दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आबड्या हुसेनकडं आला. डोक्यावर पापडाची पाटी होतीच. ठरल्याप्रमाणं ते चौपाटीवर गेले. आबड्यानं नजर टाकली. ते लोक आले नव्हते. मग त्यानं चौपाटीवर फेऱ्या मारल्या- ‘पापऽऽड, पापऽऽड, खुसखुशीत, कुरमुरीत, मुगाचे, उडदाचे पापडऽऽ’, लोक पाहत होते. मजा करत होते. पण ह्या पापडवाल्याकडं कुणाचं लक्ष जाईना.
तेवढ्यात दहा-पाच माणसांचा घोळका दिसला. आबड्या अन् हुसेन घोळक्यात अंग घुसवत शिरले. माकडं कुठून आली, कशी आली, यांचा मालक कोण, काहीच कळेना, तेवढ्यात एका माणसानं आबड्याचे पाच-सहा पापड विकत घेतले अन् माकडांकडं फेकले. माकडं चवताळली अन् उड्या मारत माणसांच्या मागं लागली, तशी माणसं भन्नाट पळत गेली. माकडं उड्या मारत गेली. कोणी घाबरलेलं, कोणी हसत सुटलेलं.
हुसेन म्हणाला, ‘‘माकडामुळं का होईना, तुझी भवानी झाली.’’ ‘अल्ला को चिंता’ म्हणत आबड्या पुन्हा गिऱ्हाइकाच्या शोधात फिरू लागला.
चौपाटीवर आलेली माणसं, गर्दी पाहून हुसेन थक्क झाला. ही गोरीगोमटी माणसं, मुलं, रंगी-बेरंगी भारी-भारी कपडे, इतकी देखणी, रूबाबदार माणसं त्यानं पाहिली नव्हती. गावात सगळी शिणलेली, थकलेली, राबून राकट झालेली माणसं, मारुतीपुढं पैसा टाकायचा म्हणलं तरी चार वेळा खिशात हात आत-बाहेर करतील. ह्या आबड्याच्या धंद्यात व्यत्यय नको म्हणून तो समुद्राकडं गेला. तो लाटांच्या जवळ आला, पायावर आदळलेल्या लाटा आणि लाटांच्या स्पर्शाने तो शहारून गेला.
तेवढ्यात आबड्यानं हाक मारली- ‘‘हुस्न्या, चलो, ओ लोग आ गये.’’
आबड्याच्या मागं-मागं हुसेन गेला. समुद्राच्या कडेला असलेल्या एका भिंतीच्या अडोशाला तीन-चार माणसं बसली होती. आबड्या त्यांच्यापासून पंधरा-वीस फूट अंतरावर बसला. समोर पापडाची टोपली.
बाटल्यांची झाकणं उघडली, काचेचा कनकनाट झाला. फेस उधळले, त्यातल्या एकानं ग्लासमधल्या फेसात बोटं घालून समुद्राच्या बाजूला तो फेस फेकला.
हुसेन पाहत होता – लाटांचा फेस आणि हा चिमूटभर फेस. पाच-दहा मिनिटात त्यांच्या गप्पा रंगात आल्या. मग त्यातला एकजण म्हणाला, ‘‘ये आबड्या, साला पापड लाव ना, उधर क्या पाणी देख रहा है? पहिली बार आया क्या समिंदरपें?’’
‘‘आया जी हुजूर’’, करत आबड्यानं टोपली उचलली. अन् ‘‘कितना चाहिए?’’ म्हणून विचारलं.
‘‘दे दे, पाच-छें दे.’’
आबड्या परत जागेवर येऊन बसला. हुसेन म्हणाला, ‘‘निघायचं का आता?’’
‘‘अरे, पैसे लेनेका है ना? ओ जब तक पिते है, तब तक ठहरने का, ओ एकदम पैसा देते, जरूरतसे जादा.’’
पार्टी रंगात आली. गप्पा, शिव्या, हमरीतुमरीवर येणे असं काही चाललं होतं. तेवढ्यात आणखी एक माणूस त्यांच्यात जमा झाला.
‘‘आवो, बॉस, आवो बॉस.’’
एकाने त्याच्या आवडीचा पेग भरला आणि त्याच्या हातात दिला, त्यानं आबड्याला हाक मारली, ‘‘ये डुचक्या, पापड लाना, समझता नहीं क्या?’’
‘‘हां साब, आया साब,’’ करत आबड्यानं दोन-तीन पापड त्यांच्यापुढं पसरलेल्या कागदावर ठेवले.
तो बॉस, आबड्याकडं रागानं पाहत म्हणाला, ‘‘क्यूबें, कल नहीं आया?’’ आणि त्यानं आबड्याचा शर्ट धरून जोरदार ढकलून दिलं.
आबड्या होलपडत होलपडत कसाबसा उभा राहिला! त्या बॉसनं त्याला पुन्हा एक गुद्दा मारला. तो ओरडला, ‘‘शामको इधर आनेका मालूम नहीं क्या?’’
इकडं हुसेनचे कानशिलं तापले. तो ताडकन् उठून त्या चौकडीच्या बाजूनं चालला. त्याच्या हाताच्या मुठ्या वळल्या होत्या. आबड्याच्या हे लक्षात आलं, तो भराभरा पुढे येऊन त्यानं हुसेनला अडवलं, ‘‘अरे हट, बाजूको हट’’ करत त्यानं हुसेनला ढकलत-ढकलत मागं नेलं.
‘‘हुसेन, ये लोग है ना मजा करते, ध्यान नहीं देनेका, जाते टाईम देख वो किता खुर्दा देते.’’
हुसेनला हे काही आवडलं नाही. तो आबड्याला सारखं ‘परत चल’ म्हणत होता आणि आबड्या ‘जरा रुक यार’ म्हणत होता.
थोड्या वेळानं ते सगळे लोक उठले. आबड्या उभा राहिला. ज्या बॉस म्हणणार्या माणसानं आबड्याकडं पाहिलं, खिशात हात घातला, मूठभर चिल्लर हातात आली, तेवढी आबड्याला दिली. ढेकर देत पुढे गेला.
आबड्याचा खिसा तेवढा नव्हता पण खालच्या, वरच्या बाजूच्या खिशात त्यानं ती नाणी कोंबली.
हुसेन चिडला होता. त्यानं आबड्याची गचांडी धरून विचारलं, ‘‘बोल, तू बोल आबड्या, तू असे पैसे कमावतो? अरे, मैं समझता, तू मुझसे भी जादा, साधा, भोळा माणूस आहे. पण तू यहॉं आके क्या गलत काम करता है?’’
आबड्या खाली मान घालून रडू लागला.
हुसेन म्हणाला, ‘‘आबड्या, मैं कलही गावको वापस जाऊँगा, अरे ये क्या शहर है? कल देखा एक गली, नरक जैसा लग रहा था, और आज ये तमाशा.’’
‘‘त्या हरामखोर माणसानं पैसे दिले ना, तो माज होता आणि तू घेतले ती लाचारी होती. इससे अच्छा अपने गावमें भूखा रहना अच्छा है.’’
‘‘हुसेन, तू कल गाव मत जाना, हात जोडता हूँ. मैं इधर क्या, चौपाटीपरभी नहीं आऊंगा, मुझे माफ कर, मैं लालचमें ऐसा बन गया. अल्ला की कसम, नहीं आऊंगा इधर पापड बेचने.’’
‘‘परत असं करू नको. बुढ्ढी म्हणाली होती, ज्याला पश्चात्ताप होतो आणि जो श्रद्धाळू आहे आणि जो चांगली प्रामाणिक, नेक काम करील, त्याच्या अंगावर तो पांघरूण घालील, तेव्हा तू विचार कर.’’
‘‘नहीं हुसेन, अल्ला जे माझ्या चुकांवर पांघरूण घालील त्या पांघरुणांवरही तू पांघरूण घाल.’’
‘‘अरे, मी इतका मोठा माणूस आहे का? तू म्हणाला होतास की, फार मोठी माणसं उदार आहेत. मी आशेनं आलो होतो की, मोठ्या माणसाच्या मदतीनं काही धंद्या-पाण्याचा ठेपा लागतो का, पण झालं उलटंच, अरे, ही तर मवाली माणसं. एखाद्या दिवशी तुझं मुटकुळं करून फेकून देतील समुद्रात.’’
आबड्याला पश्चात्ताप झाला होता. हुसेननं परतीचा रस्ता शोधला. आबड्या त्याच्या मागं काही न बोलता हळूहळू चालत राहिला. दोघांच्या वाटा वेगळ्या व्हायची वेळ आली, तेव्हा हुसेन म्हणाला, ‘‘अल्लाच्या मर्जीनं उद्याचा दिवस चांगला असेल.’’
हुसेनला बॅण्ड कंपनीत जायला उशीरच झाला. तो परत आला तेव्हा बॅण्ड कंपनीतले लोक त्याला विचारत होते, ‘‘अरे, आरके किदर गया था, हमारा खानाभी हो गया.’’ त्यातल्या एकानं राज कपूरचा फोटो आणला होता. हुसेनला म्हणाला, ‘‘अरे तुझ्यासाठी आणला, पण आरके, एक सांग, तुला राज कपूर का आवडतो? त्याचे तू किती व कोणते सिनिमे पाहिले?’’
‘‘आम्हाला खेड्यात कुठले सिनेमे पाहायला मिळणार, कधी सरकारतर्फे फुकट दाखवणारे येतात, ते असतात कुटुंब नियोजन किंवा इतर शिक्षण करणारे. पण तालुक्याच्या ठिकाणी यात्रेच्या टायमाला टुरिंग टाकी येते. तवा पाहिले. पैसे नसले तर पडद्याच्या तंबूतून आत घुसून, तर कधी उंच झाडावर बसून तवा त्या टुरिंगवाल्याने आठवडाभर राज कपूरचे सिनेमे दाखविले. अन् खरं सांगू का, तवापासनं लई मनात बसला हा नट. आमच्या गावातल्या लोकांनाभी तो लई पटला. कायम गरिबीतला अडाणी माणूस साध्या कपड्यातल्या, तरीबी हसवणारा, एक भोळा आदमी लगता है. हमाराच आदमी, हमारे जैसा.’’
‘‘अच्छा, तो राज कपूरका तू फॅन बन गया.’’
‘‘हां. इसलियेच.’’
दुसर्या दिवशी बॅण्ड कंपनीतल्या लोकांची प्रॅक्टिस चालली होती. त्यात कोणीतरी म्हणालं, ‘‘अरे, राज कपूरच्या सिनेमातलं गाणं घ्या. आरके हुसेन सगळ्यांना चहा पाजील.’’
‘‘डमडम डिगा, डिगा, मौसम भिगा, भिगा’’
बॅण्डच्या तालावर आरके ताल धरून नाचू लागला. गाणं झाल्यावर हुसेननं सगळ्यांना स्पेशल चहा पाजला.
बॅण्ड कंपनीतली माणसं चांगली होती. शिवाय दारू, गुटका अशा गोष्टीला मालकानं कडक बंदी घातली होती.
रात्री झोपताना मग वेगवेगळ्या गोष्टी होत. कधी कधी रागदारीवर. शिवरंजनी, मालकंस, आणखी काय काय, ते हुसेनच्या कानावर पडत होतं. ह्या गोष्टी त्याला काही समजत नव्हत्या, पण कान देऊन तो ऐकत होता.
सावत्या त्याला म्हणाला, ‘‘अरे मुंबई पाहिली की नाही?’’
‘नाही’ मानेनच हुसेननं सांगितलं.
‘‘तू असं कर, तुला उद्या मुंबई दर्शन गाडीत बसून देतो. अं, म्हणजी थोडं थोडं माहीत होईन.’’
‘‘माझ्याबरोबर माझा एक दोस्त घेतला तर चालल का?’’
‘‘अरे का नाही, तुलाही सोबत होईल. पण तुझा कोणता दोस्त?’’
‘‘आबड्या, माझा गाववाला, त्यानंच मला मुंबईत आणलं.’’
आबड्याला भेटून हुसेननं ‘मुंबई पहायला चल’ असं सांगितलं. पण आबड्या म्हणाला, ‘‘मी दरवर्षी येतो. पाहून घेतली मी मुंबई, शिवाय पापड विक्रीला खाडा, तुला तो माणूस दाखवतोच ना, जा त्याच्याबरोबर, फकस्त खिशाला सांभाळून रहा.’’
दुसऱ्या दिवशी मुंबई दर्शन गाडीतून हुसेन मुंबईत फिरला. सावत्याला म्हणाला, ‘‘लईच अचाट नगरी राव. माणसाचा पण समुद्रच.’’
देखण्या इमारती पाहून तो म्हणाला, ‘‘सावत्याजी, अगर ए नहीं देखता मैं, तो मेरी जिंदगी अधुरी रहती, ऐसा लग रहा है, जैसा फॉरेन है फॉरेन.’’
सावत्या म्हणाला, ‘‘अरे पुढच्या आठवड्यात दुसर्या गाडीनं ठरलेला भाग पाहू.’’
हुसेन मुंबईत फिरत होता. मंत्रालय, गेट वे ऑफ इंडिया, राणीची बाग, फोर्टमधल्या इमारती पाहून, त्याला आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटलं. आता फक्त एकच काम राहिलं होतं, ते म्हणजे सावत्या म्हणाला होता, ‘‘मी राज कपूरची भेट घालून देईल तेवढंच.’’
राज कपूरची भेट घेऊन गावाकडं जायचं त्यानं ठरवलं. सावत्याला तो म्हणाला, ‘‘मुंबई नगरी लई अचाट, पण इथं माझं मन नाही रमत.’’
- अरुण जाखडे
छायाचित्र : किशोर दिवाळी अंक २०१६

Comments
Post a Comment