Skip to main content

हुसेन हसला



       काल झाल्या प्रकरणामुळे आज फारसे कोणी पारावर आले नाहीत, हुसेन तर पांघरूण घेऊन घरातच झोपला. त्याला शक्तिपात झाल्यासारखे वाटत होते. आपण उगीचच मूर्खांशी तंटा घातला याचा त्याला आता पश्‍चात्ताप होत होता. आपण रागाने एवढे कधी संतापत होत नव्हतो, पण त्याच दिवशी असे काय झाले ? आपला संयम कसा गेला, याचे त्यालाही नवल वाटून दु:ख वाटत होते.
तो अतिशय अबोल झाला. घरातही कामापुरतेच बोलत असे. तो असे का वागतो, तो अबोल का आहे, याचे कोडे त्याच्या घरच्यांना पडले. बुढ्ढीनं त्याच्या कपाळावर हात फिरवला, अल्लाला दुवा मागितली आणि हुसेनला विचारलं, ‘‘तू कुठं माळरानावर, भारलेल्या मसनवाटीत वा ओढ्याच्या बाजूला संध्याकाळचा फिरला होता का? म्हणजे तिकडं उतारा टाकून देता येईल.’’ हुसेननं मानेनच नाही म्हणून सांगितलं.
        दोन दिवस झाले तरी हुसेन दुर्मुखलेला आणि उदास, उदास पाहून बुढ्ढीनं बाहेर चौकशी सुरू केली. तिनं माणिकला गाठलं आणि विचारलं. तिला नक्की काही कोणी सांगितलं नाही, पण तिला एवढं कळलं, पारावर काहीतरी बाचाबाची झाली आहे. तिनं हुसेनला विचारलं, ‘‘काय रे हुस्नू, पारपे क्या झगडा करके आया क्या?’’
        हुसेननं मानेनच नाही सांगितलं. बुढ्ढी म्हणाली, ‘‘मुझे थोडाफार मालूम हो गया है, तू किसीके साथ झगडा मत करते जा और वहा पारपेतो अभी तू जानेकाच नही, तुझे टाइम नहीं जाता तो अपने खेतमे जा. मसजिदमे जाके बैठ. मसजिद की झाडलोट करके, साफ करके, अल्लाके पास सेवा रुजू कर. अल्ला तेरा भला करेगा.’’
        दोन-तीन दिवसात पारावर माणसं जमा होऊ लागली. हुसेनची गैरहजरी जाणवत होती. पारावर आता टारगट पोरांना येऊ द्यायचं नाही, हे सगळ्यांनी ठरवलं. एकानं सूचना केली की पाटलाला सांगून ह्या पोरांना ठोकल्याशिवाय गावात जरब बसणार नाय. चार-पाच दिवसांनी हुसेन घराबाहेर पडला. पण डावीकडं, उजवीकडं न पाहता तो सरळ, खाली मान घालून चालत होता. त्याचा उदास आणि निस्तेज चेहरा पाहून कोणालाही त्याची दयाच आली असती. वाटेवर शाळेतली मुलं शाळेत चालली होती. ती हुसेनला पाहून सलाम हुसेनचाचा करत त्याच्या भोवती गोळा झाली. एक मुलगा तर त्याचा शर्ट पकडूनच उभा राहिला, त्याने हट्ट धरला, त्या दिवशी मी शाळेत आलो नव्हतो, राज कपूरने दिलेला तो बाहुला मला दाखवा ना. मुलांची किलबिल ऐकून त्याचं मन थोडं हाललं, नाराजीतून तो बाहेर आला. मुलांकडे पाहून तो किंचित हसला फक्त. काहीच बोलेना म्हणल्यावर मुलंही आणखी हट्ट धरू लागली. ‘‘बोलो चाचा, बोलो चाचा, कुछ तो स्टोरी सुनाओ’’, पण हुसेनच्या चेहर्‍यावर कोणतेच भाव नव्हते. त्यानं जवळ जमलेल्या मुलांना ढकलून वाट केली आणि पुढे चालू लागला.
          हुसेनभाईच्या ह्या अनपेक्षित वागण्यानं मुलं आश्‍चर्यचकित झाली. हुसेन पुढं चालतच राहिला. पारासमोरून जाताना त्याने मान खाली घातली, कोणाकडे लक्ष न देता तो पुढे चालत राहिला. पारावरच्या लोकांनी त्याला हाका मारल्या, पण हुसेनं तिकडं लक्ष दिलं नाही.
          पारावरची माणसं हतबल झाली. त्यांना वाटलं, दोन-चार दिवसांनी राग शांत झाला की तो परत येईल. त्याला तरी माणसाशिवाय दम निघतो काय?
          पण असं झालं नाही. पंधरा दिवस झाले तरी हुसेन पाराकडं फिरकलासुद्धा नाही. रस्त्यानं चालताना पार टाळून किंवा पाराकडं दुर्लक्ष करत तो पुढं जायचा. आता लोकांना काही दम निघेना. लोकं हैराण झाली. म्हणाली, ‘‘धरा त्याला, पकडा आणि इथं आणा.’’ ही कामगिरी माणिकवर सोपवली. 
          माणिक म्हणाला, ‘‘मी त्याला घेऊन येतो, पण तुम्ही त्याला त्रास द्यायचा नाही.’’
                 ‘‘नाही हो. आवो, आपल्या रोजच्या बैठकीतला माणूस. आपण रानावनात काम करून आलो किंवा सांजच्या पाराला देवळात आलो की दर्सान घेऊन पारावर घटकाबर बुड टेकवायला येतो, त्यातबी हुसेनचाचा लई भारी. त्यानं बोलत राहावं अन् आपण ऐकत राहावं. जा, जा माणक्या, हुसेनला उद्या घेऊन ये. तुमा दोघालाबी गुळ खोबरं देऊ.’’
          दुसर्‍या दिवशी माणिक हुसेनच्या घरी गेला. हुसेन आढ्याकडं शून्य नजर लावून बसला होता. माणिकनं त्याला हलवलं, ‘‘हुसेन, आरं गावात रहायचं म्हंजी एखाद्या टायमाला असं व्हणारच. ती काय एवढं मनावर घ्यायचं असतं काय, उलट असा वागला तर ती टारगट पोरांना वाटन, हुसेन टराकलं बघा आपल्यामुळं. आता असल्या टोळभैरवांना पाराजवळसुद्धा येऊ द्यायचं नाही ठरलंय. तू चल.’’
          पण हुसेन काही ऐकंना. शेवटी माणिकनं त्याला पिराची शपथ घातली. हुसेन म्हणाला, ‘‘ठीकय, चल.’’
          हुसेन पारावर आल्याबरोबर माणसं खुलली. ‘‘आवो चाचा, हुसेन चाचा आवो.’’ हुसेनचं जोरदार स्वागत झालं. हुसेनला मध्यभागी जागा करून दिली. हुसेन बसला, लोक बोलत होती, हसत-खिदळत होती; पण हुसेन चिडीचूप. तोंडाला कुलूप लावल्यासारखा बसला. थोडा वेळ बसला अन् पटकन उठून म्हणाला, ‘‘जातो आता, घरी कामय.’’
          हुसेन हलल्याबरोबर माणसं चकित झाली. तो आला, बसला पण आपल्यात सामील झाला नाही, कोणीतरी म्हणलं, ‘‘एवढा जरी आला तरी लई झाली. हळूहळू खुलन त्योबी.’’
          पण तसं झालं नाही. हुसेन आला तरी बोलत काहीच नसे, कोणी विनोद केला, कोणी हसवलं, तरी हुसेन निर्विकार. त्याच्या चेहर्‍यावरच्या दाढीचा केससुद्धा हलत नसे.
          शेवटी माणसं वैतागली. त्याला कोणी करणी करून त्याचा पुतळा करून टाकलाय राव. माणसं त्याला विनवण्या करू लागली. म्हणाली, ‘‘हुसेन, आमी पारावर कशासाठी येतो. जरा विरंगुळा म्हणून, जरा माणसं भेटतेत म्हणून शान येतो. त्यातबी तू आला, बोलला, जरा तुझ्या बाता ऐकल्या की जरा जान यायची. तू असा तोंडाला मुसक्या बांधल्यावणी बसला तर आमी तरी कशाला येऊ?’’
                 ‘‘आरं, हुसेन ऐक, आपल्या आयुष्यात काय हाय. एड्या बाभळावणी आपली जिंदगी. नुसती काटंच. कोण लक्ष देतय आपल्याकडं. माणसात उठलं बसलं म्हणजी मन मोकळं होतं. चार घटका जरा बर्‍या जात्यात. आता आमचं काय चुकलं असलं तर...’’
          कधी-कधी हुसेनला, थांबव तुझ्या बाता म्हणणारी माणसं त्याला बोल म्हणून त्याच्यामागं लागली. गावालाच चुकल्यासारखं वाटायला लागलं. दाट आभाळ येतंय पण घसरत नाही, तसं झालं हुस्न्याचं. नुसता उदास चेहरा घेऊन बसतंय, पण तोंड उघडत नाही.
जसजसे दिवस पालटले, तसतसं हुसेनच्या मनातला राग निवळायला लागला. एक दिवस असा आला, हुसेन जरा बोलला, कमी बोलला पण बोलला.
          लोकांना हायसं वाटलं, हुसेन कसा खूश राहील याची सगळेजण काळजी घेत होते. गावावरचं संकट गेल्यावर मोकळं मोकळं वाटावं असं पारावरच्या माणसांना वाटलं.
हुसेननं पोरांशी बोलणं सोडलं होतं, पण आता तो मिसळू लागला. नन्हे-मुन्हे बच्चे तो अपनेच है, अपनेच गावके बच्चे.
          मुलं खूश झाली. माणसं खूश झाली. पाराला नवी पालवी फुटली.
हुसेनला मूडमध्ये पाहून कोणीतरी हुसेनला आठवण करून दिली. ‘‘हुसेन तू ते मुंबईत राज कपूर भेटला का काय असं काहीतरी म्हणाला व्हता. आता ती ष्टोरी जरा विस्तारानं सांगकी.’’
          हुसेनही हसला, दाढीवरून हात फिरवत म्हणाला, ‘‘आता विस्तारानं सांगायचं म्हणलं म्हंजी तर टायमच लांबणार अन् आता दिवेलागण व्हायचा टाईम आलाय, तर उद्याच सांगू.’’
                 ‘‘चालेन, चालन, उद्या डिटेलमंधी सांग,’’ माणसं म्हणाली. कसं का व्हईना हुसन्या माणसात परत आला, याचं समाधान मानून माणसं घराकडं गेली.

— अरुण जाखडे


Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...