शेवटी एक दिवस भर दुपारी धाडस करून हुसेनभाई भगताच्या घरी गेला. हुसेनला पाहताच भगत खूश झाला. म्हणाला, ‘‘बरं वाटतंय ना आता हुसेनचाचा?’’
‘‘बरं, म्हंजी पार पहिल्यावाणी दुरुस्त झालो.’’
भगत खुलला, म्हणाला, ‘‘वो हरामखोरने तुझे पकडा था ना, उसे ऐसा पिटाया, साला भाग गया.’’ अन् भगत खांदे उडवत हसत होता.
‘‘अब क्यूँ आया बोल?’’ भगतनं विचारलं,
‘‘कुछ नही. आपलं दर्सान घ्यावं, पाया पडून आभार मानावं म्हणून आलो होतो.’’ हुसेननं भगताचे पाय धरले. भगत त्याच्या पाठीवर हात मारत उठवत म्हणाला, ‘‘हुसेन, घाबरू नको. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तुझ्या केसाला धक्का लागणार नाही. काही शंका आली की कधीही ये, सांग, मोकळेपणानं सांग.’’
मग हळूच हुसेनभाई म्हणाला, ‘‘तेच सांगायला आलो होतो.’’
‘‘अरे, उसमें क्या, बतावो, काय सांगायचं ते सगळं सांग.’’
हुसेन मांडी घालून बसला. डोळे मिटले. बराच वेळ तो काहीच बोलला नाही. नुसतीच शांतता, मग डोळे उघडत तो म्हणाला- ‘‘भगत महाराज, त्या दिवसी तो लाग्या तुमच्या भीतीनं पळून गेला. पण दुसर्या दिवसापासून तो माझ्या स्वप्नात रोज येतोय. अन् काय तरी बोलतो.’’
‘‘काय बोलतो तो हरामखोर?’’– भगत.
‘‘पहिल्यांदा काय समजत नव्हतं. इंग्रजीत बोलत व्हता. त्याला म्हणलं, मी अडाणी माणूस, मला काय असलं अवघाड बोललं तर समजत नाय.’’
मग म्हणाला, ‘‘बरं हिंदीत बोलतो’’, मी म्हटलं, ‘‘बोलो, हिंदी भी अच्छी नहीं समजती, लेकीन थोडाफार समजती तो बोलो–’’
‘‘मग काय बोलला तो?’’ भगत्यानं विचारलं.
‘‘हा म्हणाला – मी बंगाली माणूस. त्या दिवशी माळावर मी तुला पकडला. तुला धरून सगळ्याला हैराण करणार होतो. पण तो भगत्या, उसे क्यूँ बुलाया तुमने? वो मुझे जरा जड गया. साले ने मुझे मारा. मुझे जाना पडा.’’
‘‘हं हं हं, सही बात,’’ भगत मधीच बोलला. ‘‘अच्छा आगे बता’’–
‘‘तो वो बोला, अब मैं तुम्हें तकलीप नही दूँगा, वो भगत को दूँगा. भगत्याला अशी अद्दल घडवतो की त्यानं हा धंदा पुन्हा केला नाय पायजे.’’
‘‘ऐसा क्याऽऽ’’ – भगत्या.
‘‘हां, ओ बोला, मैं बंगाली, हमारी बंगाली जादू उसको मालूम नहीं. मेरे सब बंगाली दोस्त लेके आऊँगा. उसको छोडूंगा नहीं. मैं भगत्या को कुत्ता बनाऊंगा, उसको बिल्ली बनाऊंगा, उसको बंदर बनाऊंगा, उसकी बिबी को, बच्चों को तकलीप दूँगा.’’
‘‘ऐसा क्या – अच्छा, तो तुने क्या कहॉं?’’
‘‘मैने कहा, भगत अच्छा आदमी है. तू उसको ऐसा कुत्ता वगैरे मत बनावो. मैं तुम्हारें पैर पकडता हूँ ।’’
‘‘तो वो बोला, ठीकय, मुझे वचन दे, भगत अब से ये जादू टोणा, करणी, भूत, कुठ नहीं करेगा ऐसा वचन दिया.’’
‘‘तुने उसे ऐसा क्यूँ बताया? मुझे तो पूछना था ना पहले?’’
‘‘क्या पूछने का भगतभाई, वो बोल रहा था, वो भगत के पास कुछ पावर नहीं. ओ झूठा आदमी है. तुम अब मेरा काम देखो, भगत को कैसा उल्टा-पाल्टा करताय. तो मैं घबरा गया, भगत, तू अब एक काम कर, तू छोड देना ये धंदा. वो बंगाली भूत मुझे बहुत डेंजर लग रहा है.’’
अरे चिंता मत करो हुसेनभाई. बंगाली भूतकी क्या बात करता हैं. ओ कालीमाता देख, मेरे देवघरमे, उसने मुझे ये पुरी विद्या दी है.
हुसेनभाईनं पाहिलं, आत जीभ बाहेर काढलेली एक उग्र मूर्ती होती. तिच्या शेजारी कवटी, हाडाच्या नळ्या असं बरंच काही.
आता ते बघा भगतभाऊ तुमचं काय असतं ते. पण गावातल्या माणसाला त्यानं तरास दिला नाय पायजे. अन् दिला तर त्याचा बंदोबस्त तुमी केला पायजेन. गावातल्या लोकांचा लई इश्वासयना तुमच्यावर.
अरे येऊ दे त्याला वेशीच्या आत कसा इंगा दाखवतो माझा बघ साला बंगाली का फिंगाली, असं म्हणत भगत्याने आपला स्वत:चा चेहरा क्रूर केला. हाताच्या मूठी आवळत तो ती मूठ बाहेर फेकू लागला. आने दो ऊस हराम जादेको – भगताचे अंग थरथरत होते.
‘देखो भगत संभालो अपनेको और अपने गावको. मुझे वो बहुत डेंजर लग रहा है. पहाटेच्या टायमाला सपनात येतय. एक दिवस आलं, दोन दिवस आलं, तुझ्या नावानं शिव्या देतय, इचकट-विचकट बोलतय तवा मलाच लई वंगाळ वाटलं. म्हणलं, तुमच्या कानावर घालाव म्हणजे ते मला धरणार नाय.’ हुसेननं डोळे पुसायला सुरुवात केली.
रो मत हुसेन, मैने उस दिन उसकी औलाद दैखी थी. फिर उसने तुझे छोडा, क्यूँ छोडा? घबरा गया न मुझे. अब वापस आने तो दो, मेरे शक्तीका, विद्या का चमत्कार देखो.
संभाल को देखो, म्हणत हुसेनभाई उठला. भगत्याचे पाय धरले. वाहवाहवाव वाहवाव ऐंर्हींवली असले काही तरी मंत्र म्हणत त्याने हुसेनभाईच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिले. हुसेनभाईच्या कपाळावर अंगारा फासला.
हुसेनभाई घराबाहेर पडल्यावर भगत्या आतून थोडा घाबरल्यासारखा झाला. हुसेनभाईनं त्याच्यासमोर नवं आव्हानं उभं केलं, त्यानं नाही म्हटलं तरी तो बराच वेळ आभाळाकडं शून्य नजर लावून बसला.
हुसेनभाई भगत्याच्या घरातून बाहेर पडला. तो थेट माणक्याच्या घरी गेला.
माणिक गोणपाटाची फाटलेली, उसवलेली पोती दाभणानं जोडत बसला होता. हुसेनला पाहून त्यानं हातातलं दाभण ज्वारीच्या पोत्यात खसकन् रोवलं, तंबाखूचा बार फेकून, तोंड मोकळं करत म्हणाला, ‘‘हुसेन, काय दुपारी दुपारीच आला?’’ हुसेनला बस म्हणताना त्यानं तंबाखूची पुडी हुसेनच्या हातावर ठेवली.
हुसेन अधून-मधून तंबाखू खाणारा. खिशात त्याच्या पुडी नसते. आज तो जरा मूडमध्ये आला होता. त्याला माणिकला काहीतरी महत्त्वाचं आणि मुद्द्याचं सांगायचं होतं.
फाटक्या पोत्याच्या पसार्यातल्या एका पोत्यावर तो अंग सैल सोडून बसला. तंबाखू मळायला घेतली, अन् डोळे बारीक करत म्हणाला, ‘‘माणक्या, भगत्याकडं जाऊन आलो. त्याला जरा इंजेक्शन देऊन आलोय. आता पुढलं काम आपल्याला करायचंय.’’
हुसेनभाईनं माणिकला भगत्याच्या घरी जाऊन भगत्याला काय काय सांगितलं, ते सगळं डिटेलमध्ये सांगितलं.
‘‘च्यायला, कमालच केली राव हुस्न्या तू. वाटलंच, तुझी कला त्याला तू दाखवशीलच. पण आता पुढं कोणती तुझी कला दाखवणारेस?’’
‘‘तेच सांगतो माणक्या, आता तू बंगाली लाग्या लागल्याचं नाटक कर. आता ह्या शनवारच्याला अमोशा हैच. तर तू दिवस मावळला की, घुमायचं नाटक कर. जरा धिंगाना कर. त्या दिवशी भगत्याला बोलवायचं नाय. पण अमोशाच्या पुढं, रोज सांजच्याला लई बडबड करत बस. अंगाला मारून घेत रहा. विहिरीत उडी मार. आसं दोन-चार दिवस झालं की गावात हंगामा होईल. मग मी भगत्याकडं जाऊन त्याला घेऊन येईन. पहिल्या दिवशी तू त्याला घाबरल्याचं नाटक कर. तो आला की, त्याला घाबरल्यावानी कर. घरापुढच्या ह्या पिंपळाच्या झाडावर चढून बस. आमी तुला खाली ये म्हणू. गावातल्या लोकांना, मला वरून सांग, त्या भगत्याची मला भीती वाटते. तो गेल्याशिवाय मी खाली येणार नाय.’’
माणक्याचा चेहरा खुलला, म्हणला, ‘‘पुढं काय करायचं?’’
‘‘तेच सांगतो माणिक, मग आमी भगत्याला बाता मारून चढून देऊ. फुग्यात हवा भरल्यावाणी त्याला फुगवू. ते बेणं लई फुगीरय. ते फुगिरीत बाता मारायला लागतं. मग दोन-तीन दिवस झालं की, तू त्याच्यासमोर बस. ते चपला बडवायला लागलं की तू बंगाली, हिंदी, इंग्रजीत बोल. अन् म्हण, भगत्या, मी बंगाली लाग्या तुला घाबरत नाय म्हण. त्याला त्याच चपलीनं बडवायला सुरवात कर.’’
‘‘पण मला कुठं, बंगाली, इंग्रजी येतंय?’’
‘‘अरे काय बी कुणाला समजणार नाय, अशी बडबड कर.’’
माणिकला हुसेनच्या बुद्धीचं, कल्पकतेचं कौतुक वाटलं. म्हणाला, ‘‘आता मला आयडिया समजली. बघतो पुढं काय करायचं ते. आता मात्र आपण ही गोष्ट आपल्यातच ठेवायची. गावात काय, घरातसुद्धा बोलायचं नाय.’’ दोन-चार दिवस गेले. शनिवार आला. अमावस्या होती. दिवेलागण व्हायची वेळ अन् माणक्यानं धिंगाना सुरू केला. घरातलं हंड्यात भरलेलं पाणी अंगावर ओतून घेतलं. दरवाजे खडाखड आपटत तो काहीतरी न समजणारे शब्द उच्चारत राहिला. ठरल्याप्रमाणे हुसेन तिथं होताच. हुसेन त्याच्या घरच्यांना म्हणला, ‘‘ह्यो बंगाली कवा शिकला? तुमाला माहीत नाय तो जे बोलतोय ना, ते बंगाली भाषाय. म्हंजी कलकत्त्याकडची.’’
दोन दिवस संध्याकाळ झाली की माणिकने गोंधळ घातला, सगळ्या गावात बातमी पसरली. हुसेननं ही गोष्ट सगळ्यांना समजेल याची काळजी घेतली. जो भेटेल त्याला तो सांगत असे – ‘‘माणिक को बंगाली आदमीने पकडा हैै, माणिक को बहुत तकलीप हो रही है ।’’
शेवटी गावातल्या रीती-रिवाजाप्रमाणे माणिकच्या घरच्यांना, भावाला लोकांनी सांगितलं, त्या भगत्याचा काय गुण येतोय का ते बघा बरं. चार-दोन माणसं भगत्याला आणायला गेली. भगत्या काही यायला तयार होईना. एकतर माणिकला त्याची ही सोंगं आवडत नव्हती. माणिक तर भगत्याला पाण्यातच पाहत होता. अन् दुसरं म्हणजे हुसेन म्हणाला, तसं खरोखरंच बंगाली झाड आसन तर आपल्याला काय ते रेटणारय का?
इथल्या लोकांना बनवण्यात इतकी वर्षे त्यानं घालवली पण त्या दिवशी तो मनातून थोडा चरकलाच. शेवटी हो ना, हो ना करता-करता तो माणिकच्या घरी गेला. हुसेन तिथं बसलाच होता. भगत्याला पाहिल्याबरोबर हुसेन पळतच त्याच्याकडं गेला. भगत्याचे पाय घट्ट धरत म्हणाला, ‘‘भगत महाराज, शेवटाला सपनात आलं ती खरं दिसतंय. आता तुमचाच आधार. करा बंदोबस्त त्याचा अन् माणिकला नीट करा.’’
– ‘‘करतो, करतो’’ म्हणत भगत्यानं माणिककडं जाऊन त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केल्याबरोबर माणिकनं जोरात हात आसडला. भगत्या पार खाली पडून उलथा-पालथा झाला. स्वत:ला सांभाळत भगत्या उठला, माणिककडं बघत म्हणाला, ‘‘कोणयंस तू? कशासाठी तू आलास, माणिकला का त्रास देतो?’’
माणिक काहीतरी कोणालाच समजणार नाहीत असे शब्द बरळत राहिला.
हुसेन म्हणाला, ‘‘अरं माणक्या बंगाली कवा शिकला? तवाच म्हणलं मी काय तरी वायलचय बघ!’’
भगत्याला पाहून माणिक नाचू लागला. भावाला म्हणाला, ‘‘कोण ह्यो भगत्या, ये पुढं. मी ह्या माणक्याला सोडणार नाय?’’
भगत्यानं त्याला विचारलं, ‘‘का नाय सोडणार? तू जा आता परत. तुला काय पायजेन ते सगळं देतो, पण जा.’’
तसं माणिक भगत्याकडं गुरगुरत पाहत म्हणाला, ‘‘मला सिग्रेट पायजे, रसगुल्ला पायजे.’’
भगत्यानं लोकांकडं पाहत विचारलं, ‘‘आहे का कोणाकडं सिगारेट?’’ कोणीतरी पुढे येऊन खिशातलं पाकिट दिलं. भगत्यानं त्याच्या हातात सिगारेट दिली.
माणिक बकाबका धूर सोडू लागला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, कधी बिडी न पिणारा माणूस आता सिगारेट ओढतोय म्हंजे काय? रसगुल्ले त्या गावात कोठे मिळणार?
शेवटी भगत्या म्हणाला, ‘‘उद्या रसगुल्ले आणतो. ते खा अन् जा.’’
माणिक मोठमोठ्यानं हसत सुटला.
दोन-चार दिवस भगत्या आणि माणिक यांचा शो रंगत होता. भगत्या गावातल्या लोकांना पटवत होता, बघा कसा घाबरतोय तो. मला बघितलं की घडाघडा बोलतंय. त्याचा अतृप्त आत्मा त्याला जे पाहिले ते मागतंय. ते आपण देऊ. म्हणजे ते निघून जाईल.
हुसेन रोज दुपारी माणिकच्या तब्येतीची विचारपूस करायच्या बहाण्यानं त्याच्या घरी जायचा. आज संध्याकाळी कोणता तमाशा करायचा ते दोघंजण ठरवत असत.
असे दोन-तीन दिवस गेले. तालुक्याच्या ठिकाणाहून रसगुल्ले आणि इतर बंगाली मिठाई आणली. भगत्यानं ती डिश माणिकच्या पुढं ठेवली की माणिक अधाशासारखा खात सुटायचा. अरे बास, आरे बास म्हणलं तरी थांबत नव्हता.
चार-पाच दिवस माणिक मागेल ते देऊन त्याच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न भगत्यानं केला. पण माणिक काही शांत होत नव्हता. एक दिवस तर माणिकनं भलताच गोंधळ घातला. तो प्रत्येकाच्या अंगावर धाऊन जाऊ लागला, भगत्यालाही त्यानं मागं ढकलून पाडलं होतं. त्याला धरून आवरायचं नाटक करत होता. पण माणिक बेफान सुटायचा. एक दिवस तर त्यानं पाणी प्यायला मागितलं. ग्लासभर पाणी तोंडात ढकलताना तोंडाचा चंबू करून तो गाल फुगवत राहिला अन् एकदम भगत्याच्या तोंडावर पिचकारी मारत राहिला. हुसेन अन् काही लोक ओढण्याचा नाटकी प्रयत्न करायचा पण माणिकचा अवतार भयानक असायचा. बंगाली बाबूचा तो रोल जोरात करत होता.
शेवटी एकजण वैतागून भगत्याला म्हणाला, ‘‘ये भगत्या, ते बंगाली तुझ्या थोबाडावर थुकतंय तरी तुला काय त्याला गप करता येत नाय. तू कसला भगत? जमतंय का नाय तुला? नायतर दुसर्या गावातला माणूस बघायला.’’
आता भगत्याची कसोटी लागायची वेळ आली होती. त्यानं चप्पल काढली अन् माणिकच्या पायाजवळ आपटत म्हणाला, ‘‘आता तरी तू जातो का नाय? का दाखवू चपलेचा हिसका.’’ त्यानं चप्पल पुन्हा माणिकच्या पायाजवळ जमिनीवर आपटली. ती चप्पल तुटली. त्यानं दुसर्याच्या पायातली घेतली, तसा ‘माणिक, थांब, भगत्या मारू नको, मी जातो परत’ म्हणू लागला.
लोकांकडं पाहत भगत्या म्हणाला, ‘‘बघितलं का आता कसा घाबरतोय, लाथों के भूत बातोंसे नहीं मानते’’ म्हणत त्याने माणक्याच्या अंगावर चप्पल उगारली, तेवढ्यात माणक्या सटकला आणि पिंपळाच्या झाडावर चढून वर फांदीवर बसला.
भगत्या जोरजोरात हसत लोकांना म्हणाला, ‘‘बघितलं ना, हा हरामखोर पिंपळाच्याच झाडावर जाऊन बसणार, येऊ द्या आता खाली.’’
खाली भगत्या अन् गावातली सगळी मंडळी वर माणिकडं पाहत होती. तो खाली कधी येतोय, त्याची वाट पाहत होती. रात्रीचा एक वाजला तरी तो खाली येईना, वरून तो भगत्याला शिव्या देत होता. अधून-मधून देव-देवतांना हिणवत होता. लोकांना वाटत होतं, भगत्याला आता ते घाबरतंय. हुसेननं भगत्याची स्तुती सुरू केली. त्यानं भगत्या भलताच खुलला.
शेवटी हुसेन म्हणाला, ‘‘भगत महाराज, तुमको घाबरके वो निचे नहीं आ रहा, अब ऐसा करो, तुम उपर जावो. उसको पकडो.’’
– भगत्या गप बसला. त्याची हिम्मत होत नव्हती. पण सगळ्यांनीच हुसेनचा मुद्दा लावून धरला. भगत्याची परीक्षाच सुरू झाली. शेवटी धाडस करून भगत्याला लोकांनी तयार केलं. लोक म्हणाले, ‘‘तुम्ही वर जावा, आम्ही खालून दुसरा माणूस चपला-काठी घेऊन पाठवतो.’’
भगत्या वर चढू लागला. खोड मोठ्ठं होतं. त्याच्या हाताच्या कवळीत बसेना तेव्हा लोकांनी खालून टेकू देऊन वर चढवला. भगत वर जाऊ लागला, तसतसा माणिक आणखी वर उंच जाऊ लागला.
खालून हुसेन ओरडू लागला, ‘‘देखो देखो, वो भूत घबरा रहा है भगत तुझे, ओ उपर जा रहा है तुझे घबराके.’’
भगत्याला भलतंच प्रोत्साहन दिलं गेलं. पिंपळाचं झाड पन्नास वर्षांचं जुनं असावं. फांद्यांचा भलताच पसारा. माणिक एका फांदीवरून दुसर्या फांदीवर चपळाईनं जायचा. भगत्याचं अंग एवढं लवचिक नव्हतं पण तोही प्रयत्न करू लागला. माणिकला पकडण्याच्या नादात भगत बराच वर गेला होता. एका फांदीवर माणिक थांबला. भगत त्याला ‘हरामजादे, कुठं पळतोस’ म्हणत त्याच्या कंबरेला बांधून वर नेलेल्या चपलेने मारू लागला. माणिकनं एक-दोन चपला खाल्ल्या, ‘अरे छोड दो मुझे, मैं निकल जाता हूँ. बस एक बर्कली सिगारेट दे’ म्हणत होता. भूत घाबरल्याचं पाहून भगत्याला जोर आला. त्यानं माणिकवर पुन्हा हात उगारल्याबरोबर माणिकनं त्याला वर बडवायला सुरुवात केली. भगत्याचा फांदीला पकडलेला हात सुटला. माणिकने त्याला लाथानं ढकललं. इतक्या उंचीवरून पंचवीस-तीस फुटावरून भगत्या खाली पडला. धाडकन् आवाज आला.
भगत्या आता मेलाच असं समजून सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. त्याच्या बायकोला, पोरांना बोलावलं. माणिकही खाली उतरला. भगत्याच्या शरीराचं मुटकुळं करून त्याला चादरीत घातला. चादरीची ती झोळी, चार-पाच जणांनी बैलगाडीत ठेवली. रात्री त्याला तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेलं.
माणिक अन् हुसेन यांनी एकमेकाला घट्ट मिठ्ठी मारली. एकमेकांच्या हातावर टाळी देत माणिक म्हणाला, ‘‘बिना औषधाची खरुज गेली.’’
चार दिवसांनी पेपरात बातमी आली.
‘भूत उतरवण्याच्या नादात मांत्रिक मरणोन्मुख’
पोलीस आले, पंचनामे झाले, अंधश्रद्धा निर्मूलनवाले आले. पेपरवाले आले, दोन दिवस गावात नुसता कल्ला चालला होता. सहा महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर भगत्या घरी आला. आता त्याला चालता येत नव्हतं. एक पाय पूर्ण निकामी तर दुसर्या पायात लोखंडाच्या पट्ट्या.
हुसेन भगत्याच्या घरी भेटायला गेला. मुद्दामहून गेला. भगत्याला तो म्हणाला, ‘‘अरे भगत, मैंने कहा था ना वो बंगाली भूत बहोत डेंजर दिखता है. मैंने कहा था ना की तू छोड दे ये धंदा. तुने सुना नहीं. अब बंद करो ऐसा बुरा काम.’’
भगत्याला बोलता येत नव्हतं. हात जोडून तो हुसेनला म्हणाला, ‘‘अब तो बंद करनाही पडेगा. अच्छा होता अगर मैं मर जाता, ये अब खाट पें पडकर मौत की राह देखता हूँ।’’
पारावर माणसं बोलत होती– ‘‘आता हुसेनला एकरभर गायरानातली जमीन बक्षिसी म्हणून दिली पाहिजे.’’
पण हुसेन म्हणाला, ‘‘नको, नको, मलाच काय त्या माणक्यानंसुद्धा करामत केली. माणिकराव तुमचा जय होऽऽ’’
माणसं ओरडली, ‘‘माणक्या, हुस्न्या जय होऽऽ’’
– अरुण जाखडे
Comments
Post a Comment