देऊ. इथल्यापेक्षा ती
तिकडं वैभवात राहील. जा, सो जा, सुबह जल्दी उठो.’’
संक्रांत आली अन् गेली. गावात संक्रांतीचं काय कोणाला कौतुक वाटलं
नाही. सगळ्यांच्याच पिकाचं नुकसान झालं होतं. पारावर माणसं जमत
होती पण गप्पा रंगत नव्हत्या. हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला
गेला.
एके दिवशी पारावर गप्पा चालू असताना कोणीतरी विचारलं, ‘‘हुसेनभाई बाताड्या, तू कवा असला
येरवाळी येणारा पाऊस बघितला व्हता का?’’
‘‘बघितला व्हता म्हंजे? आपण समद्यांनीच कवानं कवा तरी पायला असतो. आपलं आवंदा नुकसान झालं, पण येरवाळी येणारा पाऊस कवाबी पडतो. आता तुम्हाला सांगतो हकिकत –
‘‘त्या साली मी गेलो होतो मामाकडं. मामा आमचा व्यापारी. आमच्या समाजातल्या बागवान माणसांचा एक धंदा असतो, तो म्हंजी फळं
इकायचा. तर ही बागवान मंडळी काय करत्यात, नुस्ती फळं नाय इकत. ती लिलाव घेत्यात. म्हंजी कसं तुमच्यासारख्याच्या रानात चिचाचं झाड आसन् तर चिचा कच्या आसतानाच झाड विकत घ्यायचं. म्हंजी त्या सालात चिचा काढायला आल्या की चिचा काढून इकायच्या. मालकाला एकरकमी दाम दिला असतो. त्याचा पुना संबंध नाय. आता चिचा तोडायच्या, घरी आणून नीट ठेवायच्या. बाया लावून फोडायच्या, वरचं टरफल, आतली चिंचुकी बाजूला करून पोत्यात भरून चिचा आडत्याला
हकायच्या. आलं का लक्षात, आवं, म्हंजी कसं व्यवहार लई सरळ. ह्याच्यात निदान दुप्पट फायदा व्हतो. बरं आसं चिचाचाच नाय तर आंब्याचं भी तसंच. झाडांना मोहर लागला अन् लहान-मोठ्या कैर्या लागल्या की आंब्याचं ती झाड नायतर ती आंबवनच इकात घ्यायचं. तेवढ्या सिझनपुरतं आंबं पिकलं की झाड उतरायचं अन् आढीत आंबा पिकून इकायचं. कवा बागवान घेत्यात, कवा आडतीवर जातं, कवा वळखीची माणसं खायला घेऊन जात्यात.
मात्र पैसं दिऊन, फुकाट काय नाय.
‘‘बागवान मंडळीच्या नादानं आमच्या मामानं पाच-सहा आंब्याची झाडं इकत
घेतली. काहींना कैर्या लोंबत होत्या. काहींना मोहर चांगला फुटला व्हता.
आन् तू आता म्हणला ना, ‘येरवाळी, पाऊस कवा बघितला व्हता का’ तर त्यो बघितला त्या टायमाला.
‘‘आता तो पाऊस कसा, ऊन तापायला लागलेलं, पाडवा जवळ आला. आखितीला सिझन जोरात व्हणार, असं आसताना त्यो
येरवाळी पाऊस छातीत धस्स करायला आला. काड् काड् काड् नुसतं आभाळ
कडकायला लागलं. वादळ सुटल्यावनी नुसता फुफाटा फिरायला लागला. अन् वर
आभाळात इजा नाचायला लागल्या. आवं ही इजाचा नाच लई खतरनाक. लढाईत तोफा
फेकाव्यात, घोडं दाणादाण जमीन हादरवत पळावीत तसं झालं अन् ह्यो धिंगाना काय मिटंना तवर ती जी आभाळ फाटलं ती बस, नुसत्या गारा, आवं गारांचा पाऊस. एक गार कुणाच्या डोक्यावर पडली तर तिथं टिंगूळ यायचा. कपाळावर पडली तर भला-मोठा टिंगूळ यायचा अन् दाताडावर आपटली तर कवळी निसटावी तशी दाताळी बाहेर पडायची. गारा आत अन् दात भायीर.
‘‘रानावनात गिलीली माणसं हैरान झाली.
झाडाच्या आसर्याला जावं, तर ती इज झाडावर लई येळा पडली, त्या भितीनं झाडाखाली जाता यायना. हात वर घेऊन डोकं, कान झाकून पळत सुटली. ही पाठाडावर नुसता गाराचा मारा. रातच्याला चोरांना जसं दगडं मारून खाली पाडावं तसं झालं. आवं ही लई भारी संकट आसतं. इजारी मुतानी भिजल्या पण पावसात ते काय दिसतंय. काय ठिकाणी येक गार दहा किलोची, काय ठिकाणी पाच किलोची. वीस-वीस किलोची. तसल्या दणक्यात मी अन् मामा धावलो. पण आमच्या अंगावर फकस्त पाव किलो, नाय तर अर्धा किलो, लईत लई खेळातल्या गोट्यावनी गारा पडल्या. आंग सडाकलं, पण आमी वाचलो.
‘‘दुसर्या दिवशी तपास केला तर समजलं ह्या गाराच्या
पावसात पाच-सहा माणसं, सात-आठ गुरं, कुत्री, मांजरं मरून पडली. आसमानीचा जोर सुलतानीच्या जोरापेक्षा वाईट म्हणत्यात
ती का म्हणत्यात ती कळलं त्या दिवशी मला. पण बरं का मंडळी, आमी वाचलो. पण खरं
मरान तर पुढंच व्हतं.
‘‘सांगतो तुमाला पुढची हकिकत, आता आमच्या मामानं आंब्याची पाच-सहा
बागा घेतल्या ती ठीक व्हतं. पण त्यानं घरात कुणाला न सांगता सावकारकडनं
व्याजानं पैसं घिऊन आणिक झाडं घेतली. त्याला लई मोह झाला, पैसं कमवायचा. तर
ती आंबं ह्या पावसात पार खलास झाली. ज्या झाडाखाली जावं तिथं कैर्याचा
पाऊस, ज्यांचा मोहर फुटला व्हता तिथं झाडं पार बोडकी झाली. कुठं कुठं फांद्या तुटून, झाडं बी अपघात झालेल्या माणसावनी मरायची वाट बघत व्हती.
‘‘मामानं शेतकर्याला इसार दिला व्हता अन् पुढची रक्कम द्यायची व्हती. झाडाची मालकं म्हणायला लागली, ‘इसार तर मिळणार नायीच पण ठरलेला व्यवहार पुरा करा. पाऊस नसता पडला तर आंबे विकून पैसे मिळाले असते तर ते काय तुमी आम्हाला दिले आसते का? त्या पडलेल्या
कैर्या गोळा करान घेऊन जा. पैसे आमाला द्या.’
‘‘शेवटी कायतरी मध्यस्ती घालून व्यवहार
मिटवला. शेतकर्यांनी काय इसार परत दिला नाय. पण व्याजाचा पैसा आता फेडायचा
कुठून, म्हणून मामा पार हाबकून गेला. ती म्हणायला लागलं, ‘त्या गाराच्या
मार्यात मी मेलो आसतो तर बरं झालं आसतं.’ माणूस मेल्यावर रडावं तसं ती रडायला लागलं. थोबाडावर
बुक्या मारून घ्यायला लागलं. त्याला आवरता आवरता अवघाड झालं.
‘‘तवापासनं आमच्या मामाचं घर काय उबदारीला आलं नाय.’’ हुसेन थांबला.
कुणीच काय बोललं नाही. त्या गाराच्या गोष्टीनं सगळीच गारठून गेली.
माणिकनं विचारलं, ‘‘पण मामाचं पुढं काय झालं?’’
‘‘काय व्हणार? शेळ्या राखत फिरतंय माळरानानी. चार शेळ्याच्या पुढं खंडी
दोन खंडी झाल्या. ईदच्या टायमाला बोकडं हकतो. त्याचा बागवानाचा धंदा
त्या गाराच्या पावसात जी बसला ती पुन्हा उठलाच नाय. आवं त्यो झाडांचा सौदा करायला
निघायचा तर टर्लिन का टिरिकॉट म्हणत्यात त्याचा पांढरा शुभ्र पोशाख, हातात पाच-पाच आंगठ्या. त्याला सहा बोटं असती तर सहा घातल्या आसत्या. चालायला लागला की कानातल्या अत्तराचा वास नुसता घुमायचा. आता त्यांच्या अंगाचा येतोय शेळ्यांचा वास.
‘‘बरं का गाववाले, ही येरवाळीचा पाऊस लई खराब. आपलं एवढं नुसकान झालं नाय, त्याचं नशीब
समजायचं.’’
कुणीतरी म्हणालं, ‘‘अय हुसन्या, दहा-दहा किलो, अन् इस-इस किलोची गार म्हंजी लई नवाल बरका. त्याला
गारा म्हणायचं का बर्फाचा गोळा म्हणायचं का गुळाची ढेप? तू काय तर लई
सांगतू राव. अन् तुला अन् तुझ्या मामालाच बरं गोट्यावनी गारा लागाव्यात? कायतरी पटंल आसं
बोल की.’’
हुसेनला राग आला. तो रागानंच बोलला, ‘‘आता मी डोळ्यांनी बघितलं ती खरं का तुमी इथं पारावर बसून बोलला ती खरं? तुमाला पटत नसन तर सोडून द्यायचं. तुमीच इचारलं व्हतं येरवाळीच्या पावसाचं. आता उद्यापासनं मी काय बोलणार नाय. मैने झक मारी और बोल्या. अब मैं बोलूंगा नई. साले मुझे सवाल पुछते. भरोसा नहीं तो ठिकय, कलसे मैं कुछ
बोलनेवाला नहीं.’’
हुसेन रागाने तडातडा चालायला लागला. ज्यानं त्याला उचकवलं होतं, त्यानं पळत-पळत
जाऊन हुसेनला पकडलं अन् ओढत पाराकडं आणलं. तो हसत होता अन् हुसेनला छातीशी आवळून
म्हणाला, ‘‘अय हुसन्या, आपली गंमत केली रं. आजकाल तू लई लगीच तापतो राव. आवं
आम्हाला वाटलं इनोद करावं. पण तुला नाय पटला तर जाऊ दी. मी चुकलो
म्हंतो पण रागावतो कशाला? इथं गारा इकत मिळाल्या असत्याना तर तुला चार-दोन किलो विकत
घिऊन दिल्या आसत्या. त्या इस किलोची गार घेऊन म्हणलं आसतं ‘खा किसून.’’’
‘‘तू अभी भी मुझे भडका रहा है. छोड मुझे.’’ हुसेननं त्याला
झटकून स्वत:ला मोकळं करून घेतलं. तडातडा चालत तो घराकडं गेला.
माणसं गोठल्यावणी बसली. कुणीच काय बोलंना. शेवटी माणिक म्हणाला, ‘‘आजकाल ती लई कावल्यावणी आसतं. त्यानं पारावर यायचं बंद केलं होतं. तुमच्या सांगण्यावरून मीच त्याला पटवला अन् पारावर आणला.’’
‘‘ती खरंय, पण काय कारण आसन् ती असं ताणतणावात दिसतं! लई निर्मळ माणूस आता ती बोलतं, त्यातलं कवा पटतं, कवा नाय पटत, आपण सोडून द्यायचं. पण त्याला संभाळा राव आता.’’
हुसन्याच्या काळजीचं ओझं घेत सगळी उठली. काही न बोलता घराकडं गेली.
समोर देवळातला दिवा प्रकाश देत होता.
- अरुण जाखडे

Comments
Post a Comment