आज वडाच्या
पाराभोवती गावातली जवळजवळ शे-पन्नास माणसं सकाळी, सकाळीच जमली. गावात
पहिल्यांदाच एस.टी. येणार असल्यामुळे तिचे स्वागत आणि आनंद साजरा करण्यासाठी
एवढ्या उत्साहाने माणसं जमली होती. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं, आबड्या ताशावाला
घरीच आहे. सरपंचांनी लोकांचा उत्साह पाहून त्याला पकडून आणायचा हुकूम केला. सकाळी
साडेसात वाजता गाडी करमाळ्याहून येणार आणि पुढं राशीनमार्गे पुण्याला जाणार असा
गाडीचा मार्ग ठरला होता. सरपंचांनी ह्यासाठी बरेच हेलपाटे मारले होते. एस.टी.च्या
साहेब लोकांची मनधरणी केली अन् शेवटी शिव्या पण दिल्या होत्या. सरपंच खवळला म्हणजे
कोणाचा राहत नाही. बाळासाहेब सरपंचाच्या ह्या कामगिरीमुळं लोक आज खूश होते.
हुसेन म्हणाला, ‘‘मी जरा तुमच्यामंधी
बोलू का?’’
‘‘अरे बोल, बोल, हुसेन, तू कुठंय? आजकाल नजरं नाही
येत?’’ बाळासेट सरपंच.
‘‘ह्याऽऽ ह्याऽऽ ह्याऽऽ’’, हुसेननं
ओशाळल्यासारखं हास्य केलं, अन् खाली मान घालून
बोलला, ‘‘एवढ्यात काय गावाची शीव नाय ओलांडली
भाऊसायेब. पण मला तुमच्याबदलीच बोलायचं होतं इथं इषय निघाला म्हणून...’’
‘‘आ बोल, बोल, लवकर बोल, एस.टी. आली की
राहून जाईन.’’
हात जोडून हुसेन
म्हणाला, ‘‘सायेब, तुमी लय धावपळ किली
म्हणूनशान ही एस.टी.चं डबडं आपल्या गावात येतंय.’’ गावकर्यांकडं बघत
हात जोडून तो पुढं म्हणाला, ‘‘बरं का मंडळी, आपल्या भावसायेबानं
ठरवलं ना तर आगीनगाडीबी यीन आपल्या गावात.’’
हे ऐकून सरपंच
मनातून खूश झाले, पण वर लटका राग दाखवत म्हणाले, ‘ये हुस्न्या बाताड्या, तू ही बोलू नको.
एकतर आसलं काम आपल्या आरसट्यातलं नाय अन् दुसरं म्हंजी तुझ्या ह्या थापावर माणसं
उगच खुलून जायची. साली येडी लगीच चेकाळल्यात.’’
जमलेल्या माणसांना
उद्देशून सरपंच ओरडले,
‘‘ओ, उगच समदी उभी का
राह्यली. बसा खाली बसा,
नायतर पारावर बसा, यीन आता एस.टी.’’
माणसं बसली.
एकमेकांच्या खिशातल्या तंबाखूच्या डब्या, पिशव्या ह्याच्या
हातातून त्याच्या हातात फिरत होत्या.
तेवढ्यात एकजन
झाडावर उंच चढून इकडं,
तिकडं रस्त्याच्या बाजूने पाहत होता.
त्याच्याकडं कोणाचं तरी लक्ष गेलं, ‘‘ए, खाली ये, आपला माणसात बसायचं
सोडून वर कुटं माकडावनी जाऊन बसला, खाली ये.’’
‘‘आवो, वर चढून ह्या
माळाच्या पलीकडं बघतूया मगापासनं नजर लावून, इस्टी आली तर
दिसनना माला समद्याआधी. मला सांगता यीन आली तर.’’
‘‘बरं बरं, ही भारी आयडीया.
आदी समजलं म्हंजी कसं आपलं तयार राहता येतं, माणसं लगीच जमा व्हत्यात.
बारीक ध्यान ठेव, अन् आली की सांग ती बाई.’’
‘‘बाई?’’ एकजनाला खरंच
वाटलं.
‘‘आवो, बाई म्हंजी
येस्टीबाई, तुमाला आता चार लेकरं झाली तरी बायी
आठवती म्हणल्यावर लईच कमाल झाली.’’
तेवढ्यात आबड्या
ताशा घेऊन आला.
‘‘अय, नुसता काय
मुक्यावनी आलाय. वाजवत यायचं. चल आता यीस्टी येणारंय. तवा वाजव तडम् तडम् तडम्
ताशा.’’
‘‘यीस्टीनं गावात येन्ट्री घेतली की असा
ताशा बडव की यस्टीसगट नाचली पायजेन...’’ माणक्यानं आबड्याला
बजावलं.
‘‘लई मनातलं बोलला राव, काडा डबी भायेर.’’
‘‘आता फुकाटचं खायचं बंद करा की, बरं घी. च्यायला
तुझ्या बापाला मी डबी देत होतो, आता तुला, अन् पुढं तुझ्या
पोराला बी देतो. आलंय का ती इकडं.’’
‘‘नाय आलं, समदी गाभडी शाळंत
पळाली.’’ म्हणली. सरपंचांनी पोराला पाराकडं
घिऊन यायला सांगितलंय तवा गुर्जीलोक म्हणली, ‘‘चांगली कापडं घालून, टोपी घालून या.’’ ती गेलं तिकडं उधळत
तेवढ्यात आबड्याचा ताशा वाजायला लागला.
एस.टी.चं वातावरण
तयार झालं. माणसाच्या गप्पा रंगत चालल्या.
‘कोणत्या गावाला किती भाडं असणार.’
‘पुण्याला जायला काय सीट नाय मिळायची.
खेड्यातली माणसं कशाला तिकडं फिरकतीन.’
‘आवं माणसाच्या कनपटीलाबी चार पैसे
पायजेत, तवा यीस्टीची चैन परवडन. कंडक्टरला
पैसे द्यायपरीस पायी गेलं, अन् हॉटेलात मस्त
मिसळपाव खाल्ला तरी पोटाला व्हतंय.’
माणसांच्या गप्पात
ताशाचा आवाज मिसळून कुणाचं कुणाला नीट ऐकू येईना. आता गप्पात रंगलेली माणसं, आबड्याकडं रागानं
बघू लागली. कुणीतरी ओरडलं सुद्धा, ‘‘ए आबड्या, बंद कर तुझा ताशा, बस जरा निवांत.’’
आबड्यानं ताशाच्या
काड्या कपाळावर-डोक्यावर नेऊन सलाम केला. ‘‘जी. जी. थांबतू आता, जसा तुमचा हुकूम.’’
तिकडं जरा अंतरावर
चार-पाच माणसं गोल करून बसली होती. ताशाचा आवाज बंद झाल्यावर ती बिघडलीच. त्यातला
एक डोळे वटारून आबड्यावर ओरडला. ‘‘अय, हेकन्या, वाजव की जरा, का लगीच दमला. च्या
नाय पिला का?’’
‘‘आता हिकडं बसलेली म्हणत्यात, बंद कर, तुमी तिकडून म्हणता
वाजीव, आता मी ऐकायचं कुणाचं?’’ आबड्याला राग आला, त्याला वाटलं ताशा
खाली ठेवावा, अन् ताशा बडवायच्या ह्या काड्यांनी, ही माणसंच बडवावीत.
झाडावर वरच्या
फांदीवर बसलेला माणूस ओरडला, ‘‘ओ बंद राहू द्या
ताशा, मी नजर लावून बसलोय. यीस्टी आली तर
तिचा आवाज नाय नीट ऐकू यायचा. आता हिथून मला दोन मैल, म्हंजी
बाळासाहेबाची पट्टी हैना, तिथवरचं दिसतंय बघा, अन् गाडीचा फुफाटा
उडाला की मी सांगतो तुमाला.’’
सगळ्यांनीच माघार
घेतली. आबड्यानं ताशा खाली ठेवला. हुसेनला त्यानं त्याच्याजवळ बोलवून घेतलं. दोघं
गप्पा मारत बसली.
‘‘अबदूल, तू कवा आलास? मला समजलंच नाय’’ आज हुसेन आबड्या
म्हणण्याऐवजी आपल्या खर्या नावानं बोलला याचं आबड्याला नवल वाटलं. ‘‘आलतो परवा सांजच्या
टायमाला पण लई दमलो व्हतो. अख्खा दिवस झोपून काढला.’’
‘‘तर असू दे अबदूल, एक लक्षात ठेव.
शेवटी ही गावय. ह्या गावात काय काय जन लई चाबरट हायेत. तुला इच्चारतीन हुसेन राज
कपूरला भेटला व्हता का?
हुसेन त्याच्या घरी गेला होता का? हुसेन बॅन्डमधी
मास्टर व्हता का? तर तू नुसतं हूं म्हन. लई डिटेलमंधी
बोलू नको. राज कपूरच्या इस्टुडिओमंधी, आपल्याला वाचमननी
बडवल्याचं सांगू नको. नुसतं म्हण, हुसेन अन् त्यो
गोरा गोरा माणूस काय बोलला, मला काय नाय समजलं.
पण त्यो हुसेनवर लई खूश होता. आलं का तुझ्या लक्षात?’’
आबड्या त्याच्या
चेहर्याकडं बघत बसला.
‘‘आरं बघतू काय माझ्याकडं? मला काय पहिल्यांदा
बघतो काय तू? मी काय म्हणलो ती आलं का तुझ्या
डोस्क्यात? लक्षात ठेव माझं ऐकलं नाय तर आपला
दोस्ताना संपला.’’
‘‘बरं बाबा, मी कशाला सांगीन? ही तू आदी सांगितलं
ती बरं झालं.’’
‘‘नाय म्हंजी कसं, तू नाय बोलणार, पण गावात लई जनांना
आसला उद्योग सुचतो. उगच उचापती करत बसतेत. बरं तू मला शपथ घेऊन सांग, मुंबईचं काय
सांगणार नाय, काय ती राज कपूरचं बी सांगू नको, ती बॅन्डचं बी नको
अन् ती दंगलीचं तर आजिबात नकू. नायतर गावाला लागन व्हायची त्याची. आता तू नाय
म्हंतो म्हणल्यावर नाय सांगणारन्. माझा हाय भरवसा, पण जरा मला वचनदी.’’
‘‘ही घई वचन.’’ तंबाखूची डबी दाखवत
आबड्या म्हणाला, ‘‘ह्या अण्णाशपथ सांगतो मी काय नाय सांगायचो.’’
हुसेननं आबड्याच्या
ताशावरून मायेनं हात फिरवला.
तेवढ्यात पंचायतीचा
शिपाई पळत आला. त्याच्या हातातल्या धोतरात त्यानं झेंडूची फुलं आणली होती.
सरपंचाला तो फुलं दाखवत होता, तर सरपंच एकदम
बिघडले.
‘‘आरं, तुला कोतवालचा
चपराशी केला, पण अक्कल नाय वाढली. ही फुलं काय
मड्यावर उधळायचीत का?
तुला काय सांगितलं व्हतं?’’
‘‘भाऊसाहेब, तुमी मला हार करून
आणायला सांगितला व्हता,
पण रानात फुलं जमा केली. अन् हार
करायला बसलू तर दोरा ववताना सुई कुठं खाली पडली, ती काय घावंना, बरं इकडं बघ, तिकडं बघ, शेवटी टाइम लागला
व्हायला. अन् ती काय घावंना. म्हणलं, चला आता पळत, नायतर यीस्टी जायची
निघून.’’
फुलं तिथंच ठेवून
तो कुणाच्या तरी घरी सुई आणायला गेला. सरपंच कावल्यावनी झाला.
तेवढ्यात वरून
फांदी हलवत वरचा माणूस वरडला, ‘‘दिसली. खंडोबाच्या
माळाच्या पलीकडं, बघा बघा फुफाटा उडालाच दिसतोय, लई फुफाटा उडवती
राव ही गाडी. अन् आता माळाच्या सुलपाला लागली. तिला चढवंना. नुसता बुंग बुंग आवाज
येतोय.’’
तो सरसर उतरत खाली
आला. पांगलेली माणसं जमा झाली. सरपंचानी टोपी नीट केली. पाटलानं त्याच्याकडं
रागानं पाह्यलं. आजकाल सरपंचामुळं पाटलाचा मान कमी व्हायला लागला होता.
शेवटी एस.टी.
पाराजवळ आली. थांबली. सगळ्या गावकर्यांनी ड्रायव्हरला, कंडक्टरला रामराम
केला. ‘‘या सायेब खाली या.’’ गावकरी फार नम्र
झाले होते.
आबड्यानं ताशा
वाजवायला सुरुवात केली. तडम् ताड ताड, आवाज नुसता घुमू
लागला. ड्रायव्हर कंडक्टरला कळंना, काय चाललंय ते.
कंडक्टर म्हणाला, ‘‘किती सीटयत? घ्या बसून.’’
तेवढ्यात कुणीतरी
ड्रायव्हरला, कंडक्टरला कपाळावर गुलाल लावला. सरपंच
म्हणाले, ‘‘आज नाय जाणार कुणी. तुमाला हळूहळू सीट
मिळत्येन. थांबा आता,
एस.टी.ची पूजा करायचीय. आज पहिला
दिवसंना.’’
एस.टी.च्या समोर
माणसं उभी राहिली. पोरं उगीच एस.टी.ला इथं हात लाव, तिथं हात लाव करत
होती.
आबड्या गाडीच्या
इंजिनसमोर जोराजोरात ताशा वाजवत होता. आबड्याला वाजवताना बघून हुसेन खुशीत आला अन्
तो ठेक्यावर नाचू लागला. हुसेनचा नाच बघून माणसं खूश झाली. हुसेन खाली वाकत होता, वर आभाळात बघून हात
वर करत नाचत होता. कधी स्वत:भोवती गोल गिरक्या घेत होता. कधी मोरासारखा नाचत होता.
माणसं खूश झाली. नाचणं काही थांबंना. इकडं ड्रायव्हर कंडक्टर ताठून गेली.
हा नाच चालू
असल्यामुळं तेवढ्या वेळात कोतवालानं हार केला. पूजेचं ताट घेऊन तो पुढं आला.
सरपंचाला म्हणाला, ‘‘भाऊसाहेब घ्या पूजा करून.’’
सरपंचांनी पाटलाला
हाक मारली. ‘‘पाटील गाडीची पूजा तुमीच करायची.’’
पाटील रुसल्यासारखा
मागंच उभा राहिला. ‘‘नाय, नाय घ्या तुमी करून
भाऊसायेब. आता समद्या ठिकाणी मान तुमचा. आमची पाटीलकी आता फक्त आमच्या वाड्यावरच.’’
‘‘नाय वो पाटील, जी रीत
पहिल्यापासनं चालू हाय,
तीच पुढं चालू राहणार. तुमीच आमाला
म्होरची वाट दावणार.’’
‘‘या पाटील पुढं, या पाटील पुढं’’, माणसंपन म्हणायला
लागली. ‘आता मी बोलावलं पाटलाला ती ठीकय, ही कशाला मधीच
थोबाड पसरवत्यात?’ सरपंच मनातल्या मनात चिडला होता पण
वरून हसत हसत म्हणाला,
‘‘हां, घ्या ही सामान. ही
पाणी, ही गंध, उदबत्ती, नारळ, समदं बैजवार आणलंय.
अय रामदास ती हार घी बांधून.’’
पाटलांनी गाडीची
पूजा केली. नारळ जोरात फुटला. त्याचे दोन टुकडे आणि पाणी बाजूला उडालं. इंजीनवरही
उडालं.
हुसेनच्या हातात
गुळाचं घमेलं होतं. बारीक केलेला गूळ तो सगळ्यांना वाटत होता. सगळ्यात पहिल्यांदा
त्यानं ड्रायव्हर, कंडक्टरला, मग पाटील, सरपंचाला अन् मग जो
दिसल त्याला. अधून-मधून तोही गूळ खात होता.
शेवटी कंडक्टरने
सरपंचाला विचारलं, ‘‘निघू का आता?’’
‘‘हा निघा आता, तुमाला लई लांबचा
पल्ला गाठायचाय. आता उशीर नका करू.’’
गाडीत फार सीटं
नव्हती. होती सात-आठच पण हा वायफट चाललेला वेळ पाहून ती आतल्या आत धुमसत होती.
कंडक्टरनी बेल
वाजवली अन् दार ओढू लागला, तसं सरपंच पळत पुढं
आले, दार धरत ते म्हणाले, ‘‘थांबा, लावू नका.’’
कंडक्टरने पुन्हा
सिंगल बेल मारली. त्याला वाटलं, कुणाला तरी बहुधा
सरपंचानाच यायचं असणार. पहिलं तिकिट ते फाडणार असतील. पण सरपंच ओरडले, ‘‘थांबा सायेब, आतल्या माणसांना
गूळ द्यायचा राहिला.’’
ते हुसेनवर ओरडले, ‘‘अय हुसन्या, आत घूस एसटीत लवकर
अन् समद्यांना गूळ वाट. म्हणावं, आमच्या सरपंचाच्या
गुर्हाळावरचाय. विकत नाय आणलेला. नुसता पेढाय म्हणावं.’’
आता कंडक्टर आणि आत
बसलेले आतल्या आत चिडत होते. हुसेन आत घुसला. सगळ्यांना गूळ वाटत होता. लोक
त्याच्याकडं रागानं पाहतच घेत होते.
हुसेन खाली
उतरल्यावर कंडक्टरने रागानं जोरात दार ओढून घेतलं अन् जोरात डबल बेल मारली.
सगळ्यांना ऐकू जाईल असं तो म्हणाला, ‘‘आयला, शंभर माणसं जमली; पण एक नाय चढला. हू, कसला रूट मिळालाय
मला?’’
पुढं जाणार्या
एस.टी.कडं लोक कौतुकानं पाहत होते. एस.टी. दिसेना झाल्यावर ते हुसेनकडं कौतुकानं
पाहत होते. ‘‘काय नाचला राव तू हुसन्या.’’ माणसं त्याच्यावर
खूश होती.
हुसेन म्हणाला, ‘‘आपल्या गावातली
माणसं लई चिकाट. मुंबईत आसतो तर हजाराचा खुर्दा जमा झाला असता, नुसती ववाळून
टाकतेत.’’
‘‘आरं, तू आपल्या गावातला, घरचा, तुला काय द्यायचं? तू असं कर, ह्या दुसर्या
घमेल्यातला गूळ तसाच शिल्लक रहायलाय. जा घेऊन तुझ्या घरी. त्या सरपंचाला काय परत
दिवू नको. त्याला काय बोक आलाय. जा घेऊन घरी.’’
माणसं घरी गेली.
लोकांना माहीत
नव्हतं, की एस.टी.मुळे रस्त्यावर उडालेला
फुफाटा खाली बसन, पण आता गावात असा फुफाटा उडन की त्यो
दिसणार बी नाय. कोण कोणाला दिसणार नाय. ह्या फुफाट्यात पहिल्यांदा कोसळणार आहे तो
म्हणजे पार. पार राहील,
त्याचे चिरेबंदी दगड राहतील, पण त्या पारावरचा
स्वच्छ, निर्मळपणा फुफाट्यानं पांढरा होणार.
गाव बदलून जाणार. ह्या फुफाट्यात ते हरवणार.
-
अरुण जाखडे

Comments
Post a Comment