हुसेनभाई गावात पोचल्याची बातमी वार्यासारखी पसरली. सगळ्यांना तर तो परत यावा अन् त्याची गप्पांची मैफल ऐकावी, पार परत फुलावा, गडबडगुंडी परत सुरू व्हावी असे वाटत होते. त्याचा आवाज ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आसुसले होते.
आणि तो हुसेन आला म्हटल्यावर, आता एकच लक्ष लागलं, ते म्हणजे तो घरातून बाहेर पडण्याकडं आणि पारावर कधी येतो याकडं.
हुसेन घरी आल्यावर बुढ्ढीजवळ बसला. पण तो काही बोलत नव्हता. जुजबी प्रश्नोत्तरं झाली. बुढ्ढीला वाटलं, प्रवासाचा शीण असतो. रात्रीचं जागरण झाल्यामुळे तो असा थकल्यासारखा झाला असावा. हुसेन अंघोळीला गेला. त्याच्या बीबीनं गरम पाणी आणून ठेवलं, पण तिच्याकडं पाहूनही तो फक्त केविलवाणं हसला. काहीच बोलेना म्हटल्यावर तीच म्हणाली, ‘‘अजून पाणी पाहिजे का?’’ पण हुसेननं फक्त नकारार्थी मान हलवली. ती बराच वेळ तिथं घुटमळली, तिला वाटलं, हुसेन बोलेन, काही विचारील, पोराबाळांबद्दल काही जाणून घेईल. पण हुसेन फक्त गरम पाण्यातून बाहेर येणार्या वाफांकडं एकाग्र होऊन लक्ष देत बसला. शेवटी त्याची बीबी म्हणाली, ‘‘चलो, जल्दी नहाके आवो. खाना तयार है’’ अन् थोडी रागानेच पाय आपटत निघून गेली.
पाण्यातून वाफा यायच्या बंद झाल्या. तरी हुसेन तसाच. शेवटी एकदाची त्यानं अंघोळ केली. घरात येऊन बसला. जेवण करताना फार मोजकं बोलला, शेवटी बुढ्ढी एकदम भडकली, ‘‘काय रे हुस्न्या, तुझ्या तोंडाला काय मुसक्या बांधल्या काय मुंबईतल्या लोकांनी?’’
हुसेन फक्त हुंकार दिल्यासारखा हसला. बुढ्ढीला वाटलं प्रवासाचा थकवा, खाण्या-पिण्याचे हाल झाले असणार, ती म्हणाली, ‘‘हुस्न्या ते तळवट पसरून जरा झोप मार अन् गावात फिरून ये म्हणजे तुला मोकळं मोकळं वाटल.’’ हुसेन तळवट पसरून त्यावर अंगाला आळोखेपिळोखे देत अंग सैल सोडून पसरला. डोळे मिटले. पण मिटलेल्या डोळ्यात त्याला दिसत होत्या. मुंबईतल्या त्या मिरवणुका, भगवा-हिरवा रंग आणि त्या घोषणा, दगडफेक, दंगल.
हुसेनला थोडी डुलकी लागली. चार वाजता डोळे चोळत चोळत तो उठला. चूळ भरून तोंडावर पाणी फिरवलं. ओली झालेली दाढी लुंगीनंच पुसून तो शेंगाच्या पोत्यावर बसला. त्याच्या धाकट्या भाभीनं चहा आणून दिला. त्याला तरतरी आली. काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलला, ‘‘बुढ्ढे, अल्लाची मर्जी म्हणून मुंबईत राहता आलं, फिरता आलं. पण शेवटी आपल्या गावची याद यायची, तुझी यायची, पोराबाळांची अन् जनावरांचीसगट.’’
बुढ्ढीला हुसेन काहीतरी बोलला याचं बरं वाटलं. ती म्हणाली, ‘‘जुनी माणसं उगीच म्हणायची का मरावं काशीत नाय तर वेशीत.’’
हुसेननं मान हलवली. तो शेंगाच्या पोत्यावरून खाली घसरला. त्याच्या बीबीनं तोंडाला पदर लाऊन हसू आवरलं.
हुसेन घराबाहेर पडला. पारावर पोचायला त्याला बराच वेळ लागला. कारण कुणी भेटलं की कवा आला? कशी वाटली मुंबै? परत जाणारे का? अशा प्रश्नांची उत्तरे देत तो पारावर पोचला.
‘‘सलाम आलेखुम मुंबैके पाव्हणं, सलाम आलेखुम मुंबैकर,’’ अशा सलाम स्वीकारण्यात अन् चेष्टा मस्करीत जरा वेळ गेला.
तेवढ्यात माणिक येताना दिसला. सगळे हसले. ‘‘अरे हुसेनचाचा, ये तुम्हारी बहुत याद निकलता था.’’ तेवढ्यात माणिकनं फुलं असलेल्या तरवडाच्या फांद्या तोडल्या. त्या जुळवून तरवडाच्या फुलाचा गुच्छ केला. त्या हुसेनच्या हातात देत माणिक नाचू लागला.
‘‘बंबईसे आया मेरा दोस्त, दोस्तो सलाम करो.’’
थोडी चेष्टा-मस्करी झाल्यावर रामा करांडे म्हणाला, ‘‘ये ते राहूं द्या बाजूला. हुसेन तू आता जरा लाव मुंबईची ष्टोरी. च्यायला, आमाला गावची शीव कवा वलंडता आली नाय. कळूं दे आता तुझी मुंबईची हकिकत डिटेलमंधी.’’
पण हुसेन काही फार बोलत नव्हता. पुन्हा कधीतरी सांगन म्हणाला.
हुसेन काही खुलंना म्हणल्यावर लोकांचा हिरमोड झाला, शेवटी वैतागून रामा करांडे म्हणाला, ‘‘ये हुस्न्या, तुला कुणची चावी लावल्यावर तुझं डोकं बिंगन. उताराला लागल्यावर सायकलचं चाक बिंगतं तसं बिंगव की एकदा.’’
हुसेनचा गंभीर चेहरा पाहून सगळे गोंधळात पडले. हुसेननं समोर पाहिलं. डेरेदार आंब्याच्या, पिंपळाच्या झाडातून त्याला सूर्य दिसला. दिवसभर तापल्यानं तो लालबुंद दिसत होता. पण डोळ्याला भिडला तरी गारच वाटत होता. त्या मावळतीकडं निघालेल्या सूर्याकडे तो शून्य नजरेने पाहत राहिला.
त्याचा हा बधीरपणा पाहून, माणक्यानं त्याला जोरात थाप मारली. ‘‘अरे हुसेन, असा काय बघतो?’’ ह्या छोट्याशा थापेनेसुद्धा हुसेन खाली कलंडला.
‘‘आरं लवंडतो काय असा मोकळ्या अधुलीवणी. जरा सांग की तुला एखाद्या देखणीची याद येती. त्या देखणीची गोष्ट सांग की, तुझ्या स्टाईलमंधी. आरं असल्या नटव्या लई भेटत्यात, इसरून जायचं जिथल्या तिथं.’’
माणिकच्या ह्या बोलण्यावर सगळं हसले. हसला नाही फक्त हुसेन.
हुसेनला त्या सूर्याकडं पाहत राहावं वाटत होतं. त्या झाडांच्या फांद्यांच्या फटीतून दिसणारे ते कोवळे किरण व फांद्या, झाडांचे शेंडे. पाहता पाहता त्याला एकदम धुळीचे लोट यावेत अन् सगळं धुरकट, धुरकट दिसावं. त्याला ती डेरेदार फांद्यांनी डवरलेली झाडं प्रथम धुरकट दिसू लागली. नंतर काहीतरी धुक्यात ती दृष्टीआड व्हावीत तशी दिसेनाशी झाली. तिथं धुकं गोळा झालं. पण ते पांढरंशुभ्र नव्हतं. ते विषारी धुकं असावं अन् ती झाडं, झाडावरची पाखरं अन् सृष्टीलाच जाळणारं असावं असे त्याला काहीतरी भास होऊ लागले. त्या धुक्याचा रंग बदलला, तिथं कधी भगवे, कधी हिरवे ढग दिसू लागले. कधी तो एकमेकात मिसळता मिसळता ते अलग होताहेत. त्या हिरव्या, भगव्या धुक्यांचे कण डोळ्यात चुणचुणू लागले. रंगपंचमीला उधळावे त्यापेक्षा कितीतरी तीव्र ढग-दोनरंगी. दोन रंगाचे त्यात सूर्याचे लाल, कोवळे किरण गुप्त झाले. सगळे गुप्त आणि त्या ढगांनी हुसेनला उचलू वर घेतलंय. त्याला भास झाला, आपल्याला कुठंतरी उंच, अज्ञात ठिकाणी उचलून नेलं जातंय. तो त्या भगव्या हिरव्यात आपला कोणता? आपल्याला कोण वर नेतंय, त्याला काही समजत नव्हतं.
आता भासांच्या धुक्याने त्याला लपेटून घेतलं आहे. त्याला अल्लाची याद आली पण त्याची जीभ इतकी जड पडली होती की, तो अल्लाचं नावही घेऊ शकला नाही. आपल्या शरीराला काही वजन नाही अन् उन्हाळ्यात जोंधळ्याचा पाला वार्याबरोबर आकाशात गोल गोल फिरत जावा, अन् शेवटी कोठे पोचला हे कळू नये असं त्याचं झालं. त्यानं ओळखलं, तोच तो भगवा गुलाल, हिरवा गुलाल, मुंबईत उधळळेला पाहिला होता. तोच रंग, तीच भीती. कोळशावर धूप टाकल्यावर जळणार्या धुपाकडं आणि त्या आजूबाजूला पसरणार्या धुराकडं पाहतो असा त्याला भास झाला. धूप तर जळून जात होता, पण कोळसा फुलत होता, लालबुंद भगव्या-हिरव्यात त्याला फुलणारी लाली दिसली. लालभडक, रक्तापेक्षा लाल, आता हा लाल रंग, पण तो वर जात नव्हता, वाहत होता. रक्ताचे पाट वाहताहेत अन् आपण त्या पालापाचोळ्यासारखे नुसते गरगर फिरत आहोत. त्याला आता आपलं डोकं गरगर फिरतंय असं वाटू लागलं. गरगर - गरऽऽगर - गरऽऽगर - अन् तो कोसळला.
माणिकनं त्याला गच्च धरलं. ‘‘हुसेन, हुसेन तुझे क्या हुआ, चक्कर आयी क्या?’’ कोणीतरी पळत जाऊन पाणी आणलं, त्याच्या तोंडावर डोक्यावर मारलं.
थोडा वेळानं हुसेनने डोळे उघडले. आपण तर पारावर आहोत अन् ही आपली दोस्तमंडळी.
तेवढ्यात राम करांडे लिंबू-मीठ-साखर टाकलेले सरबत घेऊन आला. हुसेनला सरबत पाजलं. त्याला थोडी तरतरी आली.
माणिकनं हुसेनला उभं केलं. ‘‘चलो घर जाके थोडा लेट जा.’’ सरबतामुळं त्याला थोडी शक्ती आली. माणिक हुसेनच्या दंडाला घट्ट पकडून हळूहळू चालत होता. बाकी मंडळी त्यांच्याबरोबरच.
घरी पोचल्यावर माणिकनं बुढ्ढीला सगळं सांगितलं. बुढ्ढी म्हणाली, ‘‘काल मुंबैहून आल्यापासनं नुसतं गुम-गुम बसतंय. काय होतंय सांगत नाय. मीच म्हणलं, जा गावात चक्कर मारून ये. तुला मोकळं वाटंन. पण हे काय झालं, अल्ला कृपाळू आहे. तो झोप झाली की नीट होईन.’’ तोपर्यंत कोणीतरी त्याला क्रोसीनची गोळी आणून दिली.
लोक हुसेनच्या घरी थोडावेळ बसून बाहेर पडली. कोणालाच काही कळलं नाही. हुसेनची मुंबईची गोष्ट ऐकायला ते उत्सुक होेते पण...
आज उद्या तो जागेवर येईन अन् बोलता होईल. चित्रगुप्तासारखा राजधानीतल्या तो बर्या-वाईट गोष्टी खुलून खुलून सांगेनच.
शाळेतलं एक बावळट पोरगं मधीच बोललं. ‘‘लिंढीच्या ओढ्याच्या कडंला एक तरवडावनी झाडंय. त्याला चिंचेवणी पानंय. ती त्याची फांदी अशी कुणाच्या तोंडाम्होरं धरली की ती हसतच सुटतं. हसत म्हंजी उताराला लागलेल्या गाडीवनी ब्रेक नाही लागत. ती फांदी लावू हुसेनचाचाच्या तोंडाला, ते हासत सुटन अन् हसता हसता सांगन समदं इसकटून इसकटून.’’
माणक्यानं त्या गैराट पोराला जोरात एक टोला मारला. ‘‘आयला, बापावाणीच कामातनं गेलंय हे बेणं.’’ ते बावळट पोरगं जोरात पळालं.
रामा करांडे म्हणाला, ‘‘आयला, आपल्या गावात एक-एक इब्लिसच जमा झालीत.’’
उद्या हुसेन पहिल्यासारखाच ताजा, हसरा, गप्पा मारणारा होईल, अन् ‘पाराला उत्साह येईन’ ह्या आशेवर सगळी पांगली.
— अरुण जाखडे
छायाचित्र : किशोर दिवाळी अंक २०१६ 
नमस्कार, सर आपल्या या ब्लॉगवरील हे धारावाही लेखन मी अधून मधून वाचत असतो . आपण एक प्रकाशक असूनही एक सिद्धस्थ लेखक आहात हे आपल्या पुस्तकावरून आणि संपादनावरून मराठी वाचकांना परिचित आहे. आपण आजारी असूनही आपलं काम सुरूच आहे . मी मागे पुण्याला येऊनही आपणास भेटू शकलो नाही . माफी मागतो . लवकरच भेटेन . आपण लवकर बरे व्हाल हि प्रार्थना !
ReplyDelete- सरदार जाधव