। 1 ।
चार-आठ दिवस असेच गेले. पारावर
सामसूम होती. वादळी हवा, पावसाळी
वातावरण यामुळे पारावर कोणी आले नाही. हळूहळू हवा नेहमीसारखी झाली. अधून-मधून
देवळात माणसं येऊ लागली. देवळातून बाहेर पडलं की तसंच पारावर जाऊन बसायचं, हा नेहमीचा शिरस्ता सुरू झाला.
माणक्या आणि हुसेनभाई सकाळीच
राशीनच्या बाजाराला गेले होते. माणक्या चांगल्या म्हशीच्या शोधात होता. तो फार
चिकट आणि घासाघीस करणारा असल्यामुळे त्याचा सौदा लवकर कधीच होत नसे. चौकस
स्वभावामुळे म्हशीची आदल्या पाच पिढीची तो माहिती विचारत असे, त्याचा हा व्यवहारीपणा न वाटता शिष्टपणा वाटू लागे. शेवटी एक
दिवस एका म्हशीच्या मालकानं चिडून माणिकला झापलं, ‘‘आवो आमच्या पाच पिढ्याची माहिती आमाला
नाय ती या म्हशीची काय सांगणार? कोणत्या
म्हशीला कोणता रेडा लागला, अन्
पुढची डोबाड जल्माला आली हे काय शोधून काढायला आमाला वेळ बी नाय.’’
दिवेलागणीला माणिक आणि हुसेनभाई गावात
पोहचले. गावात आलं की वेशीच्या बाहेरच बाजूला पार असल्यानं ते दोघंही थोडा वेळ
पारावर थांबले.
‘‘माणिक, आणली का रं डोबाड, काय भावय
रं सद्या, जनावरांना?’’
‘‘नाही,’’ माणिक म्हणाला, ‘‘अजून
मनात काय भरंना!’’
‘‘अं, मनात भरायला काय ती मंजुळा हाय का काय? मंजुळा मनामंधी भरलीऽऽ’’, एकनाथ
करांडेनं मांडीची, गुडघ्याची
ढोलकी करून वाजवली.
‘‘तू गाढवा, म्हसारडीचे दात सुदीक नीट बघून घेत नाय, अन् मग घरी आल्यावर दोन दिवसांनी पडला दातखिळा येऊन.’’
‘‘आरं तू खोलात म्हंजी लईच खोलात जातो.
म्हशीच्या पाच पिढ्या तपासायला ते काय शर्यतीचं घोडं हाय वय? तिथं बग सगळी माहिती देणारी पुस्तकच तयार असत्यात.’’
‘‘करांड्याला लई माहिती राव.’’ एकजन म्हणाला.
यावर दुमत व्हायचं कारण नव्हतं. एवढा
हुशार माणूस ह्या गावात कशाला राहिला कुणास ठाऊक? बाहेर गावात गेला असता तर लई म्होरं गेला असता.
‘‘ती जाऊ द्या, पण ह्यो माणिक त्या हुसेनला घेऊन कुठं फिरतंय.’’
‘‘आरं त्याला असा हलका समजू नका. ते
कुठं कुठं फिरून आलंय, मुंबईला
महिना-दोन महिने राहून आलाय तो.’’
‘‘आरं त्या मुंबईची स्टोरी तो सांगणार
व्हता ना? त्याला तो कुठला मोठा नट भेटला
होता... एकानं आठवण करून दिली.’’
‘‘हां, हां, ते राज कपूर, राज कपूर्र, राज कफूर्रऽऽऽ’’ सावत्या वरडला.
सगळ्यांनी हुसन्याला पकडलं, ‘‘ती जाऊ धी म्हसाडाचं, तू आपलं ही सांगणार व्हता ना - कुठल्या नटाचंऽ’’
‘‘सांगतो पण आज लई दमलो, माणक्याबरोबर राशीनला गेलो अन् परत पायी-पायी आलो. पार
घळाटून गेलोय,
उद्या सांगतो.’’
‘‘सांग उद्याच आता, दिवे लागण होऊन बी बराच टाइम झाला. या चांदण्यामुळं काय समजत
नाय.’’
शेवटी सगळी पारावरून हलली.
। 2 ।
दुसर्या दिवशी संध्याकाळी
पारावर माणसं जमलीच होती. पण हुसेन अजून तिथं पोचला नव्हता. कुणीतरी म्हणाले, ‘‘आयला कीर्तन ऐकायला माणसं जमावीत अन्
कीर्तनकारबुवाची वाट बघत बसावं तशी माणसं हुसन्याची वाट बघत बसलेत.’’
तेवढ्यात हुसन्या चमकला. लोकं
वाट पाहतच होती.
‘‘या, या, हुसेनराव, या, या, हुसेनपंत, या या.’’ या, या
हुसेनबुवा.
‘‘सद्गुरू हुसेन महाराज की जय!
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.’’
ख्यॅक, ख्यॅक लोक हसू लागली. तसा हुसेन चिडला. रस्त्यावर जाऊन
त्यानं दोन मोठे धोंडे हातात घेऊन लोकांच्या अंगावर धावला.
काही माणसं भीतीनं लांब पळाली. काही वडाच्या झाडाच्या खोडाआड
लपली. हुसेनचा पिस्टन तापला होता. तो कधी नाही ते पहिल्यांदा लोकांनी इतका खवळलेला, आक्रमक झालेला पाहिला.
हुसन्या, दगडं भिरकावीत शिव्या देऊ लागला. ‘‘हरामखोरांनो, तुमच्या
बापाचा दहावा मी खाल्लाय, याच
गावातलाय मी,
मला किती शिव्या येत्यात ते बघा
आता.’’
आता हुसेनच्या हातातल्या
दगडांना तोंडाची साथ मिळाली. शेवटी जाणकार माणसं पुढं आली. त्यांनी उडानटप्पू पोरांना हाकलून दिलं. हुसेनला शांत
करत ती म्हणाली,
‘‘अरं हुसेन, इतकं काय ताणायचं असतं का? चल पारावर शांत बस.’’
त्यांच्या हातातला हात ओढून
घेऊन तो बाजूला उभा राहिला. त्याचे डोळे आग ओकत होते. तो ओरडून म्हणला, ‘‘बघ आता ही पारावरची मिटींग म्हंजे
चावडी झाली. नवी पोरं यात सामील व्हायला लागली. त्या भडव्यांना नुसती टिंगल-टवाळी
करायची असती.’’
फक्कड पाटलानं पुन्हा हुसेनला
धरून पाराकडं ओढत आणायचा प्रयत्न केला. पण हुसेननं हिसके देऊन फक्कड रावच्या
हातातले आपले हात मोकळे करून घेतले. हुसेन भीष्मप्रतिज्ञा केल्यासारखा मोठ्ठ्यानं
ओरडून म्हणाला,
‘‘उद्यापासनं मी या पारावर येणार
नाय, नुसती टिंगलखोर, टवाळखोर पोरं इथं गोळा व्हायला लागलीत, आता हा पार पार नाही राहिला. ही चांडाळ-चौकडी गोळा व्हायची
जागा झाली.’’
साहेबा गावडे, पारावरून उठत, हुसेनकडं
आला अन् म्हणाला,
‘‘तुझं बी चुकलंच हुसेनभाई, ही नाठाळ पोरं गावावरून ववाळून टाकायच्या लायकीची, तू काय राव असल्या उनाड पोरांच्या नादी लागला. असल्या
लोकांच्या नादी लागणं म्हणजे आपलंच हसू होणं.’’
हुसेन एकदम चवताळला, ‘‘हा
साहेब्या, मैंच चूका, मैंच चुक्या, मार दो
अभी मुझे,’’
म्हणत हुसेन खाली बसला अन् आणि
आपलं कपाळ जमिनीवर जोरजोरात आदळू लागला.
साहेबा गावडे अन् फक्कड पाटलानं
पुन्हा त्याला आवरला, उभं केलं, हुसेनच्या तोंडात माती गेली होती, दाढीला माती लागली होती, अन् कपाळावर बारीक जखम झाल्यामुळं रक्त वाहत होतं.
शेवटी सगळी माणसं हळहळत उठली.
झाला प्रकार पाहून सुन्न झाली होती.
एवढा वेळ शांत बसलेला माणिक आता
रागाने उठला. म्हणाला, ‘‘मगापासनं
बघताय काय, हुसन्याला आवरताय काय, हरामखोरांनो ती कोण पोर्टी होती मला माहितंय, तुमच्या मनगटात दम नसंल पण माझ्या हायेना, दाखवतोच मी हिसका एकेकाला. इथं पारावर आणून फोडून काढतो बघा
एकेकाला.’’
माणिक उठला, त्यानं हुसेनला धरलं, त्याच्या
तोंडावरून हात फिरवला, अन्
म्हणाला, ‘‘चल हुसेन, घरी जाऊ.’’
पार शांत झाला.
सगळे घरी सुन्न मनाने गेले.
झाला प्रकार कोणालाच आवडला नव्हता. हुसेनची गोष्ट राहून गेली. गावात ग्रहण
पडल्यासारखं वाटलं, चांदणंसगट
मळभ झालं. रात्री कोरभर भाकरी प्रत्येकालाच कमी गेली.
—
अरुण जाखडे

एखादे सदर सातत्याने चालवणे कठीण असते. त्यातही 'पारावरच्या बाता 'सदरामध्ये फक्त पारावर घडणाऱ्या गोष्टी सातत्याने सांगणे अवघड आहे. रोज पारावर काय घडू शकणार : असा पहिला प्रश्न माणसाला पडतो. घडणाऱ्या साध्याच गोष्टी रसिक वृत्तीने , वाचकांना वाचनीय वाटेल अशा पद्धतीने अरुण जाखडे येथे मांडतात ; हे कौतुकास्पद आहे.
ReplyDelete