Skip to main content

हुसेनभाई आणि नाग

    असेच चार-पाच दिवस गेले. हुसेनला आता बरं वाटू लागलं होतं. घरात त्याला करमेनासं झालं. त्यानं विचार केला- आता बाहेर तर पडावंच लागेल, थोडी कंबर बांधलीच पाहिजेच. त्यानं ठरवलं, आज संध्याकाळी साडेचार-पाचच्या दरम्यान नेहमीप्रमाणे गावात चक्कर मारू आणि पारावर बसायला जाऊ. माणसं भेटतील, मुलं भेटतील, त्या दिवशी  आपल्याला नेमकं काय झालं होतं, हे तर ते विचारतीलच, ह्या कल्पनेनं तो थोडा अस्वस्थ झाला, पण कधीतरी ह्या प्रश्‍नाला सामोरं जावं लागणारंच आहे.
दुपारी पाचच्या दरम्यान गावात एक फेरी मारून तो पारावर येऊन बसला. जिकडं-तिकडं सामसूम होती. त्याला रस्त्यात कोणी भेटलं नाही. पारावरही कोणी नव्हतं. त्यानं विचार केला, इथंच बसून राहू. थोड्या वेळात शाळा सुटेल. मुलांचा गलबला सुरू होईल. रानातनं माणसं येतील.
तो अजूनही ताणातच होता अन् चेहरा अपराध भावाने निस्तेज झालेला. हताश मनानं त्यानं समोर पाहिलं, मारुतीचं देऊळ, शाळा, सगळं जिथल्या तिथं शांत आहे. त्या शांततेने त्याला आणखी उदास वाटू लागतं.
    इकडे वर्गात बसलेल्या कुणीतरी मुलांनी खिडकीतून पाहिलं, समोर पारावर हुसेनचाचा बसलेला आहे. मग एकानं दुसर्‍याला करत करत सगळ्या वर्गात बातमी पोचली. हळू आवाजात, खाणा-खुणांनी मुलांनी ही बातमी पसरवली. ते हुसेनचाचाची इतके दिवस वाटच पाहत होते.
हुसेनचाचा तेथून जाण्यापूर्वीच  त्याला भेटायला पाहिजे अन् शाळा सुटायला तर अजून वीस मिनिटं आहेत. ह्या वीस मिनिटांचा एकच मिनिट व्हावा अन् धूम बाहेर पळत जाऊन हुसेनचाचाला गाठावं असंच त्यांना वाटत होतं. अशीच गोष्ट शेजारच्याही वर्गात झाली. ज्यांना खिडकीतून हुसेनचाचा दिसत होता, त्या वर्गात सगळीकडे मुलांत चुळबुळ सुरू झाली.
बाईंच्या लक्षात आलं, मुलं काहीतरी चुळबुळ करत आहेत. त्यांचं आपल्या शिकवण्याकडं लक्ष नाही. त्या आवाज चढवून म्हणाल्या, ‘‘मुलांनो, घरी जायची घाई झाली आहे का? तुम्हांला भूक लागली आहे का? उद्यापासून तुम्ही मधल्या सुट्टीत खाण्यासाठी छोटा डबा आणत जा.’’
पण बाईंना खरं कारण कोठे माहीत होते? आणि मुलं तरी कसं सांगणार?
शेवटी घंटा वाजली. मुलांनी दप्तर उचललं अन् चपळाईनं पळतच त्यांनी पार गाठला.

    ‘‘हुसेनचाचा, कुठं गेला होता? भेट नाही, अन् हो, तुम्हांला लाग्या लागला होता म्हणजे काय लागलं होतं?’’ एकानं विचारलं, कोणीतरी सांगितलं की, हुसेनचाचाच्या गांज्या, भांग का काय असलं असतं ते मारून आल्यासारखा वागत होता, म्हणजे ते काय असतं? 
मुलांच्या प्रश्‍नांनी हुसेनभाई वैतागला पण त्यांचं प्रेम आणि मैत्री, त्यांना आपल्याबद्दल वाटणारी काळजी पाहून त्याचं मन भरून आलं. डोळे पाण्यानं डबडबले. त्यांनं मुलांना जवळ ओढून घेतलं. एक-दोन जणांचे मुके घेतले. हुसेनभाईच्या दाढीमुळं त्या मुलांना गालावर काहीतरीच वाटलं. गालावर हात फिरवत थोडं बाजूला सरकली.
    ‘बच्चो, कुछ नही हुआ था! अल्लाकी मर्जी है तब तक मुझे लाग्या-फिग्या कुछ नही कर सकता’, मग तो मोठमोठ्यानं हसतच सुटला. मुलंही हसू लागली. हुसेनभाई इतका हसला की त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.
त्यानं मांडी बदलली. आवाज गंभीर केला अन् म्हणाला, ‘‘सांगू तुम्हांला? बताऊं तुम्हें? अरे, त्या दिवशी भलतीच भारी गोष्ट झाली. मी वासरू शोधायला, माळावर फिरलो, तिथं माळावर नागोबाचं बारीक मंदिर आहे ना? तिथं थोडा विसाव्याला बसलो. तंबाखूचा बार भरला, अन् कुठूनतरी आवाज आला.
तुम कौन हो? यहॉं क्यू आयें ?
    ‘‘तो अरे आवाज? अन् इथं तर कोणी नाही. मी दोन मिनिटं बसलो, वाटलं काहीतरी भास झाला, पण पुन्हा आवाज आला, 
    ‘‘तुम कौन हो? यहॉं क्यू आये?
    ‘‘मग उठून पुन्हा देवळात पाहिलं, आता ते देऊळ तरी किती बारीक, दोन माणसं आत घुसली तर गर्दी होईन असं तिथं लपायला दिवळी, बळद, काय नाही.
    ‘‘म्हणलं, जाऊ द्या, आता इथून निघावंच म्हणून उठलो, पण वाटलं, इकडं तिकडं झुडपात-झाडात कोण असलं तर यीन म्होरं म्हणून देवळाबाहेरच्या बारक्या पायरीवर बसलो.
    ‘‘पुन्हा आवाज, तोच सवाल, तुम कौन हो?
मग मी बी कावलो, आरं कोणंय, कुठून आवाज येतोय, कशापायी तेच तेच इच्चारतो. येकी म्होरं, देतो तुला बी तंबाखूची प्ाुडी.
   ‘‘आलो, मैं आ रहा हूँ.
   ‘‘उत्तर आलं पण मी तर पार घाबरून गेलो, म्हणलं, आता काय नाटक वढून ठेवलंय समोर अल्लालाच माहीत.
    ‘‘अन् समोर पाहिलं, अन् माझी दातखेळीच बसायची राहिली. मेलोऽऽ अल्लाऽऽ बचाव, नागोबा बचाव, अपने गावके भैरवनाथ अब मुझे बचावो.
    ‘‘समोर काळाकभिन्न, पैलवानाच्या मांडीयवढा भला आठ-दहा फूट लांबलचक नागोबा सळसळत आला होता. 
    ‘‘तो नुसता रानावनात दिसतो, तसला नाग नव्हता, त्याच्या सगळ्या अंगावर अस्वलावाणी केस होतं, त्यानं फणी उभी केल्यावर वाटलं, आता आपण मेलो, तर पाहिलं, त्याच्या नाकात नथ होती, अन् कपाळावरच्या भागावर कुंकूभी दिसत होतं. म्हणलं ह्यो देवाचा नाग दिसतोय, मी आपलं हात जोडून लांबनंच  जय नागोबा म्हणून दर्सान घेतलं, अन् सगळी ताकद पायात वतून पळायला लागलो. सगळ्या अंगाला घाम फुटला होता. बनीयन पार ओला-चिंब झाला व्हता.’’
अन् हुसेन थांबला. समोर शून्य नजर लावून स्तब्ध झाला.
    मुलांची उत्सुकता वाढली होती, त्यांना एक सेकंदाचाही पॉझ नको होता, ती ओरडलीच, ‘‘चाचा बतावो, आगे क्या हुआ, जलदी जल्दी बतावो,’’
हुसेननं उसासा टाकला अन् खाली जमिनीकडं पाहत म्हणाला, ‘‘बच्चे लोग, सुनोंगेऽऽ’’ 
‘‘हॉं, हॉं’’, सगळी एक सुरात ओरडली.
‘‘बच्चो, मैं भागने लगा, तो फिर आवाज आयी, भागो मत, तुम यहॉं क्यूँ आये, तुम नहीं बताते तो मैं बताता हूँ.
‘‘आता काय करावं? मी थांबलो, तोंडातून शब्द येत नव्हता, पण भीत भीत म्हणालो, वासरू चूक गया... 
‘‘मला थांबवत पुन्हा आवाज आला, नहीं, तुम्हारी मुलाखत आज मुझसे होनेवाली थी, भागो मत, ठहरो, नहीं तो मार डालूगा.
‘‘तो मैं इतना परेशान, इतना घबरा गया था, तो उस आवाज को मैं बोला, अरे, वहॉं कितना बडा नाग हैं सामने, ओ मुझे काट डालेगा, चावेगा, उसके डरसे मैं यहां नहीं ठहर सकता, तुम जरा आगे आवो, मैं भागता.
‘‘पुन्हा आवाज आला, ‘डरो मत, तुम जिसको डरते हो, वही नाग बोल रहा है. मैं नाग बोल रहा हूँ. भागो के तो मैं पिच्छा करके काटूंगा, चावूँगा.’’
सगळ्या मुलांची उत्सुकता वाढली होती. शांतता एवढी की, मुलांच्या श्वासाचासुद्धा आवाज येत नव्हता.
‘‘तो क्या हुआ बच्चो, वो नागकी आवाज थी, मैने देखा वो अपने प्ाुरे शरीर को गुंडाळ के जैसा आदमी बैठता है नं, वैसा बैठा, उपर उसका मुँह, ओ फणी रहता है ना वो फणी...
‘‘तो नाग जोरजोरसे हँसने लगा. घबरावो मत हुसेन, जब सूरजकी किरणे बंद होती है, अंधार पडने लगता है तो मैं अलग रूपमें आ सकता हूँ.’’
‘‘देखा, सूर्य मावळला होता, थोडा अंधूक प्रकाश होता, त्या नागातून एक संन्यासी बाहेर आला. त्याच्या जटा, त्याचं त्रिशूळ, त्याच्या गळ्यातल्या रुद्राक्षाच्या माळा, कपाळावरचं भस्म, बापरें, बाप, अल्ला कसम, मैं इतना घबरा गया, इतना घबरा गया, देखा, ओ नाग वहॉं नहीं था, और सामने ये क्या देख रहा था?
‘‘बच्चो, ये बातपर अपने गाववाले भरोसा नहीं रखेंगे, लेकिन सुनो, ये कहानी सच है—
‘‘महाराज मी जातो. दिवस मावळलाय, घरी वाट पाहतील, पण मला सांगा आता तर तुम्ही नाग होता, अन् आता साधू तुम भगवान हो, मैं पापी आदमी, फिरभी आपने मुझे दर्सन दिया. अल्ला कसम कभी-कभी नमाज भी भूल जाता हूँ, मैं कुछ काम नहीं करता, फिरबी मैंने किसीको कभी तकलीफ नहीं दी, जिंदगीत इतनाही किया, लेकिन इतना पुण्यवान, इतना भाग्यवान तो नहीं की आप मुझे अपना दर्सन दे रहें है!’’
साधू हसला, म्हणाला,
‘पाप और पुण्य, मी कोणतं पाप केलं होतं, मला शाप मिळाला की, दिवस उगवला की तू नाग होशील. दिवस मावळला की पहिल्यासारखा साधू. मीच पापी असणार, त्या जंगलातून मी तरी कधी मुक्त होणार?’
‘बापरे, मला तर काय समजत नव्हतं, पण धाडस करत म्हणालो, म्हणजे दिवसा तुम्ही नाग असता?’
‘हं, नाग म्हणजे सर्पयोनी?’ 
‘पण हे कसं काय?’
‘भगवान, सांगा मला, सगळं इस्कटून सांगा.’
‘तर तो कुत्सित हसून म्हणाला, ये बात तुम नहीं समझोगे, तुम इस बातके लिए अपात्र हो.’
‘‘मग मी महाराजांच्या जवळ जाऊन दर्शन घ्यावं, आशीर्वाद मागावेत अन् घरी जावं असं ठरवलं, पण मी पुढं सरकलो नाही. मल भीती वाटली, हा पुन्हा नाग झाला अन् चावला तर काय करायचं, म्हणून तिथूनच लांबून साष्टांग दंडवत केला. म्हणालो, ‘जिंदगीमें मैने बहुत गलतीयॉं कि है, लेकिन मुझे संभालो, आशीर्वाद दो, घरके लोक, गावके लोक सुखी रहें.’’
‘‘अरे, तुम गाव के लिए भी दुवा मागता है, तुम पापी नाही, खुदके लिए कुछ नहीं मॉंगा.’’
हं, मी गप बसलो.
‘‘क्यूँ नही मॉंगा मालूम हैं?’’ साधूनं विचारलं, अन् मी मानेनंच ‘‘नाही’’ म्हणून सांगितलं.
‘‘साधू महाराज म्हणाले, ‘इसिलिए की तुम पूर्व जनममें फकीर था, इधर उधर घुमता था, मसजिदमें सोता था, और कभी-कभी एक बात करता था’—
‘‘कौनसी?’’
   महाराज हसले, त्यांनी झोळीतून नळ्या काढल्या, तंबाखूसारखं काहीतरी काढलं, नारळाची शेंडी पेटवली, नळी तोंडाला लावली, दोन हाताच्या मुठीत धरून छातीचा भाता फुगेस्तोवर आत खिंचली, अन् म्हणाला,
‘‘कभी-कभी तू ये भी बात करता था, याद है तुझे? 
‘‘नाय वो, महाराज, मागच्या जन्माचं काय इचारता, दुपारी काय जेवला म्हणून इचाराल, तर तेबी मला लगीच आठवत नाय.’
‘‘हं, तो तुम ये करता था, आवो, मेरे पास आवो, आपल्या पूर्वजन्मातील एका गोष्टीचा अनुभव घे.’’
‘‘बच्चो, आगे क्या हुआँ, मुझे कुछ याद नहीं, मी गाव जवळ येईपर्यंत पळतच होतो. पारावर, देवळासमोर माणसं दिसली अन् माझ्या जीवात जीव आला. आता म्होरं काय घडलं, ते सगळं गावाला माहितचय’’, हुसेन थांबला अन् ओक्साबोक्सी रडू लागला.
हुसेनचा हा अनुभव मुलं सुन्न होऊन ऐकत होती.
एक मुलगा म्हणाला, ‘‘हुसेनचाचा रडू नका, शांत व्हा.’’
दुसरा एक मुलगा म्हणाला,‘‘मागे एकदा कोणीतरी गावात म्हणत होतं, नागोबाच्या माळावर अधूनमधून एक नाग दिसतो. तो लई मोठाय अन् त्याला अंगावर लवय, तो सळसळत पुढं गेला की उदबत्तीच्या वासावनी सुगंधी वास मागं राहतो.’’
   हुसेनची गोष्ट संपली. हुसेनला देव भेटला होता. त्यांना कमालच वाटली. 
‘‘बच्चो, मैं कोई गलत आदमी थोडाच हूँ, मैं तो सीधा-साधा आदमी हूँ.’’ 
‘‘हो हो, हुसेनचाचा तुम कभी गलत नहीं हो सकते, पण आता तुम्ही नागोबाच्या माळावर पुन्हा कधीच जाऊ नका.’’ असं सांगत सगळी मुलं, घराकडे पळाली.  
पळणाऱ्या मुलांच्या पाठीकडे पाहत, तो म्हणाला, ‘‘अल्ला, बस इतनीही उमर देते जा, बच्चे मनके सच्चे रहते. और कितने मासूम रहते है. भगवान इनमेंही है.’’ 
   ते त्याला आता मोकळं-मोकळं वाटू लागलं. मुलांना भेटल्यावर काय सांगायचं, ह्या कल्पनेने तो कितीतरी दिवस अस्वस्थ होता. डोक्यावरचं, मनावरचं, ओझं आज उतरलं, त्याला हलकं-हलकं वाटू लागलं, त्या दिवशीसारखं... कापसासारखं.


-अरुण जाखडे


Comments

  1. आपला हुसेनचाचा भावला !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...