Skip to main content

हुसेनचं पत्र





    मुंबईला येऊन आठ-दहा दिवस झाले. रात्री झोपताना हुसेनला रोज गावाकडची आठवण येत होती. बुढ्ढीची, भावांची, भावजयांची, पत्नीची, घरातल्या सगळ्या लेकरांची अन् गुराढोरांचीसुद्धा. आठवणीने तो कष्टी होई. एक दिवस त्यानं गावाकडं पत्र लिहायचं ठरवलं. बॅण्ड ऑफिसमधल्या एका कपाटात त्याला बरीच कोरी पानं सापडली. पेनही सापडला.
    हुसेनला पत्र लिहायची सवय कुठंय. खरं तर काहीच लिहायची सवय नाही. अक्षरांशी तर काडीमोड झाल्यासारखा होता. शेवटी अडखळत-अडखळत, वेड्या-वाकड्या अक्षरात त्यानं लिहायला सुरुवात केली. त्यानं ठरवलं होतं, पत्रातून आपण खूश आहोत आणि आनंदी आहोत- हे कळवावं. म्हणजे घरचे लोक आपली काळजी करणार नाहीत.

    ‘‘सबको सलाम आलेकुम’’
    ‘‘आता माझं इथं चांगलं बस्तान बसलं आहे. अल्ला दयाळू आहे आणि त्याच्या कृपेने इथं एक चमत्कारच झाला. तो असा की, मी एका बॅण्ड कंपनीत संगीत शिकायला गेलो. आता शहरात आलं, तर काहीतरी शिकायला पाहिजे, हुशार व्हायला पायजे ना! नुसतं आबड्यावनी फिरण्यात माझं दिल रमत नवतं, म्हणुनशान संगीत शिकावं म्हणून चौकशीला गेलो. तर तो बॅण्ड मालक, त्याला सगळे मास्टर म्हणतात, तो म्हणला, ‘आमी वाद्य शिकवतो, आता वाद्य बडवायला काय मी हलका माणूसय का?’ मी म्हणलो, ‘हे नाय जमणार बुवा. 
आमच्या बापजाद्यांनी जमादारकी केली.’ तवा तो म्हणला, ‘बरं असं कर, मला जरा मदत कर, म्हणजे कसं तर माझ्याइथला मॅनेजर गेलाय पळून, तवा दुसरा येऊस्तर तू मदत कर. मॅनेजरची खुर्ची तुला देतो.’
बिसमिल्ला! मी अल्लाची याद केली अन् आडल्या-नडलेल्या माणसास्नी मदत करायचं आपल्या खानदानीतच मुरलंय. तवा म्हणलो, ‘बर करतो, पण मला जमल असं काय वाटत नाय, तवा संभाळून घ्या.’
तर समदं रामायण काय सांगत नाय, पण मी इथं आता मॅनेजर हाय. कवा-कवा सर्कशीतल्या रिंगमास्टरवनी छडी घेऊनच हिसका दावावा लागतो. तवा ही कंपनीतली माणसं वटनीवर येत्यात. पण मी म्हणलो, पोटासाठी मरत्यात ती बी. तवा घेतो सांभाळून समद्यांना. तर बुढ्ढीची याद आल्यावर ही गोष्ट कळवावी म्हणलं, की मला जरा लॉटरी लागल्यावनी झालंय. तू माझी काळजी करू नको. म्हंजी तुमी कुणीच करू नका.
आता तुमाला सांगितलं तर खरं वाटणार नाय. पण माझा इथला वट बघून अन् इथं एक सावत्या नावाचा गडी हाय. तो दोस्तीलाभी भारी अन् दुष्मनीलाभी भारी. पण दिलदार अन् लई माहितगार, माझ्या पुढं-पुढं करतो. तवा सावत्या गड्याला मी ऑर्डर केली की तो राजकपूर नट हाय ना, त्याची मुलाकत घ्यायची आपल्याला. आता त्याला माझं ऐकणं आलंच. तर ही कामगिरी आता चार-दोन दिवसातच हुईन, तवा आपल्या घरातल्या समद्यांमार्फत अन् गाववाल्या समद्यांमार्फत राजकपूरला ‘सलाम आलेकुम’ पोचवतो. अन् इदला नायतर भैरवनाथाच्या यात्रेला ये म्हणून हात जोडून बजावतो.
    आता ह्या कंपनीतच झोपायला जागा हाये. नायतर मुंबईत बाहेरच्या माणसांचे लई हाल. झोपत्यात रस्त्याच्या कडंला. आता आबड्या कासवावनी अंग आकसून झोपतं जीन्याखाली, पण पापड इकायला लई माहीर. त्याच्या मालकाला जरा इंगा दाखवायचाच मला. पण आबड्याचं काळीज सशावणी, लागलं घाबरायला. तवा म्हणलो, ‘जाऊ दे, मी काय तुझ्या मालकाला पापडावनी तळून खाणार नाय. तर आबड्याची काळजी करू नये. माझा त्याला आधार हायेच. हे समद्यास्नी सांगावं.’
    पत्रात हुसेननं सगळ्यांची आठवण मांडली. भावांची, भावजयांची, सगळ्या लेकराबाळांची. पार कालवडीचीसुद्धा. माणक्याला मी याद काढली व्हती म्हणूनही त्यानं लिहिलं होतं. पण एक गोष्ट तो विसरला होता, ती म्हणजे तो त्याच्या बिबीलाच विसरला होता.
हुसेनच्या घरात पत्राचं सामाईक वाचन झालं. काही शेजार-पाजारची माणसं पण बसली होती. त्यातला एक म्हणाला, ‘गाव सोडलं की माणसं लई म्होरं जात्यात.’
    हुसेनची बीबी मनातून नाराज झाली. ती कोणाशी बोलेना. जेवायला बसली तर नुसतं जेवल्याचं नाटक करायची. कोरभर भाकर तिला गिळंना. तवा बुढ्ढी भडकली, ‘‘आगं, तुला काय आता लाग्या लागलाय का काय झालं, चार दिवस बघती, नुसती थोबाड पाडून बसती, घरात मयत झाल्यावाणी-’’
    बुढ्ढीचं हे ऐकून ती रडायला लागली. तिनं खरं कारण सांगितलं, आपला मर्द आपल्याला विसरला, आता तो राजकपूर अन् सिनिमातल्या लोकांच्या नादी लागून माझी त्याला सय राहिली नाही. त्याला मी तीन पोरं दिली. घरात मर-मर राबती. कवा त्याला का कुणाला दुखावलं नाय, पण त्याला मुंबईला पाठवला तुमीच. आता त्या छिनाल बाया त्याच्या नजरेम्होरं असल्यावर माझी कशाला त्यो याद करीन?’’
    हुसेनची बायको मनातून का झुरत होती, ते बुढ्ढीला कळलं. बुढ्ढीनं तिला जवळ घेतलं, म्हणली, ‘‘बिसमिल्ला, बिसमिल्ला, अल्ला काय वाईट वागायला शिकवतो. आता हुस्न्या कुठं लई जवान, अन् देखणा पुतळा पडलाय, तवा त्याच्या मागं बाया लागतीन. त्यानं एखादी भुंडी आणली ना, तर त्याचं अन् त्या भामटीचं चपलेनं थोबाड फोडीन्, तुझ्या बापानं माझ्या विश्‍वासावर तुला दिलंय, ह्या घरात. तो तुझ्या आब्बाजान येतोय मंगळवारच्याला. त्याला काय बोलू नको. गावात बोभाटा करू नको. कसंय आपल्या घरातला वगळ उंबर्‍याभाहेर गेला नाय पायजे.’’
    मंगळवारच्याला अब्बाजान आला. आपली पोरगी खंगल्यावनी बघून तो काळजीत पडला. 
   ‘पोरी, आजार होती का, दवापानी नाय घेतलं का?’
बुढ्ढीनं हे ऐकलं अन् एकदम भडकली. ‘‘तुमची पोरगी म्हंजे माझी कोण नायका, आजकालच्या पोरी लई हट्टी अन् मनात काय तरी घेऊन बसत्यात. खातं पितं घरात कसं हासून राहायचं, मला तर काय समजत नाय आजकालच्या पोरींचं.’’
     आब्बाजाननं हळूच विचारलं, ‘‘हुसेन कैसा है, उसका कोई खत आया था क्या नही?’’
     आणि ती रडायलाच लागली. मग बुढ्ढीनं सांगितलं, ‘‘सगळं रामायण. म्हणली, आता ते किती धांदरटय अन् खोडील हाय ती माहिती नाय का, एखाद्या टायमाला वाड-वडलांचा मान ठेवायचा म्हणून नसन लिहिलं, हिचं नाव लाजून. माझा हुसेन काय बुरा आदमी नही, नेक आदमी है, ओ कुछ गलत बात नही करेगा, और झूठ नहीं बोलेगा.’’ 
     आब्बाजाननं अल्लाची याद केली अन् म्हणला- ‘‘मी कलीफ अल-मुस्तनिर वि’ल्ला (अल्लाची मदत मागणारा) बेटी, कुछ झूट और बुरी बात नही होगी. बेटी, खतमें सब बातें खुल्ली नहीं होती, कुराणमें है ना, झूठी बातको कोई आयुष्य, कोई जिंदगी नहीं रहती.
     सत्य सूरजकी तरह सुबह जब आता है, तो असत्य का नामोनिशान नही रहता. सच बातोंपर भरोसा रख. इतनीसी छोटी बातसे तू परेशान कैसी होती, ये अब्बाजानकी लडकी है न तू? शक से आदमी बरबाद होता है’’
अब्बाजान अन् बुढ्ढीकडं पाहून ती खुदकन हसली. 
हुसेनची बीबी चिंतामुक्त झाली.

      हुसेनच्या पत्रानं गावात बाता सुरू झाल्या. ‘साला हुसन्या, कुठंही बाता मारायला विसरत नाय. पत्रातभी बाताच. मग हे पत्र खरं असेल का? का कोणी खोटं पत्र पाठवलं असेल,’’ याची चर्चाही झाली. दत्तू साळी म्हणाला, ‘‘हुसन्या लई फुकीरचोट बेण्याचं. ह्याला झाडू मारायला कुण ठेवणार नाही अन् मॅनेजर झालो म्हणतोय. त्यो आबड्या त्याला घेऊन गेलाय अन् म्हणतोय, आबड्याला माझा आधारय.’’

     शेवटी कुणीतरी म्हणलं, ‘नराचं नशीब कवा बदलन काय सांगता येत नाही, खरंबी आसन.’
पण हुसेन गावात नसल्यानं गाव लई भुंडं, भुंडं लागतंय राव, माणसं जमत्यात, पोरं जमत्यात पण बाता काय खुलत नायीत. एकजन माणक्याला म्हणाला, ‘‘खत लिख दो उसको, जल्दी गाव वापस आवो.’
    
    माणिक म्हणला, ‘‘पण पत्रात त्यानं पत्ता लिहिलाच नाही.’’
    ‘‘माणक्या, जरा डोकं चालव की, त्याला पत्रात लिही, की तुझा पत्ता नीट पाठव.’’
माणक्यानं मान हलवली.
    सगळे हसल्यावर आपण कसे बनलो, हे लक्षात येऊन माणक्याही हसत राहिला.

– अरुण जाखडे
छायाचित्र : किशोर दिवाळी अंक २०१६

Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...