Skip to main content

हुसेनभाई बाताड्या

                                                

चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती.
पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी! 
गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या समोरही हुसेनभाई बाताड्या असंच म्हणत. चट्टयापट्टयाची लुंगी त्यावर गोलाकार ढेरीवरून खाली ओघळलेला अर्ध्या भायांचा बनियन हा हुसेनभाईंचा ड्रेस कोडच होता. शर्ट घातलेला हुसेनभाई त्याच्या घरातील मुलामुलींच्या लग्नात कधीतरी दिसत असे.
हुसेनभाईला बाता मारण्याची फार सवय. त्याच्या बातांचे एकेक किस्से करमणूक करणारे होते. अतिशयोक्ती असली तरी तो ज्या स्टाईलने सांगे त्यामुळे ती ऐकणार्‍याला त्याक्षणी तरी खरीच वाटत.
अशीच एका रविवारची गोष्ट. सकाळी बाहेर पाऊस सुरू झाला आणि मोकळ्या मैदानातून आम्ही मुलं भिजू नये म्हणून पळत पळत बाजूच्या मारुती मंदिरात आलो, तर हुसेनभाई पावसाकडं पाहत बसला होता. कोणीतरी फोडलेल्या नारळाचा प्रसाद त्याला दिला असावा, ते खोबरं त्याच्या तोंडात घुटमळत होतं. आतला उदबत्तीचा वास बाहेर पसरला होता. त्या पावसामुळं आम्ही हुसेनभाईच्या तडाख्यात अडकलो. हुसेनभाई आमच्याकडं पाहून म्हणाला, ‘या पोरांनो, बसा इथं गपगार. हुंदडू नका पावसात.’
मग आमच्यातल्या एकाची कॉलर पकडून त्यानं त्याला इतकं जोरात ओढलं, की तो हुसेनभाईच्या अंगावरच कोलमडला. त्याची फजिती पाहून जोरात हसत हुसेनभाई म्हणाला, ‘नेहरूंना मुलं फार आवडायची.’
हुसेनभाईची एक खासियत होती. काही झालं की तो पं. नेहरूंचा उल्लेख करायचा. काही संदर्भ असो. नसो. कधीच नसायचा म्हणा, पण हुसेनभाई नेहरूंना सोडत नसे. 
त्यावेळी मी बारका होतो. अन हुसेनभाई डायरेक्ट पंतप्रधानांच्या गोष्टी करतो, यामुळं मला हुसेनभाई फार भारी माणूस वाटायचा.
त्या दिवशी मी शेवटी त्याला विचारलंच, नेहरू अन् तुमचं हे जुगाड काय ते जरा खुलवून सांगा, हुसेनभाई बटन दाबलं की लाईट लागावी तसा खुलला. दाढीवरून हात फिरवत, तो आम्हा पाच-सहा मुलांकडं नुसत पाहत हसत राहिला. हसता हसता त्याचं हसणं इतकं पेटलं की हसण्याचा अटॅक आल्यासारखा जोराजोरात हसू लागला. त्याच्या नाका-डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. देवळात त्याच्या हसण्याचा आवाज इतका घुमला की देऊळसुद्धा हसू लागल्यावाणी वाटू लागलं, अन् पोरं पण फिदी फिदी हसू लागली.
थोडा टाईम गेला अन् सगळ्यांचं हसणं थांबलं. हुसेनभाईनं लुंगीनंच तोंड पुसलं, अन् म्हणला, ‘काय सांगायचं लेकरांनो, नेहरूंच्या ताटात जेवलेला मी माणूस. आसं नशिब लागतं. नशिब.’
हुसेनभाई नेहरूंच्या ताटात जेवला. आम्ही तर हादरूनच गेलो. एकमेकांची तोंडं न्याहाळत राहिलो. हुसेनभाई पुढं काय बोलतो ते ऐकायची घाई झाली.
हुसेनभाई बोलला, काय झालं, दिल्लीहून फर्मान आलं, नगरच्या कलेक्टरला, कलेक्टरचं श्रीगोंद्याच्या मामलेदारला, मामलेदार आला धावत आमच्या घरी. रात्रीची वेळ. आता असला सायेब डायरेक्ट घरी आला म्हणल्यावर आम्ही घरातली माणसं पार घाबरून चिडीचूप झालो.
मामलेदार आमच्या म्हातार्‍याला म्हणला, ‘ओ जमालभाय, चलो, तुम्हे कलेक्टरनै बुलाया है, अभी के अभी अहमदनगरकू जानेका है.’
आमचा म्हातारा गडबडला. म्हणला, ‘आवं मी आता कायबी करत नाय. कुणाच्या आध्यात नाय, कुणाच्या मध्यात नाय. नेहरूंच्या पायाची शपथ घेतली मी नगरच्या जेलात. तवापासनं साधू-संतावाणी वागतूया. अल्ला कसम इसमे मुझे मत अडकावो. ओ जमालभाय तुमको आरोपी के वास्ते नही बुलाया. कलेक्टरने बताया जमाल को दिल्ली ले जानेका, नेहरूने याद किया है. नेहरू जी का बुलावा आया तुम्हें.’
मेरा बुढा तो रोने लगा. बोला, नेहरू बडा आदमी. अभी वे पंतप्रधान है. मुझे क्यूँ याद किया
पण मामलेदारनं पुढचं काही बोलायला सवडच दिली नाही. त्याने जमालभाईला तर गाडीत बसवलंच, पण बसवता बसवता त्याला याद आली. तो म्हणाला, ‘ओ तुम्हारा लडका हुसेन किदर है. उसको साथ ले.’
हम दोनों को पकडके उस रात को नगर लेके गया. सुबह कलेक्टर के बंगले पे. मेरा बाप रोने लगा. कलेक्टर के हात पाय पडने लगा. कलेक्टर बोला, ‘जमाल रो मत. तुम्हे दिल्ली लेके जानेका उपरसे हुकुम है.’ तो मेरे बाप ने उसे कहा, ‘मै गरीब आदमी ऐसे फटेले कपडें में किदर लेके जाते हो.’ कलेक्टरने किसी आदमी को कहा - ‘जावो इनके लिये अच्छे कपडे लावो.’
हुसेनभाई मध्येच थांबला. डोळे मिचकावत म्हणाला, ‘ऐसे कपडे तो ईद के टाईम में भी मुझे कभी मिले नही थे.’
तो बात ये थी की, आमचा म्हातारा जवा नगरच्या जेलमंधी होता, तवा नेरू तिथं लिखान काम करायचे. तवा माझा बाप नेरूंची पाय चेपायचा. मालीश करायचा. कागदं नीट लावून ठेवायचा. तवा जेलमधी नेरूंनी इचारलं, जमाल तुम्हे कितने बच्चे? तो मेरे बापने बताया, अभी तो दो साल पहले शादी हुई. एकही लडका है. नेरूने पुछा, उसका नाम क्या - तो मेरा नाम तो उसतक रखाही नही था.  फिर मेरा बाप बोला - ‘हुसेन’.
तो वो बात नेरूने ध्यानमें रखी और एक दिन उनको याद आयी. अरे वो जमाल था, जेलमे मेरी सेवा करता था, उसको मिलना चाहिये. और नेहरू भी बहुत बडा आदमी - उसका दिल बहुत बडा, उसको मेरा नाम भी याद आया. तो फर्मान आया जमाल और हुसेन को लेके आवो. कलेक्टर तो घबरा गया था.
तर आम्ही दिल्लीत गेलो. लई पोलीस पहारा. समदी माझ्याकडं अन् माझ्या बापाकडं नुसतं टकमक बघत व्हुती. तो वे लोग अंदर अंदर लेके गये. एक बडा महल जैसा घर उसमे लेके गये तो सामने नेहरू. जब नेहरू ने हमे देखा तो, लगीचच पुडं आले अन् माझ्या बापाला मिठ्ठी मारत म्हणाले, ‘जमाल तूं इतने दिन कहा था?’ मेरा बा रोने लगा. तो नेरूने कहा, ‘रो मत जमाल, तू अब आझाद हिंदूस्थानका आदमी है. दो घंटे बाते चली, नगरकी जेल के दिन दोनों को याद थे.’
आम्ही ऐकत होतो. हुसेनभाई सांगत होता - नेहरूचाचा काय आग्रह सोडंना, म्हणले, ‘आता जेवूनच जायचं जमाल.’ तर बाप म्हणाला, ‘तुमाला भेटलो अन् प्वॉट भरलं,’ पण नेरू काय ऐकनां.
मग आम्ही जेवायला बस्लू. तिथली माणसं आमच्या लई पुढं, पुढं करत व्हती. मी लई गांगरल्यावानी झालो. जेवता जेवना काय करावं समजंना. समोरचा घास काय तोंडात जाईना. तवा नेरू उठले, मला जवळ घेतलं, माझा मुका घेतला अन् बसवलं त्यांच्या शेजारीच. मग काय त्यांच्या ताटातंच जेवलो मी.
बापरे! हुसेनभाईंनी ही गोष्ट सांगितली आणि आम्ही चकित झालो. हुसेनभाई आम्हाला मारुतीपेक्षा मोठा वाटू लागला. पण ती गोष्ट गावासाठी काही नवीन नव्हती. गावातल्या प्रत्येक माणसाने कदाचित रामायण ऐकलं नसेल, ज्ञानबा-तुकारामचा अभंग ऐकला नसेल, असं बरंच ऐकलं नसेल, पण हुसेनभाई नेहरू चाच्याच्या ताटात जेवला हे प्रत्येकाने ऐकलं आहे.
आता आम्हाला समजू लागलं, हुसेनभाईला ‘हुसेनभाई बाताड्या’ का म्हणतात. पण त्याच्या बाता ऐकायला गाव आसूसलं असतं.
बाहेर पाऊस थांबला. आम्ही म्हणालो, ‘हुसेनभाई, सलाम अन् धूम पळालो घराकडं. आमच्या आमच्या ताटात जेवायला.’ पळता पळता मागं वळून पाहिलं, हुसेनभाई हात हलवत म्हणत होता,  ‘आस्ते भागो, आस्ते भागो नैतर गिर जावोंगे.’
मला माहीत आहे, आम्ही दिसेनासे झाल्यावर तो मारूतीच्या मूर्तीकडे पाहत म्हणला असणारच, ‘औ हनुमानजी, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी.’

- अरुण जाखडे

Comments

  1. छान.अशी माणसं प्रत्येक गावात असायची.ती आपल्या स्मरणात आहेत.याचा खूप आनंद झाला.आणखी अशा व्यक्ति आम्हांला आपल्या लेखनातून जीवंत झालेल्या दिसतील,अशी अपेक्षा.तुम्ही लिहीत राहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...