दिवस बरगडीचे होते. पाऊस चांगला झाला , पिके चांगली होती. हिरवेगार शेतं पाहून माणसं समाधानी होती. ज्वारीची कणसं निसवायला आली. हरभर्यात आता दाणे भरू लागले होते. ऐनवेळी आभाळ फिरू लागलं. आकाश गच्च भरून येत होतं , वाटायचं आता पाऊस येणारच. शेतकर्यांच्या पोटात धस्स झालं. कुठं कुठं थोडी झिमझिम पण झाली. पंधरा दिवस आभाळात ह्या काळ्या ढगांचा खेळ चालला होता. ह्या आभाळानं घाट्यांना लागलेला हरभरा दाणे आखडून घेऊ लागला. ज्याची भीती वाटत होती तेच एका रात्री झालं. तासभर वाव्हणी पाऊस झाला , रप , रप , रप. पिकाप्रमाणेच शेतकर्यांनी माना खाली टाकल्या. आता ज्वारीला टिक्का पडणार , म्हणजे दाण्यांना काळा डाग , दाणे रसरशीत होणार नाहीत. पावसानं पिकं पुन्हा उफाळून आली. उगीच हिरवेपणा घेऊन थोडी वाढली. हरभरा हिरवागार झाला पण सगळी आंब धुवून गेली. नुसतेच डहाळे वाढले. घाट्यात दाणा मात्र फुलेना. हुसेन आणखीनच गंभीर झाला. चेहर्यावरचा ताण तो लपवू शकत नव्हता. एकेदिवशी संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे भाऊ गप्पा मारत बसले. बुढ...