Skip to main content

हुसेनची मुमू




    हुसेनच्या घरात मुमताजच्या लग्नाची काळजी सगळ्यांना लागली. बुढ्ढी एक-दोन दिवस गेले की म्हणायची, ‘‘मुम्याची शादी जल्दी बनावो. मैं जानेके पहले देखना चाहती हूँ.’’ तिनं चारी मुलांच्या मागं लकडाच लावला. थोरला गडी पाव्हण्या-रावळ्याकडं चकरा मारू लागला. कुठंतरी चांगली जागा समजावी आणि मुमूला खात्या-पित्या घरात द्यावी, एवढ्या हेतूनं त्यानं सोयरेमंडळीतली ऊठबस वाढवली होती. चार माणसांत मिसळल्याशिवाय चांगला घराणा कसा समजणार? तो आता फिरू लागला. या कामात हुसेनचा काही उपयोग नव्हता. त्यानं कधी घराची, व्यवहाराची, समाजाची रीतभात समजून घेतली नव्हती. तो सतत एखाद्या फकिरासारखं वागत राहिला. त्याला एवढंच माहीत होतं, ‘ऊठ म्हणलं की उठायचं अन् बस म्हणलं की बसायचं.’ त्याची काही अपेक्षा नसते आणि तक्रारही नसते. बुढ्ढी कधी तिच्यावर चिडायची, ‘चार मुलं जन्माला घातलेत तर जरा हालचाल करत जा की’, पण हुसेनचं हूं नाही अन् ना नाही.
     हुसेनची ही कसर त्याची बीबी भरून काढायची. घरात भरपूर काम करायची. जावांना अन् त्यांच्या मुलांना तिनं जीव लावला होता. ती चार दिवस माहेरी गेली तर सगळ्यांना चुकल्यासारखं वाटे. घरचं आवरून कधीकधी ती रानातलं कामं करायची.
     मुमताजचं लग्न जमविण्यासाठी फार फिरावं लागलं नाही. दूरच्या एका नात्यातला मुलगा पसंत पडला. मुलाच्या घरी व्यवसायाचीच परंपरा होती. तालुक्याचं ठिकाण होतं. थोरला गडी महंमदच्या मनात हे स्थळ भरलं. घरी फार बारदाना नव्हता. दोनच मुलं. सायकलचं दुकान होतं. नव्या सायकली, सायकलचे पार्टस् विकणे आणि सायकल दुरुस्तीचं दुकान होतं. ते थोरला मुलगा इकबाल पाहत होता. फळांचं दुकान होतं. कच्ची केळी ट्रकने आणून ती आडीत पिकवून छोट्या दुकानदारांना, हातगाडीवाल्यांना विकली जात होती. ही कामं धाकटं युसुफ पाहत असे. नुकतीच त्याला ही जबाबदारी दिली होती. युसुफ दिसायला फार देखणा नव्हता तरी चार-चौघांसारखा होता. महंमदभाईला वाटलं, आपली परिस्थिती साधारण. आपल्याला हे जवळ करतील का? पण त्यांनाही कळलं होतं, मुलगी फार देखणी आहे. एकत्र कुटुंबात राहणारी आहे. एक दिवस ती सगळी मंडळी मुमूला पाहायला आली. मुमूला पाहून ती खुश झाली. पटकन ‘हो’ म्हणाली, अन् मुमूचं लग्न जमलं.
    घरात धावपळ सुरू झाली. मुमू सगळ्यांची लाडकी, खेड्यात पडली असती तर रानावनात काम करावं लागलं असतं. शेणकूट करण्यात जन्म गेला असता. तालुक्याच्या ठिकाणी ती पडली. घरात नळ, लाईट, नोकर-चाकर सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळं लग्नाचा उत्साह दुप्पट वाढला. मुमूला घरातली भावंडं, गावातल्या मैत्रिणी चिडवू लागल्या. तिची एक मैत्रीण प्रभा तिला म्हणाली, ‘‘तू तुझ्या दुकानातली नवी सायकल घेऊन येत जा.’’ मैत्रिणींच्या उत्साहामुळं, आग्रहामुळं मुमू सायकल चालवायला शिकली. मुमू सायकलवर बसून जाऊ लागली की, हुसेन खुश होऊन सायकलमागे पळत ओरडत असे, ‘‘मुमू, ध्यान से चलावो. बस, बस, जादा जोर से मत चलावो.’’ आजूबाजूला कोणी दिसलं की हुसेन म्हणे, ‘देखो हमारी मुमू कैसी सायकल चलाती है, देखो, देखो वो रानी है ना हमारी’. हुसेन असं तिच्या सायकलकडं बघत किंवा सायकलमागे पळू लागला की, मुमूला फार संकोचल्यासारखं होई.
महंमदभाईनं गावात सगळ्यांना निमंत्रण दिलं. सोयरेमंडळी, पाहुणे मंडळींना भेटून लग्नाला यायचा आग्रह केला. घरातल्या शेळ्या, मेंढ्या विकल्या, कणगीतलं धान्य विकलं, माणिकनं पण हुसेनला पैशाची मदत केली. रीतीरिवाजाप्रमाणं लग्न पार पडलं. मुमू वर्‍हाडाबरोबर निघून गेली.
     निरोप द्यायला गावातली बरीच मंडळी जमा झाली होती. माणिक तर होताच. तो सारखा हुसेनला सांगत होता, ‘‘हसर्‍या चेहर्‍यानं निरोप दे. चेहरा पाडून निरोप देऊ नको. उसका अच्छा हो गया.’’ नवरदेवाला, नवरदेवाच्या आई-वडिलांना हात जोडून हुसेन म्हणाला, ‘संभालके लो’ अन् त्याला रडू आवरलं नाही. सगळ्यांनी त्याची समजूत काढली. माणिक हुसेनचा हात हातात घेऊन घरी घेऊन आला. येताना हुसेनसारखा मागं वळून पाहत होता. मुमू त्याला आता दिसत नव्हती.
मुमूचं लग्न झाल्यापासून हुसेन पारावर संध्याकाळी बसण्याऐवजी, एस.टी. यायच्या-जायच्या वेळेला जाऊन बसे. एस.टी. येईपर्यंत थांबे, खाडकन् दार ओढून कंडक्टरनं डबल बेल मारली की, तो उडणार्‍या धुराळ्याकडं पाहत परत घरी येई. त्याला वाटे एखादे दिवशी ह्याच एस.टी.तून मुमू येईन. ह्या भाबड्या आशेवर तो रोज एस.टी. येण्याच्या वेळेला एस.टी. स्टॉपवर थांबत असे.
      मुमू एक दोनदा येऊन गेली. तिचं मार्गी लागलं. मुमूकडं महंदभाईपण एकदा जाऊन आला. पण मुमू गेल्यापासून हुसेन खचलाच. खरं तर असं व्हायला नको, हे त्यालाही कळत होतं. एक दिवस माणिक त्याला म्हणाला, ‘हुसेन एक दिवस आपण मुमूच्या घरी जाऊन येऊ.’ माणिकनं हुसेनला सांगितलं, ‘मुमूच्या लग्नात तू पायजमा घातला होता, चांगला शर्ट घातला होता. आता तसेच कपडे घालत जा. लुंगी फेकून दे. अरे, सोयर्‍या माणसाकडं जायचं तर नीट कपडे घालून जायला पाहिजे.’ एक दिवस माणिक हुसेनला घेऊन मुमूच्या घरी निघाला. मुमूच्या आईनं, बुढ्ढीच्या सांगण्यावरून काही गोड-धोड बनवून दिलं. हुसेन लग्नातले नवे कपडे घालून आनंदानं मुमूच्या घरी गेला. माणिक आणि हुसेनला अचानक पाहून मुमू खुश झाली. तिच्या सासरच्या लोकांनी चांगला पाहुणचार केला. एक मुक्काम करून माणिक आणि हुसेन परत घरी आले. हुसेननं मुमूचं कौतुक सांगितलं. ‘‘अच्छा  घर मिला. अच्छे आदमी है वो लोग. मुमूका अच्छा हो गया.’’ हुसेन हे सांगत असताना त्याच्या बीबीला आनंद वाटत होता पण मुमूच्या आठवणीनं ती एका बाजूनं डोळ्यातलं पाणी पुसत होती. ती सारखी विचारत होती, ‘‘और क्या बोली मुमू?’’ हुसेन समोर नजर लावून एवढंच बोलला. ‘‘ओर क्या बोलेगी? जो कुछ बोली वो बताया. वो एभी बोली, बाबाजान ये पायजमा और शर्टमें ही तुम अच्छे दिखते हो. अब इसके बाद लुंगी, बनियन ऐसा कुछ मत पहनते जावो.’ त्या दिवसांपासून हुसेनची राहणी बदलली. तो आता लुंगीऐवजी पायजमा वापरू लागला.
      दोन-चार महिने गेले. एक दिवस मधला गडी ताजोद्दिन दारू पिऊन गल्लीत आवाज चढवून बरळत घरी आला. सगळे भाऊ थिजल्यासारखे झाले. बुढ्ढीनं संताप केला, ‘‘ताजू, तू इतना बेकार लडका निकला, मुझे शरम आ रही है. अरे, शराब पिता है तू. पाप करता है. तुझे मालूम नहीं क्या शराब पिना अल्लाको मंजूर नहीं. तू पापी आदमी है.’’ अन् ती खाली कोसळलीच. तिला आवरता-आवरता सगळ्या जावाही रडू लागल्या. घरात आवाज वाढला. शेजार-पाजारची आवाज ऐकून गोळा झाली. महंमदभाईनं ताजूच्या दोन मुसकाडीत लगावल्या. ‘हकाल दे साले को’ म्हणत घराबाहेर ढकलून दिलं अन् घराचा दरवाजा खाडकन् लावून घेतला.
        ‘बहुत बेकार तमाश हुआ’ बुढ्ढी खंतावून गेली. तिनं अंथरूण धरलं. ताजूची बीबी तर पास संकोचून गेली होती. आपल्या नवर्‍यामुळं सगळ्यांना त्रास झाला, तमाशा झाला. तिला फार वाईट वाटत होतं, ती फक्त रडत होती. दुसर्‍या दिवशी कोणी अन्नाला हात लावला नाही. सगळ्यांनी चार घास खावेत म्हणून बुढ्ढी उठली म्हणाली, ‘‘मुझे रोटी खानेकी. लेकिन पहले सबने खानेकी. वो बच्चे लोक देखो, मुह छोटा करके बैठे है. आज स्कूलमेंभी नहीं गये. चलो.’’
ताजू अधूनमधून धिंगाना करत असे. एक दिवस माणिकला घेऊन हुसेन दारू बनवणार्‍या संत्या कोळीच्या रानात गेला. संत्या त्याच्या पडक्या विहिरीत खाली भट्टी लावत असे. संध्याकाळी दारू घेऊन घरी येई, तेव्हा त्याची वाट बघत दहा-पाच दारुडे बसलेलेच असत. हुसेन आणि माणिकला पाहून संत्याला नवल वाटलं. अरे ही काय बिघडणारी माणसं नाहीत. इथं कशाला आली? त्यानं माणिकला विचारलं, ‘‘राम राम पाटील, इकडं वाट कशी वाकडी करून आला?’’ हुसेन आणि माणिक खाली बसले. संत्याला म्हणाले, ‘‘संत्या, तू पण इथं ये. खाली बस समोर.’’ संत्या बसला. माणिक समजुतीच्या आवाजात म्हणाला, ‘‘संत्या ये हुसेन है ना, त्याचा भाऊ ताजू दारू पितो. तुझ्याकडं येत असणार, तू एक काम कर, त्याला दारू देत जाऊ नको.’’
संत्या एकदम बिघडला, ‘‘कुणाला द्यायची अन् कुणाला नाय,  हे तुमी नाय ठरवणार. माझा बापबी नाय ठरवणार. ते समदं मी ठरवणार.’’
त्याचं उद्धट बोलणं ऐकून माणिक आणि हुसेनचं डोकं फिरलं. कचा-कचा दात चावून माणिक काहीतरी बोलणार तेवढ्यात संत्या म्हणाला, ‘‘ए हुस्न्या, वो तेरे भाईको पहले बोल, दो हजारकी उधारी हो गयी. पहले वो पैसे दो.’’
     हुसेनच्या लक्षात आलं, आता आवाज चढवून उपयोग नाही, तो म्हणाला, ‘‘संत्याशेठ, छोड दे ये बुरा काम. पहले गावमें दारूकी भट्टी नहीं थी. लोक शराब नहीं पिते थे. लोगोंके घर जलाके तुझे क्या मिलता है?’’
    संत्या एकदम चिडला. म्हणाला, ‘‘तू काय साधू झाला की, भजनी मंडळातला टाळपिटू. अरे मी काय लोकांची घरं जाळतो का? ते कशाला  मारायला दारू ढोसतेत. त्यांना सांग ढोसू नका. तुझ्या भावाला सांग आदी ढोसू नको. संध्याकाळ झाली की त्याचं नरडं नुसतं आगीनं पेटल्यावनी होतंय. तुमी एवढं सांगायला आला व्हता काय? जावा आल्या वाटंनं आपल्या घरी.’’
दुसर्‍या दिवशी पारावर माणिकनं विषय काढला. म्हणाला, ‘‘त्या संत्याचा बंदोबस्त नाही केला तर गाव पार नासून जाईल. समद्यांनी एक होऊन त्याला दम दिला पायजे की, भट्टी लावायचं काम बंद कर, नायतर गावात राहू देणार नाय.’’
    सगळ्यांना हे पटत होतं. पण कोणीच काही बोललं नाही. शेवटी असं ठरलं की, पाटलाच्या अन् सरपंचाच्या कानावर घालू अन् त्यांनाच संत्याचा बंदोबस्त करायला सांगू.
तसं झालं. लोक पाटलाकडे गेले. पाटील, सरपंच म्हणाले, ‘‘त्याची पोलिसात तक्रार देऊ.’’ तशी तक्रार दिली. दोन पोलीस आले. संत्याच्या भट्टीवर जाऊन त्याला मुद्देमालासह पकडून, पंचनामा करून, अटक करून न्यायचं ठरलं. ते दोन्ही पोलीस संत्याच्या भट्टीवर गेले. संत्याला मुद्देमालासह पकडला, त्याला अटक केली अन् तालुक्याच्या गावाला घेऊन गेले.
दोन दिवसानंतर संत्याला सोडलं. संत्या गावात आला अन् लगेच भट्टी लावली. पुन्हा तोच खेळ सुरू झाला. दोन दिवस संत्या पोलीस स्टेशनमध्ये होता. तिथं त्याला कळलं, पोलिसांना अधूनमधून हप्ते दिले तर काही होत नाही. तो हप्ते ठरवून आला. आता तो असली कामं रानातल्या पडक्या विहिरीत करण्याऐवजी गावातच घरामागच्या पडक्या वाड्यात राजरोस करू लागला. गावातली माणसं थक्क झाली.
    त्यातल्या त्यात एक गोष्ट हुसेनच्या दृष्टीनं बरी झाली. ती म्हणजे घरातून फक्त ताजूला हाकलून द्यायचं ठरलं. बाकी तीन भाऊ अन् बुढ्ढी एकत्र राहणार. बुढ्ढी जिवंत आहे तोपर्यंत ह्या तिघांनी एकत्र राहायचं ठरलं. ताजूला घरामागं पत्र्याच्या दोन खोल्या बांधून दिल्या. बुढ्ढीनं ताजूच्या बीबीला सांगितलं, ‘‘माझा पोरगा हिरा निघाला. त्याच्यामुळं तुला त्रास होतोय, पण अडल्या-नडल्या टायमाला मोकळेपणानं येत जा. काय लागन ते सांगत जा. सांभाळ त्या राक्षसाला.’’ तिनं ताजूला भरपूर शिव्या दिल्या.
    हुसेन आता शुभ्र पायजमा शर्ट घालूनच फिरत असे. गावातले त्याचे मित्र त्याला गमतीनं म्हणू लागले, ‘‘अरे, तू आता दुसरं लग्न करणार दिसतोय.’’
हुसेन हसून एवढंच म्हणाला, ‘‘अरे इस उम्रमे दुसरी शादी क्या करनेकी.’’ हे असे कपडे घालण्यामागचं राज फक्त त्यालाच माहीत होतं. मुमूच्या आनंदासाठी तो आता असेच स्वच्छ, पांढरे कपडे घालणार होता.
    सगळ्या गोष्टीचा परिणाम बुढ्ढीच्या मनावर, शरीरावर होऊ लागला. ताजूच्या वागण्यामुळं ती खचली. ती आता कृश दिसू लागली. ती म्हणे, ‘आता अल्लाचा हुकूम आला की वर जायचं. चार पोरात फक्त हुसेनलाच लडकी झाली. वो अच्छे घरमें गयी इतना देखनेके बाद अब मैं समाधानी मनसे उपर जाऊंगी.’
   दोन महिने गेले अन् निरोप आला, मुमू मॉं बननेवाली है. सगळे खुश झाले. बुढ्ढी म्हणाली, ‘‘मुमूके बच्चे को देखनेके लिये अब मुझे जीनाही चाहिये.’’ तिला एकदम बळ आल्यासारखं वाटलं. घरातले ताण कुठल्या कुठं पळाले.
- अरुण जाखडे

Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...