आज वडाच्या पाराभोवती गावातली जवळजवळ शे-पन्नास माणसं सकाळी , सकाळीच जमली. गावात पहिल्यांदाच एस.टी. येणार असल्यामुळे तिचे स्वागत आणि आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या उत्साहाने माणसं जमली होती. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं , आबड्या ताशावाला घरीच आहे. सरपंचांनी लोकांचा उत्साह पाहून त्याला पकडून आणायचा हुकूम केला. सकाळी साडेसात वाजता गाडी करमाळ्याहून येणार आणि पुढं राशीनमार्गे पुण्याला जाणार असा गाडीचा मार्ग ठरला होता. सरपंचांनी ह्यासाठी बरेच हेलपाटे मारले होते. एस.टी.च्या साहेब लोकांची मनधरणी केली अन् शेवटी शिव्या पण दिल्या होत्या. सरपंच खवळला म्हणजे कोणाचा राहत नाही. बाळासाहेब सरपंचाच्या ह्या कामगिरीमुळं लोक आज खूश होते. हुसेन म्हणाला , ‘‘ मी जरा तुमच्यामंधी बोलू का ?’’ ‘‘ अरे बोल , बोल , हुसेन , तू कुठंय ? आजकाल नजरं नाही येत ?’’ बाळासेट सरपंच. ‘‘ ह्याऽऽ ह्याऽऽ ह्याऽऽ ’’, हुसेननं ओशाळल्यासारखं हास्य केलं , अन् खाली मान घालून बोलला , ‘‘ एवढ्यात काय गावाची शीव नाय ओलांडली भाऊसायेब. पण मला तुमच्याबदलीच बोलायचं होतं इथं इषय निघाला म्हणून... ’’ ‘‘ आ बोल , बोल , लवकर बोल , एस.टी. आ...