Skip to main content

हुसेनभाईची वापसी




। एक ।
        हुसेनच्या आयुष्याची हृदयद्रावक कथा ऐकून बॅण्ड ताफ्यातल्या सगळ्यांनाच त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. सकाळी हुसेन अंथरुणातच लोळत पडला. कोणीतरी त्याला हाक मारली, ‘‘आर.के., आर.के., लवकर ऊठ. आता चहा यायची वेळ झाली. आज खास सगळ्यांसाठी पाव मागितलेत.’’
         हुसेन आळुके-पिळुके देत उठला. तोंड धुऊन चहा-पावाच्या पंक्तीत सामील झाला.
         हुसेन म्हणाला, ‘‘असे पाव आमच्या गावाकडे मिळत नाहीत. मुंबईची टेस्ट लई भारी.’’
         सावत्या म्हणाला, ‘‘अरे इराण्याच्या हॉटेलातला खाल्ला का तू कधी?’’
         ‘‘नाही.’’
         ‘‘ठीकय, तुला घेऊन जातो. ही पार्टी माझ्यातर्फे.’’

        सगळे हसले. अरे, राजा उदार झाला आणि हाती कोहळा दिला. सावत्या डोळा मारत म्हणाला, ‘‘अरे त्यालाच तर जीवाची मुंबई म्हणत्यात.’’
जीवाची मुंबई म्हणजे काय, हे त्याला आता कळलं. सावत्यानं त्याला इराण्याच्या हॉटेलात चहा-पावाची पार्टी दिली.          त्या मस्का पावाच्या मस्काचा थोडा घास हुसेनच्या दाढीनं खाल्ला. ‘‘अजून कशात जीवाची मुंबई असती’’ - हुसेन. 
         सावत्या सांगू लागला, ‘‘अमूक ठिकाणचा डोसा, तमुख ठिकाणची मिसळ, अमूक ठिकाणची पाणीपुरी, तर अशा अनेक गोष्टींची यादीच त्यानं सांगितली.’’
           हुसेन म्हणाला, ‘‘आता मी चार-पाच दिवसच आहे. जाऊ आपण हे खायला, सगळं माझ्यातर्फे तू फक्त घेऊन जायचं. मला बुढ्ढीनं दिलेले पैसे फार खर्च झालेच नाहीत. आता बॅण्ड कंपनीचा पगार पण मिळंल जाताना.’’
           सावत्या त्याला रोज संध्याकाळी कुठं ना कुठं घेऊन जाऊ लागला. जाता-येता मुंबई दाखवत होता. हुसेननं आबड्याला पण बोलावलं. पण संध्याकाळी आबड्याच्या धंद्याचा टाईम; पण एक दिवस आबड्याही आला होता.
सावत्यानं चार दिवस मुंबई पाहिली. चटकदार मिसळ, पाणीपुरी, रगडा सगळ्यावर ताव मारला.
           ‘‘बरं झालं सावतोजी पाणीपुरी अन् रगडा आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला. गावाकडं तर कुणी नावंसुद्धा ऐकली नसतील. आता ह्यो ठोकळा दाखवला ना, तर ते बर्फी म्हणतील, नाहीतर मैसूर पाक.’’ 
            सावत्या हसला, ‘‘खरंय आर. के.’’
            हुसेन सांगू लागला - ‘‘सालं, मी समुंदर म्हंजी काय ऐकून होतो. पण ह्यो पाण्याचा पसारा पाहून दबकलोच. पहिल्या दिवशी तर छातीच दबून गेली माझी. आता पाताळ का काय म्हणतेत ते हेच आसन वाटतं.’’ सावत्या काय म्हणणार, ‘‘आसन, मी काय लई ज्ञानी माणूस नाय.’’
            हुसेन आकाशाकडं बोट दाखवत म्हणाला, ‘‘स्वर्ग.’’ खाली जमिनीकडं बोट दाखवत म्हणाला, ‘‘पृथ्वी अन् समोर दिसतंय ना ते समिंदर, ते म्हणजे पाताळ.’’
           ‘‘काय समजत नाय आपल्याला, गावाकडं चॅप्टर माणूस असला, तर त्याला पाताळयंत्री म्हणतात, बायकांच्या भांडणात तर त्या एकमेकीला झिंज्या पकडून तू पाताळयंत्री, मी नाय तू पाताळयंत्री. लई कालवा घालताना मी ऐकलं होतं राव.’’
           ‘‘असं काय म्हणता सावतोजी, आवो, आमच्या गावात मारुतीच्या देवळात सप्ता असतो, तेव्हा बसतो कधी ऐकायला. कानाला गोड लागतं अन् चार गोष्टी कळत्यात. विठ्ठलाच्या देवळात सुद्धा श्रावण महिन्यात कवा-कवा असलं पुराण ऐकत आलो.’’
             ‘‘जाऊदे, हुसेन. इथं फक्त भगवा अन् हिरवा.’’
             ‘‘म्हंजे?’’
             ‘‘अरे, तू बोला ना राज कपूर मुझे बहुत प्यारा है, हरएक सिनेमात गरीब, भोळा, श्रीमंतांचा राग करणारा, दिलवाला लेकिन जेबसे फकीर. ओ बिलकुल तेरे जैसा. इसलिये तो तुझे हम लोक आर.के. नामसे बुलाते.’’
आता गावाकडं निघायची वेळ आली. दुपारी तो आबड्याला भेटायला गेला तेवढ्यात रस्त्यात गलका झाला, काहीतरी गोंधळ झाला - एक मिरवणूक चालली होती - सगळ्यांच्या हातात भगवे झेंडे. जय भवानी, जय शिवाजी.
दंगल उसळली होती. समोरच्या मशिदीवर दगड फेकले जात होते अन् पोलिसांच्या गाड्या पळत होत्या. ऍम्ब्युलन्स पळत होत्या. पोलिसांचा कर्णा ओरडत होता, ‘‘मोमीनपुर्‍याकडं जाणारे रस्ते बंद केलेत, सिद्धीविनायकाकडे जाणारे रस्ते बंद केलेत. कुठेही न जाता घरी जा.’’
               हुसेन घाबरून गेला. सगळा जीव मुठीत धरून तो रस्त्याच्या इतक्या कडेनं जायला लागला की एक-दोनदा त्याला दुकानाची दारं, पायर्‍यासुद्धा लागल्या. कसाबसा तो आबड्याकडं पोचला.
आबड्या जिन्याखाली शरीराचं मुटकुळं करून, पांघरूण घेऊन झोपला होता.
हुसेननं हाक मारल्यावर, ‘‘अरे तू इस टाईम क्यूॅ घुमता. चल जल्दी अंदर आ, मेरे पास. तेरी लुंगी और दाढी देखके, किसीने हटा नहीं क्या.’’
             ‘‘नही.’’
             ‘‘अरे, तू अल्लाकी कृपासे नशीबवान. यहा हिंदू-मुस्लीम दंगल चल रहा है. अब इदरही बैठ.’’
             ‘‘ही दंगल कशासाठी? ही मारामारी कशासाठी? अरे, आपुनके गावमे तो ऐसा कभी देखा नहीं था.’’
             ‘‘ओ मुझे कुछ समजता नही. चूपचाप बैठ, किसीने सुना तो आपुनको हकाल के देंगे, शहर और गाव में यही फरक है, समझा?’’
              कुठून बुद्धी सुचली अन् मुंबईला आलो, असं हुसेनला जाणवू लागलं. त्या रात्री, तो आबड्याच्या अंथरुणातच जिन्याखाली पाय आखडून झोपला.
               सकाळी वातावरण शांत झालं. अफवा आणि गैरसमजुतीतून दंगल उसळल्याचं कळलं.
हुसेन आबड्याला म्हणाला, ‘‘आबड्या, तू पण गावाकडं चल.’’ पण आबड्या अजून महिना-दीड महिना येणार नव्हता. ‘‘थोडे पैसे साचलेत, आणखी थोडे जमा झाले की येतो.’’ हुसेनची तो समजूत काढत होता. तो म्हणाला,                  ‘‘अरे हुसेन, इथं मिळालेले हे पैसे मग वर्षभर गावाकडं पुरतेत. गावातली लोकं काय, फुकट्यात ताशा वाजवून घेत्यात. काही लोकं तर जेवण अन् दोन भाकरी बांधून देत्यात. अन् आपली पण काय तक्रार नाय. पण कमरेला दोन पैसं आसलं म्हणजी कसं बरं वाटतं.’’
हुसेन काहीच बोलला नाही. त्यानं मुलांसाठी बरेच पाव, खार्‍या, टोस्ट, बटर घेतले. थोडी मिठाई घेतली अन् तो जोकर. सगळं पिशवीत भरलं, निघताना त्याचे डोळे भरून आले. त्यानं बॅण्डच्या सगळ्या वाद्यांवर प्रेमानं हात फिरवला. सगळ्यांचा निरोप घेतला. योगायोगाने मालक त्याचवेळी आता होता. त्यांच्या पाया पडला.
                 ‘‘सलाम आलेखुम.’’
                 आबड्याचा रडवेला चेहरा पाहून त्यांनी आबड्याला जवळ घेतलं, ‘‘अरे तू, तो वापीस आनेवाला है ना? इतना नाराज क्यूॅ?’’ हुसेननं नुसती मान हलवली.
                   आबड्या त्याला पोचवायला स्टेशनवर आला. गाडी आली, गाडीत बसल्यावर त्यानं खिडकीतून आबड्याचा हात हातात घेतला. त्याच्या हातात पन्नासची नोट दिली.
‘                ‘अरे तू ये क्या कर रहा? मुझे इसकी जरुरत नहीं.’’
                 गाडी हलली. त्याच्या डोळ्यातले पाणी हवेनं उडाले, ते पुसत तो सुन्न होऊन बसला.

। दोन ।
                हुसेनभाई जाऊन महिना होत आला. पहिले एक-दोन आठवडे गावात कोणाला काही जाणवलं नाही. तरी सगळ्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. पुढे तर पारावरची रयाच गेल्यासारखे वाटले. सगळं कसं बुच्चं-बुच्चं. माणसं जमत होती. गप्पा मारत होती; पण त्याला रंग चढत नव्हता. हुसण्या नुसता गावातून मोकार फिरला अन् पारावर आला नाही तरी, हुसन्याचं अस्तित्व तिथं घुटमळत असायचं. आता त्याच्या नसण्यानं लोक हवालदिल झाले. त्यांच्यात चर्चा सुरू झाले.
              ‘‘आरं, आता एक आठवडा झाला, दोन आठवडे झाले तरी हुसन्याचा काही पत्ता नाही. मेलं का, काय तिकडं रेल्वेत अडकून.’’
               दुसरा म्हणाला, ‘‘मरतंय व्हय ते राव. ते आपल्या नावची आंघूळ करन अन् पारावर आपल्याविषयी बाता मारत बसन.’’
            ‘‘च्यायला, आसलं वंगाळ नकू बोलू. आपल्याला कशाला मारतो?’’
             कुणी म्हणालं, ‘‘अरं, कामाधंद्याला लागला आसन.’’ अशी हुसन्याची चर्चा चालू असतानाच माणिक समोरून येताना दिसला.
              तात्या बनकर, मिशा बाजूला करून, तंबाखू बाहेर फेकत म्हणाला, ‘‘या, या, माणिकराव पाटील. तुमचीच वाट पाहत होतो. कुठं गेला तुमचा जानी दोस्त हुसेन?’’
              पारापुढच्या दगडावर टेकत माणिक म्हणाला, ‘‘खरं काय मला बी समजंना. इतका कसा इसारला आपल्याला. फकस्त एक टपाल आलं, त्याच्यापुढं काहीच नाही.’’
              असेच दोन-चार दिवस गेले. चर्चा चालूच होती. शेवटी माणिकरावच्या नेतृत्वाखाली हुसेनच्या घरी गेले. बुढ्ढी समोरच गहू पाखडत बसली होती.
               माणिक म्हणाला, ‘‘बुढ्ढे, आम्ही तुझ्याकडेच आलोय. ते सूप जरा बाजूला ठेवून दे.’’
               ‘‘थांब जरा एवढंच राहिलंय ओंजळभर. तेवढं ठेवते म्हणजे झालं काम पुरं.’’
               माणिक म्हणाला, ‘‘आता ह्या वयात कशाला पाखडत न् पिखडत बसली. त्या सुना बस्तीन तुझ्या डोक्यावर.’’
                ‘‘नाय रे माणिक. त्या काय मला कर म्हणत नाहीत, लई कामाच्यात त्या बी. पण मलाच कायतरी काम असल्याबिगर करमत नाय.’’ तोपर्यंत बुढ्ढीचं पाखडणं संपलं.
                माणिक म्हणाला, ‘‘बुढ्ढे, हे बघ आमी आलोय तपास करायला. आपला हुसेन काय म्हणतोय, त्याचं काय टपाल आलं का?’’
               ‘‘नाही रे, ते एक आलं तेवढंच.’’
               ‘‘म्हणून म्हणतो, आमच्या मनात काय बी वंगाळ यायला लागलं. हुसन्याचं काय कमी जास्ती झालंय, गर्दीत हरवलाय, का कोणत्या रोगानी पकडलाय, काय समजंना. आमी म्हणलं, तुझ्याकडं काय खबरबात मिळाली तर बघावं.’’
                 बुढ्ढी म्हणली, ‘‘आरं, असलं काय अशुभ बोलता, अल्लाची कृपा होऊन तो सुखरूप इन.’’
तेवढ्यात हुसेनची पोरगी अन् बायको समोर दिसली. तिला बोलावून तिची रिबीन ओढत अन् हुसन्याच्या बायकोला ऐकू जाईल, अशा आवाजात तो म्हणाला, ‘‘काय गं झम्मे, कुठं गेला तुझा बाप? दुसरं लगीन लावून मुंबईतच मजा करतोय. त्याला कशाला इन, तुझी अन् तुझ्या आईची याद.’’
                  हुसेनची बायको लाजली. मुलगी मात्र चिडून बाजूला उभी राहिली. माणिकबरोबर गेलेला कांता सुतार म्हणाला, ‘‘काय भरवसा आजकाल माणसाचा? ह्यो मायाजाळ लई डेंजर. मुंबईतल्या बाया लई बनेल, गड्यावनी त्यांन्ला लागतो एक नवरा.’’
                 काळजीनं बुढ्ढीचा चेहरा काळवंडला. माणसं निघाली तसं ती म्हणाली, ‘‘आरे, काय वाईट वंगाळ अस्त तर आबड्या आला असता की सांगायला.’’
                 माणसं पुन्हा पारावर गेली. ‘‘काय आणली बातमी, सांगा डिटेलमंधी.’’
                 माणिक म्हणाला, ‘‘काय वाईट वंगाळ नसन, नाहीतर आबड्या आला असता की सांगायला.’’
                 तशी माणसं कुत्सित हसली. ज्ञाना माळी म्हणाला, ‘‘ते आबड्या व्हय हेकनं, आधीच एक डोळा नाही, ती हेकनपती कशाला यीन इथं सांगायला. मुळात ती अल्लाची गाय. भीतीनच येणार नाही.’’
                 अशा चर्चा रोज होऊ लागल्या. दिवस कलला, त्यांना कुठं माहीत होतं - हुसेनभाई ऊर्फ हुसन्या ऊर्फ हुसेनभाई बाताड्या, गावाकडं येण्यासाठी रेल्वेत बसला आहे.

 — अरुण जाखडे
छायाचित्र : किशोर दिवाळी अंक २०१६

Comments

  1. the reader can see the events taking place before his eyes !!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...