संध्याकाळी बॅण्ड कंपनीतले लोक ज्यांना घर नाही किंवा बाहेर गावाहून आलेले आहेत, अशी मंडळी बॅण्डच्या कार्यालयातच संध्याकाळी लांबलचक मोठी सतरंजी पसरून झोपत असत. पडल्या-पडल्या गप्पा-टप्पा, चेष्टा-मस्करी, बॅण्डमध्ये वाजवायच्या गाण्यांची चर्चा, ऑर्केस्ट्रा अशा गप्पा होत. कधी एकमेकांच्या सुख-दु:खाविषयी होत. आर. के.च्या गप्पा त्यांना नेहमीच आवडत. बोलता-बोलता कोणीतरी आर. के.ला विचारलं,
‘‘आर. के. मुंबईला येण्यापूर्वी तू गावाकडं काय करत होतास? तुझ्यावर ह्या वयात अशी मुंबईला यायची आफत का आली? घरी रागावून वगैरे तर नाही आला ना?’’
आर. के. दोन मिनिटं गोंधळलाच. ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं. आपण गावाकडे फारसं काय, काहीच काम करत नव्हतो. एकत्र कुटुंबात सगळ्यांनी सांभाळून घेतलं, पण आपण काहीच काम करत नव्हतो, हे सांगणे म्हणजे तर गैरच. जरा शरमल्यावणीच वाटतंय. बरं, आपण काही रूसून, भांडून, पळून आलेलो नव्हतो, उलट घरच्यांनी मुंबई पाहण्यासाठी पैसे दिले होते. बॅण्डमध्ये नोकरी काही जमण्यासारखी नव्हती. उगीच शिपायासारखी कामं किंवा शोभेला माणूस उभा करावा, तसंच माझं काम.
पण कुणीतरी पुन्हा विचारलं, ‘‘खरंच आर. के. तू लेकरं-बाळं असलेला माणूस, काहीतरी करत असणारच की? कोणत्या परिस्थितीनं हैराण झाला म्हणून आला?’’
मग पाठीवर लेटलेला हुसेन ताटकन् उठला अन् मांडी रवालून बसला. आता तो काय सांगतो याची उत्सुकता सगळ्यांना लागली.
हुसेननं तोंडावर हात फिरवला, ‘‘सांगतो, दोस्तांनो, माझ्यावर कोणती आफत आली होती ती सांगतो.’’
‘‘त्याचं काय, माझा होता एक छकडा, एक छोटीसी गाडी अन् एक बैल एवढाच माझा बारदाना. सकाळी 8.30-9 ला न्याहारी करून निघायचो. चार-दोन कडब्याच्या पेंढ्या छकड्यात हाथरायची अन् त्याच्यावर घोंगडी टाकून मस्तपैकी तालुक्याच्या गावाला जाऊन एस. टी. स्टँडवर थांबायचो. सकाळी जाताना कधी कधी चार-दोन सिटं मिळायची. तालुक्याच्या ठिकाणी तव्हा कुठं एवढ्या एस. ट्या. व्हत्या? आमच्या गावात यायला तर पायी चालत येण्याबिगर सोय नव्हती, पण आमच्या गावातली माणसं लई चिकाट. पायी चालायची पण माझ्या छकड्यात बसत नव्हती. लईच डंगरं म्हातारं पाय वडत-वडत चालत असलं, तर मला दया यायची अन् बसवायचो छकड्यात. असल्या फुकट्या लोकांना वाहन्यातच जन्म चालला; पण असायची काही माणसं, चार पैसे खर्चायला त्यांचा हात मोकळा असलेली. असली माणसं असायची अन् त्यात खर्च निघायचा. खर्च म्हणजे बैलाच्या खादगीचा, पण माझी खरी गिर्हाईकं व्हती, ती म्हणजे मामलेदार कचेरीतली, कोर्टाचा बेलीफ, सरकारी दवाखान्याचा डाक्टर, असली सरकारी कचेरीतली माणसं, अन् ती पैसे द्यायला घासघीस नव्हती करत, त्यात खरं म्हणजे ब्रुक बॅण्ड कंपनीचा एजंट आठ-पंधरा दिवसातून यायचा. तो पोपट छाप चहा विकायचा. आता तो छाप मिळत नाय वाटत. तर हा जो चहा विकणारा सायेब होता, तो लई मोठ्या मनाचा. लई गप्पा मारायचा. घरची विचारपूस करायचा. त्याचा एक शिरस्ता व्हता, तो म्हणजी माझी कामं झाल्यावर परत तालुक्याच्या गावाला म्हणजे कर्जतला आणून पोचवायचं. असला मोठ्या मनाचा माणूस काय हलक्या मुठीचा असतो का? लोकांपेक्षा दहा-पाच रुपये जास्तीच द्यायचा.
एक दिवशी कर्जतहून येताना जरा उनाचा सपाका जास्तीच होता. हा चायवाला सायेब म्हणला, ‘‘अरे, हुसेन तुम्हारे गाडीको उपरसे तट्ट्या बिठाके लो. ये उन बारिसमें तकलीप नहीं होती.’’
मी काहीच बोललो नाही. बैलाचं शेपूट पिरगाळलं, तसं ते जोरात चालायला लागलं.
सायेबाला वाटलं, मला ऐकू आलं नाही. म्हणून पुन्हा म्हणाला, ‘‘हुसेन, बांबूपासून काड्या काडतात ना त्याच्या नाहीतर निदान ताडपत्रीचं वरती पांघरून टाक, छप्पर केल्यावाणी.’’
‘‘सायेब, तुमचं म्हणणं पटतंय, तुम्ही काय चुकीचं बोलत नाय; पण तेवढं करायला आपल्याजवळ लक्ष्मी पायजेल ना. ह्याच्यावर माझं अन् ह्या बैलाचं पोट आहे. आता ही वाळकी चिपाडं खाऊ घालून बैलाचे पोट भी खपाळलंय.’’
तवा तो चायवाला सायेब म्हणला, ‘‘चल घे बसवून, जेवढा दाम लागन तेव्हडा मी देतो.’’
‘‘आवो नगं सायेब, मी गरीब माणूस, तुमचं देणे नाय फिटलं तर नरकात जावं लागन. कुणाच्या पैशाला मन नाय दावलं पायजे.’’
चायवाल्या सायबाला माझं बोलणं ऐकून लई मजा वाटली. हसत हसत त्यानं माझी कॉलर वडली, म्हणाला, ‘‘अरे, तू पैसे वापिस देनेके नही, मुझे बहुत पगार है, खर्ची कमी है, तू दे या ना दे, कल मेरे ऑफीस आके पैसे लेके जा.’’
‘‘मैने बुढ्ढीको पुछा, बडे भाईको पुछा, ओ बोला, ओ खुशीसे और प्यारसे देता है तो ले. तुने तट्ट्या बिठाया ना तो आने-जानेवाले बहुत मिलेंगे, चार-आठ पैसे तू जरा जादा लेता जा.’’
‘‘साहबकी मर्जीसे तट्ट्या तो बिठाया लेकिन मेरे दिलपर किसीने तो पत्थर रखा है, ऐसे बोझ लग रहा.’’
तो मैने चायबाबू को पूछा, ‘‘साहब, तुम्ही रोज आजूबाजूच्या गावाला जाता ना?’’
‘‘नाही, आठवड्यातून चार दिवस.’’
‘‘तर मग मी ते चार दिवस तुमच्यासंगच फिरत राहीन, त्यातनं तुमचं पैसे वळती करून घ्या.’’
पण सायेब म्हणाला, ‘‘नको, अरे तुझ्या छकड्यामुळे दुसर्या लोकांची सोय होते ना, ती बंद होऊन जाईन, तुझ्या गावात येणार्यांची अडचन होईन, नको, आपलं हे चाललंय तेच बरंय.’’
‘‘सायेब तुमच्यासारखी माणसं म्हणजे परमेश्वरच. अल्लाची कृपा झाली म्हणून तुम्ही भेटला.’’
सायबानं एकदा माझा फोटोबी काढला होता. हातात बैलाचा कासरा धरून मी बसलोय अन् बैलासगट अख्खा छकडा आला होता राव त्याच्यात.
असं बरं चाललं होतं. मी लई खुशीत होतो, कारण माझा छकडा स्टॅण्डला पोचला की, कोणत्या तरी कचेरीतून शिपाई धावत यायचा अन् घाई करायचा. ‘‘हुसेन जल्दी चलो, साहबको दुर्गाव जानेका है.’’
‘‘कितने बजे?’’
‘‘बारा बजे.’’
‘‘अरे अभीसे वहा क्या करू.’’
‘‘नही, नही, दुसरी कोई सवारी मिली तो तू उसके साथ जायेगा.’’
‘‘हर दिन कोई ना कोई तो, ऐसा पिछे लगता था.’’
‘‘हुसेन इधर जानेका जल्दी चलो.’’
‘‘हुसेन साहबको ले को जावो, साहब गुस्सा कर रहे है, हुसने जल्दी क्यों नहीं आता.’’
‘‘हुसेन मंगळवारकी किसीकी भी सवारी मत लो.’’
‘‘और बाजारका दिन रहता था ना, तो पुछो मत, मै दो-दो बार सवारी करता था.’’
‘‘हुसेन, हुसेन, हुसेन. सब जगह हुसेनका नाम. मै मशहूर हो गया.’’
मग हुसेन बोलता-बोलता थांबला. पुढे काहीच बोलेना, सगळे चुपचाप होते. त्यांनी पाहिलं, आर. के. गुडघ्यात डोकं घालून रडत होता.
‘‘अरे, आर.के. आसं काय झालं, रडतो का?’’ आर.के. हुंदके देत होता. सगळे उठले. त्याला पाणीभर पाणी पाजलं. ‘‘शांत हो आर. के., शांत हो.’’
मग हुसेन बोलला, ‘‘एके दिवशी मला बैलाला बाजार दाखवावा लागला. राशीनच्या बाजारात जाऊन विकला. त्याच्या पाठीवर शेवटचा हात मारला, तवा मला वाटलं आता मीच मेलो. इतके दिवस त्याच्या जीवावर मी अण्णाचे चार कण खाल्ले. लेकरंबाळं जगली.’’
हुसेन बोलता-बोलता पुन्हा थांबला.
‘‘आर. के. का बरं तू बैल विकलास?’’
‘‘काय सांगणार, गावात एस.टी. सुरू झाली. दोन-चार वेळा ती घिरट्या घालू लागली. आता माझ्या छकड्यात कोण बसणार? चायवाल्या सायबाला वरची जागा मिळाली. तो भी गेला, तुम्हाला सांगतो, त्याच्या चहाचा माल गाडीत टाकला की गाडीत नुसता चहाचा घमघमाट सुटायचा. कुणा सायबाचा अत्तराचा वास तर कुणाच्या घामाचा भी. छकडा पळतच राहायचा.
एस.टी. सुरू झाली अन् पळणारा छकडा जागेवरच थांबला. आता बैलाला पदरमोड करून किती दिवस खाऊ घालणार? शेवटी विकावा लागला.
‘‘मग माझं मन काय गावात रमंना, तवा म्हणलं चला, मुंबईला जाऊ, असं माझ्या जन्माचं रामायण झालं बघा.’’
आर. के. ची ही स्टोरी ऐकून सगळेच गलबलून गेले. त्यांना त्याची दया वाटू लागली. त्यादिवशी रात्री बराचवेळ गप्पा चालल्या होत्या की, ‘‘खेड्यापाड्यातली काही रोजगारी यंत्रामुळं कशी संकटात सापडली.’’
हुसेनचं त्यात लक्ष नव्हतं, त्याला माहीत होतं की आपल्या चुलतभावाचीच गोष्ट आपली म्हणून आपण सांगितली. पण मी तरी काय सांगणार होतो. गावात बोंबलत फिरत होतो का बिनकाम्या होतो? काय सांगणार, मग वेळ मारून नेली.
हुसेनला अपराधी अपराधी वाटू लागलं. त्याला समोर चित्र दिसलं. छकड्यावर तो बसला आहे आणि म्हणतोय–
सजन रे झूट मत बोलो,
खुदाके पास जाना है।
आपण कोणाला तरी बनवलंय ह्या अपराधी आणि अस्वस्थ मनानं तो झोपी गेला.
— अरुण जाखडे
छायाचित्र : किशोर दिवाळी अंक २०१६

Comments
Post a Comment