Skip to main content

राज कपूरच्या घरी

      

        हळूहळू चालत येणार्‍या हुसेनकडे पाहून माणसं कावली. शेवटी एकानं ओरडूनच हुसेनला हाक मारली, ‘‘जरा लवकर भराभर चालत ये की, उगं मुडदूस झाल्यावणी डकाव-डकाव स्वत:ला ढकलत चालतंय. आमी कवापासनं येऊन बसलोय इथं.’’
       हुसेन फक्त हसला. आपल्या दाढीवर हात फिरवत-फिरवत तो हळूहळू चालत पारावर टेकला.
‘‘हुसेन तुमचं डोबाड गाभणंय का?’’ – कांती शेलार.
       ‘‘हां है नं.’’ – हुसेन.
       ‘‘मग विकायचंय का?’’ – कांती.
       ‘‘म्हातारीला अन् थोरल्या गड्याला इच्चारावं लागंन.’’ – हुसेन.
       ‘‘आवो, इथं इषय काय, अन् चाललंय काय? तू काय ही डोबाडाचं मधीच काढलं?’’ – माणिक.
       ‘‘आता मधीच नाय, घ्यायचंय मला एक डोबाड म्हणूनशान इचारलं तर काय झालं?’’ – कांती.
       ‘‘मग राशीनच्या बाजाराला जा की, इथं उगंच वडाच्या झाडाखाली फुगरटावनी बाता मारतो.’’ – माणिक.
       ‘‘आता हे थांबवणार का पेटवतच राहणार?’’ – माणिक.
       ‘‘अय, त्या हुस्न्याला बोलू द्या जरा.’’ – लोकं कावून बोलली.
       हुसेन पुन्हा हसला. लुंगी झटकली, दाढीवरून हात फिरवला अन् हसत हसतच म्हणाला,           ‘‘काय राव एखाद्याचं ऐश्‍वर्य आसतं लक्ष्मीवाणी, स्वत: डोळ्यानं पाह्यलं राव. त्यो चमचमाट बघितलाना की डोळं पार खल्लास व्हत्यात. काय सांगायचं गाववाले मंडळी, ती घरं, त्यातली सजावट, नुसती राजवाड्यावानी.
       ‘‘काल म्हणालो तसं, गेलो ना राज कपूरच्या घरी. आता मी नवतो जाणार, पण त्यानं लईच आग्रह केला, अन् लई वेळा म्हणलं, घरी ये, घरी ये, तवा म्हणलं, चला जाऊ आता, त्यो म्हणतोय तर जाऊ. शेवटी हुडकत हुडकत त्याच्या घराबाहेर उभा राहिलो. आता उभा राहिलो, त्यात काय चुकलं? पण दोन-तीन माणसं, ‘वाचमन’ का काय म्हणत्यात त्यांना, ती पळतच आली अन् मला मागं ढकलायला लागली.
       ‘‘तेवढ्यात राज कपूर अंडरपँट वाळत टाकायला, गॅलरीत का काय म्हणत्यात ना, तिथं टावेल गुंडाळून आला होता. ही ‘वाचमन’ अन् माझ्यातली बाचाबाची त्यानं पाहिली अन् लगीच म्हणाला,            ‘‘हुसेन, आवो, आवो, उप्पर आवो हुसेनभाय!’’
         ‘‘अरं, तुमची ही कुत्री आवरा, म्हंजी वर येता येईल.’’
         ‘‘राज कपूरनं वरूनच टाळी वाजवली अन् हाताच्या खुणानंच सांगितलं, ‘बाजूला सरका’, तशी ती कुत्री बाजूला झाली.
        ‘‘त्यातल्या एकानं माझी पिशवी घ्यायला घाई सुरू केली. तवा मी कावलोच. ‘आरं काय, ह्या पिशवीत चार-पाच बनपाव आणल्येत तुझ्या मालकाला द्यायला.’
        ‘‘तर ती म्हणतं कसं, ‘नहीं साहब, ओ थैली लेते है हम. साहब के कोई पाहुणा-बिवणा आया, तो हम उसके हाथमें जो थैली रहती है, वो लेके उपर जाते है, वो स्वागत रहता है.’
        ‘‘ये थैली मेरे भाभीने पुरानी पॅण्ट की बनायी थी, घरमेंही सिलाई की अपने दोरा-सुईसे.’ मैने ‘वाचमन’ को बताया.
        ‘‘ओ कुछ नहीं बोला, मैने सोचा, जाने दो, गुंगा होगा.’’
        ‘‘अरे, क्या बाते हुई ये तो बतावो, – इतनी छोटी-छोटी बातें बतानेसे क्या फायदा, ओ तुम्हे क्या बोला ये बतावो पहले,’’ कांती शेलारचं हे म्हणणं सगळ्यांना पटलं. 
        ‘‘शंभर टक्के खरं बोलला कांती तू.’’ – माणिक.
        हुसेन सांगू लागला, ‘‘आवं घरात गेलो, तर स्वत: त्यो राज कपूर पळतच जिना उतरत खाली आला. उंबर्‍यातनं आत शिरलो, तर समोर बघितलं अन् त्याला विचारलं, राज कपूर तुमने चप्पल, बूट का दुकान खोला क्या? बाटा की एजन्सी है ना? इतनी जुते देखकर मैं हैरान हुआ, आपुन को कैसा आदत, दार में कितने जुते उतने आदमी उस घर में, इतनासा छोटा गणित मालूम है।’’
       ‘‘चलो हुसेन, उपर चलो.’’ 
       ‘‘मेरा हात पकडके मुझे तो उपर लेके गया.
       ‘‘काय त्या खुर्च्या, बसलं तर उठावं वाटंना, लई मऊ, गुबगुबीत. मी बसलो. त्याला असं टावेल गुंडाळलेला अन् वर बनियन घातलेला बघितला अन् म्हणलो, ‘अब ये असली राज कपूर है. राजू, राजू जो हर फिल्ममें रहता है।’
       ‘‘तो मुझे ‘बैठो’ कहके अंदर गया. पूरी बैठकमें मै अकेला था, इधर-उधर देखने लगा, तो क्या बात है साला, ऐसा घर तो आपुनने देखाच नहीं. पांच मिनट हो गये, ओ अंदर क्या कर रहा है?
       ‘‘हां, वो पॅण्ट बुशकोट पुरा ड्रेस पहनके आया. मेरे सामनेही बैठा, मैने देखा वो अपने पैर नीचे छोडकर बैठा, मैने दोनो पैर खुर्चीपें लेकर बैठा था. अच्छा तो ऐसे बैठते है करके, मैने मेरे पैर नीचे छोड दिए. इधर-उधर देखकर मैं थोडा हसा, अभी बोलने की शुरवात मैंनेच की, मैं बोला, ‘भगवान क्या खेल दिखाता है, वो उसकोच मालूम. मेरे जैसे देहाती गँवार आदमीके, सपनेमें तुम आये क्या, और मैं, इधर तुमको मिलनेको आया क्या, ये सब भगवानका खेल है.’
        ‘‘चलता है हुसेन – देखो, हमारे बापजादा पाकिस्तानसे कहॉं भारतमें कलकत्ता, मुंबई करके आये. खेतीवाडी गया, घर-दौलत गया, फिरभी वो उपरवाला है नं, वो रहता है अपने पिछे.’’
        ‘‘तो मैंने जल्दही टाली बजाके कहा, ‘हां वो उपरवाला, सबसे बडा जोकर, अरे तुने देखा ‘मेरा नाम जोकर’, हां, तो वो फिल्म में रहता है, लेकिन बहुत पाक रहता है, उसकी मर्जीसे सबकुछ होता है, आज तुम मिले, कल कौई और..
         ‘‘देखो, पिक्चरमें तो आप बहुत हिरो जैसे लगते है, लेकिन आज देखा, तुम इतने बुढ्ढे दिख रहे, अरे जरा पेट कम करो, तो वो हसने लगा, बोला, ‘ये समय किसके लिए ठहरता नहीं. कल जवान थे आज बुढ्ढा, कल शायद उपर भगवानके पास.’
         ‘‘मैंने खडा रहकर कहा, ऐसी बातें मत करो, भगवान तुम्हाला माझी समदी आयुष्य देऊ दे.
         ‘‘माझा हात हातात घेऊन तो म्हणतो कसा, ‘हुसेन तू फार भोळा, निर्मळ माणूस हाये रे.’
         ‘‘अरे तुम्हें मराठीबी आता है क्या? फिर बनावो ना मराठी फिल्म.
         ‘‘ते बिचारं नुसतं हसलं, म्हणाला, ‘मी आता मुंबईत इतकी साल राहिलो, तर मराठी समजताय, बोलू शकतो पण इतना अच्छा नहीं, तुम्हारी जैसी मराठी माझी नाही. पण हां, बोलू शकतो. तू बोल ना मराठीमंधी. तुमी हिंदीत बोलला म्हणून मी हिंदीत बोललो.
         ‘‘च्यायला, त्यानं मला धक्काच दिला की.
         ‘‘मग मीच म्हणालो, आता असंय राजासाहब, मला भी जरा महत्त्वाची कामयत. तर मला जायला पायजेन ना.
         ‘‘अरे, असं कसं जाणार तू हुसेन? ओ, कृष्णा मुझे बताके गयी, हुसेन आया तो उसको ठहरके लो, वो आनेके बाद कुछ चाय-पानीका बंदोबस्त हो जाएगा.’’
         ‘‘तर एवढं बोलनं होतंय तोच एक बाईमाणूस आलं. आता मला काय माहिती ती त्याची बीबी. उसने भी मुझे पहचाना. हात जोडके नम्रतासे कहां – ‘कब आये हुसेनभाई? मला उशीर झाला का?’ मैंने कहां, ‘नहीं नहीं, मुझे कुछ कामबीम नहीं रहता.’
         ‘‘हुसेन, ये ‘कृष्णा’, मेरी बीबी. म्हणजे मराठीत बायको. बरोबरय ना?’’ 
         ‘‘मी आपलं घाबरल्यावणीच झाल्लो, आता एवढी मोठी माणसं, पण कशी वागत्यात? लई मायाळू, आणिव कसली घमेंड नाय.
         ‘‘बैठो, बैठो, हुसेन आता आपल्याला खायला मिळन, चाय गरम बी मिळंल, ओ कृष्णा आयी ना अभी.’’
         ‘‘म्हणलं, आता आपण चार-पाच बनपाव आणल्येत तर देऊन टाकू, म्हंजी होतीन चहाबरोबर खायला. ती दोघं बी खुश होतीन. म्हणून मी माझ्याजवळची थैली दिली राज कपूरला. उसने पुछा, ‘ये क्या है?’ ‘अरे राजूसाब, त्याच्यात ब्रेड हायती ब्रेड, बनपाव, म्हणलं चहा होणार दिसतोय तर घ्या तुमी बी दोन-दोन.’’
         ‘‘वो कुछ बोलाही नहीं. मी म्हणलं, ‘माझं काय चुकलं का?’
         ‘‘नाय नाय, तुझं काय चुकलं नाय हुसेन.’’
         ‘‘तेवढ्यात कृष्णाभाभी पोहे घेऊन आल्या. आता भूक लागलीच व्हती मलाबी. मी भराभरा खाल्ली, अन् बघतू तर राज कपूरच्या थाळीत अजून निम्मी राहिली व्हती.
         ‘‘कृष्णा भाभीच्या लक्षात आलं, मला पोहे फारच आवडली. ती आणिक घेऊन आली, मी नगं नगं म्हणतोय पण ती दोघं ऐकतेत व्हय? आणिक वाढली बघा. भाभी आत जाता जाता म्हणाली, ‘थांबा, मी चहा घेऊन येेते.’
         ‘‘या, या ही बनपाव घेऊन जा आत. खावा च्या संग. पण त्यानी काय नेली नाय. ती लई समजदार माणसं राव. हावरटावाणी नाय करत ती. नाय तर आपली माणसं, छ्या– 
         ‘‘तर च्या-पानी झालं.
         ‘‘मग त्यानं विचारलं, काय हुसेन, तुझं गाव काय म्हणतंय?
         ‘‘लई झॅक, मी म्हणलं, पाऊस-पाणी झाल्यानी समदी आबादी-आबाद  है, तुमच्यावानी लई पैसा-पाणी बाळगून नाय कुणी, पण खाऊन-पिऊन सुखीत. आता चैत्रामंधी भैरवनाथाची यात्रा भरते गावात तर तुम्हाला आग्रह करून सांगतो, तुमी दोघांनी बी यायचं. अन् तुमी जर आले ना तर लोकं लई खुशी व्हतीन.
          ‘‘त्योबी गडी खुललाच. म्हणाला, ‘येण्णारच. तुझी बीबी पोरं पाह्यला येतो.’ 
          ‘‘मग मी हळूच म्हणलं, ‘ही बघा, तुमच्यासारखा फेमस माणूस आला की फोटो काढायला ती धडपडतीन. पण तुमी सांगायचं, माझ्याबरोबर बाजूला हुसेनच पाहिज्ये. म्हणजी कसं, तुम्हाला आवतान देणार मी अन् फुकटचा भाव खाऊन जाणार ती, आता ही गावगुंडी कशी आसती, तुम्हाला शहरातल्या माणसांना नाय लय समजणार.’’
          तेवढ्यात दोन-चार माणसं उठली, ‘‘ये हरामखोर हुस्न्या, आमाला काय कमी लेखतो वय रे, दाखवू का तुला गावगुंडी. परवा कसा बिथरला व्हता, त्या पोरांनी तुला हिसका दाखवला तसा तुला दाखवू का?’’
          हुसेनच्या लक्षात आलं, बाता मारायच्या नादात आपली गाडी लईच घसरली. दोन्ही कान हातानं पकडून तो ‘‘माफी मागतो, माफी मागतो, तसं नव्हतं मला म्हणायचं’’ म्हणत सुटला.
          ‘‘मग काय म्हणायचं होतं?’’
‘‘तेच की  तुमी आला समजलं की आजूबाजूच्या गावची माणसं येणार अन् ती मंधी मंधी घुसणार अन् आमची माणसं बाजूला राहणार. ती जरा सांगण्यात चुकलं.’’
          हुसेन ज्याच्या-त्याच्या पाया पडू लागला. एकानं त्याला होलपडला. तो बाजूला पडला. कन्हत कन्हत पुन्हा जागेवर येऊन बसला.
          ‘‘हे बघा गावकरी, मला म्हणायचं व्हतं मी बरोबर असलं म्हंजी नक्की ओळखणार, आपल्या गावातला कोण अन् बाहेरच्या गावातला कोण, आता तरीबी काय चुकलं आसन् तर पुन्हा माफी मागतो. पाय पडतू, पण जरा सांभाळून घ्या.’’
          ‘‘बरं असू दे आता, म्होरं काय झालं ते सांग.’’ – माणिक.
          ‘‘म्होरं काय व्हणार? मी थांबतच नाय म्हणल्यावर त्यानं समदं घर फिरून दावलं. पोराबाळांचे फोटो दावले. नेहरूबरोबर एक फोटो व्हता तो पाह्यला. अन् मी बघतच राहिलो.
          ‘‘आवो राज कपूर सायेब, तुमचं अन् आमचं जुळलं बघा आज, म्हंजी आदीच जुळलं व्हतं पण आता लई खोलवर जुळलं.’’
          ‘‘म्हणजे काय?’’– त्यानं विचारल्यावर, मी त्याच्या हातावर टाळी देत म्हणालो, ‘‘आवो जुळलं म्हंजी हे नेहरू हायत ना, त्यांच्याबरोबर तुमाला पाहून मला याद आली. आवो, मी नेहरूच्या ताटात जेवलो की एकदा मग समदी स्टोरी डिटेलमंधी सांगितली तवा त्यानी मला मिठीच मारली. मी एवढंच म्हणलो, ‘लई मोठ्या मनाचा माणूस. आगदी तुमच्यावणीच स्वभाव नेहरूंचा. नायतर मी कोण, कुठला, आता ही गोष्ट हाय बचपनची. पण अजून विसरत नाय, तवर फोन लागला वाजायला. राज कपूर फोनमंधी बोलताना पाहून फोटो काढायचा व्हता पण च्यायला, कॅमेरा न्यायलाच इसरलो.’
          ‘‘म्हणलं चालू द्या तुमचं फोन-बीन, अन् कृष्णाभाभीच्या पाया पडलो. राजसायबाच्या पडलो, म्हणलं, ‘निघतू आता’ तर माझ्या डोळ्यातनं पाणीच यायला लागलं.
           ‘‘माझ्या डोक्यावर हात ठेवत तो बडा माणूस एवढंच म्हणाला, ‘खुश रहो, हुसेन खुश रहो.’
           ‘‘मी बाहेर पडणार त्येच माझ्या लक्षात आलं, आपली पिशवी आतच राहिली. मी जरा घाबरत घाबरतच म्हणालो, ‘आवो, ती आतली पाव काढून घ्या अन् माझी पिशवी तेवढी परत द्या.’
            ‘‘तर त्यानी पावासगट पिशवी परत दिली. कृष्णाभाभी म्हणाल्या, ‘काल फार पाव आणलेत, आमचा जानीसुद्धा कंटाळलाय.’
            ‘‘जानी? जानी कोण?’’– मी.
            ‘‘आमचं लाडकं कुत्रं. त्यालासुद्धा कंटाळा आलाय पावाचा.’’
            ‘‘बरं असू द्या, असू द्या, म्हणत पिशवी घेतली. अन् अल्लाची याद आली. अल्ला फिदा हुआ तो क्या होता है, ये मैंने आज देखा, इतने बडे कलाकारके साथ चाय-पानी करने का मौका कितनी बडी भाग्यकी बात है.
            ‘‘बरं ते झालं तुझं, मग एखादा फोटो काढला का नाय त्याच्याबरोबर. ती दावल्याशिवाय आमी खरं कसं समजायचं’’ – कांती.
            ‘‘हा हे बराबरय, दाव की एखांदा फोटो. बारका का हुईना पण दावच.’’ – रघु, गणपत सुतार, सगळ्यांनीच पुस्ती जोडली.
            ‘‘खरंय तुमचं मंडळी. मी बी त्या इशार्‍यानंच गेलतो त्याच्या घरी. त्याच्यासाठीच पाव घेतले. त्याच्या हातात पावाची पिशवी देताना फोटो काढणार व्हतो. तसं मी बोलून भी दावलं आणि त्येबी तयार झालं. पण घोटाळा कुठं झाला, ओ कृष्णा भाभी को इसका कुछ अंदाज आया, तर ती आतनंच बोलली, ‘थांबा, थांबा, फोटो काढू नका.’
           ‘‘मी का म्हणून विचारलं, तर तिनं सांगितलं, ‘आमची भावकीतली काय माणसं तिकडं पाकिस्थानात हायेत अजून, तर आमच्या लांबच्या भावकीत मयत झाली. तवा आता दहा दिवस कॅमेरा, फोटो, शूटिंग सगळं बंद. सुताक हाय ना आमाला.’
           ‘‘मी खल्लासच झालो, म्हणलं हे बी खरंय. पुन्हा कवा येऊ परत फोटूसाठी. अल्लाची मर्जी झाली तर येणारच की.
           ‘‘तर तुमची बी बरोबरय. फोटो न निघल्यामुळं माझा लई तोटा झाला. समदं गणितच चुकलं की हो. हां तुमाला एक गोष्ट मी दाखवू का, परवाच शाळेतल्या पोरांना दावली. त्यानं दिलेला बाहुला दाखवू का?
           कुणी काहीच बोललं नाही.
हुसेन उठला. सगळ्यांना हात जोडत म्हणाला, ‘‘जाऊ का आता. मला गुरांना वैरण कापून ठेवायची.’’
सगळेच उठले. पार रिकामा झाला.
— अरुण जाखडे


Comments

  1. हा हा हा . हसून हसून पुरेवाट झाली. बाताड्या हुसेन ! अरुण जाखडेजी , मानलं तुम्हाला. तुम्ही इतकं छान विनोदी अंगाने लिहू शकता हे माहीत नव्हतं. या सदरासाठी शुभेच्छा !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...