पारावर माणसं
एकमेकांची वाट पाहत बसली. हुसेनचा विषय निघाला. हुसेन फकिराबरोबर गेला होता आणि
दोन दिवसांपूर्वीच गावात आला होता, एवढी माहिती
सगळ्यांना होती. तेवढ्यात हुसेनचा जिगरी दोस्त माणिक टपकला. कोणीतरी विचारलं, ‘‘माणिक शेठ, आपले दोस्त का येत
नाही इकडं? दोन दिवस झाले परत येऊन. पण
फिरकलासुद्धा नाही. आता आजतरी येणार हाये का नाही त्यो इकडं?’’
‘‘आला तर यीन नाहीतर नाय यायचा,’’ माणिक म्हणाला.
‘‘दमलं असन फकिराबरोबर वणवण भटकून.’’
‘‘त्या भटकण्याचीबी त्याला कसकस आली असन
बघा. आता फकीर माणसावनी वागायला याला जमतंय व्हय.’’
‘‘आवो, तुमच्या ध्यानात
आलं का, ह्यो फकिरालाच त्याच्या लायनीत वढन.
हुस्न्या म्हंजी बोलायला लई चतुर. बिरबलावनीच. फकिराला बातामंधी येडा बनवायला
बसलाय.’’
‘‘आवं त्यो अल्लाला सुदिक चकवा दिइन.’’
‘‘पण कायबी म्हणा, हुस्न्या लईच भारी
राव. आता त्यो इथं नाय आलं तर आपल्याला बी चुकल्यावनीच वाटतं.’’
‘‘असला माणूस लागतो एखांदा म्हंजी पक्का
टाईमपास.’’
‘‘त्याच्या बाता कशा का असना पण
गुंगीवतय राव ती समद्याला.’’
‘‘आता त्याचं कसंय, त्ये हुस्न्या काय
कुणाच्या घरच्या गोष्टी करत नाय. कुणाची निंदा नालस्ती करत नाय, अन् कुणाला घालून
पाडल्यावनीबी बोलत नाय. कुणाच्या मागं चांगलं-वाईट बोलत नाय.’’
‘‘खरंय बरंका ही. ती कुणाच्या बाता मारत
नाही. लई येगळ्याच असत्यात राव. आपण कवा त्याची कल्पना सगट करत नाय.’’
‘‘हुसेनच्या गप्पा ऐकायला म्हणून तर
सगळी माणसं कान टवकारून बसलेली असत्यात. आसुसलेली असत्यात. तो कोणत्या दिवशी कोणती
गोष्ट सांगन, याचा माग लागू देत नाही.’’
तेवढ्यात कुणीतरी
शंका काढली – ‘‘ती बघा बरं मसुदीत जाऊन बसलं आसन.
त्याला असली फकीर, साधू, बुवा माणसांचा लई
नादय.’’
अशा बाता चालल्या
असतानाच हुसेन समोरून येताना दिसला. चट्ट्यापट्ट्याच्या कपड्याची रंगीत लुंगी, वर पांढरी स्वच्छ
बंडी. हुसेन आज जरा ताजातवानाच दिसत होता.
‘‘अल्ल्याका हुसेन, कुठं तरफडला व्हता
त्या फकिराबरोबर, ही नवीनच काय तरी खूळ तू डोक्यात
घालून घेतो. राज कपूरपासनं नेहरूपर्यंत तुझा दोस्ताना असताना तू एकदम फकिराबरोबर?’’
‘‘आवो, त्याला टेकू द्या, टेकू द्या. त्याला
बसू द्या. त्याच्याशिवाय त्याला कसं सुदरन. शांततेत घ्या बगा सगळं. तो आता कुठं
जातंय? फकिरानं त्याला नाय म्हंजी ह्यानी
फकिराला काय अक्कल शिकवली आसन ती ऐकू या की.’’
‘‘फकिराचं बघता यीन नंतर, ती मुंबईत काय करत
व्हतं ही काय नीट सांगितलं नाय. त्यो खायचा कुठं, प्यायचा कुठं, त्याची पथारी कुठं
व्हती, ती डिटेलमंधी सांगायला पायजे वो
हुसन्यानं. नुसतं कवा तरी म्हणलं की, बॅण्ड कंपनीत
व्हतो. आता ह्याला साध्या हाताच्या टाळ्या नीट वाजवता येत नाय. ह्याचं नरडं काय
गायच्या लायकीचंय? तर ती नकाका नसाना. आपल्यालाबी माहिती
नाय त्याला जमत. पण मग ह्यो तिथं घुसला कसा? ह्यो एक प्रश्न
हाय अन् दुसरा प्रश्न म्हंजे एवढं तिथं व्हतं, अन् मोठमोठ्या
गप्पा मारतंय, तर मग परत हिथं उकिरड्यात आलाच कशाला? तिकडंच थांबायचं, म्हंजे आमाला मुंबई
बघायला चानस घावला असता.’’
‘‘ही खरंय बरं का फक्कड दादा, आवो याला पिपळाच्या
पानाची पिपानी नाय वाजवता यायची, ही कुठं निघालं
बॅण्ड वाजवायला. अन् माझा बी एक सवाल हाय. त्यो म्हंजी, ह्याला एखादी...
एखादी (लाजत) नखरेवाली नाय भिटलीका. ती जरा रंगव गड्या. आपल्याला त्ये ऐकण्यात लई
इंटरेस्टय.’’ डोळे मिचकावीत रंग्या लईच मूडमंधी
येऊन बोलला अन् गुडघ्याचा मृदुंग करून वाजवत बसला.
‘‘आवो, आवो त्याला
बोलूनद्या, बोलूनद्या, नुसतं गप बसलंय ते, अन् तुमीच लई
चेकाळल्यावणी बडबड करताय. जरा थोबाड बंद करा तुमचं.’’
जरा वेळ कुणीच काय
बोललं नाही. सगळी गपगार. तेवढ्यात वरून वडाचं एक पान खाली पडलं, त्याच्याकडं बघत
हुसेन म्हणाला, ‘‘मी आता काय तुमाला सांगणार नाय.
तुमाला वाटतं, मी बाता मारतो.’’
‘‘अरे हुसेन, तुला असं कोण
बोललंय? सांग बरं, कवा पुरावा मागितला?’’ फक्कड दादानं
समजुतीच्या भाषेत सांगितलं.
‘‘काय? परवा तुम्ही नाय म्हणला
का, राज कपूरबरोबरचा एखांदा बारका फोटो
तरी दाखव म्हणून शान. एखांद्या सालाला त्याला भैरवनाथाच्या यात्रंला घेऊन इन अन्
पालखीम्होरं त्याच्यासंग चालन तवा तुमची डोळं पांढरी व्हतील. तवा मीच विचार केला
की, बारकासा फोटो दावण्यात मला काय रस
नाय. अन् बॅण्डमंधी मी व्हतो म्हणलं तर आता पुराव्यानिशी यीन तवाच बॅण्डच्या
गोष्टी खर्या वाटतीन. त्यो पुरावा बरोबर घेऊन यीन तवा तुमी म्हणताल, हा हुसेन, ये बात सच है. आज
मैं कुछ नहीं बोलूंगा.’’
‘‘हुसेन, तू इतना गुस्सा मत
कर. असंच बोलतात कंधीमंधी, त्याचं काय मनावर
घ्यायचं आस्तं का, इनोदावर घ्यायचं आसतं.’’
‘‘तुमचं बरोबरच फक्कड दादा, पण मनाला लागतं ते, लई वाईट. कुणाच्या
मनाला लागन असं बोलू नये, दादा.’’ ‘‘आसं बोलल्यानं माझा
जीव तुटतो.’’ हुसेननं लुंगीनेच डोळे पुसले.
हुसेनचा रडवेला
चेहरा पाहून सगळेच शांत बसले. कुणीच कुणाशी काही बोलत नाही.
मग हुसेनच बोलला, ‘‘कारभारी, उंद्या मी सबूत
घेऊन येतो. अन् तुमचं म्हणणं हाय म्हणूनशान माझं बॅण्डमधलं काय व्हतं अन् काय
नव्हतं ते सांगतो.’’
----------------
गावाकडं येताना
बॅण्ड कंपनीमधल्या काही वस्तू परत करायला पाहिजे होत्या. पण हुसेनला वाटलं, आपण मालकाला
सांगितलं, तर तो परवानगी द्यायचा नाही. हुसेन तर
मालकाला आणि बॅण्ड कंपनीतल्या साथीदारांना सांगून आला होता की आपण चार-दोन दिवसांत
परत येऊ.
पण हीच गोष्ट
हुसेनच्या मनाला खात होती. आपण परत येणार नाही, हे माहीत
असूनसुद्धा आपण खोटं बोलत आहोत, याचा त्याला
अद्यापही त्रास होतच आहे. भिडस्त माणसाचे जे हाल होत असतात तसाच त्रास त्याला होत
होता. पण तो परत येतो म्हणून जे सटकला, ते तिथल्या काही
गोष्टी, उदा. बॅण्डचा युनिफॉर्म वगैरे जमा न
करताच आला होता. आपण आपले कपडे परत जमा केले तर सगळ्यांना समजेल की हुसेन आता
येणार नाही. दोलामय अवस्थेत तिथून तो निसटला पण घरी आल्यावर आपलं चुकलंच ही भावना
त्याला पिडून दु:खी करत होती. आज हा बॅण्डचा युनिफॉर्म घालूनच गावातून फिरत पारावर
जाऊ म्हणजे सगळ्यांना समजल की मी बॅण्डमध्ये होतो.
त्यानं मुंबईवरून
आल्यावर काही गोष्टी लोखंडी पेटीत आबाधित ठेवल्या होत्या. त्यानं ती पेटी उघडली.
त्यात जोकरचा बाहुला दिसला. त्याचा मुका घेऊन तो बाजूला ठेवला आणि तळाशी व्यवस्थित
घडी घालून ठेवलेला बॅण्डचा युनिफॉर्म त्यानं बाहेर काढला. त्या ड्रेसवर त्याला
बॅण्डमधल्या सगळ्या सहकार्यांचे चेहरे दिसू लागले. मालकाचाही अन् तो ‘चाये ऽऽ गरम’ करत येणार्या
बारक्याचाही. त्याला बॅण्डमधले दिवस आठवले. त्या आठवणींनी तो घायाळ झाला. डोळ्यात
पाणी आलं, घडी घालून ठेवलेला ड्रेस त्यानं
दोन्ही हातानं एखादं लेकरू हातात घ्यावं तसा घेतला आणि डोळ्यांपर्यंत नेला. त्या
रंगीबेरंगी कपड्याने त्याचे डोळे टिपले. आठवणीत उदास होऊन त्यानं ड्रेस अंगावर
चढवला.
त्याच्या अंगावर तो
ड्रेस पाहून बुढ्ढीला तर नवलच वाटलं. हुसेनच्या बिबीनं त्याच्याकडं लाजून पाहिलं
अन् हळूच म्हणाली, ‘‘कितना किमती है, और इसमें तुम बहुत
बडा आदमी देखते है.’’
हुसेन घराबाहेर
पडला, त्याचा हा ड्रेसमधला नवा अवतार पाहून
कुत्री जोराजोरात भुंकू लागली. काही कुत्री तर त्याच्या अंगावरच धावली. हुसेन
घाबरून ओरडू लागला. ‘हाड, हाड, साले पहेचानते नहीं
क्या अपने गावके आदमी को’, असं म्हणतानाच
त्यानं रस्त्यावरचे दोन-चार दगडं उचलले अन् भुंकणार्या कुत्र्यांच्या पेकाटात
मारले. ‘कुई कुई’
करत कुत्रे बाजूला झाले. पण ह्या
गल्लीतल्या कुत्र्यांचा आवाज ऐकून पुढच्या गल्लीतले कुत्रेही भुंकू लागले. हुसेन
पुन्हा घरी आला आणि एक लाकडी काठी घेऊन बाहेर आला. ‘या भडव्यांनो’ म्हणत तो
कुत्र्यांवर खेकसला. एवढ्या वेळात कुत्र्यांनी त्याला ओळखलं आणि ती गपचूप बसली.
हुसेननं डोक्यावरची टोपी काढून हातात धरली, तेव्हाच
कुत्र्यांनी त्याला ओळखलं.
डोक्यावरची टोपी
एका हातात आणि दुसर्या हातानं काठी फिरवत तो चालू लागला. पुढच्या गल्लीत आला, तिथली कुत्री
अगोदरपासून भुंकतच होती. हुसेनच्या हातातली छडी पाहून ती लांब बाजूला थांबून आपलं
थोबाड पसरवित होती. पण ती लवकरच शांत झाली. कदाचित हुसन्याला त्यांनी ओळखलं असणार.
हुसेन पारावर
पोचला. त्याचा हा अवतार बघून सगळीच नवलाईत डुबली. ‘‘आवो, हुसेनराव, काय तुमी पोषाख
चढवलाय राव, आमी तर तुमाला वळखलंच नाही.’’ सगळ्यांचा सूर असाच
होता.
शेवटी त्यातला एक
गडी तंबाखूची पिचकारी फेकत म्हणाला, ‘‘च्यायला, तुला लांबून बघितलं
तवा मला वाटतं, रायरंदच आला.’’
‘व्हय राव’ म्हणत सगळ्यांनी
सहमती दिली.
आपल्याला, रायरंद म्हणल्याचं
हुसेनला आवडलं नाही. तो चिडला. हातातली काठी पाराच्या दगडावर आपटत तो जोरात
म्हणाला, ‘‘आवं, तुमी काय मला
स्वांग करणारा माणूस समजला काय?’’
‘‘नाय वो नाय, पण मुंबईला
गेल्यावर तू आसला पोषाख घेशीन वाटलंच नाही.’’
‘‘तुमाला कसं वाटन, आता मी स्वांग
करणारा रायरंद हायना तर पोलीस इन्स्पेक्टरचं स्वांग करतो अन् काढतो बडवून एकेकाला
ह्या काठीनं. ह्या काठीला घाबरून कुत्रीसुदिक लांब पळाली.’’
‘‘आरं ती कुत्री काठीमुळं नाय बाजूला
पळाली. त्यांना तुझ्या अंगाचा वास आला आसन. आरं ती जात लई भारी, वासावरून वळखत्यात.’’
चर्चा अशी लांबत
असताना हुसेननं रागानंच विचारलं, ‘‘बरं आता बसू का नगं
मग?’’
‘‘नाय नाय, चुकलं आमचं. बसा, हुसेनशेठ, अन् सांगा आमाला
तुमचं मुंबईतलं पार डिटेलमंधी.’’
हुसेन बसला, लोकांच्या शंका
लक्षात घेऊन तो सांगू लागला –
‘‘ह्यो ड्रेस हायना, ह्यो बॅण्ड
कंपनीतल्या मॅनेजरचा हाय. समद्यांचा सारखाच असतो पण माझी टोपी लई भारी. तर
मॅनेजरला समदं माहिती असावा लागतं. बॅण्डवाली आली की त्यांना ड्रेस घालायला लावणं, वरातीच्या पुढं
नायतर कोणत्याबी मिरवणुकीत समद्यात म्होरं बॅण्ड आणि बॅण्डच्या मधनंच मी चालणार.
चालताना लाईनीतून भाहेर गेला, आत गेला की
सटकावलंच त्याला काठीनं म्हणून समजा. समदी टरकून असायची मला. आवं, एवढंच नाही, तर गाणं वाजवताना
कुणाची पट्टी चुकती,
कुणाचा सूर बिघडतो, मग मला लई राग
यायचा, काठी उगारली की ती जागेवर यायची.’’
‘‘आरं, पण हुसेन तू कवा
गाणं शिकला, बॅण्ड शिकला?’’ एकानं विचारलं.
‘‘आवो शिकायला काय जरा मन लाऊन समजून
घेतलं तर त्या जगात काय अवघड नाय अन् असली बॅण्ड कंपनी आपल्या इकडं बघायला सगट
मिळायची नाय. ह्या बॉम्बे बॅण्ड कंपनीच्या पुढं ते नगरचा वा पुण्याचा तो राजकमल
बॅण्ड काय, करमाळ्याचा तो बॅण्ड काय, ज्यांना आपण लई
भारी म्हणतो, त्यांची लायकी ह्या बॉम्बे बॅण्ड
कंपनीच्या पायाशी बसायची सगट नाय. आवो थोडं इकडच्या तिकडं झालेलं चालत नाय. आता
माझं कसं, रागदारीवर लई भर रहायचा. रागदारीवर
म्हणजे ते सूर काढायचे त्याचं एक शास्त्रय बगा. एखादा शिवरंजनी रागात मधीच घुसला
की सापडलाच माझ्या तावडीत, मग काठी ओरडून
सांगावं लागायचं, आरं ती मालकंस सोडून कुठं भरकटला.
माझं काय झालं, ऐकून ऐकून लईच माहिती वाढली. अन्
मालकाचा माझ्यावर विश्वास. समदी जळायची माझ्यावर, पण मालकापुढं
कुणाचं चालतंय.’’
हुसेनच्या ह्या
गप्पा सगळ्यांच्या डोक्यावरून जायला लागल्या. ही मालकंस काय, शिवरंजनी काय असली
नावं सुद्धा त्यांनी पहिल्यांदाच ऐकली, बॅण्डची प्रॅक्टीस
चालायची तेव्हा मास्टर सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून घ्यायचा. त्यांच्या चर्चा ऐकून
ऐकून हुसन्याला असले डेंजर शब्द माहीत झाले होते. कानावरून गेलेले हे शब्द भराभरा
फेकून हुसेननं सगळ्यांना गार केलं. सगळी शांत बसून कान देऊन ऐकत होती.
‘‘हे बघा गावकरी मंडळी, मालकानं मला बजावून
सांगितलं, हुसेनभाय, तू इकडं तिकडं कुठं
जायचं नाय. मुक्कामाला बी इथंच थांबायचं. समदी बॅण्ड कंपनी तुझ्या हातात, तर मी नवतो राजी
ह्या गोष्टीला, पण ते लईच हातापाया पडायला लागलं, तर म्हणलं, बरं असू द्या, पण मी लईतर महिना
दोन महिनं थांबन, तवर तुमी दुसरा माणूस शोधा. मला
गावाकडं जायलाच पायजे.’’
‘‘असं मी राहिलो, महिना-दीड महिना पण
माझा जीव काय तिथं लागंना. मुंबई म्हंजी लई डेंजर सिटी. आसल्या डेंजर सिटीत
मारामारी, गुंडागिरी लई चालती. भाऊ भावाला वळखत
नाय पैशापुढं. तर दोन जातींत, दोन धर्मांत
मारामारीच चालती. वैतागलो राव त्या भानगडींना. आपलं गाव कसंय, शांत शांत. आवं
शंकराला कळलं आसतंना ही आपलं गाव, तर त्यो हिमालयात
गेलाच नसता. आलं का लक्षात. कशाला जाईन? असली मसनवाटाची
शांतता कुठं आसती? मी निघालो तर मालक म्हणाला, ‘हुसेन, कभीभी वापिस आवो, ही बॅण्ड कंपनी
तुझीच समज.’ आता एवढ्या मोठ्या मनाचा माणूस कुठं
भेटणारंय व्हय? लई मोठ्या मनाचा अन् ताकदीचा बी.
त्याची ताकद मंजी पैशावर लोळायचा त्यो माणूस, पण कसली घमेंड नाय, नायतर आपल्या गावात
एखाद्याला खंडीभर माल झाला तरी ते लई फुगराट बनतं. आवं एका बॅण्डमंदी वीस-वीस
माणसांचा ताफा, पण बरोबर द्यायचं माझ्यावर सोपवून.
असला दिलदार माणूस नाय बघितला आपण.’’
बॅण्डमधली वाद्ये
आणि गाणी यावर बोलण्याऐवजी हुसेन मालक आणि नको त्या इतर गप्पा मारत बसला. माणसं
ह्या गप्पात एवढी रमली,
की त्यांच्या हे लक्षात आलंच नाही.
हुसेन चतुराईनं बॅण्डबद्दल बोलायचं टाळून मालकाबद्दल, दुसर्याबद्दल बोलत
राहिला.
हुसेन पुन्हा सांगू
लागला, ‘‘हे बगा, आता दिवंलागण
व्हायचा टाईम झाला,
ह्या टायमाला खोटं बोलू नये.
म्हणूनशान तुमाला सांगतो. बॅण्ड ज्याच्या घराम्होरं, नायतर वरातीत
वाजवायचा, त्यो माणूसबी लई मालपाणीवाला असायचा
राव. बॅण्ड मिरवणुकीतून परत त्याच्या दाराम्होरं आला, की मला बोलवून
घ्यायचा, अन् म्हणायचा, हुसेन चाचा, तुमच्या बॅण्डमधी
वाजवणार्या समद्यांना पोटभर जेवू घाल. आता ही जबाबदारी तुझी. आता अशी जबाबदारी
टाकल्यावर मला लई ताण यायचा अन् जेवणखाण काय काय असायचं, आता नावं सगट आठवत
नाय. जिल्बी खा, लाडू खा, बर्फी खा, आवं, कमरेचा पट्टा
तुटायची येळ यायची पण आमची ही बॅण्डमंडळी खातच राहायची. आता त्यांना तरी एवढं कुठं
मिळणार? मी आपला कानाडोळा करायचो.’’
‘‘आता शेवटचं इच्चारतो, समोर मारतीचं देवाळ
हाय, तुमी ही गोष्ट ध्यानात घेऊन सांगा, मी बरोबर बोलतोय का
नाय? आता ह्यो माझा पोषाख बघा अन् तुमीच
ठरवा. मी बॅण्डमंदी व्हतो का नाय?’’
‘‘असणार, असणार,’’ सगळे एकसुरात
बोलले.
‘‘असणार नाय व्हता म्हणा, व्हता म्हणा.’’ – हुसेन हसत हसत
बोलला.
माणसं थक्क झाली.
हुसेन मुंबईत जातोय काय,
राज कपूरला भेटतोय काय, बॅण्डमंदी चमकतोय
काय, सगळं नवल करावी अशीच गोष्ट. कोणाला
काय बोलायचं सुदरना. तंबाखूचा बार भरल्यावनी थोबाड बंद करून बसली.
हुसेन उठला, काठी वाजवत-वाजवत
घराकडं गेला. पारावर माणसं बोलत होती, हुसन्याचं ‘खरं का खोटं’ याचा पंचनामा कोण
करणार? कसं का आसंना, पण त्याला काहीतरी
माहिती आहे, एवढं तरी लक्षात घ्यायला पाहिजे, यावर एकमत होऊन पार
रिकामा झाला.
-
अरुण जाखडे

प्रत्येक माणसाची एक हळवी कहाणी असते. तशी हुसेन ची देखील आहे. आपला बँडचा ड्रेस जसा त्याने खोल पेटीत झाकून ठेवला होता तशीच आपली कहाणी देखील त्याने ह्रदयात लपवून ठेवली होती. आज जाखडे यांनी ती सांगितली आणि वाचकांना अंतःकरणापासून हलवून सोडले.
ReplyDeleteरोज नवे वळण हे सदर घेत असल्याने ते वाचनीय झाले आहे. पुढील सदर लेखनासाठी शुभेच्छा !