आज पारावर माणसं जमली, त्यांना आज गप्पा मारायला चांगलाच विषय मिळाला होता. हुसेनभाईनी मुलांना दाखवलेला बाहुला अन् त्याची राज कपूरबरोबर झालेली भेट मुलांनी घरी सांगितली. आपसात, इतर मुलांत सांगितली आणि कर्णोपकर्णी ही बातमी पसरतच गेली.
बातमी समजली, पण हुसेन भेटल्याशिवाय त्याची खातरजमा कशी करणार? पारावर आता हाच विषय रंगात आला. बर्याच लोकांना असं वाटत होतं की, त्यानं मुलांची करमणूक केली. त्याला म्हणावं, ‘‘इथं ये, अन् चारचौघांसमोर सांग तुझं काय ते.’’ सगळ्यांनी हाच मुद्दा पास केला.
फक्कड पाटील म्हणाले, ‘‘आवो, तो एक नंबरचा बाताड्या. त्याला हुसेनभाई बाताड्या म्हणत्यात. ते माहीत असून त्याच्या बातांना काय किंमत देता अन् इथं तो विषय चघळत बसता?’’
‘‘पण बाता मारायला सुदिक डोकं लागतं. तो इतक्या बैजवार सांगतो की ऐकणार्याला खरंच वाटावं. आता तुम्ही सांगा बरं, त्याच्या बाता ऐकायला सगळी माणसं टपलेली असतात. अन् तो सांगतो असं, की ऐकत राहावं अन् ऐकताना काही खोटं असतं असं वाटत नाही.’’ एकजन म्हणाला, तर दुसरा लगेच म्हणाला, ‘‘आवो, ती बी एक कलाच असती. हुसन्या म्हणजी कलाकारचय.’’
‘‘कसाबी असला तरी, सरळ माणूसय. त्याच्या मनात पाप नसतं. गावातल्या लेकराबाळावर जीव लावतो. म्हणून तर पोरं, तो दिसला की गलका करतेत. आता तुम्ही सांगा, एकतरी असा माणूस आहे का, जो शाळेत जाऊन पोरांना भेटतो. गप्पा मारतो. लहान पोरात लहान होऊन जातं ते हुसन्या,’’ विलास सुतार म्हणाला.
‘‘आवो, त्याच्याबद्दल दुमत नाही. स्वभावानं तर अल्लाची गाय. कोणाला काय बोलणार नाय. दुखावणार नाय.’’
अशा गप्पा रंगत चालल्या तोवर समोरून हुसेन येताना दिसला. त्याच्या मागं माणक्या पण येताना दिसला. माणक्याला पाहून फक्कड पाटील ओरडला, ‘‘आरं त्या हुसन्याला आणायला गेल्ता का काय? बरं झालं, त्याचीच वाट पाहत बसलीत सगळी मंडळी. जरा ढकल त्याला पुढं.’’ हुसन्या हसत हसत आला. अन् सगळ्या मंडळींना म्हणाला, ‘‘सलाम आलेखुम.’’
‘‘ते सलाम फिलाम जाऊदे बाजूला. पहिल्यांदा टेक या पारावर अन् ते जरा सांग मुमईची वित्तंम बातमी.’’
‘‘आता बातम्या सांगायला काय तो रेडिओ हाय का पेपर? लई तर हालहवाला विचारा अन् काय ते मुंबईत कुठं फिरला, हरवला, चुकला, असली हालहलात विचारा.’’ माणक्या म्हणाला.
‘‘आता तुमचं थोबाड बंद करा, त्याला सांगू द्या की कशी वाटली त्याला राजधानी.’’ फक्कड पाटलानं सगळ्यांना गप्प बसायला सांगितलं.
सगळी गप बसली अन् पाहत राहिली हुसेनकडं. हुसेननं तोंडातली तंबाखू टाकून तोंड मोकळं केलं अन् लुंगी सावरत नीट बसत म्हणाला, ‘‘मुंबईची जरा वेगळीच तर्हाच. एकाच ठिकाणी स्वर्ग, नरक, पाताळ, पृथ्वी बघायची आसन तर मुंबईला जावं.’’
‘‘स्वर्ग म्हणल्यावर अप्सरा आल्याच की राव,’’ माणक्या मध्येच बोलला.
‘‘अप्सरा काय म्हणतो त्याच्या म्होरच्या अप्सरा असत्यात तिथं. फकस्त तुमच्या पदरी पाप-पुण्याचा हिशेब नाही बघतला जात तर तुमच्या पदरी किती दामाजी हायत ते पाहून अप्सरा तुमच्यासमोर नुसत्या येणार नायत तर नाचत येतील.’’
‘‘साल्या, तू गेल्ता का पायला?’’ विलास जरा संशयानंच बोलला.
‘‘आता समदं काय बघायलाच पायजे का? आरं तिथं मोठमोठ्या हाटेलात असलंच चालत्येत. आता मी नाय पायलं पण बँड कंपनीतली माणसं गप्पा मारताना म्हणत व्हती. मालपाणी असलेली हौशी माणसं असल्या अप्सरावर नुसता खुर्दा, खुर्द्यामागून खुर्दा उधळतेत. आलं का लक्षात. आपली लायकी तिथं दारात उभं राहायची सगट नाही.’’ हुसेन एवढं बोलून समोर नजर लावून गप बसला.
‘‘झालं म्हंजी आपल्यासारख्याला स्वर्गाचं दार बंदच की,’’ फक्कड पाटील.
‘‘तसं नाय म्हणता यायचं, आवं आसल्या इमारती बघितल्यावर महाल काय वेगळी असतेत का? राजमहालच समुंदराच्या साक्षीनं उभी हायतेच. ती आपल्यासारख्या फाटक्या माणसानी लांबून बघायची. आता एकदा मुंबई दर्शन गाडीनंं मुंबई बघत होतो तर त्यानी लांबून दाखवली. नट-नट्यांची घरं. घरं म्हंजी बंगले. आवो तिथं कुणी बाई-माणूस चाललं तरी त्यांची सावली बी अशी देखणी की नुसती त्या मातीचेच मुकं घेत बसावं.’’
‘‘च्यायला लई मजा केली राव हुस्न्या तू,’’ माणक्या मधीच बोलला.
‘‘आरं आता तो आता लाईनीवर, त्याला बोलू द्या, आता लाईनीवर म्हंजी आपल्याला जे ऐकायचं होतं त्या टप्प्यावर हुसन्या आला बघा.’’
‘‘कोणत्या टप्प्यावर?’’ माणिक.
‘‘आरं ते नट-नट्यांची घरं बघितली म्हंतो तर तो राज कपूर इथंच घावला का त्याला तेच तर ऐकायचं व्हतं ना आपल्याला.’’ फक्कड पाटील.
‘‘नाय नाय पाटील, ती ष्टोरी वायलीचय, ती अशी एका दमात नाय सांगता यायची.’’
‘‘बरं आता तू म्होरं बोल,’’ माणक्यानं त्याला बजावलं.
‘‘बोलतो माणिकदादा, पण असं मधी मधी माझं बोलणं तोडू नका. मधीच मग इसरल्यावणी व्हतं.’’
‘‘तर असा स्वर्ग भी हाय मुंबईत. लई भारी घरं, बिल्डिंगा, देखणी बाया-माणसं, आता देखणी म्हंजी कसं, तर आपल्या गावात कोणता बी माणूस बघा, दगडामातीचा रंग घेऊन आलेला.
‘‘कवाबी बघा, थोबाड पार शिळं पाकं झालेलं. रापलेली माणसं सगळी आपली, आपल्या तोंडावर तेजच नाय. आपली लायकीच नाय मुंबईत फिरायची. तर ही असं स्वर्गाचं लई सांगता यीन पण आपल्यासारख्याला ही सगळं लांबूनच बघायचं.
‘‘बरं थांबव ती स्वर्गाचं, ती नरक भी बघून आलान तू?’’ माणिक.
‘‘नरक मातर लांबून नाय पायला. पार आत घुसून, त्यांच्यासंग बोलून चालन पायला. कुठंबी अशा बारीक बोळा, जिथं माणसं दाटीवाटीनं राहत्यात. चाळ म्हणलं आपल्याम्होरं तमाशातली अप्सरा इती. तिथं, चाळ म्हंजी, दाटीवाटीनं राहायची जागा. काय काय पोटं भरायला आलेली माणसं रस्त्याच्या कडंला फूटपाथवर पण राहत्यात. अन् कवा-बवा मोठ्या लोकांच्या गाडीखाली चिरडली बी जात्यात. अन् झोपडपट्टीत तर लई नमुनेदार नरक. गेल्लो यगदा धारावीच्या अन् दुसर्या झोपडपट्टीमधी. आत फिरावं म्हणलं, तर नुसत्या वासानीच गरगरायला लागलं मला. कुणाच्या झोपडीत बोंबलाच वास, कुणाच्या माशाचा, तर कुणाच्या मेथीच्या भाजीचा. कुणाच्या घरात रेडिओ मराठीत खरखरत असतो, तर कुणाच्या कन्नडी, कुणाच्या केरळी तर कुणाच्या तेलगी. आरं एकाच टायमाला अशी भणभणत असतेत. रेडिओ, टी.व्ही. ही माणसं कशी जगत्यात त्यांनाच माहिती.’’
‘‘आरं तू खाण्यापिण्याचं सांग, ती जगतीत कशी?’’ माणिक.
‘‘मला तर वाटतं आर्धी मुंबई पावावर जगत आसंन, बघा. आपण इथं तालुक्याच्या गावाहून इसाकभाई सायकलला बटरच्या पाट्या लावून येतो तर संध्याकाळपर्यंत दोन-तीन गावं फिरलं तरी त्याचे बटर संपत नाय. इथं लेकराला बटर घ्यायला, चार-आठ आणे दिलं तर पोरांचे लई लाड केल्यावणी वाटतंय.
‘‘बाप वरडतच राहतो. बटर दिले तुला, आता वासरांना पाणी पाज, बटर दिली तुला, अभ्यास कर, पण मुंबईत बटरचं काय कौतिक नाय. एक दिवस पाव बनवू नका म्हणून कोणी सांगितलं, तर मुंबईतली माणसं म्हणतीन, लाईट गेली तरी चालन पण ते पाव बनवायचं बंद नका करू. झोपडपट्टीत पाव आठ आण्याला आसंन तर तोच बाहर नायतर इतर ठिकाणच्या हॉटेलमंधी दोन-तीन रुपयाला. मी आपलं गाड्यावर खायचो. जेवणबी खिशाला परवडंल आसं, पण ते गाड्यावर.’’
हुसेनभाई पारावर बसून सगळ्यांना मुंबई गप्पातून दाखवत होता तेवढ्यात कुठून तरी ओरडायचा आवाज आला. सगळी माणसं उठली, अन् कानोसा घ्यायला लागली. एक पोरगं बोंबलत आलं, ‘‘साळुंक्याच्या घरात लई लांबलचक नाग दिसला, तो मोरीतून मागच्या वाड्यात गेला, कुणीतरी पाहिलं, तो सळासळा कडब्याच्या गंजीत गेला.’’
सगळी मंडळी उठून भराभरा तिकडं पळाली. हुसेनभाईच्या गप्पाला कुलूप लागलं. साळुंक्याच्या घरी निम्मा गाव जमला. माणसं त्या नागाला कसं पकडायचं अन् मारायचं याचं धोरण आखत होती. बापू कासार म्हणाला, ‘‘द्या ती गंज पेटून, ती आपोआप जळून जाईन, नायतर आगीच्या धगीनं बाहेर यील, बाहेर आला की आपण समद्यांनी गंजीच्या चारी बाजूंनी काड्या, गज घेऊन उभंसं राहायचं, ज्याच्या आवाक्यात यीन त्यानं त्याच्यावर सपकन काड्या, गज मारायचे व अन् जागेवरच चिचून काढायचा.’’
नामदेव साळुंके तर पार रडायलाच आला. म्हणाला, ‘‘आवो, गंज जाळू नका, माझी दोन जित्राबं सालभर काय खातीन. मी गरीब माणूस.’’
हुसेनभाई त्याला समजावत मधीच म्हणाला, ‘‘साळुंके पाटील, आवं ही मोकळ्या रानातलं जित्राब इकडून आलं, तिकडं जाणार. त्यानं तुझ्या पोराबाळाची खोड केली नाही. तू आता येक कर, तेल-वात घेऊन भैरोबाला जा. भैरोबाला नारळ वाढव. अंगारा आण. ‘नाथाचे चांगभले’ म्हणत सगळ्या घरात, गंजीभवती अंगारा टाक. संपलं सगळं. शेवटी तोच आपल्याला सांभाळणारा. गावातली माणसं गंजच काय, घर पेटून दी म्हणतील. पायात काटा अडकला म्हणून काय पाय तोडायचा का?’’
नामदेवला हुसेनभाईचं म्हणणं पटलं. संध्याकाळ संपून रात्र झाली. चांदणं चांगलं फुललं होतं, पण लोकांनी गोल बसून सापा-नागाच्या गप्पा फुलवल्या होत्या. एक-एक माणूस हळूहळू सटकत होता. नाग काय दिसत नव्हता.
रात्रीचे दहा वाजायला आले. एकजण म्हणाला, ‘‘चला आता, हे जनावर काय भाईर येत नाही. कवर बसायचं?’’
या सगळ्या नादात हुसेनची मुंबईची ष्टोरी बाजूलाच पडली.
— अरुण जाखडे

अरुण जाखडे यांच्या 'पारावरच्या बाता'मधून खेड्यात असणारे एक कौटुंबिक वातावरण, एकमेकांबद्दल असलेली आस्था,मदतीला धावून जाणं इ. गोष्टी पाहण्यास मिळतात. टीव्ही, सिनेमा नसलेला तो काळ. माणसं पारावरच्या गप्पा गोष्टीत रमून जायची. मुंबई सारख्या महानगराची त्यांना उत्सुकता असायची.१९७०-८० पर्यंत खेड्यात दिसणारे हे वातावरण अरुण जाखडे यांनी छान रीतीने येथे वर्णन केले आहे. याच्या पुढचा लेख वाचण्यासाठी उत्सुक आहोत.
ReplyDelete