Skip to main content

हुसन्याचा आरके झाला

     
दुसर्‍या दिवशी सकाळी हुसेनला घेऊन आबड्या इमारतीतल्या सावंत आजीकडे घेऊन गेला. सावंत आजी मूळच्या कोकणातल्या, खेड्यापाड्यातल्या आठवणीत रमणार्‍या. गावाकडून पोटापाण्यासाठी आलेल्या माणसांना मदत करणार्‍या. त्यांच्याच कृपेने आबड्याला जीन्याखाली झोपण्यापुरता आसरा मिळाला होता. आबड्यासाठी तर त्या देवासमान. पापड विकून जमा झालेले पैसे तो सावंत आजीकडे ठेवत असे. गावाकडं जाताना ते परत घेत असे. सावंत आजी त्याच्या साचलेल्या पैशात अकरा रुपयांची भर घालून देत.
      आबड्याबरोबर हुसेनला पाहून त्यांनी हुसेनची चौकशी केली. हुसेनला काहीतरी चांगलं काम हवं होतं. सावंत आजीच्या ओळखीचा माणूस एका बॅण्ड कंपनीत काम करत होता. सावंतबाईंनी विचारलं, ‘‘जा, तो आमच्या गावचा सावत्या तुला बॅण्ड कंपनीत काम देईल.’’
हुसेन आणि आबड्या बाहेर पडले. आबड्या म्हणाला, ‘‘पापडवाल्याकडं जाऊन पैसे जमा करतो, तू पण चल. पापड विकण्याच्या नादात फिरस्ती होते. तुला मुंबई बघता येईल.’’
      ‘‘आबड्या, तुला मी सांगितलं ना, तो पापडवाला आदमी मुझे बहुत डेंजर लगता है तू जरा संभालके उसके साथ संबंध रख.’’
      आबड्या खाली मान घालून म्हणाला, ‘‘हुसेन मुझे भी वो अच्छा नही लगता, कभी कभी थोडीसी गलतीके लिए बहुत गालियॉं देता है, मारता है. फिर भी मेरी मजबूरी है.’’ आबड्याच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणाला, ‘‘मी बुटका माणूस, कमरेत थोडा वाकलेला, एक डोळा नाही, मी कुरूप आदमी, देखनेमें अच्छा नहीं. मुझे दुसरा काम कौन देगा? और जो लोग पापड लेते है ना, वो भी गरीब लोक रहते है बडे लोक होटल में पापड खाते है. गरीबांना पापड म्हणजे पाणी प्यायला आधार. कवा कवा तर उधार भी लेते है वो लोग बाते करते है। पुछते है मेरा नाम, काम, कितना पैसा मिलता है? हुसेन तूच बघ, नाय तर या मुंबईत माझ्याशी कोण बात करणार?’’
      ‘‘अरे आबड्या, अल्ला कसम, तू बहुत अच्छा आदमी है तू कुरूप थोडा है. अरे, तू जब दिल लगाके ताशा बजाता है ना, लोक नाचने लगते है’’ हुसेनने नाचण्याची ऍक्टिंग केली. आबड्या खुदूखुदू हसला.
      ‘‘ऐसा ही हसनेका, साला रोने का नहीं’’, त्याने आबड्याच्या कपाळावर ओठ देऊन मुका घेतला.
       आबड्या पापडवाल्याकडं गेला. हुसेन पत्ता शोधत, बॅण्ड कंपनीत गेला. सावंत आजीनं सांगितलेला सावत्या तिथं भेटला. मालकाशी मुलाखत झाली. मालकाला सगळे मास्टर म्हणत होते. 
मास्टरनं विचारलं, ‘‘काय वाजवतोस?’’
          हुसेन गप्प बसला. मानेनंच काही नाही सांगितलं. ‘‘ठिकय, बँडके आगे तू जोकरका ड्रेस पहनके चलनेका! नाय तर आसं कर, बँडमधी नुसतं रूम्बा शेकर्स वाजव.’’
हुसेननं मान हलवली.
          सावत्याने डबा आणला होता. जेवायची सुट्टी झाली. त्यानं हुसेनला डब्यातल्या निम्म्या चपात्या दिल्या.
हुसेन घ्यायला तयार नव्हता. सारखं म्हणत होता, मैं बहुत खाके आया, पेट भरा है मग सावत्याच्या आग्रहासाठी त्यानं एकच चपाती खाल्ली. सावत्याबरोबर गप्पा मारताना सावत्याची स्टोरी त्याला समजली.
         सावत्या त्याला म्हणाला, ‘‘मी बँडमधी यायला तयार नव्हतो. उगं गालफुगी होऊस्तर फुकत राहायचं. पण आपल्या बँडमधला एक तकदीरवाला आदमीको सिनेमावाले असत्येत ना, तर तिथं संगीतवालोने त्याला उचललं बघ.’’
        ‘‘लई भारी.’’ हुसेन म्हणाला, ‘‘अब उसका नाम बहुत रोशन होगा लेकिन साला आपुनका इतना तकदीर नहीं’’
        ‘‘देखेंगे, नहीं तो दुसरा क्या कर सकते,’’ सावत्यानं उसासा सोडला. ‘‘ह्या बँडमधून आपलं नशीब घडणार असं सावत्याला ज्याम वाटत होतं.’’
        बँडच्या तालमी चालायच्या, त्यात हुसेन रमू लागला. सिनेमातली गाणी पाठ होतीच, पण आता जास्ती गाणी त्याला माहीत झाली. शिवाय बँडच्या कार्यालयातच त्याला झोपायला जागा मिळाली. त्याबद्दल झाडलोट करणं, पाणी भरणं, असली कामं त्याला करावी लागत होती.
        एक दिवस हुसेन सावत्याला म्हणाला, ‘‘साला अल्ला की करामत लई भारी. तो काय खेळ दाखवल ते समजणार नाय. आता माझंच बघ गावाकडं मी साधी इकडची काडी तिकडं करत नव्हतो. राजावाणी फिरत होतो. साला इथं झाडलोट करायची येळ आली. अरे, मै जमादारकी औलाद हूँ, ये किसी गाववालोने देखा, तो वो कहेगा। ये असली हुसेन नहीं हुसेन जैसा देखनेवाला दुसरा कोई होगा.’’
         ‘‘मुंबई नगरीची जादू त्या अल्लाला सुद्धा चकवा दिइन बघ. ओ राजकपूरभी पहले नाटक कंपनीमें स्टेज साफ करनेका काम करता था, और अंबानी घर-घर जाकर साडी बेचता था.’’
तेवढ्यात अचानक कुणीतरी कर्कश ड्रम वाजवला. हुसेन जागेवरच कावरा-बावरा होऊन पाहू लागला.
        सावत्या अन् तो ड्रमवाला खिक्‌खिक् हसले. हुसेन जरा ओशाळला. मग तो म्हणाला,        ‘‘सावत्याजी आपुनका  एक सपना है ओ राजकपूर को एक बार मिलनेका उसके साथ खाना खानेका.’’
        ‘‘हूंऽऽ’’ सावत्यानं वासरू हंबरावं तसा आवाज काढला. 
        ‘‘अरे सावतासाब, बस एक मिनिट उसको देखनेका फीर मैं मेरे गाव वापस चला जाऊंगा। यहॉं मेरा दिल नहीं लगता.’’
         बँडमधल्या लोकांना हुसेन एक इंटरेस्टींग माणूस वाटू लागला. त्याचं स्वप्न, त्याच्या गोष्टी, त्याची गावाकडची ओढ, गावाकडच्या गप्पा, असं सगळं ऐकता ऐकता हुसेन बँड कंपनीत सगळ्यांचा दोस्तच बनला.
        एक दिवस मास्टरने हुसेनला सांगितलं, ‘‘कलसे, तू बँड का युनिफॉर्म पहनके टिमके साथ बजानेको जानेका.’’
         दुसर्‍या दिवशी बॅण्डच्या ड्रेसमध्ये पाहून त्याला सगळे हसू लागले. त्याची ढेरी, त्याचा गोल चेहरा, दाढी. एकजन तर गमतीनं म्हणाला, ‘‘साला, तू आज बहुत चिकना दिखता है राजकपूर जैसा लग रहा है.’’
        सगळे हसले अन् त्या दिवसापासून सगळे त्याला आरके म्हणू लागले. 
        ‘‘ओ आरके झाडू लगाना, ओ आरके कपडे इस्त्रीको डालना, ओ आरके जरा ये, मिठाई खा.’’
        ‘‘आरके, आरके, आरके.’’
        हुसन्याचा आता आरके झाला. त्याला स्वत:लाही हे नाव आवडते.
– अरुण जाखडे
छायाचित्र : किशोर दिवाळी अंक २०१६

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...