बर्यावाईट गोष्टी पाहत हुसेन आता मुंबईत रमू लागला.
खरं म्हणजे बॅण्ड पथकात तो जास्तीच रमू लागला. आपल्याकडे अशी काही कला
नसल्याची खंत त्याला वाटत असे. बॅण्डची प्रॅक्टिस चालू असताना त्यांच्या
होणार्या चर्चा, वाद ऐकताना त्याला गंमत वाटू लागली.
मोकळा
वेळ असेल तेव्हा किंवा रात्री झोपताना त्याला घरची आठवण येत राही. एवढ्या
मोठ्या एकत्र परिवारात राहायची सवय अन् इथं एकदम एकलेपण आणि पोरकेपण. आपण
मुंबईला नशीब आजमायला जावू असं त्याला वाटत होतं. पण तसं काही घबाड
त्याच्या हातात लागत नव्हतं. सावत्या म्हणत होता, ‘‘महिना दोन महिन्यात
काही घडत नसतं. इथं आख्खी जिंदगी पणाला लावावी लागते. तेव्हा कुठं थोडंफार
हाताशी येतं.’’ बुढ्ढीची, मुन्नीची, बायकोची, भावांच्या पोरांची आठवण आली
की तो अबोल होईल, होमसिक झाल्यासारखं त्याला वाटे. आपण तर बुढ्ढीला मुंबई
पाहायला जातो एवढंच सांगितलं होतं. आता ते काम झालं की आपण परत गावाकडं
परतु असं त्यानं नक्की केलं.
हुसेनच्या
दृष्टीनं त्याच्यासाठी महत्त्वाचं काम राहिलं होतं, ते म्हणजे सावत्याच्या
वशिल्याने राज कपूरला भेटायचं. राज कपूरला भेटवतो असं आमिष दाखवून सावत्या
त्याचं अनेकवेळा ब्लॅकमेलिंग करी. सारखी किरकोळ किरकोळ कामं सांगे, ‘‘अरे
आरके, तो ड्रम इकडं ठेव, अरे आरके चहा सांगून ये. अरे आरके सगळे झोपल्यावर
लाईट बंद कर.’’ हुसेनला त्यानं अगदी हैराण केलं होतं. हुसेन त्याला नाराज
करत नसे. सावत्या त्याला एक दिवस राज कपूर दाखवणार होता, भेटवणार होता.
एके दिवशी तो सावत्याला म्हणाला, ‘‘सावतोजी शेठ हात जोडून प्रार्थना करतो, ते आपलं एक राहिलेलं काम कराना.’’
‘‘कोणतं काम?’’
‘‘तेच राज कपूरला तुम्ही मला भेटवणार होता, ना. तर तेच जरा लवकर होऊ द्या, मला चार दिवस गावाला जाऊन यावं वाटतंय, त्याच्या नंतर.’’
हुसेनला
माहीत होतं, आपण परत गावाला जाणार म्हणलं तर मालक आजच हाकलून देईन.
सावत्या सलगी करणार नाही. म्हणून त्यानं चार दिवसात परत येतो असंच सांगायचं
ठरविलं.
‘‘अच्छा, ह्या शनिवारी मला दोनशे रुपये दे, मी तुझं काम करतो.’’
हुसेन एकदम खूश झाला. बुढ्ढीनं, भावानं त्याला खर्चासाठी पैसे दिलेच होते. त्यातले दोनशे त्याच्या हातावर टेकवले.
आता
शनिवार यायला तीन दिवस होते. एकेक दिवस त्याला मोठ्ठा वाटू लागला.
बॅण्डमधले सगळे विचारू लागले, ‘‘अरे आरके, आजकल तू बहुत खूश रहता है रे?’’
हुसेननं
खुशीचं कारण काही सांगितलं नाही. पण खुशीत येऊन तो कधी बैसूर फ्ल्युट
वाजवू लागला. कधी कणसं बडवल्यासारखा ड्रम बडवू लागला. कधी तो सगळ्यांना चहा
पाजू लागला.
शनिवार उजाडला. सावत्या म्हणाला, ‘‘आता दुपारी जायचं बघ आपल्याला. राज कपूर दाखवतो तुला.’’
हुसेनला
एका सिनेमा थिएटरमध्ये तो घेऊन गेला. हुसेनला काही कळेना की इथं कसा काय
दिसणार? थिएटर फुल झालं. अंधार झाला. सावत्या म्हणाला, ‘‘तो पुढं पांढरा
पडदा आहे ना, त्याच्यावर नजर ठेव.’’
सिनेमा
सुरू झाला. अर्ध्या-एक तासानं राज कपूरची एन्ट्री झाली. त्यानं हुसेनला
सांगितलं, ‘‘बघ, तो जोकर दिसतोय ना, तोच राज कपूर.’’ हुसेन कौतुकानं पाहत
होता. नंतर बर्या कपड्यात राज कपूर दिसल्यावर त्यानं तर उभं राहूनच नमस्ते
केला.
सावत्यानं त्याचा शर्ट ओढला. खाली
बसवलं. हुसेनला वाटलं, हा खेळ झाला की, राज कपूर पब्लिकच्या सामने येणार
नक्की. पण सिनेमा सुटला, लोक बाहेर पडले. त्यानं सावत्याला विचारलं, ‘‘राज
कपूर दाखवणार होता ना?’’
‘‘अरे, आरके, इतक्या वेळ पडद्यावर कुणाला पाहिलं, तोच राज कपूर, चल झालं तुझं काम.’’
बॅण्ड
कंपनीत चंदुमिया बागवान नावाचा कलाकार होता. हुसेन अबोल झाला होता आणि
चेहराही पडलेला. चंदुमियानं विचारलं, ‘‘क्यो आरके, तबीयत बराबर नहीं
क्या?’’
राज कपूर दावण्याचे सांगून सावत्यानं हराण दावलं. ‘‘फक्त राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ सिनेमा दावला. उसने वादा नही निभाया.’’
चांदमिया
हसत म्हणाला, ‘‘अरे ओ बहुत छपरी आदमी है, तुझे राज कपूर देखनेका होगा, तो
तू चेंबूरमें आरके स्टुडिओ है, उदर अंदर नहीं आने देंगे. लेकिन गेटपर खडा
रहा, कभी किस्मतसे आते-जाता नजर आया तो तू देख.’’
दोन
दिवस चेंबूरला कसं जायचं, याचा त्यानं अभ्यास केला. आबड्याला हुकूमच केला,
की ‘‘चल मेरे साथ, चेंबूरमें जानेका है.’’ आबड्या नाही म्हणत होता, ‘‘अरे ओ
कितना बडा आदमी आपूनको हकाल देंगे.’’ पण हुसेनला जायचंय होतं. तो म्हणाला,
‘‘आबड्या, चल अपनी तकदीर अजमाके देखेंगे.’’
सकाळीच
आरके स्टुडिओच्या गेटवर ते थांबले. समोर रस्ता वाहत होता. मधूनच एखादी
गाडी स्टुडिओत जाताना दिसे. अर्धा तास गेला अन् पाच-पंचवीस माणसांच्या
घोळका आत जाताना दिसला. वाचमन त्यांना काहीतरी विचारून आत सोडत होता. रांग
संपत आली. हुसेन आबड्याला घेऊन रांगेतून घुसू लागला. वाचमननं विचारलं,
‘‘क्या रे?’’
हुसेननं पुढं जाणार्या
माणसांकडं हात दाखवत खुणेनंच सांगितलं. आम्ही त्यांच्याबरोबरच आलोय.
वाचमननं ‘जल्दी चलो’ करत त्या दोघांना आत ढकललं. आता हुसेननं अर्धी लढाई
जिंकली होती. आत गेल्यावर मात्र ते गोंधळात पडले. कारण ते मजूर होते अन् आत
सेट वगैरे बनवण्याच्या कामासाठी होते.
इकडं-तिकडं न्याहाळत असताना एका वाचमनने त्याला ढकललं अन् ओरडला, ‘‘चल बाजू हट, साहब आ रहें है.’’
हुसेननं
पाहिलं, गाडीत राज कपूरच आहे. तो गाडीचा पाठलाग करत पळत राहिला,
त्याच्यामागं वाचमन, ‘‘अरे, ठहर, ठहर.’’ पण हुसेन कसलं ऐकतोय. आबड्या
जागेवरच उभा. तो हुसेनला हाका मारत होता. ‘‘हुसेन वापस आ, वापस फिर.’’
गाडी
आत गेल्यावर गाडीला फारसा वेग नव्हता. शेवटी गाडी थांबली. मागच्या सीटवर
एक देखणा माणूस दिसला. ड्रायव्हर गाडीचं दार उघडत असताना त्याला राज कपूरचा
लालबुंद चेहरा दिसला. सगळ्यांकडं पाहत राज कपूर फक्त हसत होते.
ते
हसणं पाहून हुसेन गलबलून गेला. त्यानं राज कपूरला सॅल्युट केला. राज कपूर
स्टाईलमध्येच. अन् लगेच साष्टांग दंडवत घालत पाय धरले. तोपर्यंत सिक्युरिटी
फौज गोळा झाली. हुसेनला बाजूला ओढलं.
राज कपूर त्याच्याकडं पाहत हसतच होते.
राज कपूरने विचारलं, ‘‘कौन आदमी?’’
सिक्युरिटीला काही सांगता येईना.
हुसेन
म्हणाला, ‘‘मैं एक गरीब गवॉंर आदमी हूँ, नगर जिल्हा है ना उस जिलेमें
कर्जत तालुकेमें मेरा गाव है, मेरे लिए तुम भगवान हो. तुमको देखके मेरा
सपना पुरा हो गया.’’ राज कपूरने त्याच्या खांद्यावर हात ठेवले, अन् पुढे
निघून गेले. जाताना सिक्युरिटीला ‘छोड दे’ सांगून पुढं गेले.
सिक्युरिटीच्या
लोकांनी ‘चल हट’ करून हुसन्याला हाकललं. ज्या खांद्यावर राज कपूरने हात
ठेवला होता, त्या खांद्याचा त्यानं मुका घेतला. सिक्युरिटीच्या एका माणसानं
हुसेनच्या पृष्ठभागावर दंडा मारला. पण त्याचं दु:ख त्याला नव्हतं, तो
गेटकडं भराभरा चालत आला. गेट वाचमनने अडवलं, ‘‘अरे कौन तू? बाहर जानेका
गेटपास है क्या?’’ हुसेननं सगळी कहाणी सांगितली. गेटवरच्या त्या धिप्पाड
पठाणानं त्याचं थोबाड लाल केलं. हुसेन खाली कोलमडलाच अन् सगळं आवसान एकवटून
बाहेर पळाला. तोपर्यंत आबड्याच्या पिंढरीवरही दंडा बसला. लंगडत लंगडत तोही
बाहेर आला, बाहेर ते थोडावेळ कुठंतरी बसू, म्हणून बसस्टॉपच्या बाकड्यावर
बसले.
हुसेन आबड्याच्या गळ्यात हात घालत म्हणाला, ‘‘आबड्या माझ्यामुळं तुला मार मिळाला. पण लक्षात ठेव आज मैं ‘हाजी’ हो गया.’’
आबड्याला ‘हाजी’ म्हणजे काही कळलं नाही.
‘‘अरे
‘हाजी’ याने मक्का मदिनेका यात्रेकरू, लेकिन जो पाक दिलके है और जिनकी
नियत अच्छी रहती है, उन्होंने यात्रा नही की तो उनको सभ्यताकी कायदेसे
‘हाजी’ कहते आहे.’’
आबड्याच्या हे सगळं
डोक्यावरून गेलं. हुसेन वडिलांबरोबर लहानपणी मशिदीत जात असे. शिवाय त्याची
बुढ्ढी धार्मिक वृत्तीची असल्याने ती कधी कधी मुलांना कुराण समजून सांगत
असे.
आबड्या म्हणाला, ‘‘मै भी ‘हाजी’ हो गया?’’
‘‘हॉं’’ हुसेन.
‘‘चल, अबे पेटपाणी का धंदापाणीका देखेंगे.’’
दोघे आपआपल्या ठेप्यावर गेले.
हुसेनचं
स्वप्न आज पूर्ण झालं होतं. बॅण्ड कंपनीत त्यानं ही स्टोरी तिखटमीठ लावून
सांगितली. सगळ्यांना त्याच्या जिद्दीचं कौतुक वाटलं, झोपताना त्याला हसणारा
राज कपूर दिसत होता. त्याला आतून गुदगुल्या होत होत्या.
- अरुण जाखडे
छायाचित्र : किशोर दिवाळी अंक २०१६

Comments
Post a Comment