हुसेन
आता रानात रमू लागला. पारावर रेंगाळणारी माणसंही आता कमी झाली. एस.टी.
यायच्या-जायच्या वेळेस ती एस.टी. थांबते तिथं जमू लागली. दुपारच्या वेळेस सावली
असते म्हणून काही माणसं पारावर हात-पाय पसरून घोरतही असत एवढेच. पार नावाचं एक
केंद्र असं आता कमकुवत होत होतं.
शिक्षणाला
बाहेर गेलेली मुलं सुट्टीत वेशीबाहेरच्या मोकळ्या पटांगणात खेळण्यासाठी जमत. खेळून
दमली अन् गप्पांसाठी बसली तर कधी हुसेनचाचाचा विषय निघे. खरंतर कोणत्यानं कोणत्या
कारणानं हुसेनची आठवण येतच असे. मुलं मोठी झाली, पुढच्या
शिक्षणासाठी शहरात गेली तरी लहानपणी हुसेनचाचाबरोबर असलेली त्यांची गट्टी, हुसेनचाचानं त्यांना सांगितलेल्या गोष्टी, त्यांच्या मनात कायम रूजलेल्या आहेत. गाव म्हणलं की ज्या गोष्टी
डोळ्यासमोर पटकन उभ्या राहतात. उदा. गावाची वेस, मंदिरं, विहिरी, बारवा, झाडी, शाळा, वडाचा पार, तसंच
हुसेनसुद्धा. हुसेनचाचांनी भन्नाट गोष्टी सांगून त्यांचं मन तृप्त केलेलं ते कसं
विसरणार?
असा
हुसेनचाचा कधी भेटलाच तर ही मुलं त्याला रस्त्यावर थांबवत. ‘चाचा, चाचा एखादी गोष्ट सांगा.’ हुसेन
आता पहिल्यासारखा खुलत नाही पाहून ते नाराज होत, हुसेनला
हसविण्याचा ते प्रयत्न करत. हुसेन म्हणाला की, ‘आता
माझ्याकडं नवी गोष्ट नाही’, तर ते मागचीच जुनी गोष्ट सांग म्हणून आग्रह धरत.
ते हट्ट करत की, ‘चाचा, तुम्ही
नेहरूच्या ताटात जेवला ते सांगा किंवा राजकपूरला भेटला होता ते परत सांगा.’ पण हुसेनला आता आपण त्यावेळी काय सांगितले तेही नीट स्मरत नसे.
त्याला सारखी आठवन करून द्यावं लागे, गोष्ट
अर्ध्यावर आली की तो थांबे, नुसताच स्तब्ध बसे. मग पुढची गोष्ट मुलंच पूर्ण
करीत. मुलं अगदी हुसेनचाचाच्या स्टाईलमध्ये सांगत. आपलीच गोष्ट मुलांकडून ऐकताना
त्याला आश्चर्य वाटे. मुलांचं कौतुक वाटे. त्याला मनापासून आनंद होई. तो मुलांना
विचारत असे, ‘‘अरे, तुमको
सब याद है, बहोत हुश्शार लडके है अपने गावके. असं म्हणून तो
मुलांच्या पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवत-फिरवत आणखी काही बोले, ‘‘बच्चो ये बताओ, तुम्हें वहां भी मेरी याद आती थी?’’ मुलं ‘हो’ म्हणताच
तो डोळे विस्फारून हसत-हसत म्हणे,
‘‘कुछ साल पहले तो अपने
तालुकाके स्कूलके बच्चे मुझे देखने आये थे. मैं बोला, अरे मैं थोडाही बडा हिरो हूँ की मुझे देखनेके लिए यहॉं आये, मैं तो मामूली किसान आदमी. मैं हायस्कूलमें तो कभी गया भी नहीं.
लेकिन वो भी मेरी तारीफ कर रहे थे. बोल रहे थें आप जो अपने गावके बच्चोंमें बाते
करते थे, कुछ कहानी, किस्से
बोलते थे, वो सब हमें आपके गावकें बच्चोंने बताया और वो
बहुत खुश होकर मुझे मिलने यहॉं आए थे, तो
तुम सब बच्चे भी उधर दुसरे दोस्तोंको मेरे बारेमें बोलते है क्या?’’
‘‘हां हां चाचा. चाचा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या कोणत्या पुस्तकात वाचायला
मिळणार नाहीत अशाच आहेत. आमचे सर म्हणजे गुरुजी आम्हाला सांगतात. प्रत्येक माणूस
म्हणजे एक पुस्तक आहे.’’
‘‘क्या कहते है तुम्हारे गुरुजी?’’
‘‘वो कहते है की हर एक आदमी एक किताब होता है. तर
आम्हाला काही हे फार समजत नव्हतं. पण चाचा, तुम्हाला
पाहिलं की वाटतं खरंच तुम्हीच एक पुस्तक आहात. बिन शब्दांचं, बिन अक्षरांचं, तुमच्या गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही लहानपणी तुमची
वाट पाहायचो. पण आतासुद्धा आम्हाला वाटतं, तुमच्या
गोष्टी ऐकाव्या. आजसुद्धा वाटतं, तुम्ही पहिल्यासारखंच बोलावं, आम्ही लहान होऊन ऐकावं.’’
‘‘तर मग या की माझ्या शेतात. दिवसभर तिथंच असतो.
आंब्याला कैर्या लोंबतायत, काही ठिकाणी आंबा पाडाला आलाय. या, या आता तुम्ही काय पहिल्यावनी शाळंत नाहीत की, तिथं येऊन बाहेर मैदानावर बाता माराव्यात.’’
मुलं ‘हो’ म्हणाली.
बरेच
दिवस असेच गेले. मुलं काही हुसेनच्या मळ्यात गेली नव्हती. हुसेनही विसरून गेला.
त्याला वाटलं, मुलं गमतीत बोलली. ‘‘इतक्या लांब कशाला
येतील?’’
एक
दिवस दुपारी चारच्या दरम्यान सात-आठ मुलांचा गठ्ठा त्याच्या रानात बांधा-बांधावरून
येताना दिसला. नांगरट झाल्यानं सगळ्या रानात ढेकळं उलथून पडली होती. त्या
ढेकळावरून होलपटत, होलपटत स्वत:चा तोल सांभाळत मुलं त्याच्या
वस्तीवर पोहचली.
हुसेन
मुलांना पाहून खुश झाला. त्यांच्याकडे पाहत हसत-हसतच तो ओरडलाच, अगदी ओरडलाच– ‘‘आवो, आवो, बडे हुशार लडके, आवो, इस पुराण पुरुषको मिलने आये तो स्वागत है, आवो, बैठो.’’
सगळी
बसली. सांगत होती, ‘‘अहो, बरेच
दिवस यायचं चाललं होतं. तर आज मुहूर्त सापडला. आलो का नाही चाचा, अरे हमारे प्यारे चाचाको, हम
मिलने जरूर आयेंगे, बार-बार आयेंगे.’’
‘‘अरे, जरूर
आवो. तुम सबके बाप-लोक तो मेरे उम्रके ही होंगे, कोई
थोडा छोटा, कोई थोडा बडा, अपनेही
घरके है सभी.’’
एकानं
विचारलं, ‘‘चाचा, इथं
तुम्हाला करमतं का? रानात बरं वाटतंय का गावात?’’
‘‘अरे, गाव
भी अपना और ये शेत भी अपना. सब जगह एकही है. हां. पण इथं बहोत खामोशी रहती है.
जादा आवाज नहीं, कुछ झगडा-बिगडा नहीं.’’
‘‘अरे पण हुसेनचाचा, तुम्हाला
तर गप्पा-गोष्टी करायची सवय, इथं तुम्ही कोणाशी गप्पा मारणार? इथं माणूसच काय कुत्रं पण दिसत नाही.’’
‘‘अरे, बाते
मारनेको फुरसतही नहीं मिलती. फिरभी मैं बाते करता हूँना. ह्या झाडांशी, पक्षांशी, बैलाशी आणि नाहीच जमलं तर खुदसे. स्वत:शी गप्पा
मारत बसतो मी. आता बघा, माझी मुमू गेली सासरी, तिची याद आली की मी तिच्याशी गप्पा मारत बसतो. आता ती नसते ऐकायला
म्हणून काय झालं, पण आता ही बैलयत ना, मी गप्पा मारायला लागलो की, कान
टवकारून ऐकत्यात. चिपाडं चघळायची सगट इसरत्यात. आता तुम्हाला वाटंल मी पागल आदमी
झालो काय. पण हरएक को पागलही होना पडता है. अपने वतनके वास्ते, अपने पूर्वजोंके वास्ते, अपने
खेती के वास्ते, देखो तुम भी देखो. शिक्षणके वास्ते पागल हो गए.
लेकिन पागल होता है उसका भविष्यकाल बहोत रोशन होता है. तुम साहब बनोगे ना?’’
‘‘ते ठीकंय, पण
इथं काहीतरी सांगण्यासारखी गोष्ट घडली असणारच. चाचा, तुम्ही
सांगा बरं.’’
‘‘इथं काय गोष्ट घडणार.’’ मग त्यानं थोडा आपल्या डोक्याला ताण दिला. थोडा वेळ गप्प बसला.
डोळे मिटून म्हणाला, ‘‘खतरनाक, बहुत
खतरनाक!’’
मुलं
सावध बसली. ‘खतरनाक, आता काय खतरनाक?’
‘‘अरे बच्चे लोग, लईच
खतरनाक. म्हणतेत ना माणसाला मौत एकदम येत नाय. एकदा भेटून जाती कवातरी जिंदगीत.
तशी भेटून गेली राव मला.’’
‘खतरनाक आणि मौत’ मुलं
थोडी घाबरलीच. ‘‘मौत भेटून गेली, तुम्हाला चाचा? आवो
तुम्हाला लई मोठमोठी माणसं भेटून गेली अन् आता म्हणता मौत भेटून गेली? यमाच्या दरबारात जाऊन आला काय?’’
‘‘अरे, बच्चे, यमाच्या दरबारात गेलो असतो ना तर परत माघारी आलो असतो का, त्याच्या तावडीतून? मग आज
आपली मुलाखत झालीच नसती. तर ऐका आता गपगुमान होऊन. आता ही समोर इहिर दिसती ना
तुमाला?’’
‘‘हां दिसती.’’
‘‘तर त्या इहिरीला यंदा पैल्यांदा पाण्याचा टिपका
नाय राहिला. माझ्या आख्या जिंदगानीत इहिर अशी कोरडी कवा झाली नव्हती. पण वो अल्ला
है ना, कुछ अलग खेल दिखाता है. मेरे बापजादेने कधी
कोरडी इहिर पहायली नसन. चार पिढ्या जगल्या या इहिरीवर. जमादार घराना आमचा. ही
मोठ्ठी इहिर बांधली. आमच्या खानदानाची निशानीच म्हणा. समदी चिर्यामंधी अन्
चुन्यामंधी बांधली. आत उतरायला पंधरा पायर्या, पण
कवा पायर्या लागल्याच नाहीत. कवाभी बघा इहिर भरलेलीच. कवातरी एखांदी वस्तू पडली, तर वरूनच उडी मारायची इहिरीत. पायर्या कोन वापरतंय, पण यंदा समदं उलटं-पालटं झालं.
‘‘आता इहिर कोरडी झाली तर एक दिवस मनात इचार आला
खाली उतरून तर बघावं. पुना पाणी आलं, तर
ह्यो तळ कशाला फिरून बघायला यीन, म्हणून उतरलो. एक दिवस उतरलो, पहिल्यांदाच पायर्यावर पाय ठेऊन अन् एक हात इहिरीच्या चिर्यांना
धरून उतरत होतो. अन् पोहोचलो एकदाचा खाली. समदी इहिर गोल-गोल फिरून पायली. आता
इहिरीला पाणी नसलं तरी जमिन लई गार-गार लागत व्हती. लईच गार. पायाला गारवा गोड
लागला, अन् मी इकडं-तिकडं न्याहळतोय अन् बघतो तर बोभडीच
बसायची येळ आली माझ्यावर?
‘‘समोर बघितलं, तर
दगडाच्या-चिर्याच्या कपारीतनं आपले महाराज, मुंडकं
बाहेर काढून परत आत घेत होते, पुन्ना बाहेर, पुना
आत. म्या म्हणलं, च्यायला, ही
पीडा आता आपल्याला संपवायला आली का काय. म्हणून म्हणलं पायर्याच्या बाजूनं जावं, तर पायर्या शेवटपतूर कुठं व्हत्या, खाली
उतरताना म्या पायर्या संपल्यावर उडी मारली व्हती.
‘‘म्हणलं जाताना जाऊ कपारी-कपारीनं, यंगत कसंबी. पण हे महाराज मधीच. तिथवर जाऊस्तवर बाहेर आलं तर?
‘‘अन् पोरांनो थांबा, तुमाला आता मधी बोलावं वाटलं तरी बोलू नका. ती समोर दिसल्यावर घाम
फुटला मला. बोंब मारली तर ते सावध होईन. अन् बोंबलून काय फायदा? इथं तर कोणीच नव्हतं. अन् तेवढ्यात ते बाहेर आलं, पहिल्यांदा फूटभर, मग दोन फूट, मग
तीन फूट, मग चार फूट, आरं
ती हायतरी किती लांब? सुतळीवनी लवचिक अन् नुसतं लांबत बाहेर येत
व्हतं. अन् जवळजवळ दहा फूट लांबीला अन् मनगटाहून डबल जाडीला आसन. आता म्हणलं, यानी जर का अडवलं, यानी जर का माझ्या अंगाला विळखा घातला, यानी जर का माझ्या मांड्या फोडल्या, यानी
जर... यानी कायबी केलं तरी ह्या हुसेन जमादारचा अवतार संपणार व्हता. मी भैरवनाथाची
याद केली. अल्लाची याद केली. ती इहिरीच्या कडंला अंग चिकटून गपगार बसलं. त्येला बी
गारवा आवडला आसन पण निम्मी इहिर त्यानं अडवून ठेवली. आता जी निम्मी राहिली व्हती.
तिच्या कडकडनं हळूच चालत, पावलाचा आवाज होणार नाय अशी काळजी घेत पायरीच्या
खाली आलो. तिथनं दोन फुटावर त्याचं शेपूट होतं.
‘‘आता मी, समोरचं
जनावर आणि मौत असं तीनच गोष्टी दिसत व्हत्या. आता चार पिढ्यांची ही कुआँ तर मौतकी
कुआँ बनली व्हती माझ्यासाठी. पायरी सात-आठ फूट उंच व्हती. कसाबसा फट मिळंन तिथं
हात घालून, पाय टेकवून स्वत:ला वर वडत व्हतो. नजर मात्र
त्या महाराजावर. अन् जमलं, कसंतरी पायरीला हात लागला अन् यंगलो वर. इतका
चपळ, इतका लवचिक, इतका
हलका मी कवाच झालो नसंन. स्वत:चं शरीर स्वत:च वर उचलायचं म्हंजी लई बळ लागतं.
कुठणं आलं ती बळ. मी पायरी, पायरीनं वर आलो. अन् वर आल्यावर पहिल्यांदा पाया
पडलो भैरवनाथाला, अल्लाच्या नावानं नमाज पाडले. हे अल्ला, तू बहुत महान है, आज मला समजलं मीच तर ‘अल्लाहचा वली’ आहे. मीच मुहिब्ब हूं. याने की अल्लाचा सखा. ये अल्लाह दुसरा कोई
नहीं. औलिया ए अल्लाह है.
‘‘मी घरी आलो. बुढ्ढीला सगळा प्रकार सांगितला. ती
म्हणाली, ‘जा, भैरोबाला
तेल-वात लावून ये. नारळ वाढवून ये. त्याचे आभार मान. प्रार्थना कर.’’
‘‘पण पोरांनो ही गोष्ट इथंच संपत नाही. तो
महाराज-सर्प महाराज एखाद्यानं डूच धरावा तसा पुन: फिरून माझ्यासमोर आला व्हता. पण ह्या
टायमाला व्हतो मी पटांगणात. आता त्याचा अन् माझा खेळ काय झाला, ते सांगन उद्याच्याला कारण तुमी लई उशीरा आला. मला गावात जाऊन धारा
काढायच्या. घरी वाट बघत असतेन.’’ हुसेन उठला अन् तडातडा घराकडं चालू लागला.
मुलं
म्हणत होती, ‘‘आरं थांब चाचा, आमालाबी
घराकडं यायचंय.’’ पण हुसेनला समोर दिसत होत्या, पान्हावलेल्या गाया, त्यांचे
चेहरे अन् वासरं, लुचूलुचू करायसाठी माझी वाटच पाहत असतीन.
- अरुण
जाखडे

Comments
Post a Comment