Skip to main content

हुसेनभाईंपुढचं संकट

      हुसेनभाई घरी तळमळत पडला होता. बाजेवर उताणा पडून वर आढ्याकडं पाहत तो झाल्या घटनेचा विचार करत पडला होता. काय झालं त्या दिवशी? का आपणास अशी भुरळ पडली? ती आपली एक चूक लपविण्यासाठी आपण भगताचा मार गपचूप खाल्ला. हरामखोर भगत्या, मला चपलेने मारत होता. वाटलं, ओरडून सांगावं का, मला लाग्या लागला नाही, तर नेमका काय प्रकार झाला ते सांगावं, पण ते सांगण्याची छाती आपल्याजवळ नव्हती. आपलं बिंग फुटलं असता, लोकांचा माझ्या चांगुलपणावरचा विश्वास उडाला असता, ह्या भीतीपोटी आपण भगत्याचा मार खाल्ला. लाग्या लागल्याचा भास तयार केला. 
      आता त्या दिवशी आपली काय चूक होती. बुढ्ढी म्हणाली, रानात वासरू चुकलय शोधायला जा. आपण गेलो, एक-दोनदा कालवड हंबरल्याचा आवाज आला, आपण त्या आवाजाचा माग घेत ओढ्या ओढ्यानं फिरलो, पण दुसर्‍याचंच जनावर निघायचं. आपलं वासरू सापडत नव्हतं. शेवटी माळावर नागोबाचं देऊळ दिसलं, तिथं जरा बसावं वाटलं. दिवस मावळतीकडं झुकत गार वारा सुटला होता. नागोबाच्या देवळातून कसला तरी वास आला, थोडा आवाजही. देवळाचा दरवाजा इतका बारीक की बसूनच अंग पुढं सरकवत, रांगत गेल्यावणी आत जावं लागायचं. आत सगळा अंधार. उगं बारीक समईचा दिवा कुणीतरी लावल्यानं थोडा अंधार बाजूला सरकला होता. पुन्हा आवाज आला म्हणून डोकावलं, आत काहीतरी हलल्यासारखं दिसलं. पहिल्यांदा घाबरल्यावनीच झालं, पण मग लक्षात आलं, कुणीतरी आत दिसतय. वाटलं, आसन कुणीतरी भिकार भणंग, नाहीतर नागोबाचं दर्शन घ्यायला आलेलं.
      माणूस सरकत बाहेर आला. डोक्यावरच्या जटा बांधलेल्या, कपाळावर, दंडावर, पोटावर सगळ्या अंगावर भस्म फासलेलं. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंग उघडं, गुडघ्यापर्यंत भगवं धोतर आडवं-तिडवं गुंडाळलेलं. तो आधी बाहेर आला, मग हात लांबवून आतली झोळी बाहेर ओढली. बाहेर पायरीवर येऊन बसला.
       माझ्याकडं त्यानं थोडं रागानं, थोडं नवलाईनं पाहिलं, जय भोलेनाथ! बंबं भोलेनाथ! असं काहीतरी म्हणाला, पुन्हा माझ्याकडं पाहिलं, मी त्याच्याकडं बघून हसलो, त्याला नवल वाटलं होतं, माझी दाढी, लुंगी पाहून ह्याला वाटंत असंन, मुसलमान माणूस इथं नागोबाच्या देवळाबाहेर कशाला बसला असंन.
      पण असली साधू, महाराज मंडळी दिसली की मला वाटतं, त्यांच्याशी बोलावं. का झाला तू साधू, साधू म्हणजी देवाची माणसं, कसली तरी शक्ती त्यांना असते. त्यांना सांगावं, विचारावं, पोराबाळाचं, पावसापाण्याचं, गाव वस्तीचं भाकीत विचारावं. त्याला कसली तरी विद्या देवानं दिली असणार, ती भणंग फकिरावाणी फिरतेत, त्यांची वाचा कायतरी सांगते. त्यांनी निदान आपलं वासरू कुठं चुकलंय, कुठं त्याला चकवा झालाय, कुठं घावन एवढं सांगितलं तरी आतापुरतं माझ्यासाठी सगळं मिटलं. वाटलं, विचारावं, नीट विचारावं, पण लगीच कसं इचारायचं, म्हणलं, थोडं आधी त्याच्याशी बोलावं, त्याला बोलतं केलं, म्हंजे त्याचे पाय पकडून विचारावं, म्हणून त्याच्याकडं बघून हसलो. इथंच फसलो. हसल्यावर तो आपले दारशिन्यानं वघळून वघळून काळेकुट्ट झालेले दात दाखवत म्हणाला, ‘‘हं, काय पाहिजे, नागोबाच्या पाया पडायला आला का?’’
      तो स्वत:हून बोलला. माझा हुरूप वाढला. मी म्हणलो, ‘‘हं आता आलोचय तर घेतो नागोबाचं दर्शन मी उठून नागोबाचं दर्शन घेतलं. काळी कुळकुळीत पाषाणाची गुडघ्यापर्यंत उंचीची नागोबाची पाच फण्या असलेली मूर्ती मान डोलल्यावणी वाटली. ती कशी डोलन, मग मीच हेरलं, त्या साधूचीच कृपा, त्याच्यामुळं नागोबा हलला. मी पुन्हा पाहिलं तो जागेवरच दिसला. मग तो भास होता की साधूचा चमत्कार? काही का असंना, साधूच्या पाया पडलो, अन् म्हणालो, ‘‘महाराज, वासरू हरवलंय, घावंना, कुठं सापडंन?’’ महाराज   हसला, मला तर भीतीच वाटली, काहीतरी म्हणाला, ‘‘विश्‍वाच्या पसार्‍यात कोण कुठंय याचा काय भरोसा. कोण कुठंय ते त्यालाच माहीत. जाऊदे वाट सापडन  तिकडं जाइन, आपली वाट आपण सोडायची नाय.’’
      ‘‘पण आपल्या वाटेवर ते सापडन  का?’’ मी विचारलं, तसा तो भडकल्यावणीच झाला. म्हणाला, ‘‘हा नाग मूर्तीतनं बाहेर पडला, तर सळसळ करत कुठं जाईन तुला कळन का? तसंच वासराचं, तसंच माणसाचं ओढत नेतं त्याला त्याचं मन, ओढत नेतं त्याला त्याचं कर्म. वासराचा लोभ फार दिसतोय तुला.’’ 
      तरी मी नाद सोडला नाही, म्हणालो, ‘‘महाराज वासराचा नाय वो, आता दिवस मावळतीला गेला. दावणीला गाय वाट बघत असंन वासराची. हंबरत असंन, अन् तिचं लेकरूबी तसंच वरडत असंन. गोठ्यातली जनावरं म्हंजी घरातली माणसंच असल्यावणी, चार पाय असत्यात म्हणून घराच्या बाजूला, छपरात बांधतो आपण त्यांना.’’ 
साधू बनेल होता. त्यानं हेरलं, हे भोळसट पात्र दिसतंय, आता रात्रभर इथंच मुक्काम करायचाय तर ह्या येड्याला जरा चकवावं, वासराला चकवा झालाय, अन् ह्याला पण झालाय दिसतोय. 
      मग हुसेनला वासराचा विषय संपवावं वाटलं, हा साधू काय कामाचा दिसत नाही, आपल्याला मदत करत नाही, तर जाऊ या, आता अंधार पसरायला लागंन, घरी वाट बघत असतीन. म्हणतील वासरू बी नाय अन हा हुस्न्या पण नाय. त्यांचा जीव वरखाली व्हईन. निघावं, पण लगीच कसं निघावं, ह्या गोसावड्याचा निरोप तर घ्यावा, ‘‘महाराज, वासरू घावंन असा आशीर्वाद द्या. आता निघायला पायजे मला.’’ महाराज काही बोललं नाही, त्यानं झोळी उघडली. वाटलं, काहीतरी अंगारा, फिंगारा दिन काहीतरी तोडगा सांगन, जरा घुटमळलो. बाजूला नारळाच्या शेंड्या पडल्या होत्या, त्यातली एक शेंडी पेटवली. पिशवीतून त्यानं चिलीम काढली, पेटवली. चिलीम पेटवत तो म्हणाला, ‘‘थांब जरा’’ अन् हसला. नाव काय तुझं? ‘‘हुसेनभाई जमादार.’’ 
   ‘‘हुसेनभाई, तुम खुद भोलेनाथ हो.’’ 
   ‘‘मै भोलेनाथ? कान पकडके बोलता हू, मै कोई भगवान नही, मामुली इन्सान हू. भोलाभाला आदमी हू.’’ 
   ‘‘अरे अरे तुम तुमको नाही समझ  सकते.  तुम बोला ना भोला- भाला, तो आओ, इधर आवो, मेरे पास बैठो.’’
हुसेनभाई साधूच्या बाजूला सरकला, त्या भस्माचा, त्याच्या अंगाचा, त्याच्या चिलमीचा, तंबाखूचा कसल्या कसल्या वासाचा उबग येऊन हुसेनभाई थोडं पुन्हा मागं सरकला.
    ‘‘हुसेनभाई, ये दुनिया समजना बहुत मुष्कील काम है. एक बार तुम भगवानको समझेंगे लेकिन इस दुनिया को नहीं.’’
हुसेनभाईला काही समजलं नाही. तो गोंधळून गेला. त्याला तिथून सटकायचं होतं, पण तो आता त्या साधूच्या तावडीत सापडला होता. 
हुसेनभाई नुसतंच हसला. केविलवाणं हसला. 
     साधूनं डबी उघडली. कसली तरी काळीकुळकुळीत गोळी हुसेनभाईच्या तळहातावर ठेवली. म्हणाला, ‘‘खावो, भोलेनाथ का प्रसाद समझके खावो.’’
     हुसेनभाईनं त्या गोळीला पवित्र गोळी समजून प्रथम तिला कपाळाला लावलं, अन् मग त्यानं ती तोंडात टाकून गिळली.
साधू म्हणाला, ‘‘हुसेनभाई एक झटका मारो तो?’’
‘‘समझा नहीं.’’ हुसेनभाई घाबरला होता. 
‘‘अरे, मै जैसा चिलिम खिंच रहा हूँ, वैसा खिंचो, तुम्हारा वासरू मिल जाएगा ।’’
आता तर असं करायलाच पाहिजे. एक काम तरी होईल या अपेक्षेने त्यानं चिलीम हातात घेतली. खालीवर पाहिलं, चिलिमीपेक्षा तो स्वत:च गरम झाला. त्याला कानाच्या पाळ्या तापल्यासारख्या वाटल्या.
साधू कुत्सित हसला, ‘‘अरे दम मारो,’’ एखादी बिडी तोंडात धरून फुंकावी तशी त्यानं तोंडात चिलीम धरली.
साधू एकदम चिडला, म्हणाला, ‘‘अरे भंपक आदमी ऐसा नहीं,’’ मग दोन मुठी, बोटं, पंजे यात चिलीम कशी पकडायची अन् आकाशाकडं पाहत कशी खेचायची, ते त्यानं करून दाखवलं.
     हुसेनभाईला पहिल्या दमात काही जमलं नाही, पण दुसर्‍या-तिसर्‍या वेळेला अगदी साधूसारखा तो पिऊ लागला. 
त्याला आता थोडी ऊब आली. थोडी किक बसल्यासारखं झालं, तरी चिलिम फिरत होती, त्याच्या हातातून साधूच्या अन् साधूच्या हातातून पुन्हा त्याच्या.
     मधेच त्याच्या लक्षात आलं, घरी वाट पाहत असतील. तो उठला. साधूचे पाय धरत म्हणाला, ‘‘वळख ठेवा महाराज, मी जातो.’’
साधू पुन्हा कुत्सित हसला, ‘‘अरे, कसली वळख, मी रोज कुठं जाणार मलाच माहीत नसतं. आज इथं, उद्या तिथं, आज देवळात, उद्या मशिदीत परवा मसनवाटीत.’’
आता ह्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही हे समजून हुसेनभाई घराकडं निघाला.
गावात आल्यावर जो तमाशा झाला, तो आठवला अन् स्वत:चेच कान पकडत तो म्हणाला, ‘‘हे अल्ला मैने उस दिन ये क्या किया? कोणती भुरळ पडली आपल्याला. आपण काहीतरी चुकीचं वागलोय या अपराधभावानं हा सगळा प्रकार हुसेनभाईनं कुणाला सांगितला नाही. भगताचा मारसुद्धा खाल्ला.
आता हुसेनभाई अस्वस्थ होत चालला, त्याला जाणीव झाली, आता आपण नव्या संकटात सापडलो आहोत.
घरातल्यांना, गावातल्यांना अन् मुलांना काय सांगायचं, हे पाप कसं लपवायचं?
आढ्याकडची नजर बाजूच्या भिंतीतल्या कोनाड्याकडं वळवत, विव्हळत एवढंच म्हणाला,
‘‘हे अल्ला, अब बचाव मुझे, नहीं तो सब लोग मुझे गलत आदमी समझेंगे ।’’

(क्रमश:)
- अरुण जाखडे

Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...