Skip to main content

हुसेनभाईचे दात

     पोरा-सोरात रमणाऱ्या हुसेनचाचाची थोडी पंचायतच झाली. शाळेला सुट्टी, काही मुलं सहलीला गेलेली, तर काही रानावनात पांगलेली. हुसेनभाईला काही करमेनासं झालं, म्हणून तो पारावर जाऊन बसला.
       तिथं आधीच चार-दोन मंडळी ठाण मांडून बसली होती. हुसेनभाईला पाहून त्यातला माणिक गुंजाळ म्हणाला - काय हुसन्या, ‘‘त्वांड लई नरमल्यावणी दिसतंय. बुळकी तर नाही ना लागली?’’
‘‘नाय रे माणक्या, पण जरा बुच्च बुच्चच वाटतंय.’’ तेवढ्यात पारासमोरून एक बैलगाडी डुकूक डुकूक, हळूहळू गावाबाहेर चालली. 
        बैलगाडीकडं पाहून दगडू करांडे म्हणाला, ‘‘गावात आता बैलगाड्या लईच कमी झाल्या. नुस्त्या कमी झाल्या नाही, हाय त्यांचा रुबाब बी गेला. ती लाकडी चाकं, त्याच्यावरची धाव, तो साठा, समदं सुतारवाड्यात व्हायचं. आता बाजारातून आणून जोडलं जातं.’’
        ‘‘ बैलगाडीच काय पण बैलंभी लईच कमी झाली. बारा-बारा बैलांचा बारदाना असायचा एका-एकाकडं. खिल्लारी बैलाच्या जोड्या हौसंनं सांभाळायची माणसं. आरं आमच्या चुलत्याला तर लई हौस व्हती. पैसं हाताशी आलं की, सारखी बैलं बदलायचा.’’
बैलाच्या गप्पा रंगात आल्या. कोणाकोणाकडं कशी बैलं होती, बैलपोळ्याला बैलं कशी सजवली जायची, याच्या गप्पा पारावर रंगात आल्या. तंबाकूची पिचकारी टाकत हुसेनभाई म्हणाला, ‘‘आरं आपल्या आज्या-पंज्यापासून बघा. घरोघर घोडी व्हती. माझ्या बापाकडं तर लई खानदानी, धिप्पाड घोडं होतं. घोड्यावर बसून तर तो सगळीकडं फिरायचा. टांगे व्हते, अन् कुणाच्या बी दाराम्होरं उभं राहिलं की, घोड्याचा लीद आणि मुताचा वास यायचा. काय उधळायची राव ही घोडी. अन् माणिक तुला आठवतंय का, तुमची ती फत्ताबाई, बाई पण सगळीकडं घोड्यावर फिरायची. लईच अफाट बाई. बिनधास्त बीड्या फुकायची. चांगली कारभारी माणसं बी तिच्यापुढं नरम व्हायची. फत्ताबाईच्या घोडीचा लई रुबाब व्हता राव.’’
        ‘‘हा ना राव, समदं आठवतंय आपल्या लहानपणचं. आपण तर तवा बारीक व्हतो, पण पाच-पन्नास वर्षात समदं बदललं.’’ माणिक.
        ‘‘ही बघ माणिक, ही हुसेनभाईची वाचा लक्षात ठेव, ही घोडी जशी गावातली संपली ना तशी बैलं भी संपतील. आता शेणा-मुताचा वास विसरायचा अन् डिझेल-पेट्रोलचा वास घेत फिरायचं. समद्याच्या वाडग्यात आता ट्रॅक्टर अन् त्याची ती सणगं पार नांगरणी, पेरणीपासून सगळी.’’
बैलाच्या-घोड्याच्या ह्या गप्पा रंगात आल्या असतानाच, समोरून कारखान्याचा ऊस वाहून      नेणाऱ्या बैलगाड्यांची रांग सरकताना दिसली. एक अफाट पोरगं एका गाडीतून भराभरा ऊस उपसत होता. दहा-बारा ऊस घेऊन तो पाराकडं आला.
‘‘खावा, खावा, ऊस खावा. नुसती तंबाखू-बिड्या नका मारू.’’
माणिक हुसेनभाईला डिवचण्यासाठी म्हणाला, ‘‘हुसेन खावा चार-दोन ऊस.’’ 
‘‘नगं आता मला काय खावं नाय वाटत.’’
‘‘आता ऊस खाता येत नाय म्हण की?’’- माणिकनं खोड काढली 
‘‘का खाता येत नाय म्हण्तो? माझ्या तोंडाचं काय बोळकं झालंय व्हय. अन्‌‌ तुला काय व्हतंय, तू बी खा की, शर्यत लावून खाईन.’’
आता दोघं हमरीतुमरीवर आले. एकमेकांवर धावून जाऊ लागले. तेवढ्यात चार-पाच पोरं तिथं हा कालवा ऐकून जमा झाली.
त्यांचा वाद बघून पोरं हसू लागली. पोरांना हुसेनचाचा आपलाच वाटायचा, पोरांनी हुसेनभाईचा हात धरला अन् सांगितलं, ‘‘हुसेनचाचा तुम्ही अन्‌‌ माणिककाका दोघंबी एक-एक ऊस खा.’’
     हुसेनभाई म्हणाला, ‘‘चालल, पोरांनो चालल. नुस्तं नाय चालणार. कांड्या मोजून बघा, दहा-दहा कांड्याचे दोन ऊस काढा अन् दोघाला द्या, बघा कोण आधी ऊस संपवतो.’’
‘‘अन्‌‌ नुस्त्या चुट्‌ट्या नाय टाकायच्या बरका, बरीक चावून रस गिळला पायजे. नायतर नुस्ता सोलून 
फेकताल-’’ दगडू म्हणाला.
हुसेनभाईला मध्येच आठवलं, ‘‘थांबा, आधी रेवड्याच्या कुस्त्या. पहिल्यांदा ह्या पोरांनाबी ऊस द्या. बघू ती किती जोरात खातेत. त्यांची परीक्षा झाल्यावर मग आमची.’’
पोरं नाही - होय करायला लागली. पण हुसेनभाईनं ऊस निवडून काढले. पाचरुट फेकून पोरांच्या हातात ऊस देत म्हणाला, ‘‘खावा, तुमच्यासाठी कोवळं कोवळं ऊस निवडून दिल्यात.’’ 
पोरांना काय नीट जमत नव्हतं. ती खात होती. त्यांचे गाल, तोंड, हात चिकट झाले. हात झटकत हुसेनभाई  अन् माणिककाकाकडं बघून ती हसत व्हती.
शेवटी माणिक अन्‌‌ हुसेनभाईची वेळ आली. ऊस खाताना त्यांची जुगलबंदी रंगात आली. ऊस खाताना रसाचा तोंडातून आवाज येत होता. हुसेनभाई चेकाळून मध्येच ओरडत होता, ‘‘देखो बच्चे, उस माणिक को बोलो, ये तुमारा काम नाय. उगच तोंडाची वाफ घालत जाऊ नको. आता ते तोंड वापर ऊस खायला.’’
     दातातून उसाची अडकलेली चुट्टी बाहेर फेकत माणिक पोरांना म्हणाला, ‘‘पोरट्यांनो, त्याला सांगा, ऊस खायचं काय आता वय राहिलंय का, आता जवारीची ताटं भी नाय खाता यायची. त्याला सांगा, ही फूगिरी दी सोडून. इरिशिर्री करायला जाशीन तर कवळी खाली चुट्‌ट्याबरोबर पडन.’’
    ‘‘पडू दे. तुलाच लई इरझाळा आला व्हता. आता लढ. नीट खा नायतर तोंड कापन, जीभ, दात संभाळ. तूच तर माझ्या शेपटावर पाय ठेवला.’’
     माणिकनं उसाच्या कशाबशा दोन-तीन कांड्या सोलल्या, खाल्ल्या, अन् उरलेला ऊस दिला हुसेनभाईच्या अंगावर फेकून.
    ‘‘आयला, हरला का, आसं मधनंच शेपूट घातलं.’’ म्हणून हुसेननं त्याला पेटवायचा प्रयत्न केला.
हुसेनभाई मात्र कचाकच ऊस सोलत होता. त्याच्या दाढाखाली ऊस पिळला जात होता. सगळा ऊस संपवला. अन्‌‌ माणिककडं बघत म्हणाला, ‘‘उगीच उचकटून द्यायचं नाय कुणाला. तोंडात बी बळ लागतं. तुझ्या तोंडात नुस्त्या फकाफक बाता मारायचं बळ. आता उठ इथनं जा तोंड लपवत घरी,’’ अन् खो-खो हसत सुटला.
   ‘‘आरं उसाचं काय घेऊन बसलाय माणक्या तू. तू तर रस सुदिक माझ्याइतका नाय प्यायचा. एका बसणीला कळशीभर रस पिऊन दावतो अन्‌‌ पचवतो. आज, आज म्हंजी आत्ता. कढईतला गरम गरम किलोभर गूळ खाऊन दाखवतो बरका माणिकशेठ!’’

      माणिक हरला होता. गुरं बांधायची वेळ झाली असं म्हणत, उठला अन्‌‌ घराकडं निघाला. जाताना हुसेनभाईकडं रागानं पाहत म्हणाला, ‘‘हुसन्या तुझ्यावाणी मी रिकामटेकडा नाय. उगं आपलं तुझं भाऊ तुला सांभाळून घेतेत म्हणून इथं मोकाट येऊन बस्तो. बारक्या पोरात गप्पा मारत बस्तो. हं, हं,’’ हुसेन भाईकडं तुच्छतेनं पाहत तो निघून गेला.
इकडे हुसेनभाई हसतच होता, ‘‘अरे वो भाग गया, हार गया. बच्चे लोग, तुमीभी ऊस नाय नीट चावून खाल्ला. माझ्या वयात आल्यावर तुम्हाला दूध तरी चावल का?’’
दूध?
पोरं खदाखदा हसू लागली. हसणाऱ्या पोरांना पाहून हुसेनभाई खुलला. तो सांगू लागला, ‘‘पोरांनो दात बळकट पायजे. दात बघा हत्तीचा, सिंहाचा, तसा आपला दात पायजे.’’
‘‘आता मी दाताची काळजी लई लहानपणापासनं घेत आलो. त्याचं काय, मी लई लई वर्षं दात घासतच नव्हतो. तोंड धुतच नव्हतो. आता ही घरातली माणसं कडकड करायला लागली. त्यांची भणभण नको, म्हणून मागच्या ईदपासनं घासायला लागलो.’’
‘‘इतकी वर्षे?’’ पोरांनी आश्चर्याने विचारलं, 
‘‘नाय घासली. घासल्यानी दात कमकुवत व्हतेत. उगच सकळी उठलं की मिस्त्री घ्यायची, अन् दातावर दाब दिऊन घासत बसायची खोड मला काय पटत नाय. उगच सुतारानी वाकसानं लाकूड तासावं तसं ह्यांचं बोट वाकसावणी मागं-पुढं फिरत रहातं. त्यानं दाताची ताकद कमी व्हती-ढिल्ली व्हत्यात. मी तसं केले नाय म्हणून ऊस कसा कडाकड खाल्ला.’’
पोरांना हे काही पटत नव्हतं. ती हसतच राहिली.
हुसेनभाई म्हणाला, ‘‘पोरांनो, तुम्ही आता पेस्ट का काय लावता. असली पेस्ट का ट्यूब म्हणत्यात ती आमच्या लहानपणी आम्ही आणायचो त्याच्यात सुलोचन असायचं.  सायकलची ट्यूब पंक्चर झाली की कामाला यायचं. आता ही असली ट्यूब घरोघर दात रंगवायला आणल्यावाणी. पार मोलमजुराची पोरंबी ट्यूबा वापरायला लागली. आता मला भ्याव वाटतं, ह्या पोरासोरांनी तोंड चांगलं खंगाळलं नाय तर पेस्ट जाती पोटात. ती बी खराबच सवय.’’
पोरं गप्प झाली. त्यांना हुसेनभाईच्या दाताची काळजी वाटायला लागली.
मग पोरांचा हात ओढून त्यांच्या हातावर टाळी देत हुसेनभाई म्हणाला, ‘‘पोरांनो सांगा ह्या माणक्याला कसं पळवलं, चांगलं दात पाडलं त्याचं.’’
‘‘हुसेनचाचा तुमी ते दात घासायचं खरं बोलता, का मजा केली आमची?’’
हं...हं....हं... हॅ, हॅ ऽ ऽ ऽ हॅ हुसेनभाई हसत सुटला.   


   - अरुण जाखडे

Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...