हुसेनभाई
आबड्याबरोबर मुंबईत पोचला, दौंडहून गाडी मुंबईकडं निघाल्यावर त्याला वाटले आपण फार आश्चर्यकारक आणि चमचमाटी दुनियेतून प्रवास करीत आहोत. अल्लाकडे
जाण्याचा मार्गसुद्धा असाच असेल का? असा प्रश्नही त्याच्या मनात पडला.
पुणे स्टेशन आल्यावर आणि पुढे पाच-पंचवीस मैलाचा रस्ता म्हणजे चमचम
चमकणार्या चांदण्याचे आकाशच त्याला वाटले. ह्या आकाशातच पुढे कोठेतरी
अल्ला असेल का?
मधून मोठमोठ्या गंजीने
पेट घ्यावा किंवा उसतोड झाल्यावर उसाचे मोकळे रान ठणाठणा पेटून दिल्यावर
आगीचे डोंब उसळावेत तशा आगीचा भास होत होता. हुसेनभाईनं हे आबड्याच्या
लक्षात आणून दिल्यावर आबड्या फक्त हसला. म्हणाला, ‘‘खरा जाळ तर तुला आता
मुंबईत पोचल्यावर दिसन’’
‘‘जाळ?’’ हुसेन घाबरला.
‘‘अरे,
जाळ म्हणजे आगीचा जाळ नाही. पैशाचा जाळ, श्रीमंतीचा जाळ, मगरूरीचा अन्
मजबुरीचा. आपण डोळं मिटल्यावाणी सोंग करायचं. फक्त पहायचं, अन् जगायला
शिकायचं. पोटाची खळगी भरली की पोटातला जाळ बी निवतो. तो जाळ निवला की आपला
दिवस फत्ते झाला. हुसन्या, तुला जो जाळ दिसत व्हता ना, उसाची शेतं
पेटल्यावनी, तो जाळच व्हय लेका. ती लाईटीची करामत व्हती. आपल्याकडं घरात
एखादा गोळा बसवला किंवा नळी, तरी ती डोळं मारल्यावाणी मिचमिची करतो. इथलं
लाईटीचं गोळंबी लई भारी. फुल व्होलटेज असतं त्यांना. पुण्या-मुंबईतलं सगळंच
पावरफुल असतं बघ.’’
हुसन्याला वाटलं, आबड्याला तर लईच माहिती दिसती. गावाकडं उगं येड पांघरून फिरतंय.
आबड्यानं
त्याचा एक डोळा बारीक केला. हुसन्याचा हात हातात घेत म्हणाला, ‘‘हुसन्या,
या चांदण्या रातच्याला दिसल्यात ना, त्या खर्या चांदण्या नाहीत, लांबवर ही
लाईटीची रांग दिसती. पण मुंबईत तर भरदिवसा, भर रस्त्यावर तुला चांदण्या
दिसतीन बघ.’’
हुसन्या लाजला, खाली मान
घालून म्हणाला, ‘‘आपल्याला त्यात काय इंटरेस्ट नाय. पण मनातल्या मनात
त्यानं ठरवलं, आपण कधी गोष्टी ऐकताना भराड्याच्या भराडात कथा ऐकताना, कधी
किर्तनातसुद्धा आपण ‘रूपवती’ बद्दल ऐकलं व्हतं, तर असल्या रूपवती चांदण्याच
आता मुंबईत दिसतील, त्या तरी पाहून घेऊ. जीवाची मुंबई यालाच म्हणत्यात
का?’’
हुसन्या गप्प बसला. बराचवेळ कोणीच काही बोलले नाही. गाडी मुंबईत शिरल्याचा अंदाज आला.
दादर स्टेशन आल्यावर आबड्यानं हुकूम केला, ‘‘चला आली मुंबई, हुसेनभाय वळकटी घ्या कंबरेला, अन् सावध उतरा.’’
खाली
उतरल्यावर हुसेनभाई इकडं-तिकडं पाहू लागला. आबड्यानं अंदाज घेतला. खुणेनंच
त्यानं हुसेनला पाठीमागं यायला सांगितलं. एक मोकळं बाकडं दिसलं. तिथं
त्यानं त्याची लोखंडी पेटी ठेवली. आबड्याच्या हातातली वळकटी पण बाकड्यावर
ठेवली. अन् म्हणाला, ‘‘बसा जरा, उजाडल्यावाणी झालं की जाऊ आपल्या
ठेण्यावर.’’
हुसेनचा चेहरा कावरा-बावरा
झाला. माणसांची, रेल्वेगाड्यांची अन् फिरते-विक्रेत्यांची गर्दी अन् कालवा
पाहून तो गडबडून गेला. हळूच म्हणाला, ‘‘इथं आता कोण भेटणारय का आपल्याला?’’
थोडंसं
उजाडलं, अन् आबड्या हुसेनला घेऊन, तो ज्या मोठ्या इमारतीच्या जीन्याखाली
उतरत असतो, त्या इमारतीकडे गेला. जीन्याखालची ती जागा म्हणजे आबड्यासाठी
राखून ठेवलेेलं ‘गेस्ट हाऊस’च होतं.
हुसेनकडे
पाहून आबड्या म्हणाला, ‘‘इथंच रहायचं, आठ साडे आठ वाजले की, वरती जाऊन
सगळ्यांना आपण आल्याची वर्दी देऊ. तोपर्यंत घे लेटून जरा. रातभर गाडीत बसून
शिणवटा आलाय.’’
हुसेनसाठी हे सगळं नवीनच
होतं, आपण कोणत्या ठिकाणी आलो, आणि आता पुढं काय होणार आहे, आबड्या
आपल्याला सांभाळून घेईल ना, अशा नाना प्रश्नांनी तो अस्वस्थ झाला.
सकाळी
इमारतीतली माणसं बाहेर जाताना आबड्याकडं पाहून विचारत होती, ‘‘क्यो
अब्दुलजी, आये क्या वापीस?’’ कोणी त्याच्या घरी कसे आहे विचारत होते.
नेपाळी वॉचमनने तर त्याला एक पावसुद्धा दिला. त्या इमारतीत आबड्याचा एवढा
वट असेल असं हुसेनलाच काय, पण कोणालाच कळले नव्हते.
आबड्या
दरवर्षी येतो. त्या मोठ्या इमारतीच्या जीन्याखाली राहतो. दिवसभर पापड
विकतो. दोन पैसे मिळतात. त्यातून पोटाला खातो. रात्र झाली की जीन्याखाली
शरीराचं मुटकुळं करून झोपतो. इमारतीतल्या लोकांनी काही काम सांगितलं, तर
तेही करतो. दिवसभरात कितीतरी भय्ये त्या इमारतीत येतात. कुणी इस्त्री
करायला, कुणी कपडे-भांडी धुवायला, कुणी साफ-सफाईला, ते सगळे येता-जाता
आबड्याला ओळख देत. ‘‘सलाम अब्दुलजी, कैसे हे गांव के लोग?’’
‘‘ठीक
है साब, अल्ला की मर्जी है, फिर भी यहॉं आना पडता है, पापी पेट का सवाल है
न, और आपकी मर्जी, आपका आशीर्वाद लेनेको यहॉं आनाही पडता है।’’
थोडं
स्थिरस्थावर होण्यात दुपार झाली. गावाकडून आणलेल्या भाकरी खाल्ल्या अन् ते
बाहेर पडले. आबड्या त्याला पापडवाल्याच्या दुकानात घेऊन गेला. आपण आल्याची
त्याने वर्दी दिली. दुसर्या दिवसापासून तो त्याच्याकडून पाटीभर तळलेले
पापड घेऊन विकायला जाणार होता. आबड्याच्या बरोबर असलेल्या हुसेनकडं पाहून
पापडाच्या व्यापार्यानं विचारलं, ‘‘हा पण पापड विकणार आहे का?’’
आबड्याला
‘हो-नाही’ म्हणायची संधी न देताच हुसेन म्हणाला, ‘‘मी अब्दुलचा गाववाला.
त्याच्याबरोबर मुंबई पहायला आलोय! काही दुसरं काम मिळालं तर आनंदाने
करीन.’’
पापडवाल्या व्यापार्यानं एक पापड
आपल्या उजव्या हाताच्या मुठीत दाबून त्याचे तुकडे-तुकडे केले. पापडाचा
कराकरा आवाज येताना त्यानं डोळं वटारून हुसेनकडं पाहिलं, अन् आबड्याला
म्हणाला, ‘‘ये बहोत शोकीन आदमी दिखता है ।’’
आबड्या तिथून वळला. हुसेनचा चेहरा पडला होता. तो काहीतरी पुटपुटत होता.
आबड्या म्हणाला, ‘‘हुसेन तू त्या माणसाला पुटपुटत शिव्या देत आहेस का?’’
‘‘नाही, मी पुटपुटत होतो : अल्ला, अल्ला, मुहम्मद अस:’’
‘‘म्हणजे काय?’’ आबड्याला तर काहीच कळलं नाही.
‘‘आबड्या
माझी बुढ्ढी मुंबईला निघताना म्हणाली होती, की कोणाचा राग आला किंवा वाईट
बोललं किंवा तुला कधी भीती वाटली तर तू म्हणत रहा, ‘अल्ला, अल्ला, मुहम्मद
अस:’ तेव्हा मी बुढ्ढीला विचारलं, ‘म्हणजे काय?’ तर ती म्हणाली, ‘अल्ला हा
स्तुतीस व प्रार्थनेस पात्र आहे, योग्य आहे आणि त्याच्या कृपेने सर्व ठीक
होईल. आबड्या मला पापड विकायचे नाहीत, म्हणून मी ‘मुहम्मद अस: म्हणालो,
‘मुहम्मद - ज्याची स्तुती आणि आठवण मी केली, त्याच्या कृपेने मला नवा मार्ग
सापडंल.’’
आबड्या म्हणाला, ‘‘बुढ्ढीकी वजहसे तुझे बहुत कुछ मालूम है । मुझे कुछ नही आता, मै कुछ नही समजता ।’’
त्या
दिवशी आबड्यानं हुसेनला थोडीफार मुंबई दाखविली. रात्री ते जिन्याखाली
मुटकळं करून झोपले. त्या अवघड स्थितीत हुसेनला रात्रभर झोप आली नाही. शांत
झोपलेल्या आबड्याकडं पाहत, हुसेन मनातल्या मनात म्हणाला, ‘‘ज्यांना या जगात
फार चतुर आणि लबाड, मतलबी माणसं असतात, हे माहीत नाही, ज्यांची मनं पाक
आहेत, अशा माणसांपैकी आबड्या आहे. पण तो कितीही सज्जन असला तरी
त्याच्याबरोबर माझं मन इथं रमेल असं मला वाटत नाही. त्याला म्हातारीची आठवण
आली, बायकोची, मुलांची भावा-भावजयींची, गोठ्यातल्या गायांची अन् त्याच्या
वासरांची. अन् गावातल्या पोरांची अन् पाराची.’’
भोंग्याचा आणि धावणार्या रेल्वेचा आवाज ऐकत त्याला बसल्याजागीच डुलकी लागली. मुंबईतला पहिला दिवस असाच गेला.
--अरुण जाखडे
छान!
ReplyDelete