Skip to main content

हुसेनभाई आणि लाग्या


    त्या दिवशी संध्याकाळी हुसेनभाईचा जो अवतार गावकऱ्यांनी पाहिला, तो यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. सगळ्यांनी बुचकळ्यात पडावं अशीच हुसेनभाईची कर्तबगारी त्या दिवशी दिसली. असा तमाशा त्याने यापूर्वी कधी केला नव्हता.
    त्या दिवशीची गोष्ट. नुकतीच दिवेलागण झाली होती आणि समोरच्या वाटेने हुसेनभाई येताना दिसला. त्याचा अवतार नेहमीपेक्षा वेगळाच वाटत होता. डोळे तांबारलेले आणि नेहमीप्रमाणे डुलत चालणारा हुसेनभाई थोडा अधिक सरळ व थोडा वेगात चालत होता.
      मारुतीच्या देवळासमोर गप्पा मारत बसलेली मंडळी आणि तालमीतून बाहेर पडलेले पैलवान एकमेकांशी काहीतरी बोलत होते. तेवढ्यात त्यांना हुसेनभाई जवळ येताना दिसला.
कुणीतरी म्हणालं, ‘‘सलाम आलेकुम हुसेनभाई.’’ तर हुसेनभाईने सलाम आलेकुम केला पण एकदा करून काही तो थांबेना. सारखा सारखा तो म्हणत होता, ‘‘सलाम आलेकुम, सलाम आलेकुम, सलाम आलेकुम.’’
      सुरुवातीला लोकांना थोडी गंमत वाटली पण नंतर त्यांच्या लक्षात आलं, की काहीतरी घोटाळा दिसतोय. एकजण ओरडला, ‘‘काय रे हुसन्या, काय झालंय तुला?’’
‘‘एकदम हलका, हलका लग रहा है. मेरा बॉडी को कुछ वजनही नहीं लग रहा. मी तर आता कापसाच्या पोत्यासारखा वाटतोय.’’ हुँ..हुँ...हुँ.. आणि तो हसत सुटला. त्याचे हसणेही थांबेना.
काहीतरी घोटाळा दिसतोय हे तर लोकांनी ओळखलंच पण हुसन्याला कुणीतरी घरी पोचवावं असंही ठरलं. दोन पैलवान हुसन्याला घेऊन त्याच्या घरी गेले. हुसन्याला त्याच्या बुढ्ढीच्या, बायकोच्या आणि भावाच्या ताब्यात देऊन सांगितलं,
‘‘बुढ्ढी संभालो हुसेनभाईको, ऐसा कर रहा है जैसा गांजा पिके आया है. देख देख उसकी आँखेभी लाल हुई.’’
बुढ्ढीला काही समजेना. तो गांजा पिल्यासारखा दिसत असला तरी कोणीही हुसेनने गांजा ओढला असल असं कुणी म्हणणार नाही. त्याच्या सज्जनपणाबद्दल, निर्व्यसनीपणाबद्दल सगळ्यांना खात्रीच होती आणि तोच नाही, पण गावात असा कोणीच ‘गंजडी’ नव्हता, तेव्हा याला गांजा मिळण्याचा काही मार्गही नव्हता.
बुढ्ढीलाही तसंच वाटलं आणि त्याच्या घरातल्या सगळ्यांना हुसेन काम करणारा माणूस नसला तरी त्याच्या सात्त्विकतेबद्दल, चांगुलपणाबद्दल, तंबाखूशिवाय कोणत्याही व्यसनाबद्दल शंका नव्हती.
मग तो गंजड्यासारखा का वागू लागला? बुढ्ढीनं दार लावून घेतलं. त्याला आत बसवलं, त्याच्या कपाळावरून पिराच्या पुढं ठेवलेले मोराचे पंख फिरवले. ऊद लावला, अन् त्याला म्हणाली, ‘‘हुसेन तुझे ऐसा क्या हुँआ? देख लोक तुझे देखकर हस रहे है?’’
हुसेन रडायला लागला आणि रडायचाही थांबेना. शेवटी त्याच्यापुढं जेवणाची थाळी ठेवली, जरा पोटात भाकर गेली की हा जागेवर येईल असं बुढ्ढीला वाटलं.
पण हुसेन भाकरी खायला लागला आणि पुन्हा पुन्हा लवकर भाकरी आणा म्हणू लागला. दोन, तीन, चार, सहा, आठ भाकऱ्या खाल्ल्या तरी तो थांबेना. सगळ्या घरासाठी थापलेल्या भाकरीचं टोपलं त्यानं एकट्यानंच अर्ध केलं. शेवटी बुढ्ढी रागावून म्हणाली,
‘‘हुसन्या, बकासुर हो गया क्या आज तू?’’ आणि त्याच्यासमोरची थाळी तिनं ओढून घेतली.
बुढ्ढीच्या दोन-चार शेजारणी गोळा झाल्या. त्यातल्या एकीनं सांगितलं, ‘‘उसको लाग्या लगा होगा. वो अपना मंत्र करता है ना देवी का भगत, उसको बुलावो. झपाटल्यावाणी दिसतय त्याला.’’ 
बुढ्ढीला वाटलं, दुपारपर्यंत हा बरा होता. कालपासून वासरू चुकलं म्हणून त्याला सगळीकडं, राना-वनात, माळावर, डोंगरावर, फॉरेस्टात, फिरून बघायला सांगितलं. तिकडं फिरतानाच त्याला लाग्या लागला आसनं.
    बुढ्ढीनं मान हलवली. शेजारणी कामाला लागल्या. इतक्या वेळात बरीच माणसं जमली होती आणि त्यात माणिकही होता. भगताला बोलावलेलं माणिकला आवडलं नाही. तो बुढ्ढीला म्हणाला, ‘‘क्यूँ बुलाया उसको? वो बुरी नजरवाला आदमी है. समोरच्या प्रत्येक गोष्टीला त्याची नजर लागते. तो करणी करतो आणि वस्तू पळवतो. रानातलं धान्य पळवतो. पण अजून त्याला कोणी पकडलं नाही. कारण भगत म्हणत असतो की त्याला आंतद्रिय शक्ती वश आहे. त्यामुळे वाईट योनीतील आंतद्रिय शक्तींबरोबर तो मैत्री करू शकतो किंवा भांडू शकतो. यांतून त्या शक्ती त्याला कधी वश होतात. त्याचे हे म्हणणे किती खरे हे देव जाणो, पण गावातली माणसं त्यामुळे त्याला घाबरून राहतात.’’
भगत येणार म्हणल्यावर माणिकने हुसेनला बाहेरच्या पडवीत आणून बसवलं. आणि घराच्या आतल्या खोल्यांची दारं-कड्या लावून बंद करून घेतली, जेणेकरून भगताला घरातले काही दिसणार नाही व त्याची नजर जाणार नाही. 
एवढ्यात भगत आला. भगतने हुसेनच्या समोर बसून हुसेनला विचारलं, ‘‘बोल, क्यूँ तकलीफ दे रहा है? कहॉं से आया है तू? बाहर निकल. हुसेनको छोड दे.’’ भगत डुलत होता. हुसेनच्या डोक्यावर हात ठेऊन तो म्हणाला, ‘‘हुसेन, अब मै आया हूँ. घबराना नही. सालेको मेरा हिसका दिखाता अभी.’’
    भगताने काहीतरी पुटपुटायला सुरुवात केली. काहीतरी बडबडत होता. भाग जा, भाग जा, असं काहीतरी बडबडत होता. भगत अंगात आल्यासारखा अंग हलवू लागला. त्याने डोक्यावरच्या लांब केसांची गाठ बांधली होती. भगत हलल्याबरोबर ती लांब शेंडी किंवा शेपटी मानेेच्या ह्या बाजूकडून त्या बाजूकडे उडू लागली. त्याचं अंग गदगदत होतं.
त्याने बरोबर आणलेल्या तांब्याच्या भांड्यात लाकडांचा मोठा जाळ केला. त्या भांड्यातील अगोदरची राख हातात घेऊन मोठमोठ्याने ओरडत चिमूट चिमूट राख हुसेनच्या अंगावर टाकत होता आणि राख टाकताना ओरडून म्हणत होता.
‘‘हडळ छो, खविस छो,
आलेले बदाम छो -
झोटिंग छो, वेताळ छो,
आलेले बदाम छो’’
अशी अनेक भुतांची नावे घेत ओंजळभर राख हुसेनच्या अंगावर टाकली. हुसेनचा चेहरा सगळा पांढरा झाला.  मग त्यानं कोल्हापुरी चप्पल आणायला लावली अन् हुसेनला बडवायला सुरुवात केली. पाठीवर, पृष्ठभागावर, हातावर, पायावर तो चपलेनं मारत होता.
हुसेननं ओरडायला सुरुवात केली. मोठमोठ्यानं तो बोंबलू लागला.
म्हातारीला काळजी वाटू लागली. ती भगताला म्हणाली, ‘‘मारो मत, इतना मारो मत,’’ अन् ती भगताचा हात पकडू लागली.
भगताने म्हातारीला जोरात ढकलून दिलं. बुढ्ढी बाजूला कोलमडली. ‘‘बुढ्ढी मै हुसेनको नही मार रहा. वो हैना, वो हरामजादा, जिसने हुसेनको पकडा है, उसको मार रहा हू.’’
भगताचा अतिरेक व्हायला लागला. कालवा ऐकून जमलेल्या लोकांनी सांगितलं, ‘‘अवं थांबा, त्याच्या अंगातून आता रक्त यायला लागलंय. अंगावर चपलेचे वण. हे काय खरं नाही.’’
लोकांचा संताप पाहून भगत थांबला अन् भेसूर हास्य करत म्हणाला, ‘‘कर दिया ना उसको सरळ. अभी वो जायेगा’’ आणि हुसेनकडं पाहत तो म्हणाला, - ‘‘अरे चांडाळ, तू कल सुबहतक गया नहीं, तो फिर मै आके तुझे ऐसाही पिटाऊंगा.’’
भगत गेला. माणसं पांगली. हुसेनला मारानं वेदना होत होत्या. तो कण्हत होता. रडत होता. तो जागेवरच शरीराचं मुटकुळं करून लेटला. बुढ्ढीनं हुसेनच्या गालावरून, अंगावरून हात ङ्गिरवला. हुसेनची बायको, भावजया, भाऊ बाजूला बसलेले. सगळेच घाबरलेले.
बुढ्ढीनं खूण केली. हुसेनच्या बायकोनं चादर आणून बुढ्ढीजवळ दिली. बुढ्ढीनं हुसेनच्या अंगावर ती पांघरली अन् म्हणाली, ‘‘सो जा, हुसेन’’ आणि सगळ्यांना इशारा केला की, जा, तुम्ही आता पडा. मी इथंच रातभर बसते.
    दुसऱ्या दिवशी सकाळी हुसेन उठला ते कण्हत कण्हतच.
    दुपारी बुढ्ढीनं मलिदा केला. पिराजवळ ठेवला. नाथाच्या मंदिराबाहेर ठेवला. उडीद, लिंबू, काळे तीळ, रोट, त्यावर कुंकू असा काहीतरी उतारा घेऊन हुसेनची बायको मसनवाटाकडे ठेवून आली. अन् घरी येऊन हुसेनजवळ बसली. काल बकाबक भाकरी खाणाऱ्या हुसेनला आज एक घास गिळवत नव्हता. 
    दुसऱ्या दिवशी मुलं शाळेत एकच चर्चा करत होती. काय झालं होतं हुसेनचाचाला, कुठे गेला होता हुसेनचाचा, आणि कोणता लाग्या त्याला लागला, याची चर्चा चालली होती. पोरांना हुसेनची काळजी लागली. सकाळची शाळा सुटली. तेव्हा हुसेनच्या घराजवळ राहणाऱ्या अनिल शितोळेला पोरांनी सांगितलं, दुपारी शाळेत येताना हुसेनची खबरबात घेऊन ये.
दुपारी अनिल शाळेत आला तेव्हा जो तो त्याला विचारू लागला, ‘‘काय रे भेटला का हुसेनचाचा?’’ 
अनिल सांगत होता, ‘‘भेटला, मारानं लईच ज्याम झालाय तो. अंग बदलायला लागला तरी बोंबलतय.’’ मग मी म्हणलो, ‘‘पोरांना काय समजत नाही, हुसेनचाचा तुम्हाला काय झालं ते. स्कूल के बच्चे बहोत काळजी मे पड गये. पोरं घाबरून गेलीत. काय झालं सांगा.’’
हुसेनचाचा म्हणाला, ‘‘पोरांनो जरा बरं झालं की येतो पारावर, नायतर शाळेसमोरच्या ग्राऊंडवर समदं डिटेलमंधी सांगतो.’’
‘‘पण हा गांज्या का लाग्या का काय ते खरं सांगा. मसणवाटीत गेला होता का?’’
‘‘समदं सांगतो अन् - गांजा? हूँ..हूँ.. मैने नेहरू चाचाकी कसम कभीच ली है. मै तो बीडीभी नहीं पिता. और ओ लाग्या को भी मै मेरा हिसका दिखाऊंगा. अरे अनिल ओ माणिकको बोलो जरा मिलने आवो. मेरी तंबाखूकी पुडी खतम झाली. पुडी घेऊन ये म्हणावं त्याला.’’
पोरांना बरं वाटलं, आता ते वाट पाहत आहेत. बरा झाल्यावर हुसेनभाई शाळेपुढं किंवा पारावर येऊन काय सांगतोय त्याची...
क्रमशः 
- अरुण जाखडे

Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...