सकाळी हुसेन उठला, तेव्हा त्याला कालची संध्याकाळ आठवली. ते भास होते का स्वप्न? आपल्या पाठीमागे भीतीचे भूत लागले आहे, याची त्याला कल्पना आली. आपण ज्या भीतीने झपाटलो आहोत, ती भीती इथे या गावात वाटण्याचं कारणच नाही. काल मला घरी सोडायला निम्मा गाव आला होता. माणक्या आपली वाट पाहत होता. इथे ना धर्म, ना जात, इथे तर आहे फक्त माणुसकीचा झरा. न आटणारा, गटागटा प्या, नाराळाच्या पाण्यावाणी गोड.
तो स्वत:शीच हसला. मुंबईचं आता विसरून जाऊ. दोनशे कोसावर भूकंप झाला म्हणजे आपल्या गावात थोडाच होतो. तरीही त्याच्या पोटात शंकेचा गोळा फिरला. आज नाही उद्या, इथपर्यंत पोचलंच ना. आता नवी फॅशन मुंबईत आली की गावातल्या पोरीबाळी नाही का तसली कापडं घालत. हा फिरता गोळा त्याने हातानं एका कोपर्यात बसवावा तसा बसवला. उद्याचं कोण पाहतंय, आज तरी आबादी आबाद हाये ना. तेवढं बास. आता उद्या आपण जगतोय का मरतोय, हे कुठं सांगता येतंय?
गोळा जागेवर बसला, हुसेनभाई ताजातवाना झाला. त्यानं पोरांंना हाका मारल्या. सगळ्या भावाची पोरं त्याच्याभोवती गोळा झाली. लहान पोरांचे मुके घेत तो म्हणाला, ‘‘बघा पोरांनो, तुम्हाला मी खाऊ आणला, खेळणी आणली. आता तुम्ही खूष झाला ना? पण लक्षात ठेवा, तो बाहुला आहे ना, जोकर म्हणत्यात त्याला, त्याला मात्र हात लावला की एकेकाची तंगडी तोडून टाकन. मी जशी तुम्हाला मुंबईची आठवण आणली, तशी आठवण मला एका माणसानी दिली. आता तो जोकर म्हणजे माझं काळीज समजा.’’
त्यातल्या एका पुतण्यानं विचारलं, ‘‘चाचा, मुंबईमें क्या यात्रा थी क्या, इतने चित्रे खरिदके लाया?’’
‘‘अरे, यात्रा क्या बच्चू, वहॉं तो गली गली में यात्रा.’’
‘‘अच्छा! कोनसे भगवानकी? उरूस भी होता है क्या उदर?’’
‘‘अरे, वहॉं एकही भगवान है, उसका नाम– दामाजी’’, हुसेननं बोटानं पैसे मोजल्याच्या खुणा केल्या.
पोरांना पटवून तो उठला. लुंगी गच्च आवळली अन् खाकरत त्यानं चुलीचा अंदाज घेतला. चहाचं पातेलं चुलीवर पाहून तो आणखी ताजा झाला. बँड कंपनीत चहाची किटली घेऊन येणार्या बारक्याची त्याला याद आली. हुसेन ओरडला,‘‘चायेऽऽगर्रम, चायेऽऽगर्रम,’’ अन् चुलीच्या भोवती बसलेल्या भावजया, अन् त्यातली एक त्याची बीबी– यांच्याकडं पाहत तो म्हणाला, ‘‘अरे बॉम्बे टी बनावो. खाली पाणी उकळके मत दो. तुमको क्या मालूम बॉम्बे टी क्या होता है?’’
सगळं कुटुंब हसलं. हुसेनची बायको लाजली. तोंडाला पदर लावून हळूच हसली.डोक्यावरचा हंडा रांजणात रिकामा करावा, अन् डोकं आणि हंडा रिकामा, हलका व्हावा, तसं हुसेनभाईचं झालं. तो पूर्वीच्या मूडमध्ये आला. आज शाळा सुटायच्या वेळेसच, 5-5.30वाजता तो शाळेसमोर उभा राहिला. घंटा वाजली अन् मुलं चिंग पळत सुटली. आज त्यांना किती दिवसांनी हुसेनचाचा दिसला होता. मुलांच्या गराड्यात तो हरखून गेला. मुुलं एकच प्रश्न विचारत होती, ‘‘चाचा इतके दिवस कुठं गेला होता?’’
हुसेन त्यांचे गालगुच्चे घेत सांगत होता, ‘‘अरे सुनो, सुनो जरा- मैं गया था मंबई, ये मंबई एक अजीब शहर है. अब तुम बताओ, तुममेसे किसने मंबई देखी?’’
मुलं एकमेकांच्या चेहर्याकडं पाहत होती. एकजण म्हणाला, ‘‘मी पाहिली, चित्रात पाहिली.’’
सगळी मुलं खिक्-खिक् करत हसली.
‘‘अरे बच्चो, मुंबईकी एक अलग शान है, हमारी राजधानी है, वहॉं एक घर के उपर दुसरा, उसके उपर तिसरा, अरे उपर देखा तो टोपी गिर जाती है, इतनी उंची इमारते, नागीण सळसळत जावी तसल्या रेल्वेगाड्या नुसत्या पळत राहत्यात. अन् आपण घाबरून लांब उभं राहतो. आता लई मज्जा. ती काय येक दिवसात सांगायची गोष्ट का? तुम्हाला आता सविस्तर, डिटेलमंधी सांगतो. आता पळा घरी, चार घास खावा, अन् या परत खेळायला मैदानावर.’’
हुसेनचाचा पोरांच्या गराड्यातून सटकला. खरं तर तो मुंबईची स्टोरी सांगण्यात रमू लागला होता. थोडा खुलला पण त्याला पारावर जमलेली माणसं दिसली. अन् तो तिकडं सरकला.
‘‘सलाम गाववाले’’, म्हणत हुसेन पारावर टेकला.
नानू सुतार हुसेनकडं पाहत म्हणाला, ‘‘बरं वाटत असलं तर टेक इथं. नायतर फुकाट आमच्या डोक्याला टेन्शन. च्यायला काल कसलं घाबरून सोडलं रं तू?’’ रंगूदादा मांडीवरचं धोतर नीट सावरत म्हणाला, ‘‘हुसेन, तुला काल मी नीट पाहिलं, मला वाटतं, तू काल कोणत्यातरी जगात रमला होता. तू इथला राह्यलाच नव्हता. तुला पीर दिसला का तिथं?’’
हुसेननं ‘नाही’ म्हणत मान हलवली.
मग फकीर, साधू, गेला बाजार एखादं भूत, हाडूळ– हुसेननं मान हलवली– ‘‘नाही.’’
‘‘मग नुसती टक लावून काय बघत व्हता? मावळत्या सूर्याकडं तुझी नजर स्थिर व्हती.’’ कोणीतरी म्हणालं, ‘‘त्याचीच झापड आली आसन त्याला. तुला ठाव नाय, मेलेल्या माणसांवाणी कडक झालास तू.’’ इतका वेळ गप्प बसलेला माणक्या कावला. अन् म्हणाला, ‘‘लई ताणू नका आता ते रामायण, त्याच्यापेक्षा त्याला इच्चारा की ममईची हवा-पाणी.’’
‘‘हवा-पाण्याचं द्या सोडून, ती काय कवा गार आसती कवा गरम.’’ रघू करांडेनं विषय बदलून टाकला. रघू करंडेचा आपला ठरलेला सवाल आसतो. कोणत्या गावाचा पावणा आला की त्याला इच्चारायचं, तू कोणाच्या गावचा. समजा तो त्याला म्हणाला की, राक्षसवाडीचा किंवा देमणवाडीचा किंवा होल्ह्याच्या वस्तीचा, की लगेच रघू विचारणार, सांग राक्षसवाडीला राक्षसवाडी का म्हणत्यात. तर त्याची ही सवयच म्हंजे हॅबीटच. तसं त्यानं हुसेनभाईला हाच सवाल टाकला, ‘‘ममईला ममई का म्हणत्यात?’’
हुसेननं ह्या गोष्टीचा विचार केलाच नव्हता. त्याचं कारणही नव्हतं. त्यानं खरं सांगितलं, ‘‘नाय बुवा सांगता यायचं. समदी म्हणत्यात म्हणून मी म्हणतो, आपण सगळीच म्हणतो.’’
रघू करंडे हातावर हात आपटत म्हणाला, ‘‘मग तू, काय ममईत रसगुल्ले खात फिरला का बोंबलाच्या काड्या चघळत. तू नुस्ता बोंबलभिक्या, महिनाभर राहून तू कोरडाच राहिला, आपल्या भीमेच्या गोट्यावाणी, माणक्या वैतागून म्हणाला, ‘‘तू लई हुश्शारयस तर सांग की तू’’ ‘‘आता मी काय ममईला जाऊन आलो का?’’ रघू तंबाखू चिमटीत पकडत म्हणाला, ‘‘मी आसं चिमटीत पकडलं, की तुमा लोकांना लई लागतं.’’
‘‘चिमटीत पकडायला काय तू ढेकणं मारायला निघाला नाहीस. पण तू जरा आमच्यापासनं जास्तीच हुशार हायेस. तवा म्हणलं, तू जरा तुझ्या अकलेचा दिवा पाजळ म्हंजी आमाला बी चार गोष्टी समजतीन.’’
‘‘मी सांगितलं तर तुमाला पटणार नाय. अन् मला काय ती पटविण्याची कला नाय.’’ – रघू.
‘‘आरं समजंन तेवढं समजंन, तुला माहीत आसन तर सांगकी.’’ स्वत:ला जरा सावरत, डोक्यावरची टोपी नीट करत, शरीर जरा ताठ करत तो म्हणाला, ‘‘ऐका, आता मी सांगायला लागलो की, कुणी मधी थोबाड बुचकाळायचं नाय. अन् इकडं तिकडं वास घेत मुंडकं फिरवायचं नाय. समजदं काळजीपूर्वक ऐका-’’
‘‘– तर मी सांगत व्हतो, ममईला ममई का म्हणत्यात? ह्योच दांडगा सवाल हाय. तर त्याचं काय– ममईला पहिलं काय म्हणत व्हते माहिती का –’’
‘नाही’ सगळ्यांनी माना हलवल्या.
‘‘ममईला बॉम्बे म्हणायची. समद्या जगातली. म्हणजे ती सातासमिंदरापलीकडची माणसं सुदिक बॉम्बे म्हणायची.’’
‘‘हा, हा, बॉम्बे, बॉम्बे.’’ लोकांना पटलं, माना हलवल्या. ‘‘तर ते काय झालं. बॉम्बेत पाकिस्तानच्या हरामखोरांनी दहा-पाच फुसके बॉम्ब उडवले. कुठं–?’’
‘‘बॉम्बेत.’’ लोकं एका आवाजात म्हणाली.
‘‘आता फुसका बॉम्ब असला तरी फुसूक फुसूक करतंच की. आता तशी थोडीफार माणसं आपली गमावली. तवा सरकारनं ठरवलं. आता बॉम्बेचं नावच बदलून टाका. बॉम्बे नावात बॉंब हाये तवा बॉम्ब शब्द उडवून टाका. फकस्त ममई म्हणायचं. तवापासनं बॉम्बेला ममई म्हणायला लागली.’’
रघ्याचा कान पकडत माणक्या म्हणाला, ‘‘ये रघ्या, ममई आपली गावरान माणसं म्हणत्यात. शिकली सवरलेली मुंबई म्हणत्यात. च्युत्या बनवतो का काय आमाला तू?’’
माणक्याच्या हातातला कान सोडवत रघू म्हणाला, ‘‘आरं थांब जरा, स्टोरी इथं नाही संपत. म्हणून मी आगूदरच बजावलं व्हतं, मंधी मंधी थोबाड बुचकळू नका. तर काय म्हणत व्हतो- ही अशी माझी तार तुटली. मंधीच इसारल्यावणी व्हतं.
‘‘हां, तर ते काय शिकलेली तेवढी हुकलेली. त्यांनी ममईचं बी इंग्रजी करून टाकलं. तर खरं नाव ममई, मम म्हंजी माझी. कालच कीर्तनवाल्यांनी सांगितलं ना, ‘मम हृदयास यातना फार’, तर मम म्हंजी माझी अन् त्याला पुढं आई जोडलं, झालं ममई.
‘‘आता ममई म्हंजी माझी आईच नव्हं का, आता तिच्या कुशीत कोकणातली लेकरं जात्यात, इकडं वर्हाडातली जात्यात, अन् पार ती लुंगीवाली मद्रासी काय, भय्ये काय, समद्या लोकांना आपल्या कुशीत घेती. खायला-प्यायला देती, म्हणूनशान माझी आई, आता ममई. आता अठरापगड जातीची अन् हजार भाषा बोलणारी माणसं. कुणी मुंमई, कुणी मुंबई, कुणी मुंबै अशी म्हणायला लागली. आता सरसगट सरासरी काढली तर मुंबई व्हायला लागली.
‘‘आता माणक्या ऐक, तू ममई म्हण, मुंबै म्हण, मुंबई म्हण, समद्यांना समजन. आता आलं का डोस्क्यात बॉम्बेला मंबई अन् मुंबईला मम्बई का म्हणत्यात. माझी आई- ममाई, आलं का ध्यानात? माझी ही आई सोडणार नाय म्हणून शंभरावर पाच माणसं मेली. पण ही आई पक्काट धरून ठेवली, ती आपल्याकडंच राहिली. त्या टायमाला लई कालवा माजला. आता कोणता माणूस आपली आई सोडन्?’’
सगळ्यांना रघू करांडेचं कौतुक वाटलं. एवढी डिटेलमंधी हकिकत ह्याला माहिती कशी?
माणक्या म्हणाला, ‘‘रघ्या, तू गाव सोडून शहरवस्तीला गेला असता ना तर म्होरं गेला असता, इथं ढेकळात तुझं हुशारीपण पावसाळ्यातल्या पाण्यावानी विरघळून गेलं.’’
रघू करांडेच्या चेहर्यावर तरतरी आली. डोळे बारीक करत तो म्हणाला, ‘‘चौकस रहावं लागत माणसांनी, बरं का हुश्शेनभाय.’’
इतका वेळ सगळी माणसं कान टवकारून रघूची गोष्ट ऐकत होती. आता चुळबूळ सुरू झाली. नानू सुतार उठत म्हणाला, ‘‘जातो आता घरी, लई पानच्याट गप्पा चालल्या. आता त्या हुस्न्याचं काय ते ऐकायचं सोडून ममईला ममई का म्हणत्यात, आसलं एरंडाचं गुर्हाळ लावलं. त्याला चव ना चोथा, मी जातो घरी. वाडग्यात गुरं आली असत्यान, उद्या रघ्या तुम्हाला बी इच्चारीन, माणक्याला माणक्या का म्हणत्यात? तुम्ही पण लई येड्याच्या नादी लागता.’’
माणक्या वैतागून म्हणाला, ‘‘रघ्या, तू आज सगळ्या बातांचा इस्कोट केला. माणसं टपली व्हती, हुस्न्याचं ऐकायला. पण जाऊद्या. उद्या ऐकता यीन.’’
एक-एकजण तिथनं निसटला. माणक्या अन् हुसेन दोघेच राहिले.
हुसेनचं लक्ष मावळत्या सूर्याकडं गेलं. तोच सूर्य, ज्याच्याकडं पाहताना काल काहीतरी विपरीत घडलं.
मक्केकडं तोंड करून उभं राहावं, तसा तो उभा राहिला. मावळत्या सूर्याला मनातूनच नमस्कार केला.
माणक्यानं विचारलं, ‘‘हुसेन, तुला काल काय झालं, ते आठवतंय का? कशामुळं तू निपचीत झाला.’’
‘‘अल्ला शपथ, मला नाय सांगता येत.’’ हुसेन माणक्याला आलिंगन देत एवढंच पुटपुटला. ‘‘अल्ला ये रिश्ते, ये दोस्ती, ऐसीही रहने दे. इसमें ना धर्म की, ना जात की दिवार खडी कर.’’ हुसेनचे तोंड माणक्याच्या खांद्यावर होतं. माणक्याचा मानेला, गळ्याला, हुसेनच्या दाढीनं गुदगुदल्या झाल्या.
हसता-हसता तो म्हणाला, ‘‘हुसेन घर चल.’’
माणक्याचा हात हातात घेताना, त्याला वडील नेहमी म्हणायचे तो शब्द आठवला- ‘अलहमदोलिल्ला’
माणक्यानं विचारलं, ‘‘तू आता काय बोललास?’’
हुसेन म्हणाला, ‘‘मेरा बाप कभीकभी बोलता था ‘अलहमदोलिल्ला’ – याने कि किसकी नजर न लगे. अपनी आपको भी नही. माणिक, अपने गांव में जो अपनापन है, जो एक दुसरे से प्यार करते है, उसे किसीकीभी नजर ना लगे. ना अपने दोस्तीको, ना अपने प्यार को.’’
छायाचित्र : किशोर दिवाळी अंक २०१६
— अरुण जाखडे

Comments
Post a Comment