शेवटी एक दिवस भर दुपारी धाडस करून हुसेनभाई भगताच्या घरी गेला. हुसेनला पाहताच भगत खूश झाला. म्हणाला, ‘‘बरं वाटतंय ना आता हुसेनचाचा?’’ ‘‘बरं, म्हंजी पार पहिल्यावाणी दुरुस्त झालो.’’ भगत खुलला, म्हणाला, ‘‘वो हरामखोरने तुझे पकडा था ना, उसे ऐसा पिटाया, साला भाग गया.’’ अन् भगत खांदे उडवत हसत होता. ‘‘अब क्यूँ आया बोल?’’ भगतनं विचारलं, ‘‘कुछ नही. आपलं दर्सान घ्यावं, पाया पडून आभार मानावं म्हणून आलो होतो.’’ हुसेननं भगताचे पाय धरले. भगत त्याच्या पाठीवर हात मारत उठवत म्हणाला, ‘‘हुसेन, घाबरू नको. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तुझ्या केसाला धक्का लागणार नाही. काही शंका आली की कधीही ये, सांग, मोकळेपणानं सांग.’’ मग हळूच हुसेनभाई म्हणाला, ‘‘तेच सांगायला आलो होतो.’’ ‘‘अरे, उसमें क्या, बतावो, काय सांगायचं ते सगळं सांग.’’ हुसेन मांडी घालून बसला. डोळे मिटले. बराच वेळ तो काहीच बोलला नाही. नुसतीच शांतता, मग डोळे उघडत तो म्हणाला- ‘‘भगत महाराज, त्या दिवसी तो लाग्या तुमच्या भीतीनं पळ...