ते केवळ वडाचं झाड नव्हतं. आमच्या गावातला पुराणपुरुषच. लांब लांब पसरलेल्या फांद्या, त्यांच्या पारंब्या, काही लोंबकाळणाऱ्या तर काही पुन्हा जमिनीत सामील झालेल्या. गावात जसं कुणी भिकार, भणंग, अंडेवाला, औषधवाल्या वैदूपासून कितीतरी गावाबाहेरच्या लोकांनी गावात यावं, कुणाच्या घरासमोर बसावं, कुठं अंग लेटून घ्यावं, कुणी बोलावं, भांडावं, भोकणार्या कुत्र्यांनाही सतवावं, पण ह्या सगळ्यांना गाव सगळं पोटात घेतं, समजून घेतं. गावाचं हे पोक्तपण मला आवडतं.
वडाचंही तसंच, घारी, गिधाडं, कावळे, चिमण्यांपासून मुंग्यापर्यंत अनेकांचं ते गावच आहे. खोडाचा आकार एवढा मोठा की त्यामुळं काही सवाष्णी वटपौर्णिमेला ह्यावडाला दोरा न गुंडाळता, नदीकाठच्या बारीक खोड असलेल्या वडाला जाऊ लागल्या. काही मात्र परंपरेने ह्याच वडाला. गावचं ग्रामदैवत असल्यासारखं समजून येतअसतात, दोर्याचा अख्खा रीळ संपूनच घरी जायच्या. बाजूला गोटी आंब्याचा ढीग, त्याच्यावर डोळा गुरवाचा अन् मुंग्याचा.
ह्या वडाला भला मोठा पार केला होता अन् त्या पारावर येणारी-जाणारी माणसं थोडी थांबत. संध्याकाळी राना-वनातून आलेली माणसंही गप्पा मारायला, एकमेकांना भेटायला इथंच रमत. इथं कायमस्वरूपी बसणारा माणूस म्हणजे हुसेनभाई. काही लोक त्याला हुसेनभाई बाताड्याही म्हणत. बाता मारणं हाच तर हुसेनभाईचा मुख्य व पूर्ण वेळ धंदा. ऐन रखरखत्या उन्हात कधी हुसेनभाई बरोबर चार-दोन रिकामटेकडी माणसं दुपारच्या वामकुक्षीसाठी वडाच्या खोडालाच उशी करून लेटत.तशीच त्या दिवशी लेटली होती. मी नदीवरून पोहून आलो होतो आणि घराकडं चाललो, हुसेनभाईनं हाक मारली, ‘‘अय अरुण, ये जरा सावलीला, उनानं तुपलं आंग काळंकुट्ट झालंय. लई रापलाय तू. तिकडं शहरात गेल्यावर हुईन पुना गोरं.’’
मीही बसलो. मला पाहून बाजूला पडलेली माणसं हळूहळू उठताना फार कष्ट होत आहेत, असं दाखवत उठून बसली.
बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. मग त्यातल्या पोपट कोळीनं मोठी जांभई दिली. पाय ताणून आळस दिला अन् म्हणाला, ‘‘काल शनिवार व्हता, आज रविवार,उद्या सोमवार म्हणत पोपटनं पुन्हा जांभई दिली.’’
हुसेनभाईनी दाढीवरून हात फिरवला अन् ओठ हलवू लागला. बघता-बघता दिवस सरत्यात. काल रविवार- दौंडचा बाजार, उद्या सोमवार श्रीगोंद्याचा, परवामंगळवार - राशीनचा, पुन्हा बुधवार. बुधवारचा कुठला काय आठवत नाय पण गुरुवारी भांबुर्याचा अन् आलाच की आपला बाजार शुक्रवारचा.
आपल्या शुक्रवारच्या बाजारला काय रय नाय राहिली. उगं आपलं नवरा बायकूचं भांडण झाल्यावणी. कवा माणसं जमली अन् कवा पांगली काय समजत नाय. पोपट बोलला.
पोपटच काय पण बाकीची पण इतकी घळाटलेली होती की वाटलं, दौंडच्या मिशनरी दवाखान्याच्या बाहेर झाडाखाली बसलेली आजारी माणसंच.
हुसेनभाई उठला. तो बाजूला मशिदीच्या पडक्या भिंतींकडं हलला. हलताना म्हणला, ‘तुमच्या बाजारच्या बातात मी नमाज इसरलो व्हतो, बरं टकुर्यात आलं.
'आता ही बघा, तुमीचं ती चूक. गुमानं घरी चाललं व्हतं तर ये अरुण करून बोलवून घेतलं.’ पोपट कावला.
हुसेन हलल्यावर मीही हललो. पोटात कावळे ओरडत होते. वडावरचे कावळे मात्र गपगार बसले होते.
थोडं पुढं गेल्यावर पुन्हा पाराकडं वळून पाहिलं. ती माणसं पुन्हा लवंडली, कुणी पाय ताणून तर कुणी मुटकुळं करून. रखरखत्या उन्हात. त्यांना वडाची सावली बरी होती, समोर शाळेच्या तीन खोल्या, त्यांच्यावरचा पत्रा, बाजूचं मारूतीचं देऊळ अन् देवळामागचा पिंपळ उन्हाला झेलत उभे. इतकी सामसूम की कुत्रंसुद्धा नाही. हातातला टॉवेल डोक्यावर टाकला. त्या उन्हात घर जवळ करायची घाई झाली.
ती दुपार अशी संपली. उन्हानं बातासुद्धा होरपळ्यासारख्याच, निस्तेज.
छान आहे!
ReplyDeleteवास्तविक गावाकडल्या कितीतरी गोष्टी नोंदवून ठेवण्यासारख्या आहेत.
नव्या पिढीला हुसेनभाई तरी कुठं ठाऊक आहे?
त्याची तर 1992 च्या दंगलीने असे किती तरी हुसेनभाई आपल्याला दुरावले आणि आपणही त्यांना...
धन्यवाद
DeleteWonderful.Though I have seen hundreds of villages in my professional life never experienced such thing.Reminded me of Kamal Desai's story-"Mahadeowadi- Sanjay Arvikar
ReplyDeleteधन्यवाद, तुमचा अभिप्राय माझ्यासाठी महत्वाचा आहे.
Deletepowerful prose.
ReplyDeleteGanesh Devy
Thank you Sir,Your remark has boosted my confidence.
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteThank you Sir, your remark has boosted my confidence.
Deleteअसा गाव आम्ही कधीच पाहिला नाही. त्यामुळे वाचायला छान वाटतं.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteअसा गाव आम्ही कधीच पाहिला नाही. त्यामुळे वाचायला छान वाटतं.
ReplyDelete