Skip to main content

हुसेनभाईला धक्का


      हुसेनभाईच्या घरी भगतने जो तमाशा केला, तो पाहून बरेचजण अस्वस्थ होते, पण असंच बरीच वर्षे चाललं आहे. ज्याला-त्याला अडचणीत तो हुसेनचाच एक मार्ग जवळ करावा वाटतो. माणिक मात्र आता चिडला होता, रागावला होता, भगतचा बंदोबस्त करायचाच ह्या मताचा तो झाला होता. 
     संध्याकाळी पारावर माणसं गोळा झाली होती. सरपंचही आला होता. माणिकने भगतला गावातून हाकलून द्यायची त्याच्या मनातली ईर्षा, खदखद  सगळ्यांना सांगितली. पण भगतच्या  भीतीने कोणीच काही बोलायला तयार नव्हते. प्रत्येकाला वाटायचं, कशाला आपण वाईटपणा घ्यायचा. 
     माणिकने असे प्रयत्न यापूर्वीही केले होते. तालुक्याला जाऊन फौजदार आणि हवलदारालाही त्याने ही  गोष्ट सांगितली होती. त्यानुसार एके दिवशी दोन हवलदार गावात आले आणि त्यांनी भगतला चावडीत बोलावून घेतले. भगत हात-पाय पडत, काकुळतीला येऊन हवलदारांना म्हणाला, ‘सायेब, एकबार फकस्त माझ्या घरला या, मपले देव बघा, मपली देवाची सेवा बघा अन मी काय चुकीचं करतो का ते ठरवा.' 
हवलदारांना वाटले, आता हा सांगतोय तर एकदा त्याचे घर बघू. त्याचा देव्हारा बघू. त्याची काय-जी करामत आसन तर ती बघू, म्हणून ते दोन हवलदार भगतच्या घरी गेले. 
समोर टाकलेल्या घोंगडीवर दोन्ही हवलदारांना बसवलं, बायकोला च्या कर म्हणाला, अन सांगू लागला,
     'हावलदार साहेब, मी कुणाच्या अदयात नाही, मदयात नाही, मी कुणाच्या घरी जाऊन कुणाला सांगत नाय , मला बोलवा, लोकंच माझ्या घरी येत्यात, मला बोलावत्यात, आता हीच बघा ना, परवा हुसेनच्या घरी मी काय मनानं गेल्तो ? बुढढडीला  इचारा, हातपाया पडत व्हती माझ्या. कसं बी करून घरी ये म्हणून मला बोलवायला माणसं पाठवली व्हती.' 
     ठीकंय, तुझा तो देव्हारा काय ते दाखव आता, एका हवलदारानं त्याला चढया आवाजात विचारलं, तसं हात जोडत तो म्हणाला, चला, आत चला, दावतो. त्यानं देव्हाऱ्यासाठी एक स्वतंत्र खोली केली होती. 
     हिरव्या खणावर देव्हाऱ्यात महालक्ष्मीचे असावेत असे दोन मुखवटे चमकत होते, आणखी काही शेंदूर फासलेले गोल, उभे दगड देव्हाऱ्यात होते. सगळ्यावर भरपूर कुंकू दिसत होते. मोराचे पंख देव्हाऱ्यात वर होते. 
बाजूला त्यांनी पाहिलं, माणसाची कवटी दिसत होती. बाजूला हाडाच्या नळ्या दिसत होत्या, शंखन काय काय बरंच काही पडलं होतं. ती कवटी पाहून हवलदार मागं सरकले. थोडे घाबरलेच म्हणा. तरी तोंडात उसनं आवसान आणून त्यांनी विचारलं, हे काय?
     ' घाबरू नका हवलदारसायेब, मी असल्यावर ती नाय तकलीप द्यायची तुम्हाला.  हे सगळं काय उगच आलय का, बारा वर्षे रोज रात्री मसणवाटात जाऊन तपश्चर्या केली, पूजा केली, दर्शन घेता घेता एक दिवस तेच म्हणलं, मीच येऊन राहतो तुझ्या घरी, तवा ते आलं, मी नाय आणलं त्याला.' 
     त्याचं हे ऐकून हावलदार थोडे आतून घाबरलेच. त्यानं तकलीप शब्द वापरला होता. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्यालाही तकलीप द्यायचा. 
एकाने उत्सुकतेने विचारलं, बारा वर्षे रात्रीचा मसणवारीत जात व्हता?
बारा वर्षे!  हवालदार सायेब, शनवार म्हणू नका, आमोशा म्हणू नका, ग्रहण म्हणू नका, मी जातच व्हतो. सायेब, ही चिकाटीची, सेवेची बक्षिशी मिळाली मला !! परीक्षेत पास झालो त्यांच्या, मग मी ठरवलं, ह्याचा फायदा स्वतः नाय घ्यायचा. ज्यांना तकलीप व्हती, त्यांना द्यायचा. म्हणूनशान कुणीबी अडचणीत आलं, कि मी ह्या शक्तीनं बंदोबस्त करतो.' 
     मग त्यानं पुन्हा हवलदारांना बाहेर आणलं. घोंगडीवर बसवलं, अन म्हणल ' सायेब, गरीबाच्या कशाला मागं लागता, आता आत जे हाय ते खवळलं तर तुमालाबी त्रास व्हायचा. सायेब, तुमच्या पोरं-बाळांना धक्का नाय लावायचा तो.’ 
     पोराबाळांचं नाव काढल्यावर हवालदारांचा आवाज आणखी  कमी झाला.भगत आत गेला, देव्हाऱ्यातलं कुंकू घेऊन बाहेर आला ,  हवालदारांना म्हणाला,' सायेब नाय म्हणू नका, कालीदेवीचा आशीर्वाद तुमच्या कपाळावर लावतो. लई बरकत व्हईन. लवकर जमादार व्हताल, फौजदार व्हताल. पोरंबाळ घराण्याचं नाव काढतील.'
     हावलदारांना काय करावं समजेना, तोपर्यंत त्यानं दोघांच्या कपाळावर कुंकू थापलं होतं. निघताना ते एवढच म्हणाले, ' भगत गावातल्या लोकांची तक्रार नाय आली पाहिजे एवढ बघ. अन ते बाहेर पडले. हवालदार परत चावडीत आले.
 आले तेव्हा लोकांनी पाहिलं, त्यांचं कपाळ कुन्कुवानं बरबटलय. लोकांनीच कपाळावर हात मारून घेतले. लोकांकडे पाहून कम्रेवरचा बेल्ट घट्ट आवळत हवालदार म्हणाले, ' चांगलाच भोसडला भडविच्याला. चांगली तंबी दिली त्याला. वरती रिपोर्ट करून त्याचा कायमचा बंदोबस्त करतो.'
     हावलदार आले, तसे गेले माणिकचा हा प्रयत्न सपशेल फसला होता. आता त्यानं पारावरच्या माणसांना सांगितले, समद्यांनी मिळून त्याला काठ्यानं बडवायचा, मारायचा, गाव सोडून पळला पायजे, त्यो देव्हारा नदीत फेकून द्यायचा. तुम्हाला समजत नाय, तो करणी करतो, लोकांच्या खळ्यातलं, कणगीतलं, धान पळवतो. एक माणूस गावाला भारी पडावा हे काय मनाला पटत नाय. माणिकचं म्हणणं सगळ्यांना पटत होतं, पण भगतजवळ असणा-या अतिंद्रिय शक्तीची भीती सगळ्यानाच बसली व्हती. ते घाबरून गप्प बसले होते.
     सरपंच म्हणाले, 'हे बघ माणिक, हे करणी-फिरणी, धान पळवणं, हे सगळं खरं-खोटं हे सिध्द करून दाखवायला पाहिजे, नाहीतर उलटवार होईन.'
     'दाखवतो की, त्याला काय घाबरतो काय , थांबा आता सुगी आलीचय. मी भगत्याच्या रानाच्या आजूबाजूला ज्यांची वावरं हायेत , त्यांच्या खळ्यात थोडी रंग लावलेली रंगीत जवारी मिसळतो. अन ती भगत्या पोती  भरायला लागला , की त्याची जवारी तपासायला जायचं . रंगीत दाणं त्याच्या जवारीत दिसलं की , पकडलंच समजायचं अन पकडलाकी  मग म्होरं सांगा काय करणार ? '
     माणसं गप बसली, म्हणाली माणिक तुझ खरंय. कुणाच्या ताटातलं असं वडू नये, पण तुझी अक्कल लई भारी. जागेवरच तो सापडन .
     त्यातच विष्णू म्हणाला , ' अय माणक्या ह्याच्या हून लय सोपी आयडिया  आली माझ्या डोस्क्यात , त्यो हुसेनभाई हायना आपला हुसेनभाई बाताड्या, त्याच्यावरून यवढ रामायण चाललय, ह्यो हुसेनभाई कामाला यीन बघा आता, त्याला म्हणावं, हुस्न्या तू त्या भाग्त्याकडं जा , अन तुझी बात मारायची कला दाव त्याला. अशी बात मार की त्याचं धोतर पिवळं झालं पायजे. अन ते चकार पळत सुटलं पायजेन गाव सोडून.'
     विष्णूची आयडिया पटण्यासारखी नव्हती पण कुणी त्याला नाय पण म्हणलं नाय.    
     विष्णू म्हणाला , हे बघ माणक्या , तुझा त्यो हुसन्या हाय ना , त्याला म्हणावं तुझ्या बाताड्यापणाचा देखावा आम्हाला नको  दाऊ , तू त्या भगत्याला बात मारून घाबरव, तर म्हणाव तुला एक एकर जमीन बक्षिशी देऊ, माणिक अन सगळेच गालात हसले.
     हा, हेबी करून बघायला पायजे ग्रामपंचायातीत ठराव करून देऊ त्याला गावठाणत गायरान एकरभर.
     हे बघ माणक्या, हुस्न्याला म्हणावं, असा सुरुंग लाव तुझ्या बातातनं तुला एकरच काय दोन एकर जमीन देऊ. अन समजा त्याला नाय जमलं , तर ते बाता मारायचं तरी थांबन.
     हुसेन पार बरा झाल्यावर, त्याला पारावर बोलवून घ्यायचं अन त्यानं कोणती कामगिरी करायची, त्याची बक्षिशी काय, हे सगळ सांगायचं ठरलं अन, अंधार पडू लागल्यानं सगळ्यांची पावलं घरांकडे वळली .
     इकडं, पोर अस्वस्थ होती. अजून हुसेनभाई हिंडता फिरता झाला नाही वाटतं, असं समजून ती हुसेनभाई ‘ फिट्ट ‘ होण्याची वाट बघत आहेत. हुसेनभाईनं अनिल जवळ सांगितलं होतं, समद डिटेलमंधी सांगतो. त्याचं डिटेल ऐकण्यासाठी पोरं त्याची वाट पाहत आहेत, बहुतेक उद्या तो येईनच ..                                          
                                                     (क्रमश:)

-अरुण जाखडे


Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...