मुमू लग्न होऊन तिच्या सासरी गेली. नाठाळ भाऊ ताजूला घरातून हाकलून दिलं , मुमूच्या लग्नात शेरडं , करडं , बोकडं विकल्यामुळे गुरांचं वाडगं सगळं मोकळं झालं होतं , या सगळ्यांमुळे आलेल्या रितेपणाची उदासी हुसेनच्या मनावर , चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. त्यातच त्यालाच नव्हे तर घरातल्या सगळ्यांनाच हे जाणवलं होतं की , मृत्यूची सावली आपल्या घरापासून आता दूर नाही. बुढ्ढी आता खचली होती आणि तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं. तिच्या चेहर्यावरच्या सुरकुत्यासुद्धा चेहर्यावरची ओल शोषल्यामुळं एखाद्या वाळलेल्या दोडक्याच्या शिरांसारख्या दिसू लागल्या. अल्लाचा हुकूम येईपर्यंत दिवस काढायचे , एवढंच तिला वाटत होतं. या सगळ्यांचा परिणाम प्रत्येकाच्याच वागण्या-बोलण्यावर झाला होता. हुसेन केवळ अबोलच नाही , तर दिवसभर तो रानातच काहीतरी काम करत बसे. झाडाच्या गार-गर्द सावलीत तो स्वत:चे अंग आकसून पडलेला असे किंवा उगाच आभाळाकडं नजर लावून तासन् तास बसलेला असे. त्याला आता रानातच बरं वाटे. त्यानं स्वत:ला गावापासून अलिप्त करून घेतलं होतं. त्याला आता माणसांचा , त्यांच्या गप्...