त्या दिवशी संध्याकाळी हुसेनभाईचा जो अवतार गावकऱ्यांनी पाहिला, तो यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. सगळ्यांनी बुचकळ्यात पडावं अशीच हुसेनभाईची कर्तबगारी त्या दिवशी दिसली. असा तमाशा त्याने यापूर्वी कधी केला नव्हता. त्या दिवशीची गोष्ट. नुकतीच दिवेलागण झाली होती आणि समोरच्या वाटेने हुसेनभाई येताना दिसला. त्याचा अवतार नेहमीपेक्षा वेगळाच वाटत होता. डोळे तांबारलेले आणि नेहमीप्रमाणे डुलत चालणारा हुसेनभाई थोडा अधिक सरळ व थोडा वेगात चालत होता. मारुतीच्या देवळासमोर गप्पा मारत बसलेली मंडळी आणि तालमीतून बाहेर पडलेले पैलवान एकमेकांशी काहीतरी बोलत होते. तेवढ्यात त्यांना हुसेनभाई जवळ येताना दिसला. कुणीतरी म्हणालं, ‘‘सलाम आलेकुम हुसेनभाई.’’ तर हुसेनभाईने सलाम आलेकुम केला पण एकदा करून काही तो थांबेना. सारखा सारखा तो म्हणत होता, ‘‘सलाम आलेकुम, सलाम आलेकुम, सलाम आलेकुम.’’ सुरुवातीला लोकांना थोडी गंमत वाटली पण नंतर त्यांच्या लक्षात आलं, की काहीतरी घोटाळा दिसतोय. एकजण ओरडला, ‘‘काय रे हुसन्या, काय झालंय तुला?’’ ‘‘एकदम हलका, ह...