Skip to main content

हुसेन आणि फकीर

     

     बरेच दिवस हुसेन पाराकडं फिरकलाच नाही. त्याची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवत होती. लोक त्याच्या पश्‍चात त्याच्याविषयीच्या खर्‍या-खोट्या गप्पा, निंदा मारत होती. तरीसुद्धा हुसेन हा त्या पारावरच्या मंडळींचा, गावाचा, शाळेतल्या मुलांचा एक भागच बनला होता. कोणीतरी तपास केला आणि बातमी दिली, की हुसेन एका फकिराबरोबर गेला आहे.
     कोण हा फकीर? हुसेनचा त्याचा काय संबंध?
लोकांनी हुसेनच्या घरी जाऊनच खबरबात मिळवली. गावातल्या एका पडक्या मशिदीत एक फकीर तीन-चार दिवस मुक्कामाला होता. हुसेन मशिदीत नमाज पाडायला जायचा, तेव्हा त्यांची भेट झाली. बरं, हुसेनभाईचा स्वभाव बोलका. त्यानं फकिराबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली, ‘‘सलाम आलेकुम! कोण गावचं, कुठून आला, अल्लानं तुम्हाला इथं राहायची का बुद्धी दिली?’’ अशा गप्पा मारता-मारता तो घरून दोन-तीन भाकरी, भाजी, ठेचा त्याला आणून देऊ लागला. फकीर हुसेनवर खूश झाला. त्याची धुनी, धुपाचा वास, तो धूर हे त्याच्या डोक्यात झिनझिनायला लागलं. तो फकिरालाच अल्लाचा दूत समजून त्याची सेवा करू लागला.
     एक दिवस फकीर त्याला म्हणाला, ‘‘कल मैं ये गाव छोडके जा रहॉं हूँ.’’ हुसेनला वाईट वाटलं. उद्यापासून ह्या पवित्र वास्तूत आपणास हा फकीर दिसणार नाही. अर्धवट उभी असलेली, कधी काळी-पांढरा रंग दिलेल्या त्या मशिदीत ह्या माणसामुळं पोकळपणा कमी झाला होता. उद्यापासून ती रिती दिसणार, जुनाट, शापित वास्तूसारखी. फकिराने हुसेनच्या चेहर्‍यावरून, डोक्यावरून मोराचे पंख फिरवले, अन् म्हणाला, ‘‘तुम मेरे साथ चलो हुसेन, यहॉं तेरा कुछ काम नहीं, अल्लाके लिए कुछ दिन निकालो, हज यात्रा का पुण्य मिलेगा.’’
    हुसेनच्या मनात चलबिचल झाली. हा निर्णय आणि तोही एकदम. तो एकदम गोंधळात पडल्यासारखा झाला. त्यानं फकिराला विनंती केली की, ‘‘घरी जाऊन बुढ्ढीला विचारतो, भावांना विचारतो. मी तर शादीशुदा बीबी बच्चेवाला माणूस. उनको तो पुछना पडेगा.’’
      त्याने पुन्हा फकिराला हात जोडून विनंती केली. ‘‘मैं घर जाके उनकी परवानगी लेके आता हूँ.’’
हुसेन घरी गेला. बुढ्ढीला त्यानं सगळा प्रकार सांगितला. बुढ्ढीनं सगळं ऐकून घेतलं अन् त्याचे कान ओढत म्हणाली, ‘‘गधे, फिर शादी क्यूँ की? लडके क्यूँ पैदा किए?’’ हुसेन गप्प बसला. तेवढ्यात त्याचा थोरला भाऊ आला. बुढ्ढीनं त्याला सगळं सांगितलं. थोरला भाऊ एकदम बिथरला. हुसेनला तर त्यानं शिव्याच दिल्या. शेवटचा उपाय म्हणून हुसेननं सांगितलं, ‘‘फक्त चारच दिवसात परत येतो. अल्ला मुझे गलत रास्ते नहीं लेके जाएगा.’’ चार-पाच दिवसांनी परत येतो. त्यानं रडवेला होऊन कळवळून विनंती केली. शेवटी बुढ्ढीनं त्याला चार दिवसांसाठी परवानगी दिली. थोरल्या भावाला हे काही आवडलं नव्हतं. हा उद्यापासून झोळी पसरत घरोघर जाणार. आपली आज परिस्थिती पूर्वीसारखी नसली, तरी जमादाराचं रक्त आपल्या शरीरात आहे. न जाणो ह्याला तशीच चटक लागली तर परत  यायचा नाही. फकीर होणं इतकं का सोपं आहे?
      पण बुढ्ढीनं त्याची समजूत घातली. हुसेनला म्हणाली, ‘‘हुस्न्या, तू मेरे माथेपे हात रखकर बोल, मैं चार दिनमें वापिस आऊंगा, ले कसम ले, मेरी कसम ले.’’ हुसेननं कसम घेऊन सांगितलं,                      ‘‘सच्ची मैं चार दिन में आऊंगा.’’
       हुसेननं एक सतरंजी, चादर, दोन कपडे, एवढं सगळं एका वळकटीत गुंडाळलं. बुढ्ढीला, बिबीला, सगळ्यांना त्यानं सांगितलं की, ‘‘मैं अल्लाके नामसे चार दिन किसी मशिदमें रहकर वापस आऊंगा.’’
      हुसेन आणि तो फकीर गावाच्या बाहेर पडले. चार-पाच तास चालल्यानंतर एक गाव लागलं. फकीर हुसेनला म्हणाला, आज इथंच राहायचं, हुसेनही चालून कंटाळला होता. त्यानं मानेनंच ‘हो’ म्हटलं. चौकशीअंती त्यांना समजलं की, ह्या गावात चांगली, बांधलेली मशीद नाही. गावाच्या बाहेरच मातीचं एक टेकाड होतं, त्याच्यावर पुरुषभर उंचीची मातीची भिंत पडक्या अवस्थेत उभी होती. गावात पाच-सहा मुसलमानांची घरं होती. ती माणसं त्या भिंतीला साक्षी ठेवून नमाज पाडत असत. गावात कोणी फकीर आला तरी तो तिथंच मुक्काम करी, थांबे. किंवा पुढच्या गावाला जाई.
      फकिरानं हुसेनला सांगितलं, ‘‘आज आपला मुक्काम इथंच.’’ हुसेनला असं उघड्यावर झोपणं प्रशस्त वाटलं नाही. तिथं जमीनसुद्धा सरळ सपाट नव्हती. उकरलेल्या ह्या जमिनीवर त्यानं नजर फिरवली अन् तो फकिराला म्हणाला, ‘‘गावात एखादं मंदिर असन् त्या मंदिरात आपण पडू. रात्र निघून जाईल.’’ पण फकीर मंदिरात मुक्काम ठोकायला तयार नव्हता. फकिरानं हुसेनचं समुपदेशन केलं, पण ते हुसेनच्या डोक्यावरून गेलं. आजपर्यंत त्याला मंदिर आणि मशीद यांत फरक वाटत नव्हता. पण आता आपण फकिराबरोबर आलो आहोत, तर त्याचंच ऐकणं जरूर होतं.
       रात्रभर हुसेनला नीट झोप आली नाही. रात्री कुत्रे भुंकू लागले. हुसेनला वाटलं, ते इथं येऊन आपल्याला कचाकचा चावतील. भिंतीच्या पडक्या ढेकळातून साप-नाग वळवळत येऊन तेही चावा घेतील, काहीतरी पिसवासारखे त्याला चावू लागलं. सगळं अंग खाजवण्यात त्याची रात्र गेली. त्यानं पाहिलं, बाजूला फकीर शांत झोपला होता.
       दुसर्‍या दिवशी फकिराबरोबर तो चार-पाच घरं फिरला. कामापुरतं झोळीत पडलं होतं. कुणी पीठ दिलं होतं, तर कुणी भाकर्‍या. हुसेन आता फकीर झाला होता.
       हुसेनला वाटलं, दुसर्‍या दिवशी मुक्काम हलवू. पुढच्या गावाला गेलं की निदान बांधलेली मशिद तरी भेटेन. तेथे राहता येईल. पण फकीर ह्या गोष्टीला तयार नव्हता. एखाद्या ठिकाणी तीन-चार दिवस तरी राहायला पाहिजे.
        गप्पाच्या ओघात हुसेनला कळलं की, फकीर आता त्याच्या घरी कधीच जाणार नाही. त्याची बायको तर दोन वर्षांपूर्वीच वारली होती. त्याला सगळ्या म्हणजे पाच मुली होत्या. अन् त्यांची लग्न होऊन त्यांच्या घरी राबत होत्या. एक दिवस फकिराने आजूबाजूच्या पडोसी लोकांना सांगितलं, की ‘‘मी आता पवित्र यात्रा करून परत येतो. किती वर्षांनी, महिन्यांनी, दिवसांनी परत येईल ते सांगता येत नाही. मला अल्लाची मर्जी होणार आहे आणि मग मी परत येईन.’’ फकिरानं घराला कुलूप लावलं.           गरजेपुरती एक वळकटी घेऊन तो गावोगाव फिरत होता. त्याने असं ‘निदान शंभर मशिदीत राहून मग पुढचा निर्णय घ्यायचा’, असं ठरविलं होतं.
       आता हुसेनला त्याची संगत फार नको असं वाटू लागलं. फकीर त्याला कुराणातल्या गोष्टी समजावून सांगत असे. तरी तो आतून घाबरला होता. आपण त्या माणसाबरोबर फिरायला का बरं राजी झालो? आपली मुलं, बाळं, घर, कुटुंब, सगळा बारदाना सोडून असं फिरणं, म्हणजे घरच्यांशी, लेकरा-बाळांशी बेइमानी केल्यासारखं होईल. आपण घरच्यांना फसवतो आहे आणि त्याचा ताण डोक्यावर घेऊन फिरतोय असं वाटतंय.
        पण फकीर त्याला पुन्हा-पुन्हा सांगत होता. ‘ये अल्ला का आदेश है.’ एका बाजूला घर, सगळा प्रपंच, पोरबाळं, बुढ्ढी तर दुसर्‍या बाजूला फकिरानं उभी केलेली अल्लाच्या आदेशाची ‘भिंत’ ह्या दोन्हींमध्ये आपण चिरडून जावं, आपलं सगळे शरीर, अस्तित्व त्यात विरघळून जावं. आता कुठेच आपण वा आपलं शरीर असू नये. फकीर म्हणतो, तसा कुठला मोह, कुठला त्याग, कुठला हा विचार? फकीर म्हणतो, ‘‘आपण जो असतो, ते आपण खरंतर कुणीच नसतो.’’ पण म्हणजे नक्की काय, कुणीतरी असतोच की. फकीर म्हणतो, ‘‘तुला हे समजायला बरेच दिवस लागतील.’’
       त्या क्षणी हुसेन उठला. भिंतीचा एक ढासळलेला मातीचा गोळा त्यानं हातात घेऊन कपाळावर मारला, अन् भिरकावून दिला. भिरकावून दिला तो आदेश, ते फकिराचे शब्द ‘म्हणजे आपण कुणीच नसतो.’, भिरकावून दिलं सगळं मनावरचं ओझं, त्याला वाटलं, फकिराला धरून गदागदा हलवावं अन् विचारावं, तू सर्वज्ञानी आहेस, तर दाखव मला काही चमत्कार. दाखव ही भिंत हलवून.
आपल्याला कशी भुरळ पडली अन् ह्या फकिराच्या नादाला लागलो, असं त्याला झालं.
        तो शांतपणे उठला. मडक्यातलं पाणी गटागटा प्याला अन् फकिराजवळ जाऊन तो म्हणाला, ‘‘मला काहीतरी बोलायचंय.’’
        फकीर म्हणाला, ‘‘बोल.’’
       हुसेन बोलू लागला, ‘‘काल रात्री मला जे सपान पडलं, त्यानं मी गारठून गेलो. समदी पृथ्वी, घर, ही मशीद, ही भिंत गरागरा फिरायला लागली. मी तर घाबरूनच गेलो. आपण रहाटगाड्यात बसलोय अन् उंच वर गेलेल्या झोक्यात बसल्यावर डोळे फिरावेत, मळमळ व्हावी, छातीचा ठेका चुकावा, असं झालं. कसला तरी आवाज येत होता. कुणीतरी माझे केस पकडून मला जोरात ओढतंय. मी मरण, मरण, मला सोडा म्हणत होतो, ओरडत होतो. माझे सगळे केस उपटले आणि आपल्या लांब हातानं त्यानं माझ्या गावाकडं, घराकडं, माझ्या शेतात टाकले. एक-एक केस तो उपटून तिकडं टाकत होता. अन् मी ओरडत होतो. माझ्या पूर्ण केस नसलेल्या, चंपी झालेल्या डोक्यावरून मी हात फिरवला. त्या मोकळ्या, मऊ डोक्याचा स्पर्श मला फार यातनादायक वाटला. त्या लांब हाताने माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, ‘‘आता जिकडं मी तुझे केस उपटून टाकले, तिकडं तू जा. तुझ्या गावात, घरी, शेतात.’’ मी लई धाडस करून एवढंच विचारलं, ‘‘पण फकिराबरोबर मला जायचंय ना, मी त्याला शब्द दिलाय’’, तसं तो त्याचा हातच बोलल्यावणी बोलला, ‘‘ये अल्लाका आदेश है, वो फकीर जादा दिन तक इस दुनियामें नहीं रहेगा.’’
         हुसेननं हे सगळं स्वप्न सांगितलं, अन् पुन्हा गटागटा पाणी प्याला. फकीर म्हणाला, ‘‘ऐसा नहीं हो सकता. सपने क्या सच रहते क्या?’’ पण हुसेननं धाडस करून सांगितले, ‘‘कुछ भी रहे, मुझे तो मेरे गाव जाना पडेगा. अन् तुम तुम्हारा खयाल करो, और मौतसे मत घबरनेका. तुमने तो कहा था ना, हमे एक दिन मरने का है.’’
         हुसेनचं हे स्वप्न ऐकून फकिराच्या मनात चलबिचल झाली.
               ‘‘ये फकीर इस दुनियामें जादा दिन तक नहीं रहेगा’’, ह्या हुसेनच्या वाक्यानं तो हबकलाच. हे खरं असू शकतं? पण हुसेन फार सरळ, भोळा माणूस आहे. खरं तर त्याचा अल्लावर एवढा विश्‍वास आहे, म्हणूनच तो आपल्याबरोबर आला. कदाचित असं घडलं तर...
         त्याला आपली मौत, कफन दिसली. आपली लाश दिसली.
थोडं थांबून फकीर म्हणाला, ‘‘ठरल्याप्रमाणे ह्या ठिकाणी आपण अजून तीन दिवस राहू आणि परत जाऊ.’’
            ‘‘परत? तुमने तो कहा था कमसे कम शंभर मशीदमें मुझे मुक्काम करनेका है? तुम आगे जावो.’’
       फकीर झोळीत हात घालत म्हणाला, ‘‘नहीं, वापस जाकर मेरे सब लडकियों को बुलाके लेता हूँ. चार दिन खाना, पिना, कपडा करके भेजूंगा. न जाने कल मेरी मौत आयी तो...?’’
हुसेन हसला, फकिराची बडबड किती पोकळ आहे, त्याच्या लक्षात आलं.
       तिसर्‍या दिवशी संध्याकाळी एक बैलगाडी त्या मशिदीजवळ थांबली. त्या बैलगाडीतून चार-पाच माणसं सगळा बाड- बिस्तारा घेऊन उतरली. अन् त्या मशिदीकडं आली आणि गंमत म्हणजे ती माणसं मुसलमान दिसत नव्हती.
       थोड्या वेळात त्यांनी तीन दगडांची चूल केली. आजूबाजूची जागा साफ केली अन् सतरंज्या, चादरी टाकून त्यावर पोरं-बाळं बसवली. हुसेनला हा काय प्रकार आहे ते समजेना. त्याचं कुतुहूल वाढलं, त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पातून समजलं की, त्यांच्या वाडवडिलांनी कधीतरी मुलं होत नाहीत म्हणून इथं नवस केला होता. आणि त्यांना मुलं झाली. त्याप्रमाणं ते नवीन मुलं झालं की इथं येऊन आठ दिवस राहतात. इथं घरचं अन्न खायचं नाही. चार घरं फिरायची, मिळेल तेवढ्यात भागवायचं. पण ह्या गावातल्या लोकांना आम्ही असं येतो हे माहितीय. ते भरपूर भिक्षा घालतात. दुधापासून गुळाच्या ढेपेपर्यंत सगळं आणून देतात. एका हिंदू कुटुंबाची अल्लाबद्दलची भावना पाहून तो थक्क झाला.
       सकाळी हुसेन अन् फकीर उठले. त्यांनी पाहिलं, त्या कुटुंबानं त्या दगडाच्या चुलीवर चहा केला आहे. तो चहा त्यांनी हुसेनला आणि फकिराला दिला. ह्या गरमगरम चहानं हुसेनला हुशारी आली. आपल्या झोळ्या काखेत अडकून तो आपल्या गावाकडं निघाला. मागे तो फकीर हळूहळू चालत होता.
         हुसेन भराभरा चालत होता. त्याला घरी जायची घाई झाली होती.

- अरुण जाखडे


Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...