Skip to main content

हुसेनभाईची टोपी


    आमच्या शाळेत गणेशोत्सवातील कार्यक्रमात देशभक्तीपर नाटिका बसवण्याचे ठरले. त्यात एक इंग्रज अधिकारी कसा छळ करतो हे दृष्य होते. ह्या इंग्रज अधिकाऱ्याचे पात्र आमच्या वर्गातील दिलीप नावाच्या गोऱ्या-गोमट्या व थोडा उंच असलेल्या मुलाला देण्यात आले.
त्या काळात ड्रेपर्स वगैरे प्रकार नव्हता. इकडून तिकडून मेक-अप अन् पोषाख वगैरेचं सामान गोळा करावं लागायचं. अधिकाऱ्याची भूमिका अधिक प्रभावी, सजीव होण्यासाठी दिलीपला इंग्रजी साहेबाचा ड्रेस शोधण्याचे काम आले. पॅण्ट, कोट वगैरे मिळवली पण टोपीचं काय? कोणीतरी माहिती दिली की, अशी साहेबी टोपी हुसेनभाई जमादाराकडे आहे. आम्ही ही माहिती गुरूजींना सांगितली. 
गुरूजींनी ताडकन् विचारले, ‘‘त्या हुसेनभाई बाताड्याकडे?’’
‘‘हो’’ मुलं एकसुरात म्हणाले. गुरुजींनी ती जबाबदारी मुलांवरच सोपविली, म्हणाले, ‘‘जा त्या बाताड्याच्या घरी आणि बघा तो देतोय का?’’
       त्यातल्या ५-१० मुलांचा घोळका हुसेनभाईच्या दारात उभा. हुसेनभाईनं पाहिलं, बाहेर पोरांचा गलका चाललेला दिसतोय, तो घरातून बाहेर आला, उंबऱ्यात उभा राहून विचारू लागला, 
‘‘क्यूँ बच्चे लोग, इधर क्या क्या कर रहे है.’’ दिलीपनं विचारलं, ‘‘चाचाजी, तुमच्याकडे साहेबी टोपी आहे ना, ती आम्हाला एक दिवस पाहिजे. नाटक बसवलंय. त्यात इंग्रज अधिकाऱ्याचा एक रोल मी करतोय. मला आपली टोपी पाहिजे.’’
अरे बच्चू, करत त्यानं दिलीपचा गालगुच्चा घेतला. अरे बच्चू, तुम गोरा आदमीका काम कर रहे हों. तुमको सबकी गालियॉं खानी पडेगी. सगळी मुलं खिकखिक करून हसली. दिलीपला लाजल्यासारखं झालं. करो करो, अच्छा काम करो. मेरे पास टोपी है, लेकिन मै कभी किसी को भी टोपी नहीं देता.        
        मुलांचा उत्साह मावळला. मुलं गप्पगार झाली. ‘‘क्यूँ नही देता, मालूम है क्या?’’ हुसेनचाचानं विचारलं, मुलांनी नकारार्थी माना हलवल्या. त्यांना तरी काय माहिती, हुसेनचाचा ही साहेबी टोपी कोणाला देत नाही. माहीत असतं तर मागायलाच आली नसती. 
       हुसेनभाई उंबऱ्यावर बसला, पायऱ्याच्या दोन्ही बाजूला छोट्या उंचीचा ओटा होता. ओट्यावर मुलांना त्यानं बसायला सांगितलं, मुलं बसली.
        हुसेनचाचा सांगू लागला, ‘त्याचं काय पोरांनो, देने में कुछ नही, लेकिन मैने उसको मेरा वतन माना है.’ वतन सांभाळल्यावनी टोपी सांभाळून ठेवली. रोज सकाळी उठलो की जागेवर हाय का नाय ते बघतो. जन्मल्यापासून जसं आठवायला लागलं, तसं. कवा डोक्यावर भी घालून नाय बघितली. टोपीला प्लास्टिकचा कागद गुंडाळलाय. ते काय असतं, चुलीतला धूर घरात पसरतो. टोपीवर बसतो, डास, चिलटं, झुरळं फिरत्यात, उगीच टोपीवर बसायची. बायका झाडलोट करत्यात, कचरा टोपीवर बसायचा. मग मी त्याच्यावर प्लास्टिकचा कागद गुंडाळला आणि अन् दिली खुंटीवर लटकून. बरीच दिवस ती खुंटीवर लोंबकाळयची, पण आता कपाटाला मिस्तरीकडनं दारं करून घितली, आणिक कपाटात ठेवायला लागलो. वाटलं, कुणाचं ध्यान नकू त्याच्यावर जायला.आता एवढं जपतो टोपीला, काळीज जपल्यावाणी, कसा देणार कुणाला? तुमीच सांगा, पोटच्या पोरालासुदिक मी नाय म्हणीन.
           आता तो टोपी देत नाही म्हणल्यावर पोरांना वाटलं आता निघावं. उगीचच बिनकामी वेळ कशाला घावायचा.
            हुसेनभाई पोरांना म्हणाला, ‘‘थांबा लेकरांनो, तुमाला कायतरी देतो.’’ हुसेनभाई आत गेला. पोरांना वाटलं, टोपी देतो काय? तो आत गेल्यावर पोरांनी दारातून डोकावून आत पाहिलं. हुसेनभाई पातळ गोणपाटात झाकून ठेवलेल्या गुळाच्या ढेपीवर बत्ता मारत ढेप फोडत होता. ढेपेचे तुकडे बाजूला पडत होते. ते गुळाचे बारीक खडे एका ताटात टाकून तो बाहेर आला, मुलांना म्हणाला, ‘‘खा, खा, हा गूळ लई भारी, शंभर नंबरी. साखर त्याच्यापुढं झक मारती.’’गुळाचे हात झटकत तो बोलत होता. आता एवढा वेळ पोरं हुसेनभाईच्या ओट्यावर बसली म्हणल्यावर रस्त्यावरून जाणारी, येणारी माणसं तिथं रेंगाळली, पोरांचं अन् हुसेनभाईचं काय चाललंय हे समजावं म्हणून तिथंच उभी राहिली.पोरं म्हणाली, ‘‘जातो हुसेनचाचा.’’ तसं हुसेनचाचा म्हणाला, ‘‘जाता कुटं, तिथं शाळेत काय दिवं लावयच्यात, व्हय, थोडं बसा, सांगतू, टोपीची ष्टोरी जरा डिटेलमंधी.’’ रस्त्यावर उभ्या असलेल्या माणसांनी ओट्यावर बूड टेकवलं, हुसेनचाच्यांनी आपले मिष्किल डोळे बारीक केले, पांढर्‍या दाढीवरून हात फिरवला अन् सांगू लागला.
             काय पोरांनो, आमच्याकडं पहिल्यापासनंच जमादारकी. जमादारकी म्हणजे देशमुख, पाटील, कुलकर्णी यांच्यापेक्षा भारी. आमचा आजा तवा जमादार व्हता. आता जमादार म्हणल्यावर टांगा, घोडे, असला सगळा बारदाना आलाच. आमच्या आज्यानं घोड्याला टाच मारली की तासाभरात नगर गाठायचा. लई रूबाबदार घोडे होते माझ्या आज्याकडं.आता घोड्याचा अन् टोपीचा काय संबंध, पोरं बुचकळ्यात पडली. पण हुसेनचाचा सांगायचाच असं, की ऐकत बसावं.तर ह्या घोड्यावर बसून आमचा आजा शिकारीलासुद्धा जायचा. त्याला शिकारीचा लई ष्योक. तर नगरला एक गोरा साहेब व्हता, त्याला कळला आमच्या आज्याचा ह्यो नाद, तपास काढत आलान तो आमच्या घरी. आता ह्या नादात गोऱ्या सायेबाची अन् माझ्या आज्याची लई गष्टेल जमली. शनिवार, ऐतवार आला की चर्चमधी जायचं सोडून त्यो इकडं येऊ लागला. मग आजा त्याला शिकारीला घेऊन जायचा.गोऱ्या सायबाला माहिती व्हतं की माझा आजा ह्या कामात लई फायद्याचा. आज्याच्या हाताखाली चाकर माणसं व्हती. खांद्यावर बंदूक घिऊन ती आजा सांगन तिकडं म्होरं जायची. मचाण बांधून ठेवायची. गोऱ्या सायेबाला लई मदत व्हायची. आजा लई गाताड्या व्हता. खंडुबाचा डोंगर, पलिकडचं जंगाल, लई बार त्यानं पायाखाली तुडवलं व्हतं. सायबाला तो वाटाड्या वाटायचा, आजा शिकारीच्या कामात तरी तरबेज. नजर, कान एकवटून शिकार करायचा. किती भी भारी जनावर असू दे, वाघ म्हणू नका, चितळ म्हणू नका, लांडगं म्हणू नका, नुसत्या वासानं तो माग घेत पुढं सरकायचा. जंगलातली माणसं आपल्याला वळखत नायीत, मदत करणार नायीत ही त्या सायबाला समजत व्हतं, म्हणून त्यानं माझ्या आज्याशी दोस्ताना केला व्हता.माझ्या आज्याकडं सादी छऱ्याची बंदूक व्हती ठासणीची. पण त्याची ही कामगिरी बघून सायबानं त्याला भारी बंदूक दिली. पोलिसाकडं, फौजी माणसाकडं असती तशी दुनळीची. सायेब जाताना बक्षिसी म्हणून आज्याला काडतुसं द्यायचा, छऱ्याची काडतुसं द्यायचा, रायफलबी दिलती एकदा.सायबाला कळलं व्हतं, ह्यो जमादार शिकारीच्या कामात लईच पटाईत. कवा शिकार कुठं मिळन हे माझा आजा लई करेक्ट सांगायचा. अन् कवा असं भी व्हायचं, नाय घावायचं सावज.तरी ह्यो जमादार काय सायबाला खाली हातानं परत पाठवत नव्हता. मोठं सावज घावलं नाय तर बदकं, ससं, हरणं, कबुतरं, व्हलं, कायतरी सापडून द्यायचा, सायेब खुश व्हता.
          येकदा काय झालं, सायेब जमादाराला घेऊन शिकारीला गेला. दोन रात्री घालवल्या पण सावज हाती येईना. दोन बोकडं बांधून ठिवली व्हती, वाटलं बोकड खायला येईन एखादं जनावर. दुसऱ्या दिवशीपण जनावर सावध व्हतं. बोकड वरडत व्हतं अन् तरी ते बोकडाकडं फिरकंना. रात्र गेली. माघारी निघायचा टायम झाला अन् काहीतरी वाजलं. वाघानं बोकडावर झडप घातली व्हती. सायेबाची बंदूक वाघाला टिपायला वाटच बघत व्हती. बार वाजला पण वाया गेला. पण त्येवढ्यात दुसऱ्या बाजूनं खवळलेली वाघीन सायबाच्या अंगावर धावली, तसा माझ्या आज्यानं सगळं बळ एकवटून नळीचं तोंड वाघीनीकडं वळवलं. माझ्या आज्याचा बार कवाच वाया जात नव्हता. वाघीनीचं धूड खाली कोसळलं. सायबाचा जीव वाचला.
              सायेबानं ही बातमी वरपर्यंत कळवली. ती गोरी माणसं म्हणायला लागली, कुठंय तो जमादार, जाऊ त्याला बघायला.एके दिवशी, ह्यो गोरा सायेब, दोन-चार गोऱ्या सायबांना घेऊन आला. माझ्या आज्याची वळखपाळख करून द्यायला. 
               एका सायबानं काय तरी इच्चारलं, त्येची भाषा काय समजली नाही माझ्या आज्याला. मग दुसऱ्या सायबानं मुडक्यातुडक्या मराठीत सांगितलं की त्यो सायेब इच्चारतोय, तुला ह्यो शिकारीचा नाद कसा लागला.
माझ्या आज्यानं सांगितलं, ही आमच्या मुलखातली माणसं रानावनात रहात्यात. त्यांची शेळ्या, करडं, बोकडं, कोंबडं असत्यात. ही रानातली जनावरं येत्यात वाघरू, लांडगं, बिवटी, रानडुकरं, रानकुत्री पार फडशा पाडत्यात त्यांच्या शेरडा-करडांचा. टाईम आली तर माणसं बी खात्यात, तवा माझ्याकडंं ही सादी बंदूक व्हती. जमादार हायना. तरं मी म्हणलं, वाड्या-वस्तीवर राहणाऱ्या माणसांना संरक्षण दिलं पायजे. मी दिवस मावळला, की रानावनात फिरू लागलो. यातनं सावज टिपत गेलो. सायेब ह्याचा मग नादच लागला. असला मर्दानी खेळ खेळायचा म्हंजी माणूस भी मर्दच लागतो.
             ती सायेब मंडळी खूश झाली. ओ जमादार, ओ जमादार, वंडरफूल, ग्रेट करत त्यांनी माझ्या आज्याला रोख बक्षिसी दिली. काडतुसं दिली. येका सायेबानं तर आपल्या डोक्यावरची टोपी काढली अन् माझ्या आज्याच्या डोक्यावर ठेवली. सायेब माणसं माघारी गेली.
              पुढं घरावर दरोडा पडला अन् दरोडेखोरांनी जाताना घरातल्या बंदुकी भी पळवल्या. ही टोपी तेवढी राहिली. ह्या धसक्यानं माझा आजा अल्लाकडं गेला. 
            ही टोपी माझ्या आज्याच्या मर्दुमकीची निषाणी, बक्षीसी हाय ती. गोऱ्या सायबांनी आज्याला दिलिली बक्षिसी, ती मी सांभाळायला नको का, तवा पासनं ठरवलं, जान गेली तरी चालन् पण टोपी नाय गमवणार.
म्हणून मी टोपी नाय देत कुणाला. पण सांगतो ही गोऱ्या माणसाची टोपी, गोऱ्या माणसाचं काम करतूय ना तू पोऱ्या, देतो घटकीभर घालायला. स्वांग वटवण्यापुरती, ही स्वांग वटवायचं काम झालं की परत द्यायची. मी स्वतः घेऊन येणार, खेळ झाला की स्वतःच परत घेऊन घरी येणार समजलं? अन् हे प्लास्टिकचा कागद बाजूला करायचा नाय. नायतंर तुझ्या टकुऱ्याचं तेल, घाम लागायचा टोपीला.
             चालंल ! चालंन् ! मुलं ओरडली. त्यांचा उत्साह वाढला. ती उड्या मारत शाळेकडे पळाली. त्यांना हुसेनच्या गुळापेक्षा ही स्टोरी गुळच्याट वाटली.  
          त्यांच्याकडं पाहून हुसेनभाई म्हणाला, ‘‘आपुणके गावके लडके सबसे भारी.’’                                                                                                                                         - अरुण जाखडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...