Skip to main content

हुसेनचा मित्र - ताशावाला आबड्या

    नेहमीप्रमाणे पारावर माणसं जमलीच होती, हुसेनलाच जरा वेळ लागला. हुसेनला पाहून माणसं खुलली. बराच वेळ एस.टी. ची वाट पाहत बसावं आणि इतका लेट झाल्यावर तिचा नाद सोडून परत घरी जावं, तसंच माणसं त्याची वाट पाहत होती. तसं रोजच पाहत असतात. आता हुसेनला पाहिल्याबरोबर त्यांचे चेहरे तरतरीत झाले. त्यात दुधात साखर पडावी अशी गोष्ट झाली, म्हणजे माणक्या पण रानातून घरी येत होता.

      हुसेन आणि माणिक समोरासमोर आल्याबरोबर हुसेनने उत्साहाने माणिकला हात जोडून ‘‘राम-राम माणिकराव पाटील, जयहिंद, नमस्ते, सलाम आलेखुम माणिकराव पाटील.’’ असं म्हटलं.
     ‘‘अरे, बस बस, इतके राम-राम नको, तुला भी राम-राम, जयहिंद, नमस्ते, सलाम आलेखुम हुसेनभाई जमादार!’’
      ‘‘ओ पाटील – जमादार, त्या भगत्याचा काटा काढल्यामुळं तुमची लईच शान वाढली. अन् लईच कोंबड्यावनी तुरा काढून तुमी फिरायला लागलं राव गावात.’’ एकजण म्हणाला.
        तेवढ्यात माणिक हुसेनला मागे ढकलत म्हणाला, ‘‘ए हुसेन, जा जरा मागं, खेळू हुतूतू.’’
        ‘‘आरं पण दोघंच?’’  
       ‘‘आरं एकट्यात पण खेळता येतं. दोन माणसात भी लई बळ असतं.’’ म्हणत माणिक पंचवीस फूट मागं पळत जाऊन पुढे आला – हुतूतू, हुतूतू, ...इकडून हुसेनपण दोन हात कसबीनं फिरवत माणिकला पकडायला पाहत होता.       शेवटी दोघंही इतकी हसायला लागली की, खालीच बसली.
       पारावरची माणसं जरा खुलली, करमणूक झाली होती ना त्यांची.
      आनंद म्हणाला, ‘‘अरे, हे माणक्या अन् हुस्न्या लई ढोंगी हायेत. समोरासमोर आली की एकमेकांवर गुरकतेत पण आतनं लई गुळपीट हाय त्यांच्यात.’’
       माणिक हा नाकेला, गोरटेला, सडपातळ, थोडा उंच, तर हुसेन थोडा बुटका, स्थूल शरीराचा काळासावळा. दाढी, बनियन, लुंगी हीच त्याची निशाणी. माणिक हा जसा हुसेनचा मित्र तसाच आणखी एक मित्र हुसेनला आहे, तो म्हणजे आबड्या ताशावाला.
       आता आबड्याचं खरं नाव अब्दुल आहे, हे आबड्यालापण पटकन सांगत यायचं नाही. लहानपणापासून त्याला सगळे आबड्याच म्हणतात, आबड्या ताशा वाजवायचं काम करायचा. त्याच्या ताशाच्या साक्षीनं कितीतरी जणांचे बारसे झाले, लग्न झाली, मुंजी झाल्या, दसर्‍याची पालखी, कुस्तीचा हगामा काय, कोणताही कार्यक्रम आबड्याचा ताशाशिवाय झाला नाही. आबड्यासुद्धा साधा माणूस. खाकी हाफ पँट. कधी-कधी पिंढरीपर्यंतचा पायजमा घातलेला, मळका शर्ट घातलेला, आबड्या मात्र ताशा जोशात वाजवायचा. ताशा वाजव म्हटलं की, त्याच्या आनंदाला जोर येऊन आणखी जोरात वाजवणारच. आबड्या गावात सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होता. ताशाची बिदागी आबड्याने कधीच तोंडाने सांगितली नाही, मालक देईन तेवढंच घ्यायचं, एवढंच त्याला माहीत. त्याच्या ह्या स्वभावाचा गैरफायदा काही बनेल वा चेंगट लोक घेत असत. आबड्या पैशाची अट घालून कधीच वाजवायला येत नसे.
        लोक देतील तेवढ्यात समाधान मानायचं एवढंच त्याचं सोपं तत्त्वज्ञान होतं. तो म्हणत असे, उद्या मी उपाशी मरायला लागलो तर गावातली माणसं देतील की पसा पसा जोंधळे.   
      आबड्याला बिडीशिवाय पैसे लागत नसत. खर्च काही नाही, कधी-कधी कोणीतरी खुशीनंच बिड्याचा कट्टल त्याला देई, त्याच्या गळ्यात ताशा असेल तर बिडीची कट्टलं देऊन कोणी म्हणे, ‘‘घुमव जरा तुझा ताशा अन् फूक फकाफका बिड्या.’’
       आबड्याला एक डोळा नव्हता, हुसेनभाईनं एकदा पोरांना जमवून आपल्या एकाक्ष मित्राची गोष्ट सांगितली –
       ‘‘पोरांनो, ह्या आबड्याला एक डोळा का नाही माहिती का? हा आबड्या तवा लई चाबरट होता. पोरगी दिसली की, नजर लावूनच बघत बसायचा. एखादी पोरगी लईच आवडली की, डोळा मारायचा. असं त्यानं एका पोरीला डोळा मारला, पण काय झालं, ती पोरगी साधी नव्हती, आवं तिच्यात देवी होती म्हणत्यात. तर काय झालं, बाजूच्या झाडातनं एक भुंगा आला, लई अफाट राव, तो आदळला ह्याच्या डोळ्यावर, ज्या डोळ्यानं तिला खुणावलं होतं. तर तो मारा इतका ताकदवान की आबड्या खालीच पडला. त्याला काय दिसंना. लागलं हातपाय झाडून वरडायला. तो भुंगा ह्याचा डोळाच घेऊन पसार झाला. आबड्याच्या जवा हे लक्षात आलं, तवा भुंगा दिसंना झाला. आबड्या ह्या झाडावर, त्या झुडुपावर भुंगा कुठं दिसतोय का म्हणून एक डोळा घेऊन फिरला, पण भुंगा पसार झाला. आबड्याला वाटलं, डोळा घावन इथं तिथं, पण काय घावला नाय. 
     ‘‘तवा म्हणलं, ‘आबड्या, आता इथनं पुढं ह्या डोळ्यांनी लई चावटपणा करत जाऊ नको.’ बाजूला पोरं गोट्या खेळत होती. त्यांच्याकडनं एक गोटी घेतली, ती गोटी होती गारगोटीवनी पांढरी. बसवली त्याच्या डोळ्यांत. तवापासनं त्याचा हा डोळा असा हाय बघा. गारगोटी बसवल्यावणी.’’ 
      पोरांना हुसेनभाईनं सांगितलेली ही गोष्ट खरीच वाटली. पण तरी काही मुलं थोडी चकित झाली. एकजण म्हणाला, ‘‘नायवो हुसेनचाचा, आबड्या गरीब माणूस, तो कोणाकडं वाईट नजरेनं बघत नाही. असं कसं होईल? त्यानं तर लग्नसुद्धा नाही केलं.’’
       हुसेन म्हणाला, ‘‘हे बघा कार्ट्यांनो, आबड्या जिवंतय. जावा त्याच्याकडं अन् इचारा हे खरंय का खोटंय.’’हुसेनच्या ह्या गप्पा आबड्याच्या कानावर गेल्या, तेव्हा तो म्हणाला, ‘‘ओ हुसेन, हमारा दोस्त है, उसको मस्करी करनेका परमिशन है’’ अन् हसत सुटला.
       आबड्याचं हसणंसुद्धा ताशासारखंच, ताडऽऽ ताडऽऽ ताडऽऽ     
  हुसेनचा कोणालाच राग येत नसे. त्यानं अशा गोष्टी सांगितल्या नाही तरच आश्‍चर्य. त्याच्या बाढा ऐकायला तर मुलंच काय पण मोठी माणसंसुद्धा उत्सुक असतात.     
  हा आबड्या ताशावाला मात्र लगीनसराई संपली की, हुसेनच्या बुढ्ढीकडं ताशा गहाण ठेवायचा. हुसेनची बुढ्ढी त्याला पंधरा रुपये द्यायची. ते पंधरा रुपये घेऊन तो मुंबईला जायचा. तिथं त्याच्या ओळखी होत्या. एका सोसायटीत जिन्याखाली तो राहायचा. दिवसभर तळलेले पापड विकत फिरायचा. दसरा आला की तो परत गावाकडं यायचा. 
       ताशा बुढ्ढीकडं गहाण ठेवण्यात त्याचे दोन फायदे – एक तर मुंबईला जायला पंधरा रुपये मिळायचे अन् ताशा सुरक्षित राहायचा. आबड्याचं घर चंद्रमौळी, ताशा सहज चोरीला गेला असता. ताशातच त्याचा जीव अडकलेला. बुढ्ढीच्या घरी ताशा ठेवला की तो बिनधास्त जाऊ शकायचा.
       मुलांनी एकदा हुसेनभाईला विचारलं, ‘‘चाचा, तुम्ही कधी गेला होता का मुंबईला?’’   
     ‘‘हो हो, ह्या आबड्याबरोबर गेलतोना एकदा.’’
      ‘‘मग सांगा बरं, मुंबई कसी वाटली? आमी तर कवाच नाय पायली.’’
      ‘‘सांगतो, सांगतो, उद्या-परवा-पुन्हा भेटल्यावर. आता नमाज पढायला जायचंय–’’        
 हुसेन गेला, मुलांना आता ऐकायची आहे त्याची मुंबई...
           - क्रमश:
 अरुण जाखडे

Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...