शाळा सुटण्याची वेळ. सकाळचे अकरा वाजले. घराच्या ओढीनं मुलं धूम पळत सुटली. नेमका हुसेनभाई त्याच वेळी शाळेपुढून चालला होता. त्याला आज वाटलं की बरेच दिवस झाले, आपण शेतात गेलो नाही. हुसेनभाईचा स्वभाव सगळ्या गावातच रमणारा; पण आज हुसेनभाईला असं वाटल्याचा आनंद त्याच्या घरातल्या लोकांना झाला. त्यांना वाटायचं, इकडं-तिकडं गप्पा मारत बसण्यापेक्षा हुसेननं रानात जावं. त्याची कारभारीण त्याला म्हणाली, ‘‘रानातच जाताय तर दुपारच्या भाकरी तरी घेऊन जा.’’ रानात दोन भाऊ, एक भावजय आणि कुत्र्याच्या भाकरी घेऊन हुसेनभाई निघाला होता.
शाळा सुटल्याबरोबर प्रत्येक वर्गातून मुलांचे घोळकेच्या घोळके बाहेर पळत सुटले. प्रत्येकाला भलतीच घाई. त्यांना पळताना पाहून हुसेनभाई मुलांवर ओरडला, ‘‘अरे अस्ते भागो, अस्ते भागो, तुम्हे क्या जुलाब हो गया क्या इतने जोरसे भाग रहे हो.’’
तेवढ्यात हुसेनभाईनं पाहिलं, मुलांचे दोन घोळके - एका बाजूला पाच-सहा मुलं, दुसर्या बाजूलाही पाच-सहा. आणि दोन्ही बाजूची मुलं एकमेकांवर तुटून पडत होती. तुंबळ मारामारी सुरू झाली. हातावरचे दप्तर एकमेकांना फेकून मारू लागली. एकमेकांच्या कॉलर्स, गचांड्या पकडून अपशब्द फेकू लागली.
हुसेनभाई हे पाहून थांबला. मारामारी करणार्या मुलांत जाऊन उभा राहिला, आणि जोर-जोरात रागावू लागला, ‘‘अरे बच्चो, अचानक क्या हुँआ की तुम झगडा कर रहे हो. झगडा मत करो, झगडा मत करो’’ म्हणत तो मारामारी करणार्या मुलांना बाजूला ओढू लागला. शेवटी न ऐकणार्या मुलांना त्याने बडवायला सुरुवात केली.
हुसेनभाईंच्या ह्या प्रयत्नामुळं मुलं शांत झाली. सगळी शाळाच ग्राउंडवर गोळा झाली. मुलांच्या ह्या घोळक्यात हुसेनभाई मध्यभागी उभा राहून मुलांशी बोलू लागला.
‘‘क्यूँ बे, क्यू इतना झगडा करते हो? सैतान बन गये क्या? टक्कर खेल रहे. क्या हुआ ऐसा? टक्कर खेलने से क्या फायदा? घरी जाता येणार नाही, डोकी फुटून इथंच पडताल.’’
‘‘बच्चों, असा झगडा कधीच करायचा नाही. तुम्ही चांगली मुलं आहात ना. हँसो, पहले हँसो.’’ मारामारी करून रडत बसलेल्या मुलांना तो म्हणाला, ‘‘हसो, अरे हसा की, फि फी फी हसा.’’ हुसेनभाई आभाळ गरजल्यासारख्या आवाजात हसू लागला. त्याला हसताना पाहून मुलंही हसू लागली. बच्चो, मी तुम्हाला टक्कर खेळायला कधी परवानगी देतो - तालमीत. कुस्तीच्या फडात. लाल माती अंगाला लागली तरच मस्ती दाखवायची, मर्दानी दाखवायची, समजलं, इथं कसं शहाण्या पोरांवाणी दिसला पायजे तुमी.’’
घोळक्यातल्या एका मुलाला तो म्हणाला, ‘‘ये झिपर्या, केस किती वाढवलीत? गावातला वारीक काय मेला नाय अजून. झिपरी पोरं काय कामाची नाय, बाईल दिसत्यात. कुस्तीच्या मैदानात लपून बसत्यात. त्यापेक्षा आमचा ह्यो बघा, ह्यो बाळू पहिलवान, यंदाच्या आखाडात आपला दंड घुमवणार बघा. असं पाहिजे पीळदार. चल रे बाळू वाजव दंड एकदा.’’
बाळू खुश झाला. त्याने दंड वाजवले, मांड्या थोपटल्या, आवाज घुमला.
‘‘शाब्बास रे, बाळू पहिलवान. अरे अशी कर्तबगारी दाखवली पाहिजे. बापाचं नाव रोशन करणार.’’
हुसेनभाईला कुस्तीची आवड असली तरी, तो मोठ्या मल्लात कधी दिसत नसे. बालपहेलवानातच तो रमायचा. चैत्र महिन्यात अष्टमीला यात्रा असते, आणि ह्या यात्रेच्या दुसर्या दिवशी कुस्त्यांच्या हगामा रंगायचा. गावोगावचे पहिलवान यायचे; आणि आपली मर्दुमकी दाखवून जायचे. हा फड सुरू होताना प्रथम मुलांच्या कुस्त्या असायचा. ही कोवळी मुलं लंगोट नेसून आपलं उघडं-वागडं अंग घेऊन फडात उड्या मारायची, तेव्हा हुसेनभाई फारच चेकाळून जायचा. ह्या बालपहिलवानांच्या कुस्त्या रेवडीच्या. त्याला बक्षिसी नाही. हरणार्याला रेवड्या आणि जिंकणार्यालाही रेवड्या.
हुसेनभाई अर्ध पोतं रेवड्या घेऊन उभा राहायचा. कुस्ती झाली की प्रत्येकाला, मूठभर रेवड्या द्यायचा. मुलं कंटाळली तरी त्यांना बाहेर पडू देत नसे. आत ओढून, जोड्या जुळवायचा, अन् त्यांना जोर द्यायचा. ‘शाब्बास रे गब्रू, अरे जोरात, अरे लाव जोर, अरे लढ अजून, अरे लढ अजून,’ तो सगळ्याच मुलांना असं ओरडून बळ द्यायचा. बाजूला हलगी वाजवणार्याच्या अंगावर खेकसून ओरडायचा - ‘अरे जरा जोरसे बजाव, बडे मल्ल खेल रहे हे, अरे और जोरसे, अरे, ये जो बच्चा है ना मदन - मदन अपने शिवरामका लडका, देख आगे, बहुत बडा पैलवान होनेवाला है. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अन् तू, ए बोंबलभिक्या.... दूध पितोस का नाय? तुझा बाला सांगतो तुला चांगला खुराक द्यायला. साला ओ भी बहुत चेंगट है.’ तर आणखी तिसर्याला, ‘अय हनम्या, खाली नाम रखा हनुमान, जरा खेल जोर लगा के -’ कुस्ती खेळणार्या मुलांप्रमाणे तो कुस्तीच्या फडात फिरायचा. इकडून तिकडे, कधी ह्या जोडीच्या मागे, कधी त्या जोडीच्या बाजूला.
मोठी मंडळी जमलेली. मोठे पैलवान मिशी पिळत, तर कधी निवांत उभे. तोपर्यंत पाटील व इतर गावातली मंडळी जमलेली असतात. ते मुलांना सांगतात, ‘आता बास झाल्या तुमच्या कुस्त्या, चला लावा पहिली कुस्ती पन्नासची.’
पन्नासची कुस्ती खेळणारे नवाट मल्ल फडात येतात. पण हुसेनभाई त्यांना बाहेर उभे रहा म्हणतो. पोरांच्या कुस्त्या तो थांबवायला तयार नसतो. लहान पोरांना तो चेकाळून सोडतो. मोठ्यांना उद्देशून तो म्हणतो, ‘मंडळी, हीच पोरं पुढं आपल्या गावचं नाव रोशन करणारेत. त्यांना जरा खेळवलं पाहिजे.’
कशीतरी हुसेनभाईची समजून काढली जाते. अन् पुढं ह्या मुलांच्या कुस्त्या संपून खर्या बक्षिसीच्या कुस्त्या सुरु होत. ही गोष्ट दरवर्षीचीच. दरवर्षी हुसेनभाई मुलांच्या रेवड्याची कुस्त्या खेळवणारच.
हुसेनभाई मुलांना म्हणाला, ‘‘हे बघा पोरांनो, टक्कर खेळायची ना तर कुस्तीच्या लाल फडात. इथं काय टक्कर खेळात गुंडावनी. गुंड झाले का तुमी. दाखवा जोर फडात. रेवड्याच काय पेढे उधळतो तुमच्या अंगावर.’’
काही मुलांनी पाय काढता घेतला, अन् घराकडं पळाली, पण दहा पाच पोरं हुसेनभाईच्या गळाला लागली. त्यांना म्हणाला, ‘‘बसा खाली. आता ही टक्कर असते ना ती काय चीज ती आपल्या महादूपैलवानानं दाखवली. आपल्या गावालाच नाय, समद्या जिल्ह्याला. दरवर्षी यात्रांचा मोसम आला की, तो गावोगाव कुस्त्या खेळायचा. पाच-पन्नास हजाराची बिदागी गोळा करूनच गडी घरी परतायचा. गावात काय जिल्ह्यात पण त्याचा तोरा. चालायला लागला की त्याच्या अंगाचा आसा वास यायचा. दंड थोपटला, तर आवाजानं झाडावरची पाखरं पळून जायची. मर्द म्हणजे काय तर आपला महादू पैलवान.
‘‘तर ह्या महादू पैलवानाला गावातले सगळे लोक म्हणायचे - टेंगळ्या म्हादू पैलवान. हॅ हॅ हॅ ’’ हुसेनभाई हसत सुटला. ‘‘तर काय त्याच्या कपाळाला आलं एकदा मोठं टेंगूळ. हे कवटावाणी टणक अन ग्वाल ग्वाल. तर ही टिंगूळ काय त्याचं मरुस्तवर गेलं नाय. ह्या टेंगळामुळं महादू पैलवानाला समदी माणसं टेंगूळवाला महादू, टेंगळ्या महादू म्हणूनच हाका मारत. त्यालाबी त्याचं काय वाटत नव्हतं. तसं आपल्या गावात कसं, एखादं फेगडं असलं की आपूण हाका मारतो ये लंगड्या, जरा चकणं असलं की हेकण्या, तसं महादूलाबी टेंगळ्या.
पण ही टिंगूळ लई भारी. ही टिंगूळ म्हणजे त्याच्या जवानीची खूण. त्याच्या मर्दुमकीची निशानी, त्याच्या बेडरपणाची साक्ष.
महादूच्या टेंगळाची गोष्ट तुम्हाला माहिती नसंन. तुमचा तर तवा जल्मच नव्हता, तर कशी तुम्हाला कळंन? हं तुमच्या बापाला आसनं माहीत.
‘‘बरंका पोरांनो, त्याचं काय झालं, एकदा गावकर्यानी आपल्या नाथाच्या नावानं कटाळ्या सोडला व्हता. ह्याच्या रानात चर, त्याच्या रानात चर, त्याच्या गंजीचा कडबा खा, ह्याच्या रानात घूस, देवाच्या नावानं सोडला, कामधंदा काहीच नाही, तर ह्यो कटाळ्या लय ताकदवान. असा माजला, असा माजला व्हता, चार हत्ती आले तरी त्यांना चित करीन.
‘‘एक दिवस ह्यो कटाळ्या लईच बिथरला, ज्याच्या त्याच्या अंगावर धावायला लागला. कुणी म्हणलं, नाथ खवळला दिसतोय, नाथाला शेरणी बोला. आता मी सगट अकरा किलोची शेरणी बोललो पण कटाळ्या काय अवसानात यायना. कुणीतरी म्हटलं, अरं त्याला अडकवा कुणाच्या तरी वाडग्यात अन् घ्या दार लावून.’ पण त्याला कसं अडकवणार. शेवटाला काय झालं, महादू पैलवान म्होरं सरकला, आता वाटलं, तो कटाळ्याला अंगावर घेणार. समदी टरकली, आरं महादू माघारी फिर, माघारी फिर, माणसं वरडत व्हती. महादूची म्हातारी तर कपाळ बडवून सांगत व्हती, म्हाद्या माघारी फि र, माझी सून काय बोडकी करतो काय? पण महादू इरेला पेटला. आवं ते मर्दाचं रगात. तापलं म्हणजी काय खरं नायी.
‘‘महादू कटाळ्याच्या म्होरं गेला अन् दाबली त्यानं शिंगं कटाळ्याची. ताकद लावून कटाळ्याला मागं सरकवत व्हता. ह्यो जोखमीचा, जिंदगीचा सामना बघताना लोकं स्वत:ला विसरून गेली. हलक्या काळजाचा माणूस तर मेलाच असता. पण कटाळ्या अन् महादू यांची टक्कर रंगात येत व्हती.
कधी कटाळ्या म्होरं यायचा, कधी महादू त्याला मागं दाबायचा. कटाळ्या महादूच्या अंगावर आला, महादूच्या कपाळावर त्याचा माथा आपटला. महादूला काय झालं नाय पण कटाळ्याच्या डोक्यात झिणझिण्या आल्या. वरडलं मोठ्यानं अन् घळाटून बाजूला गेलं. पार गपगार झालं.
‘‘लोकांनी टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या फुकल्या, फेटं, टोप्या उडवल्या अन् खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली. दुसर्या दिवशी महादूला गावकर्यानी नवा पोशाख दिला. टॉवेल टोपी देऊन त्याची बँण्ड लावून त्याला मिरवत नाथाच्या देवळात नेला. तिथं लई शेरणी वाटली, महादूनं तर नाथाम्होरं बुक्कीनंच नारळ वाढवला. नारळाच्या ठिकर्या ठिकर्या झाल्या.
‘‘खेळ संपला. पण काय झालं, ते कटाळ्याच्या टकरीनं, महादूच्या कपाळावर टिंगूळ आलं. वाटलं, हळद लावल्यावर जाईल, मलम लावल्यावर जाईन पण ते कायमचंच राहिलं.
तवापास्नं महादू पैलवानला लोक टेंगळ्या महादू म्हणायला लागली.
लडके लोक, अगर मर्द बनना है ना तो महादू जैसे बनो. इधर क्या टक्कर खेलते. ये गुंडोंका खेल है |’’
हुसेनभाईची गोष्ट संपली, तेव्हा हुसेनभाईचा भाऊ रानातून येताना दिसला. त्याला पाहून हुसेनभाई म्हणाला, ‘‘अरे बच्चे लोग, तुमच्या नादाला लागून माझ्या कामाचा इस्कोट झाला. आरं रानात भाकर न्यायची इसारलोच. पार इसारलो. आता ह्यो आमचा भाऊ भुकेनं कावला असन्.’
‘‘जावा तुम्ही पळा, पळा, पळा.’’
हुसेनभाई ओशाळल्या नजरेनं भावाकडं पाहत होता. त्याचा भाऊ म्हणाला, ‘‘आन इकडं ती भाकर, मी जातो परत रानात, तू बस चकाट्या पिटत.’’
पोरं लांबून पाहत होती, हुसेनभाईच्या कपाळावर टिंगूळ दिसतंय का? पण हुसेनभाईनं कपाळावर हात मारून घेतला अन् तिथंच ठेवला.
- अरुण जाखडे
oghawati bhasha tyamule malahi lahan mulanpramanesh rangat chadhli. goshta keva sampli kalalach nahi.
ReplyDeleteGood !
ReplyDelete